परिस्थिती आजची, कथा अडीच हजार वर्षांपूर्वीची...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-May-2020   
Total Views |
Gautam Buddha_1 &nbs


 
भगवान गौतम बुद्धांनी दु:ख म्हणजे संवेदना म्हणजे जाणीव यांचे नियम कोणते, हे आपल्या उपदेशातून, कथांतून अतिशय उत्तम प्रकारे सांगितले आहे. आज आपण एका लेखात मावतील, एवढ्या तीन-चार कथा पाहूया.
 
भगवान गौतम बुद्ध यांची जयंती आपण देशभर उत्साहाने साजरी करत आहोत. भगवान गौतम बुद्ध हे मानवातील महामानव होते. मनुष्यजातीला त्यांनी धर्म म्हणजे काय, तो कसा जगायचा असतो, हे सांगितले. त्यांनी कधीही असे म्हटले नाही की, ‘मीच देव आहे, मीच देवदूत आहे, मी देवपुत्र आहे.’ त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत एकच गोष्ट सांगितली आहे की, ‘मी मनुष्य आहे. मला जे ज्ञान प्राप्त झाले, ते तुम्हालादेखील होऊ शकते. ज्ञान तुमच्याकडेच आहे. त्याच्यासाठी साधना केली पाहिजे.’


 
भगवान गौतम बुद्धांचे ज्ञान चेतनेविषयीचे आहे. दु:ख ही संवेदना आहे. शरीर आणि चेतना अशी माणसाची दोन रुपे आहेत. शरीर पंचमहाभूतांचे आहे. चेतना काय आहे? दु:ख काय आहे, हा गौतम बुद्धांच्या संशोधनाचा विषय आहे. पंचमहाभूतांचे नियम कोणते? पदार्थ विज्ञान सांगते, त्याचीच एक शाखा क्वॉन्टम विज्ञान. पदार्थाचे नियम सांगता सांगता जाणीव आणि चेतनेच्या दरवाजापर्यंत आलेले आहे. भगवान गौतम बुद्धांनी दु:ख म्हणजे संवेदना म्हणजे जाणीव यांचे नियम कोणते, हे आपल्या उपदेशातून, कथांतून अतिशय उत्तम प्रकारे सांगितले आहे. आज आपण एका लेखात मावतील, एवढ्या तीन-चार कथा पाहूया.
पहिलीच कथा दारुची घेऊया. ‘लॉकडाऊन’ शिथील झाले आहे, दारुची दुकाने बर्‍याच ठिकाणी उघडली आहेत. त्याच्या रंजक बातम्या आपण सर्वांनी पाहिल्या. भगवान गौतम बुद्ध एका जातक कथेत दारुचा जन्म कसा झाला आणि दारुने समाजात कसा हाहाकार माजविला, ते सांगतात. जातककथेतील राजा बहुतेक वेळा ब्रह्मदत्त असतो आणि तो बनारस म्हणजे काशीचा असतो. धर्मविचारात काशीचे स्थान कोणते, हे हिंदू माणसाला सांगण्याची गरज नाही. त्या राज्यात सूर नावाचा एक वनवासी राहत असतो. तो एके दिवशी जंगलात वस्तू शोधण्यासाठी जंगलाच्या आत जातो. तेथे त्याला मनुष्याच्या उंचीचे आणि चारही दिशांना मोठ्या फांद्या असलेले झाड दिसते.
 


 
ज्या चार फांद्या निघाल्या, त्या ठिकाणच्या खोडात मोठी पोकळी निर्माण झाली होती आणि ती सर्व पाण्याने भरलेली होती. पाण्याचा रंग लालसर झाला होता. त्या खोडाच्या आजूबाजूला खसखसीची रोपटी उगवली होती. त्यांना फूल आणि फळे येत. पिकल्यानंतर त्या पोकळीत पडत. आजूबाजूच्या शेतातून पोपट तांदळाच्या साळी घेऊन येत. त्यातील खूपसा तांदूळ त्या पोकळीत पडत. इतर पक्षी फळे खात, तीदेखील त्या पोकळीत पडत. सूर्याच्या उष्णतेने पाणी तापत जाई. त्यातून रासायनिक क्रिया घडून नवीन प्रकारचे द्रव्य तयार झाले होते. उन्हाळ्यात पक्षी ते पाणी पित. त्यामुळे त्यांना खूप नशा चढे. नशेच्या धुंदीत ते झाडाखाली पडून राहत. तीच गोष्ट जंगली कुत्रे, माकड आणि इतर प्राण्यांच्या बाबतीत होई. नंतर पशू आणि पक्षी एका धुंदीत निघून जात.
 


