भित्यापाठी ब्रह्मराक्षस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jun-2020   
Total Views |
china_1  H x W:




अर्थकारणाला भारत जुमानत नाही म्हणून चिनी ड्रॅगनने सैनिकी फणा उगारला आहे. पण, सामान्य भारतीयातला कालियामर्दन जागा झाला, तर तो कितीही फणांच्या ड्रॅगनच्या माथ्यावर थयाथया नाचू शकतो, हे सत्य आहे. चिनी मालावरच्या बहिष्कारातून चिनी अर्थव्यवस्था उलथून पडणार नाही. पण, डळमळीत होऊ शकते आणि जेव्हा अर्थकारणाचाच तोल जातो, तेव्हा प्रशासन व सैनिकी बळाचाही तोल जाण्याला पर्याय नसतो.



नकारात्मकता कधीच हिंमत देत नसते आणि लढण्यासाठी शस्त्रास्त्रे लागत नाहीत, तर हिंमत आवश्यक असते. ज्यांना हिंमत म्हणजे काय, तेच ठाऊक नसते, त्यांना कुठलीही लढाई लढता येत नाही किंवा जिंकताही येणार नसते. त्यामुळे चिनी मालाच्या बहिष्काराच्या गोष्टी लडाखच्या झटापटीनंतर सुरू झाल्या आणि अशा दिवाभितांना घाम फुटलेला आहे. चिनी मालावर बहिष्कार म्हणजे तत्काळ जगाची अर्थव्यवस्थाच कोसळून पडली, म्हणून त्यांनी ऊर बडवायला सुरूवात केली, तर म्हणूनच नवल नाही. त्यांचे शब्द व अक्कल खरी असती, तर उद्याचा सूर्यसुद्धा चिनी इच्छेनुसारच उगवला असता आणि शी जिनपिंग यांना विचारल्याखेरीज मावळलाही नसता. अशा विचारांनी ग्रासलेल्यांना चिनी मालावर बहिष्कार म्हणजे काय, त्याचाच बोध झालेला नाही. पण, ज्यांना त्याचे जबरदस्त चटके बसू शकतात, त्यांना या आवाहनाची भीषण क्षमता त्यापूर्वीच उमजलेली आहे. म्हणून त्यांनी नुसता सुगावा लागताच बोंबा ठोकायला सुरूवात केलेली आहे. लडाखची घटना कालपरवाची आहे. पण, तिथे चिनी सैनिकांनी आगाऊ पवित्रा घेतल्यापासून भारतात काही उत्साही लोकांनी चिनी मालावर बहिष्कार घालण्याची भाषा सुरू केली. त्याचे तत्काळ प्रतिसाद चिनी सरकारच्या मुखपत्रातून उमटले होते. कारण होते, एक सामान्य मजेशीर व्यंगचित्र. जगात आपल्या गुणवत्तेने बॅ्रण्ड बनलेल्या अमूल या दुग्धपदार्थ उत्पादक भारतीय कंपनीने नेहमीप्रमाणे एक जाहिरात केली आणि ‘ग्लोबल टाईम्स’ या चिनी मुखपत्राला मिरच्या झोंबल्या होत्या. चिनी सरकारने दडपण आणून ती जाहिरात वा व्यंगचित्र झाकण्याचा आटापिटा केला. ज्याला इथले महान अर्थशास्त्री जगातली ‘आर्थिक महाशक्ती’ म्हणून गौरवतात, ती अर्थसत्ता एका व्यंगचित्राने भयभीत होते? एका जाहिरातीतले मजेशीर व्यंगचित्र बघून बाहुबली घाबरतो?


