गजेंद्र - हिंदू संस्कृती आणि जंगलाचे वैभव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2020   
Total Views |

elephant _1  H
(छायाचित्र संजय सावंत) 

 


सिंधुदुर्गातहत्ती पकड मोहिमे’ची जोरदार मागणी होत आहे. मात्र, हत्तीला हिंदू संस्कृतीच्या वेगवेगळ्या कक्षांमध्ये महत्त्व लाभले आहे. जंगलात ’हत्ती’ असणे हे जंगलाचे वैभव आहे. अशा परिस्थितीत जंगलातून हत्ती पकडा म्हणणे हिंदू संस्कृतीलाच विरोध करणारे आहे.

 
 
 

अगदी लहान असल्यापासून आपण शिकत आलो आहोत की, भारत हा कृषिप्रधान देश आहे. साधारण ५१% भारतीय कृषीशी निगडीत आहेत. भारतातील कृषी ही मुख्यत्वेकरून पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे भारताचे आर्थिक जगसुद्धा पावसावर अवलंबून आहे. चांगला पाऊस झाला तर उत्तम धान्योत्पादन, पशुपालन, वीजनिर्मिती आणि त्या अनुषंगाने इतर व्यवसाय पावसावर अवलंबून आहेत. या कारणास्तव वर्षा ऋतूतील पाऊस अतिशय महत्त्वाचा आहे. फार पूर्वीच्या काळापासून, मॉन्सूनचा पाऊस हा भारताचा प्राण आहे.

 
 
 

पाऊस घेऊन येणारे प्रचंड काळे ढग, भारतीयांना आकाशात आक्रमण करणार्‍या हत्तीच्या कळपासारखे दिसले. पाऊस घेऊन येणारे ढग म्हणजे ’हत्ती’ असे समीकरण झाले. या हत्तीवर स्वार होणारी पावसाची देवता म्हणजे साक्षात ’इंद्र’. सहजच इंद्राचे अस्त्र होते - कडाडणारी लखलखती विद्युलता, वीज, वज्र ! त्याला साथ देणार्‍या देवता होत्या मरुत्त, म्हणजे मॉन्सूनचे वारे. घोंगावणारे, गतिमान, कधी हत्तीच्या कळपाने झाडे उन्मळून टाकावीत तशी वाताहत करत जाणारे वारे. हे मरुत्त इंद्राला पाऊस पाडण्यासाठी उत्तेजन देतात. प्रोत्साहन देतात. त्यावर इंद्र ऐरावतावर आरूढ होतो आणि आपले वज्र वृत्रासुरवर चालवून पाण्याचे मार्ग मोकळे करतो. भरपूर पाऊस आणतो. इंद्राचा आणि पावसाचा संबंध इतका घनिष्ठ आहे, की पावसात दिसणारे आकाशातील सप्तरंगी धनुष्य - इंद्रधनुष्य म्हणून ओळखले जाते.

 
 

elephant _1  H  
 
 

पावसावर आपले आर्थिक गणित अवलंबून आहे हे आज माहित आहे असे नाही, तर अगदी ऋग्वेद काळापासून माहित होते. ऋग्वेदाने श्रीसूक्तामध्ये लक्ष्मीचे वर्णन केले आहे. ऐश्वर्य, समृद्धी, धनधान्य देणार्‍या देवतेची आपण दिवाळीत पूजा करतो. लक्ष्मी भूदेवी आहे. पृथ्वी आहे. सर्व जीवांची जननी आहे. पृथ्वीमातेवर जलवर्षाव करणारे हत्ती म्हणजे पावसाचे ढग आहेत. चांगला पाऊस झाला की पृथ्वी सुजलाम् सुफलाम् होते. आपल्याला फळे, फुले, मुळे, धान्य, पशु, गायी, गुरं रुपी धन देते. श्रीसूक्तात म्हटल्याप्रमाणे - गजांनी केलेल्या जलाभिषेकाने लक्ष्मी प्रसन्न झाली की भरपूर धान्य उगवेल, आणि मग या जगातील दारिद्र्य व भूकरुपी अलक्ष्मीचा मी नाश करेन.

