कलियुगातील शिशुपाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jul-2020   
Total Views |


Rahul Gandhi and Modi_1&n

शिशुपाल आपल्या कर्माने मेला, असे आपण म्हणतो. या देशात त्या शिशुपालाचे असंख्य अवतार आहेत. मोदी काही कृष्ण नाहीत आणि त्यांच्या हातात सुदर्शनचक्रदेखील नाही. कलियुगातील श्रीकृष्ण म्हणजे जनता जनार्दन आहे. तिच्या बोटावरील काळी शाई हे तिचे सुदर्शन चक्र आहे.



श्रीकृष्ण चरित्रात शिशुपाल हा खलनायक स्वरूपात येतो. राजसूय यज्ञात अग्रपूजेचा मान श्रीकृष्णाला देण्याचे धर्मराज ठरवितो. जमलेले ऋषी आणि राजे त्याला अनुमोदन देतात. शिशुपाल देत नाही. तो म्हणतो, ‘‘तुमच्या सर्वांची बुद्धी मेली आहे, हा श्रीकृष्ण आहे कोण? तो गवळ्याचा पोर आहे, एखाद्या कावळ्याला हविष्यान्न देणे योग्य आहे का? एखाद्या गिधाडाला सिंहाचा भाग कसा देता येईल. हा कुलहीन आहे, जातिहीन आहे, वर्णहीन आहे. जरासंधाला घाबरून बऱ्याच वेळा मथुरेतून गेला आहे. गोकुळात हा चोऱ्या करीत होता, हा खोटारड्या आहे, खोटं बोलतो, अनेक गोष्टी लपवून ठेवतो, फसवून मारतो, हा अग्रपूजेच्या लायकीचा नाही.’’ 
 

हे जेव्हा मी वाचले, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव्या घालणारे अनेक चेहरे कापाठोपाठ एक आले. इथे मला नरेंद्र मोदी यांना कृष्णाच्या बरोबरीने बसवायचे नाही. त्यांनाही ते मुळीच आवडणार नाही. शिशुपाल कृष्णाला म्हणतो, ‘हा गवळ्याचा पोर आहे.’ काँग्रेसी आणि डावे म्हणतात, ‘नरेंद्र मोदी हा चायवाल्याचा मुलगा आहे.’ शिशुपाल म्हणतो, ‘कृष्ण चोर्‍या करीत होता.’ राहुल गांधी म्हणतात, ‘चौकीदार चोर आहे.’ राहुल गांधी आणखी म्हणतात, ‘मोदी चोर आहेत, लोकांची फसवणूक करतात, सत्य झाकून ठेवतात.’ शिशुपाल म्हणतो, ‘याची अग्रपूजा केली तर सर्वांचा घोर अपमान होईल.’ माजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले होते की, ‘मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास, देश भयानक आपत्तीत जाईल.’
 

चीनच्या प्रश्नावर राहुल गांधी म्हणतात, ‘सरेंडर मोदी म्हणजे शरणागत मोदी.’ शिशुपाल कृष्णाला म्हणाला की, ‘हा रणांगणातून पळून गेला आहे, म्हणून तो रणछोड आहे.’ शिशुपालाचा राजसूय यज्ञातील शंभरावा अपराध होता, त्यापूर्वी त्याने ९९ अपराध केले होते. ९९ वेळा त्याने कृष्णाला किती आणि कोणत्या शिव्या दिल्या असतील, याची माहिती मी घेतलेली नाही. पण, एकदा भाषण करताना अमित शाह यांनी मोदी यांना काँग्रेस आणि डाव्या लोकांनी किती शिव्या दिल्या याची यादी दिली आहे. ती अशी आहे, ‘यमराज, मौत का सौदागर, रावण, गंदी नाली का कीडा, माकड, भस्मासुर, गंगू तेली, नीच, देशाला आग लावणारा, धार्मिक तेढ वाढविणारा.’ अमित शाह यांनी काही मोजक्याच शिव्या नमूद केलेल्या आहेत. कृष्णाच्या चरित्रात एकच शिशुपाल होता. मोदी यांच्या जीवन काळात असे अनेक शिशुपाल जन्मले आहेत. ते मनात येईल ते बोलतात, वाटेल त्या शिव्या देतात, वाटेल ते आरोप करतात आणि वर काय म्हणतात माहीत आहे? ‘आमच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर बंधने आणली जात आहेत, आम्हाला बोलू दिले जात नाही, दुसर्‍या आणीबाणीचा कालखंड सुरू झाला आहे, आमच्यावर नजर ठेवली जाते, आमचे फोन टॅप होतात, आमचा जीव गुदमरतो आहे.’ अशा गुदमरणार्‍या जीवांनी काही वर्षांपूर्वी पुरस्कार वापस केले, त्यातला एकही पुरस्कार मोदी सरकारने दिलेला नव्हता. ही सगळी भाडोत्री मंडळी होती. डाव्या लोकांनी त्यांना खूप मोठे करून ठेवले होते. त्यांचे वस्त्रहरण झाले. ‘पुरस्कारवापसी’चे स्वातंत्र्य ज्या देशात आहे, त्या देशात अभिव्यक्तिस्वातंत्र्य नाही, असे म्हणणे हा मोठा विनोद आहे. असे अफलातून विनोद करण्यात डाव्या डोक्यांशी आपण बरोबरी करू शकत नाही.
 
