‘डिप्रेशन वाड्रा’ची गोष्ट...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jun-2020   
Total Views |
congress_1  H x


रोज उठून ‘ऑपरेशन कमल’ असल्या बाता मारण्यात अर्थ नाही. तुमचे नेते जगभरच्या दिग्गजांच्या व्हिडिओद्वारे मुलाखती घेत बसणार आणि तुमचे आमदार- नेते भाजपने एकत्र ठेवावे, ही अपेक्षा कशी असू शकते? पायलट व गेहलोत यांच्यातले वादविवाद भाजपने लावलेले नाहीत. पण, त्याचा राजकीय फायदा उठवणे, हेच तर विरोधी पक्ष म्हणून भाजपचे काम असते ना?


मार्च महिन्यापासून लांबलेल्या राज्यसभेच्या निवडणुका आता पुढल्या शुक्रवारी होणार असून त्यातील हक्काच्या जागांसाठीही काँग्रेस पक्षाची उडालेली तारांबळ त्या पक्षाच्या नेतृत्वाला आलेली मरगळच स्पष्ट करणारी आहे. कारण, गुजरातमध्ये चार जागांसाठी निवडणूक व्हायची असून त्यातल्या दोन जागा भाजपला हक्काने मिळणाऱ्याच आहेत, तर किंचित कमी आमदार संख्या असूनही काँग्रेसलाही दोन जागा मिळू शकत होत्या. पण, भाजपने तिसरा उमेदवार मैदानात आणला आणि काँग्रेसचे धाबे दणाणले. चार जागा आणि चारच उमेदवार असते, तर मतदानाशिवायच निवडणूक संपली असती. पण, अकस्मात मतदानाचे वेळापत्रक जाहीर झाले आणि काँग्रेसच्या आमदारांमध्ये पदाचे राजीनामे देण्याची शर्यत सुरू झाली. मग काँग्रेसची गाळण उडाली. त्यांनी उरलेले सर्व आमदार गोळा करून त्यांना तिजोरीत बंद करावे, तसे राजस्थानात पाठवून दिले. हॉटेल रिसॉर्टमध्ये त्यांना कोंडून तिजोरीची चावी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे सोपवण्यात आली. मार्च महिन्यात असेच मध्य प्रदेशचे आमदार तिकडे पाठवण्यात आलेले होते. पण, त्यामुळे कमलनाथ सरकार बचावले नव्हते. पण, अशा अनुभवातून काही शिकायची कुवत काँग्रेस गमावून बसली आहे. म्हणूनच गुजरातमध्ये राजीनामासत्र सुरू झाले आणि पुन्हा तिथलेही आमदार राजस्थानात पाठवण्याची नामुष्की आली. वास्तविक अशी परिस्थिती निर्माण होण्याचे काहीही कारण नाही. पक्षाचे प्रादेशिक व राष्ट्रीय नेते आपल्या आमदार-खासदारांच्या कायम संपर्कात असले तर असा गोंधळ उडण्याची शक्यता नसते. पण, पक्षाचे सर्वोच्च नेते पक्षाची संघटना सांभाळण्यापेक्षा कोणा दिग्गजांच्या मुलाखती घेऊन संपादक होण्याचे डोहाळे पूर्ण करीत असल्यावर यापेक्षा वेगळे काय व्हायचे? आता गुजरातचे आमदार सांभाळताना नाकीनऊ आलेल्या गेहलोतना आपल्याच राज्यातले आमदार कोंडायची वेळ आलेली आहे.