क्षुत्पिपासामलां ज्येष्ठामलक्ष्मीं नाशयाम्यहम् ।

पावसाचा मेघ म्हणजे जग, ही कल्पना कालिदासाच्या मेघदुतात पण दिसते. त्याच्या यक्षाला जेव्हा आकाशात मोठा काळा पावसाचा मेघ दिसतो, तेव्हा त्याला तो ढग हत्तीसारखा भासतो. तो म्हणतो -

आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानु

वप्रक्रीडा परिणत गज प्रेक्षणीयं ददर्श॥

मेघांचा गडगडाट, विजांचा कडकडाट पाहून यक्षाच्या मनात भावनांचा कल्लोळ उठला. त्या विरही यक्षाला तो काळा महाकाय मेघ जणू एखाद्या मदोन्मत्त हत्तीप्रमाणे पर्वताला टक्कर देत आहे, असा भासला. या हत्तीसारख्या मेघाला यक्षाने आपल्या प्रियतमेसाठी संदेश नेण्याची विनंती केली.

 
 
 

ऐहोळ येथील शिलालेखात पण ढगांना हत्तीची उपमा दिलेली दिसते. ही प्रशस्ती आहे चालुक्य राजा द्वितीय पुलकेशी याची. त्यामध्ये कवीने पुलकेशीच्या पराक्रमाचे वर्णन केले आहे. पुलकेशीने उत्तरेचा सम्राट हर्षवर्धनचा पराभव करून त्याला नर्मदेच्या पार हाकलले. पल्लव, मालाव, गुर्जर यांचा पडाव केला. चोलांना कावेरीच्या पलीकडे हाकलले. आणि तो त्रिमहाराष्ट्राचा अधिपती झाला. त्याबद्दल कवी म्हणतो आपल्या सामर्थ्याने व रणातील शौर्याने पुलकेशी इंद्राप्रमाणे शोभत असे. त्याने समुद्रातील बेटावर असलेल्या पुरी नगरीला नौकांनी वेढा दिला. त्या नौका मत्त हत्तींच्या कळपाप्रमाणे भासत होत्या. त्यावेळची शोभा काय सांगू? निळेभोर आकाश समुद्रासारखे दिसत होते. आणि ढगांनी म्हणजे हत्तीसारख्या नौकांनी अच्छादलेला समुद्र आकाशासारखा दिसत होता!

 
 

भारतीय सेनेमध्ये प्राचीन काळापासून हत्ती एक महत्त्वाचा अंग होते. यवन सम्राट अलेक्झांडरने इस पूर्व ४ थ्या शतकात भारतावर हल्ला केला होता. त्यावेळी त्याची आणि महाराज पुरूची गाठ झेलम नदीच्या काठावर पडली होती. पुरूच्या सैन्यातील हत्ती पाहून यवन सैन्याची गाळण उडाली. त्यांनी पहिल्यांदाच हत्तींचा सामना केला होता. या लढाईनंतर यवनांना कळले की गंगेच्या तीरावर असणार्‍या मगध राजाच्या सैन्यात हजारो हत्ती आहेत. त्यावेळी अलेक्झांडरच्या सैन्याने पुढे जाण्यास नकार दिला. अलेक्झांडरने माघारी परतण्याचा निर्णय घेतला त्यामध्ये हत्तींचा मोठा वाट होता.

 

चेन्नकेशव मंदिर. गजथर.

elephant _1  H  
 
 
 

भारताच्या प्राचीन खेळांमध्ये एक खेळ आहे बुद्धिबळ किंवा चतुरंग. या खेळातील सैन्यात चार दल आहेत - हत्तीदळ, घोडदळ, रथ / उंटदळ आणि पायदळ. अशा सैन्याला चतुरंगदल म्हटले जात असे. हत्तीशिवाय सैन्य अपूर्ण होते. घोड्यापेक्षा अधिक महत्त्व हत्तीला होते. महाभारतातल्या युद्धातसुद्धा ‘अश्वत्थामा’ नावाचा हत्ती प्रसिद्ध होता.

 

