समृद्ध पश्चिम घाटामधून माशांच्या तीन नव्या प्रजातींचा उलगडा !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-May-2020   
Total Views |

fish _1  H x W:

 
 


गोड्या पाण्यातील माशांच्या प्रजाती
 

 
मुंबई (अक्षय मांडवकर) - पश्चिम घाटातून खळखळून वाहणाऱ्या नद्यांमधून पृष्ठ तंतू पंखीय (फिलामेंट बार्ब) माशांच्या तीन नव्या प्रजातींचा शोध लावण्यात आला आहे. कर्नाटक आणि केरळच्या मुक्तवाहिन्या नद्यांमधून संशोधकांनी 'डॉकीन्सिया अप्सरा', 'डॉकीन्सिया आॅस्टेलस' आणि 'डॉकीन्सिया क्रेसा' या नव्या प्रजातींचा उलगडा केला आहे. या प्रजातींचा अधिवास केवळ विशिष्ट नद्यांच्या परिसंस्थेत असल्याने हा अधिवास टिकवणे आवश्यक आहे. या शोधाच्या निमित्ताने जैवविविधतेचे भांडार असणाऱ्या पश्चिम घाटाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. 
 
 
 
  
भारत आणि श्रीलंकेतील नद्यांमध्ये 'फिलामेंट बार्ब' हा गोड्या पाण्यातील माशांचा गट आढळतो. या गटातील मासे मत्स्यालयात पाळलेही जातात. त्यांचा समावेश 'डाॅकीन्सिया' या पोटजातीत होतो. या पोटजातीत भारत आणि श्रीलंकेमध्ये एकूण नऊ प्रजाती सापडतात. आता या पोटजातीत तीन नव्या प्रजातींची भर पडली आहे. केरळ आणि कर्नाटकात परसलेल्या पश्चिम घाटातील नद्यांमधून या तीन प्रजातींचा उलगडा करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे या शोधकार्याचे काम गेल्या आठ वर्षांपासून सुरू होते. २०१२ मध्ये संशोधकांना या प्रजाती आढळल्या होत्या. 'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'चे (बीएनएचएस) उन्मेश कटवटे, केंद्रीय पर्यावरण विभागाचे (एमओईएफसीसी) डाॅ. मार्कस केनाईट, केरळ विद्यापीठातील फिशरीज अॅण्ड ओशन स्टडीजचे (केयूएफओएस) अनुप वी.के, डाॅ. राजीव राघवन आणि 'इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च'चे (आयआयएसईआर) डाॅ. निलेश डहाणूकर या संशोधकांनी हा महत्त्वपूर्ण शोध लावला आहे.  सेन्केनबर्ग संग्रहालयाच्या 'वर्टीब्रेट झूलाॅजी' या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये शुक्रवारी या शोधाचे वृत्त प्रसिद्ध झाले.
 
 
 


fish_1  H x W:
 
 
नव्याने शोधलेली 'डॉकीन्सिया अप्सरा' ही गोड्या पाण्यातील माशांची प्रजात कर्नाटकच्या सौपर्णिका आणि सीता नदीत आढळत असून 'डॉकीन्सिया आॅस्टेलस' ही प्रजात केेरळ दक्षिणकडील नद्यांमध्ये आणि 'डाॅकीन्सिया क्रेसा' ही प्रजात कर्नाटकातील नेत्रावती नदीच्या परिसंस्थेत आढळून येत असल्याची माहिती 'बीएनएचएस'च्या फ्रेश वॉटर रिसर्च युनिटमधील मत्स्य शास्त्रज्ञ आणि 'केयूएफओएचस'चे पीएचडीचे विद्यार्थी उन्मेश कटवटे यांनी 'महा MTB'शी बोलताना दिली. या प्रजाती पश्चिम घाटातील प्रदेशनिष्ठ असून त्या केवळ काही नद्यांच्या परिसंस्थेत आढळत असल्याचे त्यांनी सांगितले. नव्या प्रजातीचा वेगळेपणा आकारशास्त्र आणि अनुवंशशास्त्राच्या आधारे निश्चित करण्यात आला आहे. या संशोधनाने 'डॉकीन्सिया' पोटजातीतील वर्गीकरणामधील गोंधळ देखील दूर केला गेला आहे. 
 
 
 
 
पश्चिम घाटात प्रदेशनिष्ठ असलेल्या आणि विशिष्ट नद्यांमध्येच आढळून येणाऱ्या प्रजातींचा उलगडा अजूनही होत असल्याने पश्चिम घाटातील गोड्या पाण्याच्या स्त्रोतांचे संवर्धन करण्याची गरज असल्याचे मत, 'बीएनएचएस'चे संस्थापक डाॅ. दिपक आपटे यांनी मांडले. तर हे अद्ययावत प्रकाशन असूनही, 'डॉकिन्सिया' या जातीच्या माशांचे वर्गीकरण फारसे ज्ञात नाही. यापुढे होणाऱ्या संशोधनामुळे यामध्ये अजून काही प्रजातींची भर पडणार असल्याचे 'केयूएफओएस'चे आणि 'आययूसीएन' फ्रेशवॉटर फिश स्पेशलिस्ट ग्रुपच्या आशिया विभागाचे सह-पर्यवेक्षक राजीव राघवन यांनी सांगितले. या अभ्यासाने माशांच्या गुंतागुंतीच्या गटांची वर्गीकरण समजून घेण्यासाठी एकात्मिक दृष्टिकोनाचा वापर करण्याचे महत्त्व देखील स्पष्ट केल्याचे, 'आयआयसीईआर'चे डाॅ. निलेश डहाणूकर यांनी सांगितले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@