सारे काही उद्ध्वस्त...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jun-2020   
Total Views |

nisarg cyclone_1 &nb



गेल्या आठवड्यात उत्तर कोकण किनारपट्टीला धडकलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे झालेली हानी न भरून काढण्यासारखी आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्याला या वादळाचे केंद्रबिंदू धडकले आणि त्याचा फटका आसपासच्या अनेक गावांना बसला. चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात झालेल्या वाताहातीची बरीच चर्चा झाली. मात्र, उत्तर रत्नागिरीतील किनारपट्टीच्या भागात झालेल्या वाताहातीवर अजूनही प्रशासनाने लक्ष दिलेले नाही. हरिहरेश्वर, मारळप्रमाणेच सावित्री नदीच्या पलीकडच्या बाजूस असलेल्या मंडणगड आणि दापोली तालुक्यातील गावांना चक्रीवादळाचा प्रचंड मोठा फटका बसला. मंडणगड तालुक्यातील वेळासपासून पुढे दापोलीतील मासेमारी बंदर म्हणून प्रसिद्ध असलेल्या हर्णे गावापर्यंतच्या किनारी पट्ट्याने वादळाचा प्रकोप सहन केला. हवामान विभागाने सुरुवातीला वादळ हरिहरेश्वरला धडकणार असल्याचे सांगितल्याने प्रशासनाने वेळीच वेळास, बाणकोट, वेश्वी ही गावे रिकामी केली होती. त्यापुढील केळशी, आडे, पाडले, आंजर्ले, हर्णे या गावातील केवळ कच्च्या घरांमध्ये राहणार्‍या लोकांना स्थलांतरित करण्यात आले होते. त्यामुळे वादळामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. परंतु, ग्रामस्थांना मोठी वित्तहानी मात्र सहन करावी लागली आहे. या गावांमधील आंबा, काजू, नारळाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. कच्च्या घरांबरोबरच पक्क्या घरांचीही मोठ्या संख्येने पडझड झाली. निसर्गाने या गावांना भरभरून दिलेली वनराई ‘निसर्गा’नेच उजाड केली. ७० टक्के विजेचे खांब कोसल्याने पुढील वीस दिवस तरी या गावांमध्ये वीज येण्याची शक्यता नाही. आठवड्याभरात वन विभागाने गावकर्‍यांच्या मदतीने रस्त्यांवर पडलेली झाडे बाजूला करुन रस्त मोकळे करुन दिले आहेत. मोबाईल नेटवर्कचे खांबही कोसळल्याने गावकर्‍यांचा थेट लोकांशी संपर्कही होत नाही. पर्यटनासाठी प्रसिद्ध असणार्‍या या गावांमधील अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेले पायाभूत सुविधांचे प्रश्न यानिमित्ताने समोर आले आहेत. चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे कोकणातील आपत्ती व्यवस्थापनाचा आणि मागासलेल्या पायाभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे प्रशासनाने आता तरी, या सर्व प्रश्नांचा वेध घेऊन वेळीच त्यामध्ये सुधारणा घडवून आणणे गरजेचे आहे; नाहीतर भविष्यात कोकण किनारपट्टीला अजून एखादे वादळ धडकल्यास परिस्थिती याहून गंभीर असेल.



उत्पन्न हिरावले...



‘निसर्ग’ चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या गावांमधील मुख्य उत्पन्नाचे साधन हे शेती, आंबा-काजू-नारळाच्या बागायती आणि मासेमारी आहे. या गावांचे दुय्यम उत्पन्नाचे साधन म्हणजेच पर्यटन. मात्र, ‘लॉकडाऊन’मुळे पर्यटनही खुंटले गेले होते. वेळास, केळशी, आंजर्ले ही कासवांची गावे म्हणून प्रसिद्ध आहेत. या गावांमध्ये दरवर्षी समुद्री कासवांची विण होते. यावेळी अंड्यातून बाहेर पडणारी पिल्ले पाहण्यासाठी वेळास आणि आंजर्ले गावामध्ये कासव महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवाला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. या पर्यटकांच्या राहण्याची आणि जेवणाची सर्व व्यवस्था गावामध्येच केली जाते. परिणामी, त्याद्वारे गावकर्‍यांना उत्पन्न मिळते. शिवाय या गावांमध्ये इतर काळातही पर्यटन सुरुच असते. मात्र, यंदा ‘लॉकडाऊन’मुळे या गावांमध्ये एप्रिल-मे महिन्यात होणारा कासव महोत्सव होऊ शकला नाही. त्यानिमित्ताने गावकर्‍यांच्या हाती लागणारे चार पैसे यंदा मिळू शकले नाहीत. त्यामुळे उत्पन्न मिळविण्याचा सर्व भार हा शेती आणि आंबा-काजूृ-नारळाच्या बागायतींवर होता. मात्र, ‘निसर्ग’ चक्रीवादळाने या सर्व बागा नेस्तनाबूत केल्या आहेत. आंबा-काजू-नारळाची झाडे जमीनदोस्त झाल्याने गावकर्‍यांसमोर येत्या काही वर्षांतील उत्पन्नाचा प्रश्नही निर्माण झाला आहे. कारण, या बाग पुन्हा उभ्या राहण्यासाठी पाच ते दहा वर्षांचा कालावधी लागणार आहे. हर्णे, वेश्वी, बाणकोट यांसारख्या मच्छीमार गावातील मच्छीमारांना यापूर्वीच ‘लॉकडाऊन’च्या बंदीचा फटका बसला होता. त्यात मासेमारीवर पावसाळी बंदी सुरू झाल्याने या गावातील छोट्या मच्छीमारांसमोर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बागायतीचे शासकीय पंचनामे सुरू झाल्याने पुढील आठवड्यापर्यंत शासकीय मदतीची जोड मिळेल. मात्र, या घरांच्या पाठीमागे गेल्या आठवड्यापर्यंत डोलणार्‍या नारळ-सुपारीच्या बागांमधून मिळणारे हुकमी वार्षिक उत्पन्न किमान दहा ते बारा वर्षे बंद झाले आहे. त्याला काय पर्याय मिळणार? सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना कोकणासाठी या वादळाच्या निमित्ताने खरेच काही टिकाऊ करायचे असेल, तर येथील अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या बागायत, मत्स्यव्यवसाय आणि पर्यटन या तीन क्षेत्रांसाठी दीर्घकालीन योजना आखायला हवी. आंबा, नारळ, सुपारी यासारखी झाडे पूर्ण क्षमतेने उत्पादन देण्यासाठी आणखीन १० ते १५ वर्षे लागतात, हे लक्षात घेऊन त्या प्रमाणात नुकसानभरपाई देण्यात यावी. आता या वादळामुळे उद्ध्वस्त झालेले जीवन उभारण्यात पुढील अनेक वर्ष लागणार आहेत.

@@AUTHORINFO_V1@@