मंदिरांच्या स्थापत्यात बाहेरील भिंतीच्या सर्वात खालचा थर हा हत्तींचा असतो. याला गजथर म्हटले जाते. मंदिराचा भार हत्तींवर आहे असे यातून सुचवले जाते. चेन्नाकेशव मंदिरातील सुबक हत्तींचा गजथर. असा गजथर महाराष्ट्रातील मंदिरांना पण दिसतो. सांचीच्या तोरणावर एक पाय दुमडून चालणारा हत्ती, वेरुळच्या गजलक्ष्मीच्या शिल्पातील पायाने घागर दाबून पाणी भरणारा हत्ती, महाबलीपुरमच्या गंगावातरणाच्या शिल्पातील हत्तींचे कुटुंब, वेरुळच्या प्रांगणातील हत्ती, कोणार्कच्या मंदिरावर एकमेकांशी खेळणारे हत्ती, अजिंठ्याच्या छतावर चितारलेला मिश्कीलपणे हसणारा हत्ती...किती प्रकारे हत्तीचे चित्रण केले आहे! या सर्वातून भारतीयांचे हत्तींवरील प्रेम ओसंडून वाहताना दिसते. पंचतंत्रातदेखील हत्तीच्या कथा येतात. एक कथा आहे हत्ती आणि शिंपीची. केळे खाऊ घालायच्या मिषाने शिंप्याने वाटेने जाणार्‍या हत्तीला सुई टोचली. हत्तीला राग आला, पण तो शांतपणे आपल्या वाटेने निघून गेला. नदीतून अंघोळ करून येतांना त्याने सोंडेत चिखल भरून आणला. शिंप्याच्या दुकानासमोर आल्यावर हत्तीने सगळा चिखल त्याच्यावर उडवला. करावे तसे भरावे हे शिकवणारी कथा. जातक कथांमध्ये पण एक षडदंत नावाच्या हत्तीची कथा येते. तर भागवत पुराणात मगरीने पकडलेल्या हत्तीची, गजेंद्रमोक्षची कथा येते.

 
 

महाबलीपुरम, हत्तींचा कळप

elephant _1  H  
 
 

सरस्वती सिंधू संस्कृतीच्या मुद्रीकांवर पण हत्ती मिळतो. तसेच त्याचे अंकन दोन हजार वर्षांपासून नाण्यांवर केलेले मिळते. भारतात आलेले ग्रीकसुद्धा हत्तीच्या प्रेमातच पडले. त्यांनीदेखील हत्तीची अनेक नाणी पाडली. त्यापैकी एक आहे - सेल्युकस निकेटरचे नाणे. शिंग असलेले चार हत्ती रथाला जुंपले असून, त्यामध्ये अथेना ही युद्धदेवता आरूढ आहे.

 

हत्ती हा प्राणी भारतीय संस्कृतीमध्ये पूर्ण भिनलेला आहे. तो आकाराने प्रचंड असला तरी स्वभावाने मृदू आहे. शक्तिमान असला तरी शांत आहे. जंगली असला तरी शाकाहारी आहे. प्राणी असला तरी बुद्धिमान आहे. त्याचे मोठे कान तो खूप श्रवण करतो हे दर्शवतात. बारीक डोळे तो प्रत्येक गोष्ट सूक्ष्मपणे पाहतो हे दर्शवतात. आणि म्हणूनच बुद्धीच्या देवतेला गजाननाला हत्तीचे शीर दिले आहे. भारतीय अध्यात्मात, मंदिरात, साहित्यात, कथात, खेळात, चित्रात, शिल्पात, युद्धात सगळीकडे हत्तीने हजेरी लावली आहे. जगात भारताची ओळख हत्तींचा देश अशीच आहे. म्हणूनच १९८२ मध्ये झालेल्या एशियाड गेम्सचे चिन्ह ‘अप्पू’ हत्ती होते.

 
 

हत्ती हा भारतीय मनाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. जो आपली ओळख वाहतो, त्याचे रक्षण, संवर्धन, पालन, पोषण हे आपले कर्तव्य आहे. दक्षिणेतील राज्यात हजारो हत्ती जंगलांमधून राहतात. तेथील शासन त्यांची व्यवस्था करते. महाराष्ट्रातील जंगलांमधून केवळ ७ ते १० हत्ती आहेत. ते सुद्धा आपल्याला जड व्हावेत का? आपल्या मंदिरांचा भार वाहणारा हत्ती आपल्याला जड का व्हावा? त्यांची व्यवस्था आपण का करू नये? भोंडल्याचे दहा दिवस हत्तीच्या चित्राभोवती फेर धरून गाणी म्हणायची, आणि १० हत्ती महाराष्ट्रात आले तर त्यांना पकडून कर्नाटकात सोडून यायचे? वर्षातील काही महिने, साधारणपणे उन्हाळ्यात हे हत्ती गावात येतात. नागरिकांना त्याचा त्रास होतो, भय वाटते हे खरे आहे. पण हत्ती गावात येऊ नयेत या करिता वनखात्याने त्यांची जंगलात काही व्यवस्था करायला हवी. शेवटी, जंगलात हत्ती असणे हे जंगलाचे वैभव आहे. महाराष्ट्राचे वैभव आहे. जिथे हत्ती आहे तिथे युद्धात जय देणारा इंद्र आहे, पाऊस देणारा इंद्र आहे आणि धन-धान्य देणारी लक्ष्मी पण आहे.

@@AUTHORINFO_V1@@