कोरोना कवच : ‘कोरोना’साठीचा आरोग्य विमा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jul-2020   
Total Views |

corona kavach_1 &nbs


आता प्रत्येक विमा कंपनीला ‘कोरोना कवच’ नावाची फक्त कोरोनाच्या आजारापासून संरक्षण देणारी पॉलिसी कार्यान्वित करण्याच्या सूचना नियंत्रक यंत्रणेने दिल्या असून, ‘कोरोना कवच’ पॉलिसी आता कार्यरत झाली आहे. त्याविषयी सविस्तर...


कोरोना महामारीने आधी चीनला आणि आता सगळ्या जगाला वेठीस धरले. यापूर्वी या विषाणूची, आजाराची कोणाला कल्पनाच नव्हती. त्यामुळे साहजिकच आरोग्य विमा पॉलिसीत या अनपेक्षितपणे आलेल्या आजाराचा समावेशही नव्हता. पण, या महाभयंकर रोगाचे स्वरुप पाहून विमा कंपन्यांची नियंत्रक असलेल्या यंत्रणेने म्हणजे ‘इन्शुअरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथोरिटी’ या यंत्रणेने विमा कंपन्यांना सूचना दिल्या की, आरोग्य विमा पॉलिसीत हा आजार समाविष्ट नसला, तरी हा आजार झालेल्यांना कोरोनाचे विमा संरक्षण द्या व त्यांचे दावे कमीत कमी वेळात संमत करा. आता प्रत्येक विमा कंपनीला ‘कोरोना कवच’ नावाची फक्त कोरोनाच्या आजारापासून संरक्षण देणारी पॉलिसी कार्यान्वित करण्याच्या सूचना नियंत्रक यंत्रणेने दिल्या असून, ‘कोरोना कवच’ पॉलिसी आता कार्यरत झाली आहे.


कोरोना रुग्णांकडून सध्या खासगी हॉस्पिटलमध्ये प्रचंड बिल आकारली जातात. त्यामुळे विमा संरक्षण असणे गरजेचे झाले होते. या नव्या पॉलिसींमध्ये ‘पीपीई किट’, ग्लोव्हज, मास्क व अशा प्रकारच्या अन्य वस्तू यांचाही खर्च ‘कोरोना कवच’ या नव्या पॉलिसीत अंतर्गत मिळतो. या अगोदर मात्र असा खर्च मिळत नव्हता. १८ ते ६५ वयोगटातल्या व्यक्ती ही पॉलिसी उतरवू शकतात. तीन महिन्यांपासून ते २५ वर्षांपर्यंतच्या पाल्याचाही पालकांना विमा उतरविता येतो. कुटुंबासाठी एका ठराविक रकमेची पॉलिसी उतरविलेल्या रकमेपर्यंत कुटुंंबातल्या कोणालाही खर्च संमत होऊ शकतो. या पॉलिसीचा कालावधी साडेतीन, साडेसहा आणि साडेनऊ महिने इतका आहे. पॉलिसी घेतलेल्या दिवसापासून पहिले १५दिवस विम्याचा दावा संमत केला जात नाही. हा विमा किमान ५० हजार रुपयांचा उतरवावाच लागतो व याहून जास्त रकमेचा विमा हवे असेल, तर तो ५०हजारांच्या पटीतच काढावा लागतो. कमाल पाच लाख रुपयांपर्यंत विमा उतरवता येतो.


कोरोनाची पॉलिसी घेणार्‍याला जर अगोदरपासून मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, फुप्फुसात गाठी तसेच कर्करोग असे काही गंभीर स्वरुपाचे आजार असतील, तर सार्वजनिक उद्योगातील ‘न्यू इंडिया अ‍ॅश्युअरन्स कंपनी’ ३०टक्के प्रीमियम जास्त आकारते. इतर आरोग्य विमा पॉलिसीमध्ये उतरविलेल्या रकमेच्या एक टक्का रक्कम कमाल हॉस्पिटलचे खोली भाडे म्हणून संमत असेल. हॉस्पिटलचे खोलीभाडे जर कमाल संमत होणार्‍या भाड्याहून जास्त असेल, तर ते पॉलिसीधारकाला भरावे लागते. ‘कोरोना कवच’ पॉलिसीमध्ये हॉस्पिटलच्या खोली भाड्यावर काहीही मर्यादा ठेवलेली नाही. ‘कोरोना कवच’ पॉलिसीत रुग्णालय एकूण १५ दिवस विमा उतरविलेल्या रकमेच्या ०.५ टक्के इतकी रोखरक्कम दररोज रुग्णाला देण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. रुग्णाची सरकारमान्य केंद्रातून कोरोनाची चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आली की, रुग्णाला या पॉलिसीतून खर्च मिळायला सुरुवात होऊ शकते. कोरोनाचा प्रादुर्भाव सौम्य असेल व रुग्णाला घरीच विलगीकरण करून उपचार देण्यात येत असतील, तरीही या उपचाराचा दावाही संमत केला जातो. ‘फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्स कंपनी’ सार्वजनिक उपयोगातील ‘ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी’ व ‘युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी’ यांचा प्रीमियम कमी आहे, तर ‘गो डिजिट जनरल इन्शुरन्स’, ‘स्टार हेल्थ अ‍ॅण्ड अलाईड इन्शुरन्स’ या कंपन्या जास्त प्रीमियम आकारतात.



