कान्होबा, तुझी घोंगडी चांगली!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
Mink fur_1  H x




टॉर्बन नील्सन आणि अन्य डॅनिश शेतकर्‍यांनी १९९३ साली हा ‘मिंक फार्मिंग’चा व्यवसाय सुरू केला. आज २७ वर्षांनंतर हा प्रत्येक शेतकरी वर्षाला किमान ३ लाख ६५ हजार युरो एवढा निव्वळ नफा कमावतो आहे.

‘पश्मीना’ हा शब्द मोठा काव्यमय आहे. काश्मीरच्या ‘पश्मीना शाली’ जगप्रसिद्ध आहेत. काश्मीर म्हटलं की, लगेच आपल्याला सुंदर निसर्ग, सुंदर पुरुष, सुंदर स्त्रिया वगैरे आठवायला लागतं. हिंदी चित्रपटांचा दुष्परिणाम! प्रत्यक्षात काश्मीरमधले लोक फार अस्वच्छ असतात आणि ‘पश्मीना’ हे कोणत्याही काल्पनिक मनमोहिनीचं काव्यमय नाव नसून ते बोकडाच्या एका जातीचं नाव आहे. ‘पश्मीना’ जातीच्या बोकडाच्या अंगावरची लोकर ही फार चमकदार, आकर्षक आणि गरम असते. साहजिकच त्या लोकरीपासून बनवलेल्या शाली सुंदर आणि उबदार असतात. लोकरीसाठी शेळ्यामेंढ्या पाळणं हा व्यवसाय आपल्या देशात अतिप्राचीन काळापासून चालू आहे. ऋग्वेद हा जगातला सर्वात प्राचीन ग्रंथ आहे, हे आता जगातल्या सर्व विद्वानांना (आपल्या देशातले निधर्मी आणि भाडोत्री विचारवंत सोडून) मान्य आहे. ऋग्वेदात लोकरीपासून बनवलेल्या ‘कंबल’ या वस्त्राचा उल्लेख आहे.


शाली, घोंगड्या, कांबळी किंवा तत्सम लोकरीची वस्त्रं बनवण्यासाठी शेळ्यामेंढ्यांना मारावं लागत नाही. त्यांच्या अंगावर निसर्गतः वाढणारे केस कापले जातात. त्यांचीच लोकर बनते. त्या लोकरीच्या धाग्यापासून सुंदर शाल ते जाडंभरडं घोंगडं असे नाना वस्त्रप्रकार बनतात.


पण, केसाळ प्राण्यांना मारून, केसांसकट त्यांची कातडी कमावून ती अंगावर पांघरण्याची पद्धतही प्राचीन काळापासून जगभर होती. आमचा शिव हा पशुपति आहे. तो वाघाचं किंवा हत्तीचं कातडं पांघरतो. प्राचीन युरोपमधले ‘व्हायकिंग’ हे दर्यावर्दी लढाऊ लोक केसाळ कातड्यांचे कोट विशेषतः उत्तर ध्रुवीय भागातल्या पांढर्‍या अस्वलांच्या कातड्यांचे कोट घालीत असत. अमेरिकेतले मूळचे लोक तर्‍हेतर्‍हेच्या केसाळ कातड्यांचे कपडे घालीत असत. भारताच्या वायव्येकडल्या खैबर खिंडीतून भारतावर तुटून पडणारे इस्लामी तुर्क आणि अफगाण आक्रमक असेच केसाळ कातड्यांचे कपडे घालीत असत. पूर्वी काही इतिहास अभ्यासक असा दावा करीत असत की, पानिपतावर मराठ्यांचा पराभव होण्याचं एक कारण म्हणजे अब्दालीच्या सैनिकांच्या अंगात हे जाड कातडी कोट होते, तर मराठ्यांच्या अंगात साध्या सुती किंवा रेशमी कापडांचे अंगरखे होते. पण, प्रत्यक्षदर्शी पुराव्यांनुसार हा दावा आता फोल ठरला आहे. मराठ्यांच्या तिखट तलवारींनी जाड कातडी कोटांसह आतला अफगाणी सैनिकही व्यवस्थित कापला होता. पण, लढाईच्या निर्णायक क्षणी अहमदशहा अब्दालीचं सेनापतीत्व-क्रायसिस मॅनेजमेंट-वरचढ ठरलं. ‘पेशवे पुणे दरबारी, तळपती तिखट तलवारी’ हे कवी अज्ञातवासींचं कवन अगदी सार्थच आहे.