 
हे सर्व पाहिल्यानंतर सुराने ते लाल पाणी एका भांड्यात घेऊन पिऊन पाहिले. थोड्याच वेळात त्याला चांगली नशा चढली. त्याला वाटले मांस खायला मिळाले तर काय बरे होईल. त्याने आग पेटवली. धुंदीत पडलेले दोन-चार पक्षी उचलले, ते भाजले आणि खाल्ले. नशेचा आनंद घेत तो दोन दिवस तो तिथे राहिला. दारू आणि मांस घेऊन तो जवळच्या संन्यासाच्या झोपडीत गेला. संन्यासाचे नाव असते, वरुण. (सुरवरुन ‘सुरा’ (दारु)झाली आणि वरुण वरुन ‘वारुणी’ असे शब्द तयार झाले.


नंतर ते दोघेही जवळच्या राजाकडे जातात. आम्ही एक पेय विकायला आणले आहे, असे सांगतात. हे पेय प्यायले की, आनंदच आनंद होतो. राजा त्याची चव घेतो. त्याला ती आवडते. तो ती अधिक पितो. मंत्र्यांना प्यायला देतो. त्या दोघांना राजा दारुची मोठी मागणी देतो. मोठमोठी भांडी आणून घरीच दारु बनविण्याचा कारखाना सुरू होतो. हे छोटे राज्य दारुत बुडाल्यानंतर हे दोघेजण बनारसला जातात. राजाला दारुची चटक लागते. त्यामुळे प्रजेलादेखील लागते. बनारस दारुमध्ये बुडून जाते.
 
 
दारुचा प्रसार सर्व भारतभर व्हायला लागतो. आंध्रप्रदेशातही हे दोघे दारुविके जातात. इंद्र हे सर्व पाहतो. भारताला दारुपासून वाचविले नाही, तर भारत नाहीसा होईल. म्हणून तो एका ब्राह्मणाचे रूप घेऊन जातो. पुढे इंद्र (वेशातील ब्राह्मण) आणि राजा यांचा संवाद होतो. तो खूप मोठा आहे. त्यात इंद्र दारुचे दुष्परिणाम राजाला सांगतो. दारु पिणारा माणूस झोकांड्या देत चालतो, तो दरिद्री होतो, त्याच्या बुद्धीचा नाश होतो, कधी तो गटारात पडतो, खाऊ नये ते खायला लागतो. असे दारुचे भयानक दुष्परिणाम होतात. आसुरांचा दारुमुळे नाश झाला. दही, दूध, मध, यांचे सेवन केले असता शक्ती प्राप्त होते, बुद्धी तल्लख होते, वैभव येते. ब्राह्मणाच्या उपदेशाने राजाचे डोळे उघडतात आणि तो दारुबंदी करतो. भगवान गौतम बुद्धांच्या पंचशीलातील एक शील अमली पदार्थ सेवन न करण्याचे आहे. पूर्ण दारुबंदी करा, असे सांगून सांगून गांधींजी गेले. त्यांच्या शिष्यांनी दारुचे कारखाने घातले आणि गल्लोगल्ली दारुची दुकाने उघडली. ती महिनाभर उघडली नाही तर काय होतं, हे दूरदर्शनच्या पडद्यावर बघावे.
 

 
एक धनाढ्य व्यापारी होता. त्याची पहिली बायको वारली, त्याचे दुसरे लग्न झाले. नवीन बायको तरुण होती. तो म्हातारा होत चालला होता. त्याच्या मनात असा विचार आला की, उद्या मी मेलो तर माझी ही तरुण बायको दुसरा नवरा शोधेल. माझी संपत्ती उधळून टाकेल. माझ्या मुलाला काही ठेवणार नाही. येथे संपत्तीच्या अधिकाराचा विषय आहे. वडिलांच्या संपत्तीचा वारस मुलगा असतो.तो व्यापारी आपल्या विश्वासू नोकराला सांगतो की, “माझे धन शेतातील एका झाडाखाली पुरुन ठेव. माझा मुलगा वयात आल्यानंतर त्याला हे धन दे. विश्वासू नोकर तसे करतो.” यथावकाश मुलगा वयात येतो. त्याची सावत्र आई दुसरे लग्न करीत नाही. एके दिवशी ती मुलाला म्हणते, “तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी धन पुरुन ठेवले आहे. ते आपला नोकर नंद याला माहीत आहे.”


