'कोरोना'ग्रस्त अमेरिकेतील तेहरीर चौक घटिका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jun-2020   
Total Views |
us_1  H x W: 0



अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या असून या आंदोलनामुळे समाजातील ध्रुवीकरण वाढावे, यासाठीही प्रयत्न होत आहेत. अमेरिकेतील आंदोलनाचे लोण युरोपमध्येही पोहोचले असल्याने जॉर्ज फ्लॉएडची महंमद बाउझिझीशी तुलना करण्याचा मोह होतो.



सहा महिन्यांवर आलेल्या निवडणुका, 'कोविड-१९' बळींची एक लाखांवर गेलेली संख्या, घसरणारी अर्थव्यवस्था, हेकेखोर अध्यक्ष आणि अतिडावीकडे सरकणारा विरोधी पक्ष, अशा आव्हानांचा सामना करणारी अमेरिका आज वांशिक हिंसाचाराने पेटून उठली आहे. जॉर्ज फ्लॉएड या कृष्णवर्णीय तरुणाच्या पोलीस कस्टडीतील मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्याविरुद्ध आंदोलक रस्त्यात उतरले. सुरुवातीला शांततामय मार्गाने चाललेल्या निदर्शनांनी लवकरच हिंसक वळण घेतले. आज दोनशेहून अधिक शहरात हे आंदोलन सुरू असून ठिकठिकाणी दुकानं लुटणं, गाड्यांना आगी लावणे यासोबतच चर्च आणि ज्यू लोकांच्या सिनेगॉगवरही हल्ले झाले आहेत.

वॉशिंग्टनमध्ये व्हाईट हाऊसजवळील आंदोलन हिंसक होऊन तेथे डोनाल्ड ट्रम्प जात असलेल्या चर्चवरही हल्ला करण्यात आला. यामुळे सावध होऊन गुप्तचर संस्थांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षित स्थळी हलवले खरे, पण लवकरच ट्रम्प यांनी हल्ला केलेल्या चर्चला भेट देऊन आपण हिंसक आंदोलन कठोरपणे मोडून काढू, असे घोषित केले. आंदोलकांकडून होत असलेल्या गोळीबारात अनेक लोक जखमी किंवा मृत झाले असून सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून पोलिसांनी सुमारे पाच हजार लोकांना अटक केली आहे. अनेक ठिकाणी नॅशनल गार्डना पाचारण केले गेले असून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंसाचार थांबला नाही, तर लष्कराला पाचारण करुन हा प्रश्न चुटकीसरशी सोडवू अशी फुशारकी मारली आहे.

कोरोना संकटकाळात अमेरिकेतील वांशिक विद्वेशाला मोठ्या प्रमाणावर खतपाणी घातले गेले. श्वेतवर्णीय पोलीस अधिकार्‍यांकडून, संशयित गुन्हेगार कृष्णवर्णीय असल्यास, अनेकदा त्यांना सापत्न वागणूक दिली जाते. अर्धे कृष्णवर्णीय बराक ओबामा अध्यक्ष असतानाही अशा प्रकारच्या घटना घडत होत्या. पण, कोरोनामुळे वाढलेली गरिबी आणि बेरोजगारीचा सर्वाधिक फटका तुलनेने कमी शिक्षित असलेल्या आणि हातावर पोट असणार्‍या हिस्पॅनिक आणि कृष्णवर्णीयांना जास्त बसला आहे. या सगळ्याचा राग या आंदोलनात दिसत आहे. अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुका अनवघ्या काही महिन्यांवर आल्या असून या आंदोलनामुळे समाजातील ध्रुवीकरण वाढावे, यासाठीही प्रयत्न होत आहेत. अमेरिकेतील आंदोलनाचे लोण युरोपमध्येही पोहोचले असल्याने जॉर्ज फ्लॉएडची महंमद बाउझिझीशी तुलना करण्याचा मोह होतो.

ट्युनिशियाची राजधानी ट्युनिस येथे १७ डिसेंबर, २०१० मध्ये फळविक्रेता असलेल्या महंमद बाउझिझीने महापालिकेच्या भ्रष्ट अधिकार्‍यांकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून भर रस्त्यात स्वतःला पेटवून घेतले. त्याच्या मृत्यूने क्रांतीची ठिणगी पडली. सारे अरब जग भ्रष्टाचार, बेकारी, गरिबी आणि शासकीय अनास्थेविरोधात पेटून उठले आणि ठिकठिकाणच्या चौकांत प्रस्थापित सत्ताधार्‍यांविरोधात निदर्शनं सुरु झाली. कैरोचा तेहरीर चौक या आंदोलनांचा केंद्रबिंदू ठरला. आंदोलनांच्या धगीने ट्युनिशिया आणि इजिप्तसारख्या देशात शांततामय मार्गाने सत्तांतर झाले तर लिबिया, येमेन, सीरियासारख्या देशांना युद्ध आणि यादवीने उद्ध्वस्त केले.

सोमवार, दि. २५ मे रोजी जॉर्ज फ्लॉएड या ४६ वर्षांच्या कृष्णवर्णीय तरुणाने मिनिसोटा राज्यातील मिनियापोलीस शहरात सिगारेटचे पाकीट घेण्यासाठी २० डॉलरची खोटी नोट दिली म्हणून दुकानातील कर्मचार्‍यांनी त्याचा पाठलाग करुन ते पाकीट परत मागितले. त्यावेळी झालेल्या वादावादी दरम्यान तेथे तैनात असलेल्या तीन पोलिसांनी फ्लॉएडला पकडले. त्यातील डेरेक शॉविन या अधिकार्‍याने फ्लॉएडला जमिनीवर उताणा पाडून त्याला हातकड्या घातल्या आणि त्याच्या मानेवर गुडघा रोवून सुमारे नऊ मिनिटे उभा राहिला.