गुजरातप्रमाणेच राजस्थानातही राज्यसभेसाठी मतदान व्हायचे असून तिथे प्रत्येकी दोन उमेदवार दोन्ही बाजूंनी उभे केले आहेत. ते आज उभे केलेले नाहीत. देशात ‘लॉकडाऊन’ घोषित होण्यापूर्वीच या उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केलेले आहेत आणि परिस्थिती बदलल्याने मतदान होऊ शकलेले नव्हते. म्हणजेच भाजपने दुसरा उमेदवार उभा करून लढायचे ठरवले, ही राजस्थान काँग्रेस किंवा पक्षश्रेष्ठींसाठी बातमी असू शकत नाही. भाजपकडे दुसरा उमेदवार निवडून आणण्याइतकी मते किंवा आमदार नाहीत. कारण, राजस्थानातून राज्यसभेत निवडून जाण्यासाठी किमान ५१ आमदारांची संख्या पाठीशी असायला हवी आणि भाजपचे अवघे ७२ आमदार आहेत. उलट काँग्रेसपाशी आपले हक्काचे १०७ आमदार आहेत. म्हणजेच, दोन सदस्य निवडून आणल्यावरही पाच आमदार शिल्लक उरतात. उलट भाजपला एक हक्काचा उमेदवार निवडून आणल्यावर फार तर २१ आमदारच उरतात. दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी किमान आणखी ३० अन्य पक्षांचे आमदार फोडून आणावे लागतील. असे इतर पक्षांचे वा अपक्ष मिळून फक्त २१ आमदार आहेत. ते सगळेच जरी भाजपला येऊन मिळाले तरी त्यांना ५१ मतांचा पल्ला गाठणे अशक्य आहे. मात्र, त्यासाठी काँग्रेसचे सर्व १०७ आमदार आपल्या गोटात पक्के थांबलेच पाहिजेत. पण, काँग्रेसला किंवा मुख्यमंत्र्यांना त्याचीच हमी उरलेली नाही. त्यातले पाच फुटले तरी काँग्रेसचे दोन उमेदवार जिंकू शकतात. पण, तितकेही थांबतील अशी काँग्रेसला खात्री उरलेली नाही काय? आमदार म्हणजे कोणी दुधखुळे पोर नाही. त्याला भाजपने बहकावले आणि त्याने पक्षांतर केले, असे होऊ शकत नाही. इथे तर आपली आमदारकी धोक्यात येऊ शकते; इतकी अक्कल प्रत्येक आमदाराला असते ना? मग काँग्रेसची तारांबळ का उडाली आहे?

काँग्रेसला भाजपची वा अन्य कुठल्या बाहेरच्या शत्रूची भीती नसून आपल्यातल्याच घरभेद्यांची भीती अधिक वाटते. कारण, मध्य प्रदेश वा कर्नाटकातला तोच अनुभव आहे. त्या पक्षात भाजपने बेदिली माजवण्याची भीती कशाला वाटावी? जर तुम्ही तुमच्या सहकारी व कार्यकर्ते नेत्यांना चांगुलपणाने वागवित असाल, तर अन्य कुणाला त्यांना बंडखोरीला चिथावणी देणे शक्य नसते. त्याच्या उलट पक्षातच आपली किंमत होत नाही वा नेते आपल्याकडे लक्षही देत नसल्याची भावना असेल, तर मात्र बेदिलीला सुरूवात होत असते. त्यात शत्रूपक्ष तेल ओतू शकतो, यात शंका नाही. पण, बेदिली मुळात असावी लागते. काँग्रेसच्या प्रत्येक राज्यशाखेत अशी बेदिली कायमची आहे आणि दिल्लीतल्या श्रेष्ठींनीच त्याला कायम खतपाणी घातलेले आहे. साहजिकच पक्षातले अनेक ज्येष्ठ नेते एकमेकांना सतत पाण्यात पाहत असतात. एकाची सरशी झाली तर दुसरा त्याला संपवायला टपलेला असतो. त्यांच्यात समन्वय आणायची जबाबदारी नेते किंवा श्रेष्ठी कधीच पार पाडत नाहीत. म्हणून तर मध्य प्रदेश वा कर्नाटकामध्ये त्यांच्या आमदारांना फोडून किंवा राजीनामे देऊन स्वपक्षात आणायचा जुगार भाजप खेळू शकला आहे. काँग्रेस पक्षाचे आमदार फुटू नयेत वा त्यांनी बंडखोरी करू नये; ही अन्य पक्षांची जबाबदारी असू शकत नाही. भाजपची तर ती बिलकुल जबाबदारी नाही. त्यामुळे अशी काही गडबड होत असेल, तर त्याचे खापर भाजपवर फोडण्याला काडीमात्र अर्थ नाही. कारण, अशा फोडाफोडीला धूर्तपणा वा राजकीय डावपेचाचे उदात्त नाव काँग्रेसनेच आजवर दिलेले आहे. फरक असेल तर भाजप आमदार फोडून आपले बहुमत जमवित नाही. त्यांना पक्षासोबतच आमदारकीचा राजीनामा द्यायला लावून रितसर आपल्या चिन्हावर पुन्हा निवडून आणत असतो. महाराष्ट्राप्रमाणे आमदार महायुतीचे आणि सत्ता महाविकास आघाडीची, असला ‘औचित्यपूर्ण’ व्यवहार भाजप करीत नाही.