दुसर्‍या दिवशी नंदला बरोबर घेऊन पुरलेले धन काढण्यासाठी मुलगा जातो. धनाच्या जागी आल्यानंतर मुलगा नंदला विचारतो, “धन कोठे पुरले आहे?” नंद एकदम बदलतो. त्याचा पारा चढतो. तो म्हणतो, “कसले धन? कुठले धन? कुणाचे धन? कुणी पुरले? तुझा काय अधिकार त्याच्यावर? चालता हो.” मुलगा शहाणा असतो. तो काही बोलत नाही. तसाच घरी परत येतो. नोकरावर त्याचा विश्वास असतो. दुसर्‍या दिवशी नोकराला पुन्हा घेऊन जातो. पहिल्या दिवशी जे होते, तेच दुसर्‍या दिवशी होते. तिसर्‍या दिवशीदेखील तसेच होते. नंद असा का वागतो, ते मुलाला समजत नाही.
 
  
मुलगा नंतर बोधिसत्त्वाकडे जातो. बोधिसत्त्वाला सर्व कहाणी सांगतो. नंद असे का वागतो, हे विचारतो. बोधिसत्त्व म्हणतो, “नंद ज्या जागी उभा राहून तुझ्याशी अपशब्द बोलतो, त्या जागेखाली तुझ्या वडिलांचे धन आहे. वडिलांचे धन त्याला शक्ती देते. त्या जागेवरुन खाली उतरल्यावर नंद सामान्य नोकरच असतो. म्हणून, तो तुला अपशब्द बोलायला लागल्या बरोबर त्याला खाली खेच. जमीन खण, तुला धन मिळेल.”
 

मुलगा तसेच करतो. त्याला धनप्राप्ती होते. कुणाच्या तरी पुण्याईमुळे एखाद्या नोकराला खुर्ची मिळते. पुण्याईची शक्ती त्याला बळ देते, म्हणून तो वाट्टेल ते पचपचू लागतो. कोण आहेत हे, ते वाचकांनीच शोधावे. कोशल देशाच्या राजाला पहाटे पहाटे सोळा स्वप्ने पडतात. स्वप्नांमुळे तो पहाटे जागा होतो. स्वप्न चांगली नसतात, त्यामुळे तो घाबरतो. ब्राह्मणांचा सल्ला घेतो. ब्राह्मण त्याला सांगतात की, “ग्रहशांती करावी लागेल, यज्ञ करावा लागेल, शेकडो पशू बळी द्यावे लागतील. तूप, मध, दही, दूध, अन्न यज्ञासाठी लागेल.”
 
 

राणी राजाला सांगते, “या ब्राह्मणांचे ऐकू नका. तुम्ही आपल्या राज्यातील सर्वज्ञ ब्राह्मण यांच्याकडे का जात नाहीत? (येथे ‘ब्राह्मण’ याचा अर्थ ‘ज्ञानी’ असा आहे, हा जातिवाचक शब्द नाही.) तुम्ही भगवान बुद्धांकडे जा. स्वप्नांचा अर्थ ते तुम्हाला सांगतील.” राजा त्याप्रमाणे करतो. पुढची कथा खूप मोठी आहे. राजा सोळा स्वप्ने एका पाठोपाठ सांगतो आणि भगवान बुद्ध त्याचे अर्थ राजाला सांगतात. प्रत्येक स्वप्नाचा अर्थ सांगताना नालायक राज्यकर्ते सत्तेवर आल्यानंतर काय काय घडू शकते, याचे चित्र भगवान बुद्ध मांडतात. आपण येथे फक्त दोन स्वप्ने आणि त्यांचे अर्थ बघूया.
 