फ्लॉएडने आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतोय असे सांगितले, पण पोलिसाने त्याकडे लक्ष दिले नाही. शेवटची दोन अडीच मिनिटे फ्लॉएडने हालचाल करणे थांबवले तरी पोलीस अधिकार्‍याला त्याची दया आली नाही. फ्लॉएडच्या मृत्यूमुळे कृष्णवर्णीय नागरिकांना, खासकरुन संशयित गुन्हेगारांना पोलिसांकडून आणि एकूणच व्यवस्थेकडून मिळणार्‍या सापत्नतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. डेरेक शॉविनला तत्काळ अटक झाली असून त्याच्याविरुद्ध हत्येचे कलम लावले असले तरी लोकांसाठी ते पुरेसे नाही.
अमेरिकेत १८ लाखांहून अधिक लोक कोरोनाने ग्रस्त असून एक लाख पाच हजारांहून अधिक लोकांचा यात मृत्यू झाला आहे. अर्थव्यवस्थेला प्रचंड मोठा फटका बसला आहे. चार कोटी लोकांचे रोजगार गेले असून, या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पन्न गेल्या वर्षीच्या दुसर्‍या तिमाहीपेक्षा निम्याहून जास्त कमी होईल, असा अंदाज आहे. या वर्षीच्या राष्ट्रीय उत्पन्नात पाच टक्क्यांहून अधिक घट होणार असून पुढील दहा वर्षांत कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी अमेरिकेला आठ लाख कोटी डॉलरहून अधिक किंमत मोजावी लागणार आहे.

कृष्णवर्णीय हे अमेरिकेतील दुसरे सर्वात मोठे वांशिक अल्पसंख्याक असून लोकसंख्येच्या तुलनेत त्यांची संख्या १२.५ टक्के म्हणजेच पावणेचार कोटी आहे. दक्षिण अमेरिकेतून येऊन स्थायिक झालेल्या 'हिस्पॅनिक' म्हणजेच स्पॅनिश भाषिक लोकांची संख्या सुमारे १६.७ टक्के म्हणजे ५.२ कोटी आहे. त्यांची सामाजिक परिस्थिती कृष्णवर्णीयांहून बरी असली तरी खूप चांगली आहे, असं म्हणता येणार नाही. कोरोनामुळे अमेरिकेत चार कोटींहून अधिक लोकांचे रोजगार गेले आहेत. भारतात मुलांचे शिक्षण, लग्न किंवा स्वतःच्या म्हातारपणासाठी तजवीज म्हणून कनिष्ठ मध्यमवर्गीय तसेच गरीबही सोने किंवा रोखीच्या रुपात काही बचत करतात. पण, अमेरिकेतील गरिबांमध्ये बचत करण्याचे प्रमाण कमी असून अनेक जण कर्ज काढून जगतात.

कोरोनावर उपाययोजना म्हणून अमेरिकेने २.२ लाख कोटी डॉलरचे पॅकेज जाहीर केले असून आणखी तीन लाख कोटी डॉलरच्या पॅकेजचे विधेयक प्रतिनिधीगृहात मंजूर झाले आहे. जर ते सिनेट आणि अध्यक्ष ट्रम्प यांनी मान्य केले तर एकूण मदत भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या जवळपास दुप्पट आणि 'आत्मनिर्भर भारत' योजनेच्या वीसपट असेल. या पॅकेज अंतर्गत वर्षाला ७५ हजार डॉलरपेक्षा कमी उत्पन्न असणार्‍या अमेरिकन कुटुंबांना दर महिन्याला १२०० डॉलरची मदत करण्यात येईल. असे असूनही अमेरिकेत आंदोलनं होत आहेत. यामागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे, भारताच्या तुलनेत अमेरिकेत खूप जास्त लोक संघटित क्षेत्रात काम करतात. दुसरं म्हणजे, अमेरिकेतली जीवनशैली अशी आहे की, तुम्ही काटकसरीत जगू शकत नाही. भारताच्या तुलनेत लोकांची सोशिकताही कमी आहे.

कोरोनामुळे भारतातील लाखो लोकांना, मिळेल त्या मार्गाने शहरातून आपल्या गावी परतायची वेळ आली. अनेकांनी शेकडो किमी अंतर चालत पार केले. पण, असे असताना त्यांने पराकोटीचा सोशिकपणा दाखवला आणि कठीण प्रसंगातही कायदा स्वतःच्या हातात घेतला नाही. काही विशिष्ट गट वगळता पोलिसांवर हल्ला केला नाही. दुसरीकडे मध्यमवर्गीय लोकांनीही स्वतःहून पुढे येऊन घरी परत चाललेल्या श्रमिकांना शक्य ती मदत केली. याचे कारण भारतात समान संस्कृतीचा धागा लोकांना जोडतो. अमेरिकेत व्यक्तिगत आणि सामाजिक संपन्नतेच्या स्वप्नासाठी, ज्याला आपण 'अमेरिकन ड्रीम' म्हणतो, जगभरातून आलेल्या लोकांना एकत्र बांधणारा धागा हा आर्थिक आहे. अनेक राज्यांत कायद्याने अगदी सहजपणे बंदूक बाळगता येत असल्याने गुन्हेगार तसेच पोलिसांचे सशस्त्रीकरण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. त्यामुळे परस्पर अविश्वासातून अशा घटनांत वाढ होते. जॉर्ज फ्लॉएडचा मृत्यू आणि त्यानंतर उसळलेले हिंसक आंदोलन यामुळे आजवर सर्वांना हव्याहव्याश्या वाटणार्‍या अमेरिकन स्वप्नाला म्हणूनच तडे गेले आहेत.



 
 
@@AUTHORINFO_V1@@