कलारत्न ‘शोभना’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jul-2020   
Total Views |

shobhana_1  H x
अभिनयाबरोबरच शास्त्रीय नृत्यक्षेत्रात देशात आघाडीचे नाव कमावणार्‍या अभिनेत्री आणि नर्तकी शोभना यांच्याविषयी...
भारतीय शास्त्रीय नृत्यामधील भरतनाट्यम नृत्यशैलीचे शास्त्रोक्त शिक्षण घेऊन त्यानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत भरघोस प्रसिद्धी आणि यश संपादन करणारे नाव म्हणजे शोभना चंद्रशेखरन पिल्लई उर्फ शोभना. चित्रपटसृष्टीत काम करत असताना अभिनयाबरोबर त्यांनी आपली नृत्यकलाही जोपासली. त्यामधील चिकाटी आणि पावित्र्य कायम ठेवून शास्त्रीय नृत्यक्षेत्रातही त्यांनी आपले मानाचे स्थान निर्माण केले. आजही त्यांचे नृत्यसादरीकरण प्रेक्षकांना दैवी अनुभूती घडवून आणते. चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीमध्ये त्यांना अभिनयासाठी दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार आणि केरळ राज्य चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला आहे, तर कलाक्षेत्रातील सर्वांगीण योगदानासाठी भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे.


शोभना यांचा जन्म दि. २१ मार्च, १९७० रोजी केरळमध्ये झाला. सर्वसाधारणपणे दाक्षिणात्य कुटुंबाची नाळ ही कला क्षेत्रातील कोणत्यातरी शाखेशी जोडलेली असेतच. शोभना यांची कौटुंबिक पार्श्वभूमीही नृत्य आणि चित्रपट सृष्टीभोवती गुंतलेली होती. शास्त्रीय नर्तिका आणि अभिनेत्री ललिता, पद्मिनी आणि रागिणी या प्रसिद्ध त्रावणकोर बहिणींची शोभना या भाची. शिवाय अभिनेत्री सुकुमारी त्यांची मावशी. मल्याळम अभिनेत्री अंबिका सुकुमारन त्यांच्या नातेवाईक. त्यामुळे साहजिकच शोभना यांचा ओढा हा लहानपणापासूनच कलाक्षेत्राच्या दिशेने वाढला. भरतनाट्यम नृत्यांगना चित्रा विश्वेश्वरन आणि पद्म सुब्रह्मण्यम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नृत्याचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्याचदरम्यान त्यांनी चित्रपटामधून बालकलाकार म्हणून काम करण्यास प्रारंभ केला. १९७२ साली प्रसिद्ध झालेल्या ‘अमर प्रेम’ या हिंदी चित्रपटामधून शोभना यांनी ‘बालकलाकार’ म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. १९८२ साली दिग्दर्शक बालचंद्र मेनन यांनी ‘एप्रिल १८’ या चित्रपटामध्ये त्यांना नायिकेची भूमिकेकरिता विचारणा केली. या चित्रपटामध्ये त्यांनी साकारलेल्या सर्वसामान्य मुलीच्या वास्तववादी अभिनयामुळे त्यांना प्रेक्षकांची दाद मिळाली. पहिल्या चित्रपटामधील त्यांच्या नायिकेच्या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्यामुळे पुढे त्यांना चित्रपटासंदर्भात विचारणा होऊ लागल्या. याचवर्षी त्यांनी तामिळ चित्रपटसृष्टीत प्रवेश करुन एसपी मथुरामन दिग्दर्शित ‘एनाकुल ओरूवन’ या चित्रपटामध्ये भूमिका केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करु शकला नाही. त्यामुळे तामिळ चित्रपटांची वाट सोडून शोभना मल्याळम चित्रपटांकडे वळल्या.