जगात कोणीही इतका मोठा नसतो किंवा शक्तिशाली नसतो की, त्याला आव्हान देणेच अशक्य असते. जोपर्यंत इतर सगळे घाबरून गप्प असतात, तेव्हाच कोणीतरी बाहुबली उदयास येत असतो आणि त्याचे आयुष्य कुठूनतरी आव्हान मिळण्यापुरतेच मर्यादित असते. शंभर अपराध भरण्यापर्यंत शिशूपालाचे होते, तितकेच. जेव्हा अपराधांची संख्या पूर्ण होते किंवा अन्य कोणी आव्हान देण्यासाठी उभा ठाकतो, तेव्हा बाहुबलीचे आयुष्य संपण्याची वेळ येते. चीनची कहाणीही वेगळी नाही. त्याच्याशी तुल्यबळ लोकसंख्या असलेल्या भारताला फक्त ‘बाजारपेठ’ समजण्याची त्याने घोडचूक केली आहे. त्यापेक्षाही भारतात कधीच कोणी खंबीर नेता उदयास येणार नाही, असाही खुळा समज करून घेतल्याचा हा परिणाम आहे. इथे देशासाठी आत्मसमर्पण करायला उतावळ्यांची संख्या कधीच कमी नव्हती आणि त्याची चुणूक सोमवारी मोजक्या भारतीय जवानांनी दाखवलेली आहे. त्यापैकी कोणी ‘अर्थशास्त्री’ नव्हता. त्यामुळेच जेव्हा भारतीय सैनिक सीमेवर हुतात्मा व्हायला पुढे झेपावतो, तेव्हा सामान्य भारतीय माणूसही आपले योगदान म्हणून कुठलाही त्याग करायला सज्ज असतो. फक्त त्याला आपले नेतृत्व करणार्‍यावर तितकी श्रद्धा असावी लागते. जेव्हा तसा नेता किंवा सेनापती नसतो, तेव्हा तोच भारत सुप्तावस्थेत निद्रीस्त असतो. त्याला डिवचू नये किंवा जागवू नये. लडाख प्रकरणात चीनने तीच चूक केली आहे. त्याला जवाहरलाल नेहरू व नरेंद्र मोदी यांच्यातला फरक ओळखता आलेला नाही; अन्यथा त्याने इतकी आत्मघातकी चूक नक्कीच केली नसती. आता ती चूक केलेलीच असेल, तर त्याची किंमतही मोजावी लागणार आहे आणि ती किंमत केवळ सैनिकी युद्धातली नसेल, तर आर्थिक व औद्योगिक क्षेत्रातीलही असेल. कारण, चिनी मालाला आज भारताइतका अन्य कोणी मोठा ग्राहक उरलेला नाही. कोरोनामुळे जगभरची बाजारपेठ ओस पडली आहे आणि भारतात गरिबी असली तरी ग्राहक संख्या मोठी आहे.


साधारण ४५ टक्के चिनी मालाची विक्री भारतात होते आणि म्हणूनच ‘ग्लोबल टाईम्स’ या चिनी मुखपत्राने चिनी मालाशिवाय भारताला जगता येणार नाही, अशी दर्पोक्ती केली होती. पण, तो चिनी माल भारतीय ग्राहकापर्यंत पोहोचवणार्‍या दुकानदार व्यापारी संस्थेनेच परस्पर उत्तर दिले आहे. कोट्यवधी दुकानदारांची संघटना असलेल्या या संस्थेने यापुढे चिनी मालाची आयात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे आणि बदल्यात पर्यायी मालाचे भारतातच उत्पादन होण्याला प्रोत्साहन देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी आपल्या दुकानात येणार्‍या ग्राहक सामान्य नागरिकाला स्वदेशी माल व त्यातील राष्ट्रवाद शिकवण्याची जबाबदारी त्याच संस्थेने उचलली आहे. त्याचा अर्थ पुस्तकी अर्थपंडितांना समजू शकत नाही. कारण, त्यांना जीवंत माणसे ठाऊकच नसतात. त्यांना वर्तमानपत्र वा पुस्तकातले आकडे म्हणजेच ‘माणसे’ व ‘लोकसंख्या’ वाटते. त्या लोकसंख्येतल्या भावना व भावविश्व त्यांचे निर्णय ठरवित असते. त्यासाठी कुठल्या अर्थशास्त्राचे दाखले नागरिक शोधत नाही किंवा मागत नाही. जनभावनाच चीनविरोधात प्रक्षुब्ध झालेली असेल, तर तिला कुठलेही अर्थशास्त्र बदलू शकत नाही की रोखू शकत नाही. हजारो मैल चालत आपल्या गावी पोहोचताना गाडी बस वा अन्य वाहनासाठी लाचार नसलेला कोट्यवधी समाज त्याची साक्ष देत असतो. पण, ते बघण्यासाठी व समजून घेण्यासाठी डोळे उघडे असायला हवेत आणि मेंदूही जागृत असायला हवा. त्या कोट्यवधी प्रवासी स्थलांतरित मजुरांनी बिनातक्रार कष्ट घेतले आणि त्यांचे आकडे मोजत बसलेल्यांनीच अश्रू ढाळले होते. त्या अश्रू ढाळणार्‍यांना भारत कधी समजलेला नाही, तर त्याच भारतातल्या नागरिकांच्या चीनविषयक भावना वा प्रक्षोभ कसा कळावा? त्यांना बहिष्काराची क्षमता कशाला उमजावी? त्यांनी अर्थशास्त्राचे निरर्थक अश्रू ढाळत बसावे. सामान्य कोट्यवधी भारतीय चीनला धडा शिकवायला सज्ज होत आहेत. त्याचे चटकेही चीनला बसू लागले आहेत.


