पवार, पडळकर आणि ‘कोरोना’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jun-2020   
Total Views |

sharad pawar_1  



पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध जरूर झाला पाहिजे. पण, जे वक्तव्य आक्षेपार्ह असल्याचे दावे किती टाहो फोडून केले जात होते? त्याचा पुनरुच्चार खुद्द पडळकरांनी नंतर केलेला नाही. पण, वाहिन्यांच्या बातमीदारांनी पन्नासवेळा प्रत्येकी तेच वाक्य उच्चारलेले आहे ना? ते वाक्य सातत्याने बोलण्यातून त्यांना काय साधायचे होते? त्यावर चर्चाही झाल्या. त्यातही त्याचा पुनरुच्चार चालूच होता. नेमके वाक्य टाळूनही चर्चा व बातम्या होऊ शकल्या असत्या ना? की या पत्रकारांना व वाहिन्यांना आपल्या मनातली गरळ ओकण्यासाठी पडळकरांनी दिलेली संधी सोडायची नव्हती?



भाजपचे विधान परिषदेतील नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याविषयी जे उद्गार काढले, त्याचे समर्थन कोणीही करू शकणार नाही. किंबहुना, त्यातल्या चुकीचा भाजपनेही निषेधच केलेला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी त्या उद्गारांना गैरलागू ठरवताना त्यांच्याविषयी वा फडणवीसांच्या बाबतीत असे शब्द उच्चारले गेले; तेव्हा असे सर्व संस्कृतीरक्षक कुठे होते, हा केलेला सवालही योग्य आहे. कारण, शब्द वा भाषेची संस्कृती वा संयम फक्त एकाच बाजूपुरता मर्यादित असू शकत नाही. सार्वजनिक जीवनात काम करताना प्रत्येकानेच संयम राखला पाहिजे. लोकशाहीत प्रतिस्पर्धी असतात, शत्रू नसतात, याचेही भान सर्वांनीच राखले पाहिजे. पण, जेव्हा ते भान एका बाजूने सोडले जाते आणि दुसर्‍या बाजूच्या तशाच अपराधांना पोटात घातले जाते, तेव्हा संयमाचा प्रभाव संपत असतो. अगदी ही बाब जितकी राजकीय व सार्वजनिक क्षेत्रातील लोकांना लागू पडते, तितकीच ती माध्यमांतील शहाण्यांनाही लागू असते. म्हणूनच या निमित्ताने सहा-सात वर्षांपूर्वी घडलेला एक प्रसंग आठवतो. तेव्हा अण्णा हजारेंचे लोकपाल आंदोलन जोरात होते आणि भ्रष्टाचाराचा विषय ऐन रंगात आलेला होता. त्या काळात शरद पवार युपीए सरकारमध्ये कृषिमंत्री होते. दिल्लीतल्या एका समारंभामध्ये सहभागी होण्यासाठी ते कुठल्या भव्य इमारतीमध्ये गेलेले असताना तिथे घुसलेल्या एका शीख तरूणाने पवारांना थप्पड मारण्याची घटना घडलेली होती. त्यावर सगळीकडून निषेधाचे सूर उमटलेले होतेच. मग त्याचा संसदेतही जोरदार निषेध झालेला होता.




त्या निषेध प्रस्तावावर बोलताना शरद यादव हे ज्येष्ठ जनता दल नेते काय म्हणाले होते? संसदेत सर्व पक्षाच्या नेते व सदस्यांनी त्या हल्ल्याचा निषेध केला होता. त्यावरच्या प्रस्तावावर सर्वात उत्तम भाषण शरद यादवांनी केले होते. ते म्हणाले, “मारनेवालेने तो एकही थप्पड मारा. लेकीन मीडियाने तो दो-तीन लाख भार थप्पड मार लिया.” त्यांच्या म्हणण्याचा आशय सोपा होता. घडलेली घटना निषेधार्ह आहे आणि ती किती हिणकस आहे, ते सांगायला शब्द पुरेसे होते. त्याचे चित्रण सलग दोन दिवस अखंड पुनर्प्रक्षेपित करण्यातून माध्यमांनी काय साधले? काही वाहिन्या तर तितकेच आठ-दहा सेकंदाचे चित्रण सलग दहा-बारा थपडा असाव्यात, अशा पद्धतीने दाखवित होत्या. जणू पवारांच्या त्या अपमानाचे या वाहिन्यांना खूप कौतुक असावे. त्यातून कुठला विकृत आनंद अशा पत्रकार वा वाहिन्यांना मिळू शकत असतो? जी बाब निंदनीय आहे, ती इतक्या अगत्याने व सातत्याने दाखवून कोणता परिणाम साधला जाणार असतो? अशा रितीने त्याचे सातत्याने प्रदर्शन मांडून गांभीर्यच संपवले जात नाही काय? जर ती कृती निषेधार्ह आहे, तर ती शक्य तितकी दाखवू नये. कारण, शब्दांपेक्षा दृश्यांचा प्रभाव मनावर अधिक पडत असतो. त्याचेही भान यापैकी कोणाला नव्हते काय? शरद यादव यांनी मोजक्या शब्दात त्या दुखण्यावर बोट ठेवले होते. कारण, मारणारा जो कोणी होता, त्याचा हेतू किरकोळ होता. पण, माध्यमांचा हेतू अधिक कुटील वा लज्जास्पद होता. जणू त्यांनाच पवारांचा अपमानित व डागाळलेला चेहरा जनतेसमोर पेश करण्याचा हेतू असावा; अन्यथा अशा रितीने ती घटना पेश करण्याचे कारणच काय? नेमका तसाच काहीसा प्रकार गेल्या आठवड्यात पडळकर यांच्या विधानाच्या बाबतीत घडलेला नाही काय?