तर ते असो. आपल्याला आठवतंच असेल की, काही वर्षांपूर्वी मनेका (की मेनका?) गांधी या केंद्रीय मंत्री असताना त्यांनी केसाळ कातडी कपडे, विशेषतः फर कॅप्स वापरण्याविरुद्ध प्रचंड मोहीम चालवली होती. प्राण्यांच्या केसांपासून बनवल्या जाणार्‍या धाग्याला आपल्याकडे ‘लोकर’ हा एकच शब्द आहे. पण, इंग्रजीत ‘वुल’ आणि ‘फर’ या शब्दांना वेगळ्या छटा आहेत. ‘वुल’ म्हणजे साधारणपणे प्राण्यांना न मारता, त्यांच्या अंगावरचे केस कापून, त्यांचा बनवलेला धागा आणि ‘फर’ म्हणजे प्राण्यांना मारून त्यांच्या कातड्यासकट किंवा कातड्यावरून काढलेली लोकर. फर कॅप्स, फर कोट हे असे कातड्यासकट बनवलेले वस्त्रप्रकार असतात. उत्तर ध्रुवीय प्रदेशातली पांढरी शुभ्र हिम अस्वलं आणि चमकदार चंदेरी कातडीचा सिल्हर फॉक्स या प्राण्यांची त्यांच्या कातड्यांसाठी अक्षरशः कोंबड्या कापाव्यात तशी कत्तल झाली. म्हणून मनेकांचं म्हणणं असं होतं की, वुलन कॅप्स, वुलन कोट वापरायला काहीच हरकत नाही. पण, फर कॅप्स, फर कोट वापरू नका. कारण, या वस्तू तयार करण्यासाठी प्राण्यांना मारण्यात येतं. पण, या वस्त्रप्रकारांमधल्या दर्दी लोकांचं म्हणणं असं की, फरच्या वस्त्रांना जो चमकदारपणा असतो, तितका वुलच्या वस्त्रांना नसतो. काही वात्रट लोक असंही म्हणतात की, मनेका गांधींच्या जोरदार फर कॅप विरोधामुळे त्यांचे प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी विश्वनाथ प्रताप सिंग यांना चमकदार फर कॅपचा त्याग करावा लागला आणि आपलं तितकंसं चमकदार नसलेलं टक्कल दाखवत फिरावं लागलं.


पाश्चिमात्त्य देशात फर कोटचाच ‘मिंक कोट’ नावाचा प्रकार आहे. मिंक हा मांजर किंवा मुंगूस यांच्यासारखा दिसणारा एक प्राणी आहे. तो युरोप आणि उत्तर अमेरिकेत सर्वत्र आढळतो. त्याच्या अंगावरची लोकर मखमली स्पर्शाची आणि उबदार असते. त्यामुळे कातड्यासाठी त्याचीही प्रचंड कत्तल झाली. फर कोट वस्त्रप्रकारामध्ये ‘मिंक कोट’ हा सगळ्यात सुंदर आणि महागडा प्रकार आहे. हिमअस्वल किंवा चंदेरी कोल्हा हे प्राणी मोठे असतात, तर मिंक हा मुंगुसाप्रमाणेच छोटा असतो. त्यामुळे त्याचं कातडं कमावणं नि त्याचा कोट शिवणं हे फार कौशल्याचं काम असतं. अशा सर्व घटकांमुळे किंमत वाढत जाते. राजघराण्यातले लोक, गर्भश्रीमंत लोक, विशेषतः महिला आवर्जून ‘मिंक कोट’ घालतात. मग त्या घालतात म्हणून झटपट श्रीमंत झालेल्या नखरेल नट्या, मॉडेल्स, याही ‘मिंक कोट’ घालतात. अलीकडे ‘पॉप’ या संगीत प्रकारात बेयॉन्स आणि लेडी गागा नावाच्या दोन बायकांचा बराच बोलबाला आहे. पिशाच्चांप्रमाणे कानठळ्या बसवणार्‍या किंकाळ्या फोडत गात नि नाचत असताना बरेचदा त्यांच्या अंगात ‘मिंक कोट’ असतात. (अंगात काहीतरी असतं, हे नशीब म्हणायचं!)