मल्याळम चित्रपटसृष्टीत काम करत असतानाच त्यांनी प्रसिद्ध अभिनेते सत्यराज, विजयकांत आणि भाग्यराज यांच्यासोबत अधूनमधून तामिळ चित्रपटांमध्येही अभिनय केला. या चित्रपटांमधील त्यांच्या मोहक अभिनयाला प्रेक्षकांची साथ मिळाली. १९८०-९०च्या दशकात त्या दक्षिण चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या आणि प्रथितयश नायिका म्हणून प्रकाशझोतात आल्या. १९८५ या एकाच वर्षांत त्यांचे १६ चित्रपट प्रसिद्ध झाले. मल्याळम, तेलुगू, हिंदी चित्रपटात अभिनय करण्याबरोबरच त्यांनी इंग्रजी चित्रपटांमध्येही अभिनय केला. ए. एम. फाझीलच्या दिग्दर्शित ‘मनिचित्रथझू’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना १९९४साली सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर शोभना आपल्या चित्रपटांतील भूमिका फार काळजीपूर्वक निवडू लागल्या. रेवती दिग्दर्शित ‘मित्र, माय फ्रेंड’ या भारतीय इंग्रजी भाषेच्या चित्रपटातील भूमिकेसाठी शोभना यांना २००१मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा दुसरा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. आपल्या अभिनयाच्या करिअरमध्ये त्यांनी जवळपास २५०हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. गोपालकृष्णन, जी. अरविंदन, के. बालाचंदर, एएम फाजील, मणिरत्नम, भरथन, उपलापती नारायण राव आणि प्रियदर्शन या प्रतिथयश दिग्दर्शकांसोबत काम केले. अभिनयाच्या या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी आपली भरतनाट्यम नृत्यकला कुठेही मागे पडू दिली नाही. त्याचा रियाज आणि सादरीकरणामधील सातत्य त्यांनी अभिनयाच्या कारकिर्दीदरम्यानही कायम ठेवले होते.

अभिनयामधील करिअरच्या उच्चतम शिखरावर असतानाचा शोभना यांनी 1989 साली ‘कालिपिन्या’ या नावाने आपली नृत्य प्रशिक्षण शाळेची स्थापना केली. ‘विजय’ टीव्हीवर प्रसारित झालेल्या डान्स रिअ‍ॅलिटी शो ‘जोडी नंबर १’ यामध्ये त्या परीक्षक म्हणून सहभागी झाल्या होत्या. त्यांनी तबलावादक झाकीर हुसेन, विक्कू विनायकराम आणि मंडोलिन श्रीनिवास यांच्या समवेत अनेक कार्यक्रम केले आहेत. 1985 ते 1995 दरम्यान त्यांच्या नृत्य कार्यक्रमांसाठी झालेल्या परदेशी दौर्‍यादरम्यान त्यांनी अमेरिकेतील जागतिक मल्याळी अधिवेशन, मलेशियन राजघराणे, युनायटेड स्टेट्स, युरोप, दक्षिण पूर्व आशिया आणि ऑस्ट्रेलियामधील असंख्य शहरात सादरीकरण केले. १९९४ साली त्यांनी शोयना सौरिया कृष्णमूर्ती यांनी आयोजित केलेल्या प्रतिष्ठीत ‘सोर्या म्युझिक अ‍ॅण्ड डान्स फेस्टिव्हल’ मध्ये सादरीकरण केले. १९९९साली जर्मनीच्या म्युनिक येथे ‘मायकेल जॅक्सन अ‍ॅण्ड फ्रेंड्स’ कार्यक्रमात शोभाना यांनी प्रभू देवा आणि ए. आर. रहेमान यांच्यासह तामिळ चित्रपटांच्या नृत्य मंडळांसह सादरीकरण केले. २००० मध्ये मणिरत्नमच्या नेत्रू, इंद्रू, नालाई या स्टेज शोमध्येही त्या सहभागी झाल्या. याखेरीस रामायणावर आधारित त्यांनी नृत्यदिग्दर्शित केलेली नाटिकाही बरीच गाजली. कलाक्षेत्रातील या कामगिरीसाठी २००६ साली भारत सरकारने ‘पद्मश्री’ सन्मानाने, तर २०१४साली केरळ सरकारने ‘कला रत्न’ पुरस्काराने त्यांना सन्मानित केले.

@@AUTHORINFO_V1@@