पडळकर पंढरपूरच्या एकाच पत्रकार परिषदेत एकदाच सदरहू विधान बोलून गेले. त्याचा अखंड मारा करून माध्यमांनी व वाहिन्यांना त्यातून काय साधायचे होते? मुद्दा असा, की पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध जरूर झाला पाहिजे. पण, जे वक्तव्य आक्षेपार्ह असल्याचे दावे किती टाहो फोडून केले जात होते? त्याचा पुनरुच्चार खुद्द पडळकरांनी नंतर केलेला नाही. पण, वाहिन्यांच्या बातमीदारांनी पन्नासवेळा प्रत्येकी तेच वाक्य उच्चारलेले आहे ना? ते वाक्य सातत्याने बोलण्यातून त्यांना काय साधायचे होते? त्यावर चर्चाही झाल्या. त्यातही त्याचा पुनरुच्चार चालूच होता. नेमके वाक्य टाळूनही चर्चा व बातम्या होऊ शकल्या असत्या ना? की या पत्रकारांना व वाहिन्यांना आपल्या मनातली गरळ ओकण्यासाठी पडळकरांनी दिलेली संधी सोडायची नव्हती? हे प्रकार नवे नाहीत आणि एकदाच घडत नसतात. बारकाईने बघितले व तपासले, तर प्रत्येकाला आपल्या मनातली गरळ ओकण्याची संधी त्यातून साधून घ्यायची असते.




तीन दशकांपूर्वी असाच एक गाजलेला प्रसंग आठवतो. तेव्हा कुठल्याशा सभेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगलीला गेलेले होते. त्यांच्या भाषणामध्ये घटनाकार बाबासाहेबांचा उल्लेख आलेला होता. त्यासंबंधीची जी बातमी एका दैनिकात प्रसिद्ध झाली, त्यावरून गदारोळ उठलेला होता. त्या भाषणात सेनाप्रमुखांनी बाबासाहेबांना ‘ब्रिटिशांचे हस्तक’ संबोधल्याचा आरोप होता आणि त्यावर कल्लोळ माजला. अगदी बातम्या निषेधाचा गदारोळ झाला. पण, बाळासाहेबांच्या इन्काराची दखलही घ्यायला माध्यमे राजी नव्हती. त्याही पुढे जाऊन शिवसेनेवर चिखलफेक करणारे अग्रलेख, संपादकीय लेख लिहिले गेले. तो विषय कुठे संपला? दोन-तीन दिवस हे काहूर माजलेले असताना नामदेव ढसाळ व रामदास आठवले ‘मातोश्री’वर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांना भेटले. साहेबांनी दोघांनाही आपल्या सांगलीतील भाषणाची संपूर्ण टेप ऐकवली आणि त्याही दोघांनी नंतर असे काही शिवसेनाप्रमुख बोलले नसल्याची ग्वाही दिलेली होती. पण, उडालेला धुरळा खाली बसला नव्हता. मग ‘महाराष्ट्र टाइम्स’चे सांगलीतील तत्कालीन वार्ताहर रविंद्र दफ्तरदार यांनी एक छोटेखानी लेख लिहून बाळासाहेब तसे काहीही बोललेच नसल्याचे स्पष्ट केले आणि विषयावर पडदा पडला.


पण, दरम्यान त्यांच्याही वर्तमानपत्राने त्यावर उधळलेली मुक्ताफळे कोणी मागे घ्यायची? त्यासाठी कोणी माफी मागायची? जे लोक न बोललेल्या शब्द व वक्तव्यासाठी शिवसेनाप्रमुखांच्या जाहीर माफीयाचनेची अग्रलेख लिहून अखंड मागणी करीत होते, त्यांनी आपल्या बेताल लिखाण व आरोपासाठी माफी कधी मागितली आहे काय? पण, मुद्दा वेगळाच आहे. दफ्तरदार यांच्या साक्षीने विषय गुंडाळला गेला. मग मुळात न बोललेल्या शब्दातून कोणीतरी डॉ. बाबासाहेबांवर दुगाण्या झाडून घेतल्या, त्याचे काय? ती शिवसेनाप्रमुखांनी केलेली टिप्पणी नव्हती, तर त्यै दैनिकाचा सांगलीतील वार्ताहर व त्याने धाडलेली बातमी मुंबईत छापणार्‍या संपादकांनी बाबासाहेबांची अवहेलना केलेली नव्हती का? त्यांना कोणी पकडले वा शिक्षा वगैरे दिली होती काय? मुद्दा बाबासाहेबांच्या अपमान व अवहेलनेचा तेव्हाही नव्हता आणि आजदेखील नसतो. मुद्दा हा आपल्याला कोणाला लक्ष्य वा शिकार करायचे असते, त्यानुसार बातमी वा विषयाला फोडणी घातली जात असते. त्याला कैचीत पकडता आले नाही, मग विषय गुंडाळला जातो. इथेही पडळकर हे निमित्तमात्र असतात. इतरांनाच पवारांविषयीची गरळ ओकण्याची संधी साधायची असते. मात्र, दरम्यान पडळकर व पवार सारखेच या शिकार खेळात जखमी होत असतात.

@@AUTHORINFO_V1@@