मुक्या प्राण्यांची हत्या होता कामा नये, यासाठी आकाशपाताळ एक करणार्‍या अनेक संस्था पश्चिमेत आहेत. मग हे ‘मिंक कोट’ कसे बनतात? त्यासाठी मिंक कसे मारले जातात? मुक्या प्राण्यांच्या हत्याविरोधी कायद्यातून वाट काढण्यासाठी आणि नीट व्यवसाय करण्यासाठी काही युरोपीय देशांनी प्राण्यांच्या शिकारीऐवजी प्राण्यांच्या पालनाचा रीतसर व्यवसाय सुरू केला आहे. यात डेन्मार्क हा देश आघाडीवर आहे.


डेन्मार्क म्हटल्यावर काही जणांना तरी डेन्मार्क देशाचा राजपुत्र हॅम्लेट आणि शेक्सपिअरने ‘हॅम्लेट’ याच नाटकाद्वारे त्याची अजरामर केलेली शोकांतिका आठवेल. युरोपच्या उत्तरेकडे ‘स्कँडिनेव्हिया’ या नावाने ओळखलं जाणारं एक द्वीपकल्प आहे. त्यात नॉर्वे, स्वीडन, फिनलंड आणि डेन्मार्क हे देश येतात. डेन्मार्क देशातले कोणतेही ठिकाण समुद्रापासून ५० किमींपेक्षा जास्त दूर नाही. साहजिकच डॅनिश लोक पक्के दर्यावर्दी आहेत. प्राचीन काळी अमेरिकेत आणि उत्तर ध्रुवावर गेलेल्या लढवय्या व्हायकिंग लोकांना ते आपले पूर्वज समजतात. पंधराव्या शतकात समुद्रावर स्वामित्व गाजवण्यासाठी युरोपीय देशांमध्ये जी स्पर्धा लागली होती, त्यात डॅनिश लोकही होतं. शिवरायांचा ज्या युरोपीय देशांशी व्यापारी संबंध आला होता, त्यात ‘आंग्रेज’ म्हणजे इंग्रज, ‘फरांशीस’ म्हणजे फ्रेंच, ‘फिरंगी’ म्हणजे पोर्तुगीज, ‘वलंदेज’ म्हणजे हॉलंडीज किंवा डच, ‘इतालवी’ म्हणजे इटालियन यांच्याबरोबरच ‘डिंगमार’ म्हणजे डेन्मार्की म्हणजेच डॅनिश व्यापार्‍यांचाही उल्लेख आढळतो.


आधुनिक काळात डॅनिश लोक हे उत्तम शेतकरी आहेत. डॅनिश शेतकर्‍यांनी आपली पहिली सहकारी सोसायटी १८६६ साली स्थापन केली. दूध, लोणी, चीज, दुधाची भुकटी इत्यादी दूध संबंधित उत्पादनांसाठी डेन्मार्क हा जगातला क्रमांक एकचा उत्पादक आहे.

मात्र, तिथले शेतकरी हे प्रामाणिकपणे शेती, दूध उत्पादन, मासेमारी असे व्यवसाय निष्ठेने करतात. त्यात सतत नवनवीन कल्पना आणण्याचा प्रयत्न करतात. स्वतःला शेतकरी किंवा शेतकरीपुत्र म्हणवायचं आणि ज्या काळ्या आईच्या जीवावर मोठे झाले; तिच्यात अन्नाचे मोती पिकवणं बंद करा, तिचे भूखंड बनवा नि ते बिल्डरांना विकून कोट्यवधी कमवा. वर यालाच आधुनिकता, व्यवहारीपणा म्हणा, असले धंदे ते करीत नाहीत.