 

राजा पहिले स्वप्न सांगतो, चार दिशांनी अतिशय तगडे काळे बैल मैदानात येतात. आपापसात घनघोर लढाई करण्यासाठी त्यांची तयारी असते. बैलांची झुंज बघायला लोक गोळा होतात. बैल फक्त आवाज करीत राहतात. आपापसात न लढताच ते निघून जातात. भगवान बुद्ध म्हणतात, “या स्वप्नाचा परिणाम तुझ्या हयातीत होणार नाही. परंतु, जेव्हा राज्यकर्ते स्वार्थी, अधर्मी, असतील आणि जनतादेखील अधर्माचे आचरण करणारी असेल, त्यावेळी अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण होईल. विकृतीने जग भरुन जाईल, चांगुलपणा नष्ट होईल, वाईटपणा भरुन राहील. पाऊस फार कमी पडेल. पिके टिकणार नाहीत. दुष्काळ निर्माण होईल. वारा, ढगांचा गडगडाट, विजांचे चमकणे, यामुळे लोक घरातच बांधून राहतील.” पहिल्या स्वप्नाचा हा अर्थ भगवंतांनी सांगितला.
 

 
प्रत्येक स्वप्नाचा अर्थ सांगत असताना अधर्मी प्रजा आणि नालायक राज्यकर्ते यांच्यामुळे धार्मिकता संपेल, सुमार कर्तृत्वाची माणसे मोठ्या पदावर जातील. न्यायव्यवस्थेतील माणसेदेखील सामान्य आणि मूर्ख असतील. राज्यकारभाराचा काहीही अनुभव नसलेले राज्याच्या सर्वोच्च पदावर असतील आणि त्यांना राज्य करण्याचे ओझे पेलवणार नाही. त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे स्वार्थी आणि लफग्यांचे फावेल. शहाणी आणि जाणती माणसे घरी बसविली जातील.
 
 

राजा अकरावे स्वप्न सांगतो की, लाखो रुपयांच्या चंदनाच्या मोबदल्यात हंडाभर आंबट ताक घेण्याचे स्वप्न मला पडले, याचा अर्थ काय? भगवंत म्हणाले,हे स्वप्न तुझ्या राज्यात लागू होणार नाही. ज्या काळात माझा उपदेश आणि शिकवणूक विसरली जाईल, त्या काळाचा संकेत हे स्वप्न करत. या काळात माझ्या संप्रदायात अधाशी आणि निर्लज्ज बांधव उत्पन्न होतील, मी जे करु नये असे सांगितले तेच करा हे स्वत:च्या पोटाची खळगी भरण्यासाठी सांगत राहतील. पोटासाठी ते नास्तिकांचा पक्ष घेतील. त्यांचे उपदेश निर्वाणाचा मार्ग दाखविणारा नसेल. स्वत: साठी मौल्यवान वस्तू भेट देण्याचा ते उपदेश करीत राहतील. इतर काही लोक रस्त्याच्या कडेला मोठ्या रस्त्यावर राजगृहाच्या द्वारी पैसा मिळविण्यासाठी बसतील. पैशासाठी ते माझ्या निर्वाण तत्वज्ञानाचा सौदा करतील. हे चंदन देऊन ताक घेण्यासारखे होईल. भगवंताच्या या भविष्यवाणीवर काहीही भाष्य करण्याची आवश्यकता नाही.
 
 

एकेका स्वप्नावरील गौतम बुद्धांचे भाष्य, राजकीय भाष्य आहे. राजनितीचे नियम सांगणारी ही कथा आहे. गौतम बुद्धांचे भाष्य वाचत असताना भारतातील काही राज्यांच्या राजवटी आणि महाराष्ट्राची सध्याची राजवट डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. सगळ्यांनाच तसे वाटेल असे नाही. शेवटी हा ज्याच्या त्याच्या दृष्टीचा प्रश्न आहे. भगवंताच्या जातककथा अर्थासहित समजून घ्यायला पाहिजे. या कथा पूर्वजन्माच्या आहेत. पूर्वजन्मी जी जीवनपद्धती आहे, ती कथा सांगतानाही होती आणि अडीच हजार वर्षांनंतरही हीच जीवनपद्धती आहे. हे आपल्या जीवनाचे सौंदर्य आहे. या सौंदर्याचा आनंद या कथा देतात.


 
 

Gautam Buddhakatha_1  
 
 
@@AUTHORINFO_V1@@