जॉर्ज फ्लॉएड आणि डाव्यांची ‘डबल पीएच.डी’

    17-Jun-2020   
Total Views | 113


George Floyd _1 &nbs


डाव्या मंडळींचा एक सुनियोजित ‘अजेंडा’ आहे. देशात अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण करायची. ती निर्माण करण्यासाठी बंदुकीतील गोळी म्हणून, अनुसूचित जाती-जमाती आणि मुसलमान यांचा उपयोग करायचा.


जॉर्ज फ्लॉएड या कृष्णवर्णीयाची अमेरिकेतील पोलिसाने निर्घृण हत्या केली. त्याच्या विरोधात जगभर ‘Black Lives Matter’ या नावाने आंदोलन सुरू झाले. त्याचे मराठी रूपांतर करायचे तर असं म्हणता येईल की, ‘काळ्यांचे जीवनदेखील अर्थपूर्ण आहे, त्याची दखल घ्या.’ अमेरिकेत आणि युरोपमध्ये एक चांगली गोष्ट बघायला मिळते ती म्हणजे, या आंदोलनात गोरे लोकही मोठ्या संख्येने उतरले आहेत. आपल्या देशातही अन्याय, अत्याचाराच्या घटना घडतात. अशा वेळी व्यक्ती ज्या जातीची असेल, त्या जातीचे लोक आंदोलनात उतरतात. दलित विषय घेतला तरी दलित युवकावर झालेल्या अत्याचाराविरुद्ध सर्व दलित जाती संघटितपणे आंदोलन करताना दिसत नाहीत. अमेरिका आणि भारतात हा फरक आहे.
 
भारतातील अनुसूचित जाती-जमाती आणि भटके-विमुक्त यांच्या अभिव्यक्तीचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे, त्या त्या जातीच्या संघटना आणि नेतृत्व घटनेच्या निषेधासाठी रस्त्यावर येऊन आंदोलन करतात आणि दुसरा प्रकार आहे या क्षेत्रात घुसलेले कम्युनिस्ट; ते पडद्यामागे राहून आंदोलकांना फूस देत राहतात. या सर्व लोकांना आपल्याकडे ‘डावी मंडळी’ असा शब्दप्रयोग केला जातो. आपण सर्व मुस्लीम आक्रमकतेबद्दल जागे असतो, चर्चच्या कारवायांविषयीदेखील पुरेसे जागे असतो. परंतु, डावी डोकी देशाच्या संस्कृतीला, ऐक्याला, धर्माला आणि सामाजिक समरसतेला जसा धोका निर्माण करतात, त्याकडे आपले म्हणावे तितके लक्ष नसते. याचे कारण असे की, या चळवळीचे मीडियातून येणारे चेहरे फार मोठे असतात, असे भासविले जाते. कोणी मोठा लेखक असतो, कोणी नाटककार असतो, कोणी अभिनेते असतात, कोणी अर्थतज्ज्ञ असतात, कोणी चळवळ करणारे असतात, यातील बहुतेकांना विदेशातील प्रचंड रकमेचे पुरस्कार मिळालेले असतात. त्यामुळे या व्यक्ती ठेंगू असल्या तरी झाडाएवढ्या वाटू लागतात. त्यांचा मानसिक दबाव खूप राहतो.
 
या डाव्या मंडळींचा एक सुनियोजित ‘अजेंडा’ आहे. देशात अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण करायची. ती निर्माण करण्यासाठी बंदुकीतील गोळी म्हणून, अनुसूचित जाती-जमाती आणि मुसलमान यांचा उपयोग करायचा. अजेंड्याचा दुसरा विषय - शत्रू स्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ठेवायचे. ‘तो दलितांना विषाने मारा, अशी पत्रके काढतो’ असे सांगणारी खोटी पत्रके काढून प्रचार करायचा. संघ कसा आरक्षणविरोधी, दलितविरोधी, आदिवासीविरोधी आहे, हे सांगण्यासाठी ‘रामायण’ आणि ‘महाभारता’तील कथांचा आधार घ्यायचा. त्यांच्या अजेंड्याचा तिसरा विषय राहतो कथानक तयार करण्याचा. त्याला ते ‘नरेटिव्ह’ म्हणतात. कधी अखलाकचे, कधी हत्याकांड झालेल्या दलितांचे, तर कधी अपमानित झालेल्या स्त्रीचे कथानक केले जाते. धनाची काहीच कमतरता नसल्यामुळे प्रचाराचा पूर ही मंडळी अगदी सहज निर्माण करतात.
 
