नृत्याचा 'नटराज'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jun-2020   
Total Views |
mansa_1  H x W:



कथ्थकच्या बनारस घराण्यामधील पूज्य नाव म्हणजे नटराज पं. गोपीकृष्ण. कथ्थक नृत्यशैलीत महत्त्वाचे बदल घडवून आणणार्‍या पं. गोपीकृष्ण यांच्याविषयी...


नृत्यामधील तेजी, स्फूर्ती, नावीन्य म्हणजे पद्मश्री नटराज पं. गोपीकृष्ण. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीमधील जवळपास चार शैलीमध्ये पारंगत असणारे गोपीकृष्ण कथ्थकमधील बनारस घरण्याचे प्रसिद्ध नर्तक आणि गुरू. चित्रपटांच्या माध्यमातून कथ्थक शैली घरोघरी पोहोचविण्याचे सर्व श्रेय गोपीकृष्ण यांनाच जाते. कथ्थक नृत्याच्या प्रचारासाठी त्यांनी चित्रपट नृत्याचा पुरेपूर वापर करुन घेतला. कारण, ते प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आणि अभिनेतेही होते. कथ्थक नृत्यशैलीत बनारस घराण्याचे अस्तित्व त्यांनी टिकवले आणि त्या नृत्यशैलीला पुढल्या पिढीपर्यंत घेऊन जाणारे अनेक शिष्य त्यांनी घडवले.


नटराज गोपीकृष्ण यांचा जन्म २२ ऑगस्ट, १९३४ मध्ये बनारसमध्ये झाला. त्यांचे आजोबा सुखदेव महाराज हे प्रसिद्ध गायक आणि नृत्यगुरू होते. शिवाय त्यांची मावशी कथ्थक सम्राज्ञी सीतारादेवी होत्या. त्यामुळे गोपीकृष्ण यांना नृत्याचे बाळकडू घरातूनच मिळाले. नृत्यसाधनेच्या आस्थेमुळे त्यांचे शालेय शिक्षण झाले नाही. सुखदेव महाराजांचा कल हा हिंदू धर्मातील पौराणिक कथांवर आधारित नृत्यप्रकारांवर होता. त्यामुळे सुरुवातीच्या काळात गोपीकृष्ण यांचे प्रशिक्षण त्यांच्या आजोबांच्या मार्गदर्शनाखाली झाले. चार वर्षांच्या गोपाळकडून ते तासन्तास नृत्याचा रियाज करुन घेत असत. यामुळे गोपीकृष्ण यांच्या नसानसांत नृत्य भिनले आणि त्यांना कथ्थक नृत्याची झिंग चढली. गोपीजी सहा वर्षांचे असताना त्यांना लखनौ घरण्याचे प्रसिद्ध गुरू आणि पं. बिरजू महाराज यांचे वडील पं. अच्छन महाराज यांचे शिष्य बनविण्यात आले. १९४८ साली अच्छन महाराजींचे लहान बंधू शंभु महाराज कोलकाता संगीत महोत्सवात नृत्यासाठी आले होते. त्यावेळी गोपीजींनी शंभू महाराजांचे शिष्यत्व पत्करले.


पं. सुखदेव महाराजांनी गोपीजींना वयाच्या तेराव्या वर्षी ’ऑल बंगाल कॉन्फरन्स’मध्ये नृत्याचे सादरीकरण करायला लावले. त्यावेळी त्यांच्या अप्रतिम नृत्य निपुणतेमुळे त्यांना ‘नटराज’ ही पदवी देण्यात आली. १९५१ साली दिल्ली येथे एका कॉन्फरन्समध्ये नृत्य सादरीकरण करुन ते राजधानीत प्रसिद्ध झाले. त्यावेळी चित्रतपस्वी व्ही. शांताराम हे ‘शिवशक्ती’ चित्रपटाची निर्मिती करत होते. त्यासाठी त्यांना एका नृत्यप्रधान नायकाची आवश्यकता होती. गोपीजींच्या नृत्याविषयी शांताराम बापूंना समजल्यावर त्यांना मुंबईत बोलावण्यात आले. कोलकाताहून सुखदेव महाराजजींनाही पाचारण करण्यात आले. त्यावेळी शांताराम बापूंनी ’शिवशक्ती’ हा चित्रपट रद्द करुन नृत्यप्रधान ’झनक झनक पायल बाजे’ हा चित्रपट तयार करण्यास सुरुवात केली. या चित्रपटात गोपीजींनी प्रमुख नायकाची व्यक्तिरेखा साकारली. चित्रपटातील नृत्यप्रधान नायकाच्या भूमिकेमुळे त्यांना सार्‍या भारतवर्षात प्रसिद्धी मिळाली. ते चित्रपटसृष्टीत आणि महत्त्वाचे म्हणजे मुंबईत स्थिरावले. गोपीजींनी पाच वर्ष महालिंगम पिल्लई आणि गोविंद राज पिल्लई यांच्याकडून भरतनाट्यम नृत्यशैलीचे शिक्षण घेतले. तसेच कथकली व मणिपुरी या नृत्यशैलीचाही त्यांनी अभ्यास केला.


हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी ‘मेहबूबा’, ‘दास्तान’, ‘उमराव जान, मुघल-ए-आझम’, ‘आम्रपाली’ आणि ‘द परफेक्ट मर्डर’ यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांसाठी नृत्यदिग्दर्शन केले. पूर्व आफ्रिका आणि इतर काही पाश्चात्य देशांमध्ये त्यांनी कथ्थक नृत्याचे सादरीकरण केले. मधुबाला, वैजयंतीमाला, मुमताज, संध्या, जेबा बख्तियार, मनीषा कोईराला, रवीना टंडन, बेबी नाझ, माला सिन्हा, अनिता राज, पद्म खन्ना, ट्विंकल खन्ना, आशा पारेख, डिंपल कपाडिया, रीना अशा अनेक भारतीय अभिनेत्रींना त्यांनी कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण दिले. चित्रपटसृष्टीत कार्यरत असताना त्यांनी कटाक्षाने शुद्ध कथ्थक नृत्याचे कार्यक्रमही सादर केले. महिन्यामध्ये २८ ते २९ कार्यक्रम करण्याचा त्यांचा विक्रम आहे. सकाळी विद्यार्थ्यांना कथ्थक नृत्याचे धडे देऊन ते दुपारनंतर चित्रपटाचे नृत्यदिग्दर्शन करत असत. पं. सुखदेव महाराजांचे नाव अजरामर करण्यात, त्यांची शैली यशस्वी व अमर करण्यात गोपींजींचा मोठा वाटा आहे.


गोपीकृष्ण हे कथ्थक नृत्याचे भाग करुन त्यांना प्रस्तुत करणारे पहिले नर्तक आहेत. विविध प्रकारच्या भ्रमरी तयारीने मारण्याची प्रथा त्यांनी कथ्थक नृत्यात रुजवली. जटायू मोक्ष, पुतना वध आणि रामायणातील कथा त्यांनी या नृत्यशैलीत आणल्या. या कथांवरील त्यांचे सादरीकरण पाहताना प्रेक्षक थक्क होत असत. सलग नऊ तास नृत्य करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. १९७५ साली नृत्यातील त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले. १९ फेब्रुवारी, १९९४ रोजी त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांचे अनेक शिष्य त्यांची नृत्यपरंपरा आजही पुढे चालवत आहेत. त्यांची मुलगी शंपा गोपीकृष्ण ही हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिथयश नृत्यदिग्दर्शिका आहे.



@@AUTHORINFO_V1@@