विविध कंपन्यांचे प्रीमियम दर पुढील प्रमाणे -



corona kavach_1 &nbs

वेगवेगळ्या कंपन्यांच्या प्रीमियमच्या दरात बराच फरक आहे. ग्राहकांनी सार्वजनिक उद्योगातील कंपन्यांना प्राधान्य द्यावे. आरोग्याची काळजी घेणारे जेे कर्मचारी आहेत, त्यांना प्रीमियममध्ये पाच टक्के सवलत द्यावी अशा सूचना विमाउद्योग नियंत्रण यंत्रणेने दिल्या आहेत. काही कंपन्या कुटुंबाचा विमा उतरविल्यास तसेच ऑनलाईन विमा उतरविल्यास काही सवलत देतात. वरिष्ठ नागरिकांना प्रीमियम चढ्या दराने आकारला जातो. कारण, यांचा विमा उतरविणे म्हणजे विमा कंपन्यांना जोखीम असते. ओरिएन्टल इन्श्युुरन्स कंपनी ज्येष्ठ नागरिकांना साडेनऊ महिन्याच्या कालावधीसाठी तीन लाख रुपयांच्या विम्यासाठी १,८६४ रुपये अधिक कर असा प्रीमियम आकारते. फ्युचर जेनेरेली २,५५२रुपये अधिक कर, गो डिजिट २६ हजार, १९५ अधिक कर असे प्रीमियम आकारतात. केंद्र शासनाच्या ‘आरोग्य संजीवनी पॉलिसी’पेक्षा ‘कोरोना कवच’ विमा पॉलिसीला जास्त प्रीमियम भरावा लागतो. कोरोना रुग्णांना देण्यात येणारी औषधे महाग असल्यामुळे कंपन्यांना प्रीमियम जास्त द्यावा लागतो. ‘कोरोना कवच’ पॉलिसीची कमाल मर्यादा जी पाच लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे, ती फार कमी आहे. कारण, कित्येक खासगी रुग्णालये कोरोना रुग्णाचे बिल १०लाख रुपयांहून अधिकही करतात. त्यामुळे रुग्णाला पाच लाख रुपयांच्या वरची सर्व रक्कम स्वत:च्या खिशातून भरावी लागते. मुंबईतील अंधेरी येथे एका कोरोना रुग्णाला दाखल केल्यानंतर तो दोन तासांतच वारला. त्याचा मृतदेह नातलगांना देण्यापूर्वी या हॉस्पिटलने ५८हजार रुपये बिल वसूल केले. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने व आर्थिक दृष्टीनेही ‘कोरोना कवच’ विमा सद्यस्थितीत तरी उतरवावा.


काही विमा कंपन्या रुग्णांनी पॉलिसी उतरवू नयेत म्हणून प्रीमियमची रक्कम फार जास्त ठेवतात. कारण, यात दावे दाखल होण्याचे व ते संमत करण्याचे प्रमाण फार मोठे असते व या पॉलिसीतून कंपन्यांना फायदा होण्याची शक्यताही नाही. रुग्ण एवढ्या प्रचंड प्रमाणात कोरोनामुळे मृत्युमुखी पडत असताना विमा कंपन्यांनी फायद्याचा विचारच करु नये. साडेतीन महिन्यांच्या पॉलिसींचा प्रीमियम दर साडेनऊ महिन्यांच्या पॉलिसींच्या प्रीमियम दहा टक्क्यांपेक्षा जास्त आहे. कारण, विमा कंपन्यांना असे वाटते की, कोरोनाची साथ साडेनऊ महिन्यांपर्यंत आटोक्यात येईल अणि या अपेक्षेने या कालावधीसाठी कमी दराने प्रीमियम आकारला जातो. जर तुमची नेहमीची आरोग्य विमा पॉलिसी १०लाख रुपयांची असेल, तर तुम्ही ‘कोरोना कवच’ नाही घेतले तरी चालेल. पण, जर तुमची नेहमीची आरोग्य विमा पॉलिसी कमी रकमेची असेल, तर ‘कोरोना कवच’ नक्कीच घ्यावे. सुदैवाने तुम्हाला कोरोना झाला नाही, तर भरलेल्या प्रीमियम रकमेत तुम्हाला आयकरात सवलत नक्कीच मिळेल, हा फायदा आहेच!

@@AUTHORINFO_V1@@