मध्य प्रदेशात कमलनाथ, दिग्विजय आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यातले वाद भाजपने लावले नव्हते. काँग्रेसश्रेष्ठींनी ते लावले किंवा मिटवले नाहीत. कर्नाटकात कुमारस्वामी आणि सिद्धरामय्यांचे भांडण थांबवणे, ही भाजपची जबाबदारी होती काय? त्यातून नाराज असलेल्यांची समजूत काढून त्यांना आपल्या पक्षात परत पाठवण्याचे टेंडर काँग्रेसने भाजपला दिले होते काय? नसेल तर रोज उठून ‘ऑपरेशन कमल’ असल्या बाता मारण्यात अर्थ नाही. तुमचे नेते जगभरच्या दिग्गजांच्या व्हिडिओद्वारे मुलाखती घेत बसणार आणि तुमचे आमदार- नेते भाजपने एकत्र ठेवावे, ही अपेक्षा कशी असू शकते? पायलट व गेहलोत यांच्यातले वादविवाद भाजपने लावलेले नाहीत. पण, त्याचा राजकीय फायदा उठवणे, हेच तर विरोधी पक्ष म्हणून भाजपचे काम असते ना? शत्रुघ्न सिन्हा किंवा यशवंत सिन्हा यांना आपल्या मंचावर बोलावून सन्मानपूर्वक भाजपची निंदानालस्ती करायचे प्रोत्साहन देणारे ‘ऑपरेशन कमल’ नाही तर वेगळे काय करीत होते? की भाजपने केले मग पाप असते आणि काँग्रेसने केल्यावर पुण्यकर्म होत असते? आज गुजरात, राजस्थानात जी समस्या काँग्रेसला भेडसावते आहे, ती नवी नाही. अनेक राज्यात काँग्रेस तशाच अनुभवातून गेलेली आहे. पण, भाजपच्या माथी खापर फोडून त्यांनी काहीही साधलेले नाही. आत्मपरीक्षण केलेले नाही की संघटनात्मक बांधणीला प्राधान्य दिले. कालपरवाच प्रवासी मजुरांच्या बससेवेवरून रायबरेलीतील काँग्रेस आमदार अदिती सिंग यांना प्रियंकावर टीकेचे प्रहार करावे लागले, तेव्हा त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यापुरते गांधी खानदान नेतृत्व करीत असते. ज्यांना आमदार-खासदार निवडून आणता येत नाहीत आणि स्वबळावर जे कोणी निवडून येतात, त्यांनाही संभाळता येत नाहीत; त्यांचा पक्ष असाच अस्ताला जाण्याखेरीज अन्य पर्याय नसतो. मग त्याला ‘ऑपरेशन कमल’ म्हणून हिणवा किंवा ‘डिप्रेशन वाड्रा’ म्हणून डोक्यावर घेऊन नाचा.
@@AUTHORINFO_V1@@