वन विभागाची ‘कौशल्या’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2020   
Total Views |
Koushalya Bhosale_1 

 



वृक्षसंपदेचा बेकायदेशीरपणे र्‍हास करणार्‍या आरोपींच्या बेधडकपणे मुसक्या आवळणारी वन विभागाची ‘कौशल्या’ म्हणजे वनपरिक्षेत्र अधिकारी कौशल्या हनमंत भोसले...
 
   
 

 

वन विभागासारख्या पुरुषांची मक्तेदारी असणार्‍या विभागात पहिल्याच नेमणुकीत त्यांनी आपल्या कामाची चमक दाखवली. कर्तव्यदक्ष आणि कार्यशील अधिकारी म्हणून वन विभागातील महिला कर्मचारी आणि अधिकार्‍यांचे ‘त्या’ प्रतिनिधित्व करतात. वनसंवर्धनाचे व्रत घेऊन पश्चिम घाटाच्या जंगलाला पोखरु पाहणार्‍यांना त्यांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. अवैध वृक्षतोड आणि अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी त्या भरीव कामगिरी करत आहेत. वृक्षसंपदेचा बेकायदेशीरपणे र्‍हास करणार्‍या आरोपींच्या त्या बेधडकपणे मुसक्या आवळतात. मानव-वन्यजीव संघर्षामुळे निर्माण होणारा कठीण प्रसंगही त्या वेळीच सावरतात. वन विभागाची ही ‘कौशल्या’ म्हणजे वनपरिक्षेत्र अधिकारी कौशल्या भोसले! 
 

सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर या गावात १५ डिसेंबर, १९८८ रोजी कौशल्या यांचा जन्म झाला. जन्म सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला असला तरी शिक्षणाप्रति रूची असलेले हे कुटुंब. रहिमतपूर गावामध्येच शिक्षणाप्रति एक जागृती होती. त्यामुळे शैक्षणिक पातळीवर कौशल्या यांना घरच्यांकडून उत्तम पाठिंबा मिळाला. लहानपणी शिक्षकांनीच त्यांचा मनात निसर्गाची गोडी रुजवली. उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी ठेवणे, पावसाळ्याच्या तोंडावर वृक्षारोपण करण्यासारखे उपक्रम शाळेतूनच त्यांच्या अंगी बिंबवण्यात आले होते. त्यामुळेच निसर्ग आणि आसपासच्या पर्यावरणाची गोडी त्यांना लागली. शालेय शिक्षणानंतर त्याच अनुषंगाने शिक्षण घेण्यासाठी त्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. कृषिविद्या शास्त्रज्ञातून त्यांनी पदवीचे आणि त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण घेतले. शैक्षणिक पातळीवर उत्तम कामगिरी करत असल्याने आपण वेगळ्या वाटांचा मागोवा घ्यावा, याची आस नेहमीच त्यांच्या मनी होती. म्हणूनच चाकोरीबाहेरच्या क्षेत्रात कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून काम करण्याचा निश्चय त्यांनी मनोमन पक्का केला.
 
पदवीच्या शिक्षणादरम्यानच कौशल्या यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरु केला. मात्र, पदव्युत्तर शिक्षणादरम्यान त्या अभ्यासामध्ये खंड पडला. एम.एस्सीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी पुण्यात शिकवणी लावली. २०१६ साली त्या एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. निसर्ग संवर्धनाची आवड असल्याने वन विभागातच आपली सेवा देण्याचे त्यांनी निश्चित केले. २०१६ ते २०१८ या कालावधीत त्यांनी तामिळनाडूमधून वनसेवेचे प्रशिक्षण घेतले. २०१८ साली त्या वन विभागात रुजू झाल्या. सुरुवातीच्या १८ महिन्यांचा काळात त्यांनी वन विभागातील वेगवेगळ्या कक्षांमध्ये काम केले. सप्टेंबर, २०१९ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी वनपरिक्षेत्राच्या अधिकारी म्हणून त्यांची नियुक्त झाली.
 
गारगोटीमधील आपल्या दहा महिन्यांच्या कार्यकाळातच कौशल्या यांनी वनसंवर्धनाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी परिक्षेत्राचा समावेश पश्चिम घाटामध्ये होतो. असे असले तरी, जिल्ह्यातील या पश्चिम भागातील वनहद्दीत वनगुन्ह्यांची संख्या लक्षणीय आहे. भुदरगड-गारगोटी येथील वनक्षेत्रांमध्ये अतिक्रमण, अवैध वृक्षतोड, मानव-वन्यजीव संघर्षासारख्या बर्‍याच समस्या आहेत. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी कौशल्या प्रयत्नशील आहेत. या वनपरिक्षेत्रात नियुक्ती झाल्यावर त्यांना जंगल आणि ग्रामीण भागाची फारशी माहिती नव्हती. मात्र, नियुक्ती झाल्यावर त्यांनी पहिल्या आठ दिवसांमध्ये आपल्या कार्यक्षेत्रातील जंगल आणि गावे पिंजून काढली. गावांचे दौरे करुन तेथील भौगोलिक परिस्थिती समजून घेतली. जंगलाच्या हद्दीजवळ वसलेल्या गावातील ग्रामस्थांशी संवाद साधण्यावर भर दिला. त्याचे फळ म्हणजे, याच लोकांनी पुढे येऊन त्यांना वनगुन्ह्यांची माहिती आणि तक्रारी वन विभागाला सांगितल्या.
 
जंगलामधील रात्रीच्या गस्तीला त्यांनी सुरुवात केली. शेणगाव भागातील बेकायदा वृक्षतोडीची माहिती मिळताच तातडीने त्याठिकाणी धाड टाकून वृक्षतोड रोखली आणि आरोपींवर गुन्हे दाखल केले. भुदरगड मडुर येथील एका व्यावसायिकाने जंगलातील झाडे तोडून रस्ता तयार करत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. घटनास्थळी जाऊन त्यांनी मोठ्या हिमतीने जेसीबी ताब्यात घेतला आणि व्यावसायिकावर गुन्हा दाखल केला. हणबरवाडी परिक्षेत्रातील अवैध वृक्षतोडीवरही त्यांनी चाप लावला. ग्रामसडक योजनेतील अभियंत्यांनी बारवे ते जखीन पेठ मार्गावरील जंगलामधून रस्ता तयार करताना वन विभागाची परवानगी घेतली नव्हती. ही बाब लक्षात येताच, त्यांनी संबंधित विभागाला विनापरवाना हे काम करता येणार नाही, याची जाणीव करुन दिली. यावर वादाचे प्रसंग निर्माण झाले. त्यांच्यावर दबावही आला. मात्र, विनापरवाना वनहद्दीत रस्ते काम करणे कायद्यानुसार गुन्हा आहे, याची जाणीव त्यांनी करुन दिली. वनगुन्हे रोखण्यासाठी त्यांच्या धडाडीने काम करण्याच्या वृत्तीमुळे काही घटक दुखावले. परंतु, त्यांना समजावून गैरसमज दूर झाल्याने वनसंरक्षणाच्या कामात कौशल्या यांना यश मिळवता आले आहे. गारगोटी वनपरिक्षेत्रातील मानव-गवा संघर्षाचा प्रश्नही सुरळीतपणे सोडविण्यासाठी त्या पूर्णपणे प्रयत्नशील आहेत. अशा वन विभागाच्या रणरागिणीला पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!

 

 
 
@@AUTHORINFO_V1@@