सध्या भारतासह सर्व जग कोरोना महामारीच्या संकटात जखडले आहे. असे कोणतेही संकट म्हणजे या डाव्या लोकांना ‘नरेटिव्ह क्रिएट’ करण्याची सुवर्णसंधी असते. कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉएड याची हत्या अमेरिकेत झाली. या हत्येचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. या हत्येचा आपल्या देशाशी काहीही संबंध नाही. ही हत्या वर्णद्वेषातून झाली. गोर्‍या समाजातील मोठा वर्ग स्वतःला इतर वंशांपेक्षा श्रेष्ठ समजतो, ही सर्व गोर्‍या वंशात जन्मलेल्या लोकांची मानसिकता आहे. पराकोटीची असहिष्णुता हा त्यांचा रक्तगुण. अन्य धर्मीयांना जगू न देणे, ही त्यांच्या दृष्टीने सामान्य गोष्ट आहे, पण ख्रिश्चन धर्मातीलच वेगळा विचार करणार्‍या लोकांना वेचून वेचून अत्यंत निर्दयीपणे ठार मारण्याचा इंग्लंड, आयर्लंड, स्पेन, इटली, फ्रान्स इत्यादी देशांतील इतिहास जर आपण वाचला, तर त्या रात्री झोप लागणार नाही. अमेरिकेत काळ्या लोकांचे त्यांनी केलेले हाल ‘गुलाम जेव्हा माणूस होतो’ या माझ्या पुस्तकात आणि ‘लिंकन ते ओबामा’ या काळ्या चळवळीचा इतिहास सांगणार्‍या पुस्तकात वाचायला मिळतील, असा भयानक इतिहास आपला नाही.
 
आपल्या देशात अनुसूचित जाती-जमाती, भटके-विमुक्त यांच्यावर खूप अन्याय, अत्याचार होतात. ही गोष्ट अजिबात नाकारता येणार नाही. भटके-विमुक्तांचा यमगरवाडी प्रकल्प उभा करताना त्यांचे हाल आणि कथा ऐकणेदेखील कठीण गेले. मागील आठवड्यात वाल्मीकी समाजाचा लेख लिहिला, त्यांच्या दयनीय स्थितीचे थोडेबहुत दर्शन झाले असेल. खेडोपाडी राहणार्‍या मातंग, बौद्ध समाजावर अन्याय, अत्याचार होत असतात, कधी कधी हत्या होतात. त्या नाकारता येत नाहीत. त्यांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे.
 
याचे भांडवल ही डावी मंडळी करतात आणि ते करताना अत्यंत विचारपूर्वक राजकीय संस्थेला लक्ष करतात. अन्याय, अत्याचार घडला की पोलीस कारवायांचा विषय येतो. त्यानंतर न्यायदानाचा विषय येतो. ही दोन्ही राज्यसंस्थेची अंगे आहेत. पोलीस दल कसे जातीय आहे आणि ते कशा प्रकारे भयानक अन्याय, अत्याचार करीत असतात, याच्या कथा रचल्या जातात. काही महिन्यांपूर्वी दिल्लीत दंगल भडकली. ही दंगल तिथल्या मुसलमानांनी केली, असे एकही डावे डोके म्हणत नाहीत. ते एवढच सांगतात की, पोलिसांनी मुसलमानांवर कसे अत्याचार केले, कसे मुसलमानांना पकडले हे ते सांगणार. पण, ते हिंसाचार करणारे मुसलमान होते, हे मात्र सांगणार नाहीत. देशाच्या कैदेत 50 टक्के मुसलमान कैदी असतात हे ते सांगणार, पण त्यांनी कोणते कोणते भयानक अपराध केले हे मात्र ते अजिबात सांगणार नाहीत. सत्य लपवून ठेवायचे आणि धादांत खोटे सत्याचा मुलामा देऊन सांगायचे, यात ही डावी मंडळी ‘डबल पीएच.डी’ झालेली असतात.
 
