रावणासारखा भाऊ हवाय?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Aug-2020   
Total Views |


Ravan_1  H x W:

हजारो वर्षं देश-विदेशातील लोक रामायण वाचत आहेत. जगभरातील लोक रामाला अक्षरश: डोक्यावर घेऊन नाचले. या हजारो वर्षांतील, हजारो पिढ्यांमधील कुणा विद्वानाने रावण एक आदर्श भाऊ होता, असा प्रचार केला नाही. पण, सध्या काही विद्वान मात्र ‘रावणासारखा चांगला बंधू या जगात नाही!’, ‘प्रत्येक स्त्रीला आपल्याला रावणासारखा भाऊ असावा असे वाटते,’ असा प्रचार करताना दिसतात. खरोखरच रावण हा एक चांगला बंधू होता का? पाहूया, वाल्मिकी रामायण काय सांगते ते...


रावणाला ‘चांगला’ भाऊ म्हणायचे मुख्य (आणि कदाचित एकमेव) कारण आहे - शूर्पणखेचे नाक-कान लक्ष्मणाने कापल्याचा सूड घेण्यासाठी रावणाने सीतेला पळवून आणले. यामध्ये किती बंधुप्रेम आहे, ते तपासू.

सुपासारखी नखे असलेल्या शूर्पणखेने अरण्यात संचार करताना राम-लक्ष्मणाला त्यांच्या कुटीजवळ पाहिले. रामाचे रूप पाहून ती त्याच्या सौंदर्यावर भाळली. शूर्पणखा म्हणते-
दीर्घबाहुः विशालाक्षः चीर
कृष्ण अजिन अम्बरः॥
कन्दर्प सम रूपः च रामो
दशरथ आत्मजः। ३-३४
अर्थात, हा दाशरथी राम पिळदार बाहूंचा, मोठ्या डोळ्यांचा, काळे मृगार्जीन धारण केलेला, साक्षात मदनाचा पुतळा आहे!

अशा रामाला तिने लग्नाची मागणी घातली. रामाने आपले एकपत्नीव्रत सांगितले. मग तिने लक्ष्मणाला लग्नाची मागणी घातली. त्याने देखील नकार दिला. तेव्हा ती सीतेच्या जीवावर उठली. एखाद्या मनुष्यावर हल्ला करून, आपल्या तीक्ष्ण व मोठ्या नखांनी त्याला फाडून खाऊ शकणारी ती नरभक्षक राक्षसी आहे. लक्ष्मणाने तत्काळ तिचे नाक-कान कापले. लग्नाला नकार देणार्‍या राम-लक्ष्मणावर हल्ला करायला तिने आपल्या बंधूंना खर व दूषणाला ससैन्य पाठवले. पण, त्यांचे राम-लक्ष्मणासमोर काही चालले नाही.
मग शूर्पणखा रावणाकडे आपली तक्रार घेऊन गेली. रावणाला काही तिचे नाक-कान कापल्याचा सूड घ्यावा, असे वाटले नाही. रावण हा पर दार अभिमर्शनम् परस्त्रीकडे आकर्षित होणारा, त्यांचा विनयभंग करणारा होता, हे तिला माहीत होते. मग तिने आपला पवित्रा बदलला व रावणाला सांगितले, “अरे, त्या रामाची बायको फार सुंदर आहे. जा तिला बळजबरीने पळवून आण. तिची इच्छा असो नसो, तिच्याशी लग्न कर. तुझ्यासारख्या बलाढ्य राजाकडे अशी सुंदर राणी असायलाच हवी!”
शूर्पणखेने केलेल्या सीतेच्या वर्णनावर रावण भाळला. स्वत:साठी सुंदर बायको मिळावी, म्हणून सीतेला पळवायचा त्याला मोह झाला. तस्मात् त्याने सीतेला पळवले, ते शूर्पणखेला दिलेल्या शिक्षेचा बदला घेण्यासाठी नव्हे, तर स्वत:च्या मोहासाठी! सीतेला पळवून न्यायला आलेला रावण “शूर्पणखेचे नाक-कान कापले म्हणून मी तुला पळवायला आलो,” असे म्हणत नाही. तो म्हणतो, “हे सुंदरी, तुझ्यावर माझे मन बसले आहे. माझी लंकानगरी अतिशय सुंदर आहे. तू माझ्यासोबत ये, मी तुला सुखात ठेवीन. इथे रामाबरोबर कुटीत राहून तुला काय मिळणार आहे?”
सर्व राक्षस भर्तारम् कामय-
कामात्-स्वयम् आगतम्।
न मन्मथ शर आविष्टम् प्रति आख्यातुम् त्वम् अर्हसि ॥ ३१७-४८
अर्थात, सर्व राक्षसांचा राजा असलेला मी, मदनाच्या बाणांनी घायाळ होऊन स्वत:हून तुझ्याकडे चालत आलो आहे. माझ्या प्रस्तावाला नकार देऊ नकोस!