मग पैसा मिळवण्यासाठी ते काय नवीन करतात? डेन्मार्कमधला एक शेतकरी नेता टॉर्बन नील्सन हा अर्थशास्त्राचाही अभ्यासक आहे. त्याच्या असं लक्षात आलं की, चीन हा आता एक महासत्ता म्हणून उभरतो आहे. चीनमध्ये एक नवश्रीमंत वर्ग झपाट्याने पुढे येतो आहे. माओच्या काळात लोकांनी साधे, जाडेभरडे कपडेच वापरले पाहिजेत, अशी सक्ती होती. आताच्या राज्यकर्त्यांनी लोकांना सर्व प्रकारच्या फॅशन्स करण्याची पूर्ण मुभा दिली आहे. मग चीनमधल्या या नवश्रीमंत वर्गात आपल्या देशातली कोणती शेतकी उत्पादनं खपवता येतील? नील्सनने चीनचा दौरा केला आणि त्याला आढळलं की, आपल्याकडच्या फरच्या विविध वस्त्रप्रकारांना चीनच्या बाजारपेठेत चांगली मागणी येऊ शकते.


टॉर्बन नील्सन डेन्मार्कला परतला आणि वेगाने कामाला लागला. त्याच्या प्रयत्नांमधून अनेक डॅनिश शेतकर्‍यांनी मिंक पालन सुरू केलं. कुक्कुटपालन, वराहपालन, इमूपालन, तसं मिंकपालन. हे प्राणी अतिशय शास्त्रशुद्ध रीतीने पाळायचे, वाढवायचे आणि विशिष्ट वयाचे झाल्यावर त्यांना मारायचं. त्यांच्या केसाळ लोकरी कातड्यांचे उत्कृष्ट मिंक कोट बनवून ते चीनला निर्यात करायचे. मिंकच्या मांसाचे उत्तम खाद्यपदार्थही बनतात. आर्हूस या डेन्मार्कमधल्या एका मोठ्या शहरातली सार्वजनिक बस सेवा मिंकच्या चरबीपासून बनवलेल्या इंधनतेलावर चालते.



टॉर्बन नील्सन आणि अन्य डॅनिश शेतकर्‍यांनी १९९३ साली हा ‘मिंक फार्मिंग’चा व्यवसाय सुरू केला. आज २७ वर्षांनंतर हा प्रत्येक शेतकरी वर्षाला किमान ३ लाख ६५ हजार युरो एवढा निव्वळ नफा कमावतो आहे.


ते पाहा कोपनहेगन शहर. ही डेन्मार्कची राजधानी. त्या कोपनहेगनचं ते पहा ग्लॉसट्रॉप नामक उपनगर. ते पाहा तिथलं ‘डॅनिश फर ब्रीडर्स असोसिएशन’चं प्रशस्त कार्यालय. तिथे फर प्रकारच्या लोकरीचा म्हणजे लोकरयुक्त कातड्यांचा लिलाव चाललाय. लक्षात ठेवा, हे ठिकाण फरचं जगातलं सर्वात मोठं लिलावगृह आहे. या अगोदर ‘हडसेन बे’ कंपनीचं कॅनडामधलं फर लिलावगृह हे जगातलं सगळ्यात जुनं आणि सगळ्यात मोठं लिलावगृह होतं. तो मान आता कॅनडासारख्या धनाढ्य आणि अवाढव्य देशाकडून चिमुकल्या डेन्मार्कने खेचून आणलाय. गेल्या संपलेल्या एका वर्षात या लिलावगृहाने फरचे २० लक्ष पेळू विकून २० कोटी १० लक्ष युरोची कमाई केली. मिंकपालनाच्या या व्यवसायात कोणतंही प्रदूषण नाही, बेछूट नागरिकरण नाही. काहीतरी नवीन आहे, पैसाही अर्थातच आहे; पण तो निसर्गाशी समतोल राखून आहे. निसर्गाचं शोषण आणि निसर्गाचं दोहन, अशी संकल्पना माननीय दत्तोपंत ठेंगडी मांडायचे. त्या दोहनाचं हे प्रत्यक्ष उदाहरण आहे.


हां, यात मिंकची हत्या होते, हे खरंच. पण मग कुक्कुटपालन, वराहपालन, इमूपालन यात तर मांसासाठीच त्या त्या प्राण्यांना मारलं जातं. पण त्यात कोणतंही प्रदूषण नाही, हेही महत्त्वाचं!





@@AUTHORINFO_V1@@