आपण अशी कल्पना करू की, देशात शी जिनपिंगचे राज्य आहे किंवा उत्तर कोरियाच्या किंग जोंग उनचे राज्य आहे. नुसती कल्पना, बरं का!! आणि या मंडळींनी वर ज्या शिव्या दिल्या आहेत, त्या देशप्रमुखाला दिल्या असत्या, तर काय झालं असतं या लोकांचं? हाडूक तर सोडा, पण साधी राखही बघायला मिळाली नसती. तसे हे अभिव्यक्तिस्वातंत्रवादी जेव्हा अत्यंत सुरक्षित असतात, तेव्हा ते अत्यंत शूर असतात. आणीबाणीच्या कालखंडात मी तुरुंगात गेलो. त्यावेळी देशातील सगळे बुद्धिवादी डुकराच्या बिळात किंवा उंदराच्या बिळात जाऊन लपले होते. आवाज काढायची कोणाची हिंमत नव्हती. आता माझा बुद्धिवाद्यांशी खूप संबंध येतो. बुद्धिवादी सत्ता, पुरस्कार, मानसन्मान याचा भुकेला असतो. यावर जरासे जरी संकट येण्याची शक्यता निर्माण झाली की, तो सुरक्षा कवचात जातो, जे सत्ताधारी असतात, त्यांच्यापुढे नम्र असतो. डावे बुद्धिवादी काँग्रेसने पोसले, त्यांना चारा मिळणे बंद झाले आहे. त्यांची भुकेची बोंब आहे. आज आम्ही सत्तास्थानी असल्यामुळे ते लाचाराप्रमाणे व्यवहार करतात. कधी टोपी फिरवतील, याचा नेम नाही.
 
नरेंद्र मोदी यांना एवढ्या शिव्या घातल्या जातात, पण नरेंद्र मोदी यांचे मानसिक संतुलन कधीही बिघडत नाही. ते कोणाच्याही शिव्यांना भीक तर घालीत नाहीतच. परंतु, उत्तरही देत नाहीत. राहुल गांधी दररोज मोदींवर टीका करीतच राहतात. आई त्यांना पत्र लिहीत राहते आणि बहीण काहीना काही बोलत राहते. परंतु, मोदी या तिघांचा आपल्या भाषणात चुकूनही उल्लेख करीत नाहीत. याला म्हणतात, ‘कृष्णनीती.’ राहुल गांधी स्वतःला मोदींच्या बरोबरीचे समजतात. त्यांचा उल्लेख केला तर, त्यांना आपल्या बरोबरीने आणून बसविण्यासारखे होईल. मोदी हे करीत नाहीत. सामान्य व्यव्हारातदेखील जर एखादा प्राध्यापक भाजीवाल्याशी भांडण करू लागला, तर त्या प्राध्यापकाची इभ्रत जाते. भांडण आपल्या बरोबरीच्या माणसाशी करायचे असते. राहुल गांधीला तर लोकांनी काही वर्षांत ‘पप्पू’ ठरवून टाकले. मोदी त्यांना ‘पप्पू’देखील म्हणत नाहीत. त्यांचा उल्लेख काही काळ त्यांनी ‘शहजादे’ असा केला. ‘शहजादे’ म्हणजे राजपुत्र आणि नुसता राजपुत्र नाही तर ‘मुस्लीम राजपुत्र’ असा त्याचा अर्थ होतो. एकच शब्द, पण राहुल गांधींचे चाक पंक्चर करण्यात करणारा ठरला. मोदींनी नंतर त्यांचा उल्लेख ‘एक युवा नेता जो अभी बोलना सिख रहा है’ असा सुरू केला. या डाव्या मंडळींची अनेक संकेतस्थळे, वृत्तवाहिन्या आहेत. ‘दी वायर’, ‘दि प्रिंट’, ‘स्क्रोल’, ही सर्व राष्ट्रीय विचारांचा पराकोटीचा द्वेष करणारी आहेत. त्यावर येणारे लेख बारकाईने वाचण्याची सवय करून घ्यायला पाहिजे.
 
