मान्सून इफेक्ट; महाराष्ट्रातील किनाऱ्यांवर महिन्याभरात ४३ जखमी कासवे आली वाहून

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jul-2020   
Total Views |
turtle _1  H x

 
 
कांदळवन कक्ष, डब्लूसीएडब्लूए आणि स्थानिकांचा बचावासाठी पुढाकार

 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) - गेल्या महिन्याभरात महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ४३ समुद्री कासवे वाहून आली आहेत. पावसाचा जोर वाढल्यापासून ही कासवे जखमी, मृतप्राय आणि मृताअवस्थेत किनाऱ्यावर आढळून येत आहेत. वन विभागाचा 'कांदळवन कक्ष' (मॅंग्रोव्ह सेल) आणि डहाणू येथील 'सागरी कासव शुश्रूषा केंद्र' या कासवांवर उपचार करण्याचे नियोजन करत आहेत.
 
 
 
turtle _1  H x
 
 
 
दरवर्षी पावसाळी हंगामात राज्याच्या किनारपट्टीवर मोठ्या संख्येने सागरी कासवे वाहून येतात. पावसाळ्यात खवळलेल्या समुद्राच्या जोरदार लाटांच्या तडाख्याने अशक्त आणि जखमी कासवे किनाऱ्यांवर फेकली जातात. मच्छीमारांकडून समुद्रात अनावधनाने सुटलेल्या जाळ्यामध्ये (घोस्ट नेट) बऱ्याचदा ही कासवे अडकली जातात. हे जाळे लाटांच्या माऱ्यामुळे किनाऱ्यावर वाहून येते. अशा पद्धतीने जाळ्यात अडकलेली किंवा जखमी वा अशक्त अवस्थेतील कासवे राज्याच्या किनारपट्टीवर सापडू लागली आहेत. 'कांदळवन कक्षा'कडून मिळलेल्या माहितीनुसार गेल्या महिन्याभरात मुंबईत ३, रायगडमध्ये ६, रत्नागिरीत ५ आणि सिंधुुदुर्गमध्ये ७ कासवे आढळली आहेत. तर 'वाईल्डलाईफ काॅन्झर्वेशन अॅण्ड अॅनिमल वेलफेअर असोसिएशन'च्या (डब्लूसीएडब्लूए) स्वयंसेवकांनी डहाणू-पालघरच्या किनाऱ्यांवरुन २२ कासवांचा बचाव केला आहे. 'कांदळवन कक्षा'ने स्थापन केलेल्या 'मरिन रिस्पोन्डट ग्रुप'मुळे या कासवांचे नियोजन सुरळित करण्यात यश मिळत आहेत.
 
 

turtle _1  H x  
 
 
 
 
डहाणूमधील 'सागरी कासव शुश्रूषा केंद्रा'चे व्यवस्थापन वन विभाग आणि 'डब्लूसीएडब्लूए' या संस्थेमार्फत केले जाते. ११ जूनपासून आजतागायत आम्ही डहाणू-पालघरमधील विविध किनाऱ्यांवर वाहून आलेली २२ कासवे ताब्यात घेतली असून त्यापैकी २० कासवे जीवंत आणि २ मृतावस्थेत आढळल्याची माहिती 'डब्लूसीएडब्लूए'चे प्रमुख आणि डहाणूचे मानद वन्यजीव रक्षक धवल कनसारा यांनी दिली. यामधील बहुतांश कासवांचे पर जाळ्यात अडकल्याने कापलेले आहेत. शिवाय कवचाला जखमा झाल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबईत सापडलेल्या ३ कासवांपैकी एक मृत होते. या कासवांच्या उपचारासाठी ऐरोलीतील 'किनारा आणि सागरी जैवविविधता केंद्रा'च्या आवारात उभारण्यात येणारे प्राथमिक उपचार केंद्र महिन्याभरात कार्यान्वित होणार आहे. सिंधुदुर्गमध्ये आढळलेल्या सात कासवांपैकी एक कासव पुन्हा समुद्रात सोडले आहे. इतर सहा कासवांवर तारामुंबरी येथील भैरवनाथ महिला बचतगटाच्या मत्स्यपालन प्रकल्पात उपचार सुरू असल्याची माहिती स्थानिक रहिवासी लक्ष्मण तारी यांनी दिली. यामधील गंभीर जखमी कासवे डहाणूच्या केंद्रात हलविण्याबाबत 'कांदळवन कक्षा'कडून विचार सुरू आहे.
 
 
 
मोठ्या संख्यने किनाऱ्यावरुन वाहून येणाऱ्या कासवांवर उपचार करण्याच्या अनुषंगाने 'कांदळवन कक्षा'ने डहाणूमधील केंद्रात कासव तज्ज्ञ पशुवैद्यक डाॅ. दिनेश विन्हेरकर यांची नियुक्ती केली आहे. त्यांचे मानधन आणि प्रवास खर्च हा कक्षाकडून दिला जाणार आहे. याशिवाय सिंधुदुर्गात उपचार घेत असलेल्या कासवांसाठी आवश्यक ती आर्थिक मदत करण्यात येईल. - विरेंद्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन कक्ष
 
 
 
 
साधनांची आवश्यकता  
डहाणू येथील केंद्रामध्ये कासवांवर उपचार करण्यासाठी काही साधनांची आवश्यकता भेडसावत आहे. यामध्ये जखमी कासवांना वाहून आणण्यासाठी ट्राॅली, स्टेचर सोबतच त्यांच्या तपासणीकरिता एक्स-रे मशीन, जलशुद्धीकरण यंत्रणा या उपकरणांची गरज आहे. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@