आवडत्या पंतप्रधानाने साधे आवाहन केले आणि दोन कोटी कुटुंबांनी आपले सुखवस्तू जीवन मान्य करून गॅसची सबसिडी सोडली. त्यातून आणखी सहा-सात कोटी गरीब कुटुंबीयांना घरगुती गॅस सिलिंडर जोडणी मिळू शकली. हा विश्वास त्या भारतीय लोकसंख्येवर आणि तिच्यातल्या सदिच्छेवर आधीच्या कुणा नेत्याने कशाला दाखवला नव्हता? नोटाबंदीच्या जाचक कालखंडातून कोट्यवधी जनता गेलीच ना? तिने कुठली किती तक्रार केली? तेव्हाही हे दिवाळखोर ‘अर्थकारण बुडाले’ म्हणून रडतच होते ना? म्हणून देश थांबला नाही की संपलेला नाही. रडणार्‍यांनी टाहो फोडला म्हणून देश मागे पडला नाही आणि चीनसुद्धा अशा समाजाला देशाला ग्राहक म्हणून वेठीस धरू शकत नाही. उलट आपल्या ग्राहकशक्तीच्या बळावर कोट्यवधी भारतीय चिनी सत्तेला, अर्थकारणाला व सेनेलाही ओलिस ठेवू शकतात. किंबहुना, त्याचीच चाहूल लागल्याने चिनी राज्यकर्ते सैरभैर झालेले आहेत. अर्थकारणाला भारत जुमानत नाही म्हणून चिनी ड्रॅगनने सैनिकी फणा उगारला आहे. पण, सामान्य भारतीयातला कालियामर्दन जागा झाला, तर तो कितीही फणांच्या ड्रॅगनच्या माथ्यावर थयाथया नाचू शकतो, हे सत्य आहे. चिनी मालावरच्या बहिष्कारातून चिनी अर्थव्यवस्था उलथून पडणार नाही. पण, डळमळीत होऊ शकते आणि जेव्हा अर्थकारणाचाच तोल जातो, तेव्हा प्रशासन व सैनिकी बळाचाही तोल जाण्याला पर्याय नसतो. अर्थकारण सैन्यासाठी रसद असते, या देशात अर्धपोटी राहून ‘जय जवान, जय किसान’ घोषणा यशस्वी करणारी पिढी झालेली आहे. घरातले दागदागिने सैन्याच्या खर्चाला दान करणार्‍या रणरागिणी इथल्याच आहेत. त्याचे ज्ञान व भान असलेला माणूस पंतप्रधान म्हणून देशाचे नेतृत्व करतो आहे. चिनी मालाचा बहिष्कार त्याचा एक पैलू आहे. त्याचे भयंकर प्रतिबिंब चिनी नेते बघू शकतात. म्हणून तर ‘अमूल बेबी’च्या एका व्यंगचित्राने त्यांना घाम फुटतो. जेव्हा हा बहिष्कार उलगडत जाईल, तेव्हा चिनी राज्यकर्त्यांपासून भारतीय अर्थशास्त्र्यांची किती गाळण उडाली असेल, त्याची नुसती कल्पना करावी!


@@AUTHORINFO_V1@@