मोदी संतापावेत म्हणून त्यांच्या विरुद्ध अत्यंत वाईट भाषेत काँग्रेसची नेतेमंडळी आणि त्यांचे दोस्त डावी मंडळी बोलत असतात. यापैकी कोणीही मूर्ख नाहीत. आपण समजतो त्यापेक्षा ते अधिक शहाणे आहेत. हे एक प्रकारचे मानसिक, ‘सायकॉलॉजिकल युद्ध’ असते. समोरच्याला उत्तेजित करायचे, तो संतापेल अशा प्रकारची भाषा वापरायची. या मंडळींपैकी कोणी गीता वाचतात की नाही, मला माहीत नाही. बहुतेक नसावे. मोदींची ती पाठ असावी. श्रीकृष्ण या सर्वांचा बाप आहे. गीतेतल्या दुसर्‍या अध्यायात तो म्हणतो,


‘क्रोधाद्भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः।
स्मृतिभ्रंशादबुद्धिनाशो बुद्धिनाशातप्रणश्यति ॥
रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन।
आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति॥


कृष्णाला सांगायचे आहे की, रागाच्या आहारी जाऊ नये. वासनेतून रागाचा जन्म होतो, रागाच्या आहारी जेव्हा माणूस जातो तेव्हा तो अविवेकी होतो. अविवेकी झाला की, चांगले काय, वाईट काय हे त्याला सुचत नाही आणि त्यामुळे त्याचा बुद्धिनाश होतो आणि एकदा बुद्धिनाश झाला की सर्वस्वाचा घात होतो. मोदी शांत आहेत. ते क्रोधाच्या आहारी जात नाहीत. जिभेवर नियंत्रण नसणार्‍यांच्या नादी ते लागत नाहीत. ही मनस्थिती जो प्राप्त करतो, तो नेहमी प्रसन्न असतो. आणि नरेंद्र मोदी भगवान श्रीकृष्णाचे अनुसरण करताना दिसतात. रागाच्या आहारी जायचे नाही. माता, पुत्र आणि भगिनी यांना उत्तरे देत बसायची नाहीत. अपघाती माजी पंतप्रधानांच्या आरोपांना देखील काही उत्तरं द्यायची नाहीत, शांतपणे आपली वाट चालत राहायची. आपण जबाबदार आहोत ते १३० कोटी जनतेला, स्वतःच्या विवेकबुद्धीला, बाकी सर्व तांदळाच्या भुशासारखे आहेत.
 
सिनेनट कमल हसन हे आता राजनेते झालेले आहेत. चित्रपटातील संवाद लिहिणारा दुसरा कोणी तरी असतो. राजकीय संवाद तर स्वतःला लिहावे लागतात. या ‘हसन’ नावावरून कोकणात एक विनोद आहे. एसटीच्या गर्दीत हसन चढलेला आहे, गर्दीत रेटारेटी होत असते, त्यावेळी हसन म्हणतो, “आगे हसन, बीच में हुसेन, पिछे बीबी हुस्न, जगा मिळेल तर बसेन.” असे हे कमल हसन अभिनेते म्हणून फार मोठे आहेत, त्यांच्या अभिनयाला सलाम. पण ते जेव्हा मोदींना लक्ष्य करतात, तेव्हा ‘आगे हसन, बीच में हुसेन’ अशी त्यांची अवस्था होते. मोदी सरकार, ‘बाल्कनी गव्हर्नमेंट’ आहे, असे ते म्हणतात. बाल्कनीचे तिकीट पैसेवाले काढतात. म्हणजे पैसेवाल्यांचे सरकार आहे, असा याचा अर्थ झाला. मोदींनी तर ८० कोटी गरिबांना नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य देण्याची योजना आखली आहे. 
 
मध्यंतरी देशातील ४९ ‘सेलिब्रिटीं’नी मोदींच्या नावाने पत्र लिहिले. ‘सेलिब्रिटी’ हा माझा शब्द नाही. हा डाव्या लोकांचा शब्द आहे. या ‘सेलिब्रिटी’ एवढ्या मोठ्या आहेत की, माझ्यासारख्या खूप वाचन करणार्‍यालादेखील यातील ९५ टक्के नावे प्रथमच लक्षात आली. सामान्य लोकांना आपल्या गल्लीतील कुत्रं माहीत असतं. दुर्दैवाने ही नावे त्यांना माहीत नाहीत. शिशुपालाचे १०० अपराध झाल्यानंतर सुदर्शनचक्र सोडून श्रीकृष्ण शिशुपालाचे शीर धडापासून वेगळे करतो. हे धर्मयुद्ध असल्यामुळे कृष्णाला कोणी दोष देत नाही. शिशुपाल आपल्या कर्माने मेला, असे आपण म्हणतो. या देशात त्या शिशुपालाचे असंख्य अवतार आहेत. मोदी काही कृष्ण नाहीत, आणि त्यांच्या हातात सुदर्शनचक्रदेखील नाही. कलियुगातील श्रीकृष्ण म्हणजे जनता जनार्दन आहे. तिच्या बोटावरील काळी शाई हे तिचे सुदर्शन चक्र आहे. फक्त या जनार्दनाने नित्य जाणीव ठेवली पाहिजे की, मी श्रीकृष्ण आहे, आणि माझ्या बोटावर सुदर्शन आहे आणि ते योग्य वेळी अपराध पूर्ण झाल्यानंतर सोडले पाहिजे.
 
 

@@AUTHORINFO_V1@@