जॉर्ज फ्लॉएडचा विषय सुरू झाल्यानंतर ‘अल जजिरा’, ‘द प्रिंट’, ‘द वायर’, ‘स्क्रॉल इन डॉट’ यावर आलेले डाव्यांचे लेख मी बारकाईने वाचले. या प्रत्येक लेखाचा आढावा घ्यायचा म्हटलं तर वर्तमानपत्रातील लेखात ते शक्य होणार नाही, म्हणून सर्वांचे सामायिक म्हणणे काय ते काही वाक्यांत सांगतो.


- ज्याप्रमाणे जॉर्ज फ्लॉएड याची हत्या झाली, त्याप्रमाणे भारतातदेखील दलित, आदिवासी आणि मुसलमान यांच्या हत्या होतात.


- अमेरिकेचा प्रश्न जसा वांशिक आहे, तसा भारतातील प्रश्न पण वांशिक आहे.


- ज्याप्रमाणे अमेरिकेत राज्यसंस्थाच काळ्यांच्या विरोधात आहे, तशीच भारतीय राज्यसंस्थादेखील दलित, आदिवासी आणि मुसलमान यांच्या विरोधात आहे.


- आजची भारतीय राज्यसंस्था दुसरे-तिसरे काही नसून ‘हिंदू नॅशनलिस्ट स्टेट’ आहे आणि हे ‘स्टेट’ त्याच्या स्वभावाप्रमाणेच दलित आणि मुसलमानांच्या विरोधी राहणार आहे.



अशा या ‘स्टेट’ विरुद्ध सर्वांनी रस्त्यावर उतरले पाहिजे आणि लढून न्याय मिळविला पाहिजे. या म्हणण्याचा अर्थ असा आहे की, देशात जातीय आणि धार्मिक युद्ध निर्माण करून, त्या अराजकाचा फायदा घेऊन कम्युनिस्टांनी सत्ता बळकावली पाहिजे.
 
एखाद दुसरा अपवाद सोडला तर कुठलाही डावा दलित, आदिवासीची सेवा करण्याच्या फंदात पडत नाही. त्यांना आर्थिकदृष्ट्या सबळ करण्याची भानगड तो करीत नाही, त्यांना साक्षर करण्यासाठी शाळा, महाविद्यालये स्थापन करीत नाही. कोरोना महामारीत सापडलेल्या लोकांच्या सेवेसाठी तो जात नाही. कारण, त्यांचे तत्त्वज्ञान त्यांना सांगते की, हे दलित, आदिवासी, मुसलमान, भटके-विमुक्त साक्षर झाले, तर विचार करायला लागतील आणि विचार करायला लागेल तर आपल्या ढुंगणावर लाथा मारायला लागतील. म्हणून जेथे जेथे या मंडळींना सक्षम करण्याची कामे चालू आहेत, त्यावर ते हिटलरी द्वेषाने तुटून पडतात.
 
दलित, आदिवासी हे जे समुदाय आहेत, ते कोणत्याही वेगळ्या वंशाचे नाहीत. भिन्न वंशाचा सिद्धांत बाबासाहेबांनी पूर्णपणे नाकारलेला आहे. भारतातील लोक म्हणजे, अनेक मानववंशाचे मिश्रण आहे. हे त्यांनी शूद्र पूर्वी कोण होते, भारतातील जाती यातून सिद्ध केले आहे. त्यांच्यावर अन्याय, अत्याचार होतात याचे कारण ते वेगळ्या वंशाचे आहेत, असे नाही. त्याचे कारण त्यांना वेगळे करण्यामागे धर्माचे अधिष्ठान उभे केले गेले. अस्पृश्यांना स्पर्श केला तर आपला धर्म बुडेल, आपली पितरे नरकात जातील, अशी पाप-पुण्याची संकल्पना त्यामागे असते. अस्पृश्यतेचे पालन करणारे लोक स्वभावाने दुष्ट आणि हिंसक नसतात. पशु-पक्षी, मुंग्या यांनादेखील ते प्रेमाने भरवितात. त्यामुळे आपला संघर्ष हा अमेरिकेसारखा वांशिक नसून हिंदू समाजाच्या मानसिक परिवर्तनाचा आहे.
 