शूर्पणखेच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा - रावणाने शूर्पणखेच्या नवर्‍याला विद्युत जिह्वाला यापूर्वीच मारले होते. परपुरुषावर आसक्त होणारी, दुसर्‍या स्त्रीचा नवरा बळजबरीने घेऊ पाहणारी शूर्पणखा - नवर्‍याला मारल्यामुळे असे वागत होती का? तिच्या भावाच्या या कर्तृत्वामुळेच पुढचं सगळं ओढवलं होतं का?
‘बंधू’ म्हणून रावण त्याच्या भावांशी कसे वागला, हे देखील पाहण्यासारखे आहे. कुबेर, रावण, विभीषण आणि कुंभकर्ण हे चौघे भाऊ. लंकेवर मोठा भाऊ कुबेर राज्य करत होता. काही कारणाने चिडलेल्या रावणाने आपल्या मोठ्या भावाशी, कुबेराशी द्वंद्व केले व त्याच्याकडून लंका बळकावून घेतली. भिक्षा मागायला आलेला रावण मोठ्या प्रौढीने सीतेला सांगतो –


येन वैश्रवणो भ्राता वैमात्रः कारणांतरे ।
द्वन्द्वम् आसादितः क्रोधात्
रणे विक्रम्य निर्जितः ॥ ३४-४८
मत् भय आर्तः परित्यज्य
स्वम् अधिष्ठानम् ऋद्धिमत् ।
कैलासम् पर्वत श्रेष्ठम्
अध्यास्ते नर वाहनः ॥ ३-४८-३
अर्थात, कुबेराकडून मी लंका जिंकून घेतली. त्याचे पुष्पक विमान बळकावले. त्याला सळो की पळो करून सोडले. मला घाबरून तो कैलासात पळून गेला. असा मी पराक्रमी शक्तिशाली दशानन आहे!

रावणाने कुबेराकडून त्याचे राज्य, विमान, संपत्ती सगळे लुटले, तरी त्याचे समाधान झाले नाही. रावणाने कुबेराची पुत्रवधू, म्हणजे आपल्या पुतण्याची, नलकुबेराची बायको नासवली. ते कळल्यावर नलकुबेराने रावणाला शाप दिला - “पुन्हा कुठल्या स्त्रीवर जबरदस्ती केलीस, तर तुझा मृत्यू होईल!” आजच्या भाषेत सांगायचे तर त्याने बायकोवर अत्याचार करणार्‍या स्वत:च्या काकाला धमकी दिली, ”If you rape another woman, I will personally come to Lanka and kill you.'' हा रावणाचा मोठ्या भावाशी व्यवहार!
आता त्याने धाकट्या भावांशी केलेला व्यवहार पाहू. विभीषणाने रावणाला कळकळीने सांगितले, “सीतेला पळवून आणलेस ते तू बरे केले नाहीस. सीतेला रामाला देऊन टाक, नाहीतर लंकेचा सत्यानाश होईल.” कटू, परंतु सत्य बोल सांगणार्‍या विभीषणाला रावण म्हणतो –


योऽन्यस्त्वेवम्विधम् ब्रूयाद् वाक्यमेतन्निशाचर।
अस्मिन् मुहूर्ते न भवेत् त्वाम् तु धिक् कुलपांसनम् ॥ ६१६-१६


अर्थात, “अरे निशाचर राक्षसा! हे दुसर्‍या कुणी म्हटले असते तर मी त्याचे मस्तक उडवून टाकले असते. तू माझा भाऊ आहेस म्हणून तुला मी मारत नाही. कुलनाशका! धिक्कार असो तुझा! तुला शाप लागो!”

हृदयाला टोचणारे शब्द ऐकून विभीषणाने लंका सोडली व तो रामाला जाऊन मिळाला. 
तीन भावांपैकी एकच भाऊ रावणाच्या बाजूने लढायला उभा राहिला - तो म्हणजे कुंभकर्ण. रामाशी लढायला जाणे हे मृत्युमुखी जाण्यासारखेच होते. कुंभकर्णाला रावणाने मृत्यूच्या खाईत लोटले.
तात्पर्य, रावण ‘आदर्श बंधू’ म्हणून शोभत नाही. तरीही ज्यांना रावणासारखा भाऊ हवाय, त्यांची शूर्पणखेसारखी बहीण होण्याची तयारी आहे का?


जी स्त्री आपल्या भावाला दुष्कर्म करायला सांगते, जी स्त्री दुसर्‍या स्त्रीवर अन्याय घडवून आणते, जी स्त्री लग्नाला नकार देणार्‍या पुरुषाला जीवे मारायला उठते, जी स्त्री भावाच्या नाशाला कारणीभूत होते, जी स्त्री परपुरुषावर आकृष्ट होते, जी स्त्री क्षणात एकाशी तर क्षणात दुसर्‍याशी लगट करू शकते, अशाच स्त्रीला रावण हा भाऊ म्हणून शोभतो. ज्या स्त्रीला रावणासारखा भाऊ हवाहवासा वाटत असेल, तिने आपण शूर्पणखेसारख्या वागत आहोत का, हे तपासणे नितांत गरजेचे आहे.

जर कुणाला रावणासारखा भाऊ हवासा वाटत असेल, तर हा देखील विचार करावा - तुमच्या पतीला त्या रावणासारख्या भावाने (मारायचं राहिलं दूर) मानपानात जरी काही कमी केलं तर चालते का? किंवा शेजारणीने तिच्या रावणासारख्या भावाला तुमच्या पतीविषयी खरी-खोटी कागाळी केली, आणि तिच्या म्हणण्याखातर त्याने तुम्हाला (पळवून नेणे वगैरे राहिलं दूर!!) पण चार अपमानकारक शब्द जरी बोलले तर तुम्ही तिच्या ‘रावणासारख्या’ भावाचे कौतुक कराल का? तुमचा ‘रावणासारखा भाऊ’ ठीक आहे, पण गावभर असल्या रावणासारख्या भावांच्या टोळ्या फिरायला लागल्या, तर काय कराल?


@@AUTHORINFO_V1@@