भारतातील सर्वात लहान पालीचा उलगडा !

    24-Jun-2020   
Total Views |

 gecko _1  H x W

 
 
 
आंध्रप्रदेशमधील वेलीकोंडा पर्वतरांगामध्ये अधिवास

 
 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) - भारतातील आकाराने सर्वात लहान पालीचा शोध उभयसृपशास्त्रज्ञांनी लावला आहे. आंध्रप्रदेशमधील वेलीकोंडा पर्वतरांगामध्ये आढळलेल्या या पालीचे नामकरण ‘निमास्पिस अॅवासाबिने', असे करण्यात आले आहे. 'निमास्पिस' कुळासह देशात आजवर शोधलेली ही आकाराने सर्वात लहान पाल आहे. या महिन्याभरात 'निमास्पिस' कुळातील पालींच्या पाच नव्या प्रजातींचा शोध लावण्यात संशोधकांना यश मिळाले आहे. 
 
 
 
 
देशात तयार झालेली उभयसृपशास्त्रज्ञांची तरुण पिढी या क्षेत्रात अमूल्य योगदान देत आहे. उभयसृपांमधील नव्या प्रजातींचा शोध घेऊन भारताच्या जैवविविधता भर घालण्याचे काम ही तरुण मंडळी करत आहेत. राज्यातील तरुण उभयसृपशास्त्रज्ञ अक्षय खांडेकर, इशान अग्रवाल आणि अमेरिकेचे अॅरोन बाऊर यांनी भारतातील आकाराने सर्वात छोट्या पालीचा शोध लावला आहे. ‘निमास्पिस’या कुळातील पालींना ‘ड्वार्फ गेको’ असे म्हणतात. या कुळातील पाली भारतात आढळणाऱ्या साप आणि पालींपेक्षा प्राचीन असून त्यांची उत्क्रांती साधारणपणे ५० दशलक्ष वर्षांपूर्वी पश्चिम घाटामध्ये झाली. त्यांच्या गोल आकाराच्या बुबुळांच्या वैशिष्ट्यामुळे या कुळातील पाली भारतात आढळणाऱ्या इतर पालींपासून सहज वेगळ्या ओळखून येतात. भारतातील इतर पालीची बुबुळे उभी असतात. देशात सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या पाली निशाचर आहेत. परंतु, ‘निमास्पिस’ कुळातील पाली मुख्यत्वे दिनचर असतात. त्यांच्या या वैशिष्ट्यामुळे त्यांना ‘डे गेको’ असेही संबोधले जाते. भारतामध्ये ‘निमास्पिस’या कुळातील आजवर ५० प्रजातींची नोंद झालेली आहे. त्या पश्चिम घाट, मैसूरचे पठार, पूर्व घाटातील काही भाग, आसाम, अंदमान आणि निकोबर बेटांवरती आढळतात. त्यांचे मुख्य खाद्य हे कीटक असून त्यानैसर्गिक अन्नसाखळीचा महत्वाचा भाग आहेत.
 
 
 
 
'निमास्पिस अॅवासाबिने' नामक या नव्या पालीच्या प्रजातीचा शोध आज सकाळी ‘झूटाक्सा’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला. नव्याने उलगडलेली ही पाल पूर्व घाटामधील आंध्रप्रदेशच्या वेलीकोंडा पर्वरागांमध्ये २०१४ साली आम्हाला सर्वप्रथम आढळल्याची माहिती उभयसृपशास्त्रज्ञ अक्षय खांडेकर यांनी दिली. या पालीचा आकारावरुन आम्हाला ही विज्ञानासाठी नवीन प्रजात असू शकेल असे वाटले होते. परंतु, भारतातील पश्चिम घाटामधून या कुळातील पालींच्या नमुन्यांअभावी यांचा तुलनात्मक अभ्यास होऊ शकला नाही. किंवा नवीन असल्याची तपासणी करता आली नाही. जून २०१८ मध्ये आमच्या संशोधकांच्या टीमने पश्चिम घाटातील जंगलांमधून या कुळातील वेगवेगळ्या प्रजातींचे नमुने तुलनात्मक अभ्यासासाठी गोळा केले. प्रयोगशाळेतील आकरशास्त्रीय अभ्यासाअंती लक्षात आले की, वेलीकोंडा पर्वतरागांमधील ही पाल खरोखरच विज्ञानासाठी नवीन आहे, असे खांडेकर यांनी सांगितले. या पालीचा आकार २९ मिलिमीटर असल्याने ती भारतात आढळणारी आजवरची सर्वात छोटी पाल असल्याचे, खांडेकर म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे ही प्रजात प्रदेशनिष्ठ असून ती केवळ वेलीकोंडा पर्वतरागांमध्येच आढळून येते. 
 
 
पालीच्या या नव्या प्रजातीला दिलेले 'निमास्पिस अॅवासाबिने’ हे नाव अॅवा साबिन या महिला सरीसृप संवर्धकाच्या नावावरुन देण्यात आले आहे. या पालीचे इंग्रजी नामकरण ‘साबिनन्स नेल्लोर ड्वार्फ गेको’ असे करण्यात आले आहे. ‘निमास्पिस’ या कुळातील पश्चिम घाटाबाहेर सापडलेली ही १२ वी प्रजात आहे. ती बहुतांश करुन सायंकाळच्या सुमारास आढळते. ओढ्यानजीक आढळणाऱ्या खडकांवर तिचा अधिवास आहे. सर्वसाधारणपणे 'निमास्पिस' कुळातील पालींना प्रीक्लोकॅल आणि फिमोरल ग्रंथी असतात. मात्र, या नव्या पालीमध्ये फिमोरल ग्रंथी नसल्याचे संशोधकांना आढळले आहे. 
 
 
 

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.