दुर्बलांवर अत्याचार करणे हे महापाप आहे आणि हे पाप करणार्‍यांना कुंभीपाक नरकात जावे लागेल, अशी जोपर्यंत धर्मभावना होत नाही, तोपर्यंत समाजाचे मन बदलण्याचा संघर्ष चालू ठेवावा लागेल. हे कार्य देशाची आणि समाजाची चिंता करणार्‍या सर्वांना करावेच लागेल. त्याला कोणताही पर्याय नाही. याच्यामध्ये आळस केल्यास किंवा ढील दिल्यास डावी डोकी देशाचा सत्यानाश करून टाकतील. अशा कामात व्यस्त असलेल्या सर्वांनी आपल्याविरुद्ध, आपल्या कामाविरुद्ध, आपल्या विचाराविरुद्ध कोठे कोठे काय काय चालू आहे, यावर अत्यंत बारकाईने नजर ठेवली पाहिजे. त्याचा सशक्त प्रतिवाद केला पाहिजे. वैचारिक क्षेत्रात आपण अतिशय आक्रमक झाले पाहिजे आणि तत्काळ उत्तर दिले पाहिजे. या डाव्या लोकांची डोकी कितीही सुपीक असली तरीही त्यांच्या युक्तिवादात प्रचंड अंतर्विरोध असतो, तो धाडसाने मांडला पाहिजे. काही लोकांना कदाचित राग येईल, पण माझा अनुभव असा आहे की, आपले बुद्धिवादी जेवढे निर्भय असायला पाहिजेत तेवढे ते नसतात. ‘हा देश माझा आहे. हा सर्व समाज त्याच्या सर्व गुणदोषांसहित माझा आहे. त्याच्या कल्याणात माझे कल्याण आहे आणि हे काम करणे हेच ईश्वरीय काम आहे,’ ही एकदा भूमिका घेतली की घाबरण्याचे कारण काय? प्रतिस्पर्धी दिसायला झाडासारखे असले तरी त्यांना आडवे करायला वेळ लागणार नाही.
 
 
 

अग्रलेख
जरुर वाचा
सिगारेटच्या धुरामुळे दादरमधील रहिवासी त्रस्त, शेवटी लावावे लागले

सिगारेटच्या धुरामुळे दादरमधील रहिवासी त्रस्त, शेवटी लावावे लागले 'नो स्मोकिंग'चे फलक

गेल्या दोन वर्षांपासून मुंबईतील दादर पश्चिम येथील इंद्रवदन को-ऑप. हाउसिंग सोसायटीच्या आजूबाजूला सतत धुम्रपान चालू असल्याने लोक त्रस्त झाले होते. सोसायटीशेजारी एक कार्यालय आणि मॉल असून तिथे काम करणारे लोक दिवसभर सिगारेट ओढण्यासाठी सोसायटीच्या कुंपणाजवळ येतात. त्यांच्या धुराचा त्रास सोसायटीच्या प्रत्येक घरात जाणवतो. खिडक्या बंद करूनही धूर घरात येतो, त्यामुळे लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना विशेष त्रास होतो. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांनी आता आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे...

पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर! म्हणाल्या, प्रत्येक गोष्टीला वेळ...

पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर! म्हणाल्या, "प्रत्येक गोष्टीला वेळ..."

(Rohini Khadse Breaks Silence After Husband Pranjal Khewalkar’s Arrest) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी येथे सुरू असलेल्या रेव्ह पार्टीतून अटक करण्यात आली. पुणे पोलिसांनी रविवारी मध्यरात्री ही कारवाई केली. प्रांजल खेवलकर यांच्यावर ही रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्टीदरम्यानचा व्हिडीओ पुढे आल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आता रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांन..

पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच...

पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, "दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच..."

(P Chidambaram's Remark on Pahalgam Terror Attack) पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. यामध्ये भारताने हवाई हल्ले करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. यासंदर्भातच विरोधी पक्षांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी केली होती, जी सत्ताधाऱ्यांनी मान्य केली. मात्र संसदेत चर्चेपूर्वी, ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी एका मुलाखतीत केलेले वक्तव्य समोर आले आहे. ज्यावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121