परिवर्तनकारी नृत्यांगना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-May-2020   
Total Views |


Kumudini Lakhia_1 &n


कथ्थकच्या मूळ मुद्रांना आणि हालचालींना हात न लावता, कुमुदिनी लाखिया यांनी त्यामध्ये अनेक बदल केले. महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी केलेले हे बदल कथ्थक नर्तकांनी स्वीकारले. त्यांनी नुकतीच वयाची नव्वदी गाठली...त्यांच्याविषयी...


परिवर्तन हा जगाचा नियम आहे. ‘कथ्थक’ या शास्त्रीय नृत्यशैलीच्या चौकटीमध्येच राहून या स्त्रीने त्यामध्ये समकालीन बदल केले. समकालीन कथ्थक शैली भारतात रुजवली. पारंपरिकेतेमध्ये नावीन्यपूर्ण विषय आणून त्याचे जगभर सादरीकरण केले. या नृत्यप्रकारातील एकल सादरीकरणाच्या पद्धतीला छेद देऊन त्यांनी युगल आणि संघ सादरीकरणाला सुरुवात केली. चित्रपट, नृत्यनाटिका अशा विविध माध्यमांमधून मुशाफिरी केल्यानंतर त्यांनी १९६७ साली स्वत:ची नृत्यसंस्था स्थापन केली आणि समकालीन कथ्थक नृत्यशैलीला जपणार्‍या अनेक विद्यार्थ्यांच्या पिढ्या घडवल्या. नुकतीच त्यांनी वयाची नव्वदी पार केली आहे. अशा परिवर्तनकारी नृत्यांगना म्हणजे कुमुदिनी लाखिया.

 
कुमुदिनी लाखिया म्हणजेच सगळ्यांच्या लाडक्या कूमीबेनचा जन्म १७ मे, १९३० रोजी झाला. वयाच्या लहापणापासूनच त्यांना नृत्याची आवड होती. १९६०च्या सुमारास त्यांची ओळख जगप्रसिद्ध नर्तक आणि नृत्य संगीतकार राम गोपाळ यांच्याशी झाली. त्यांच्या नृत्यसंघाबरोबर लाखियांनी सादरीकरणाला सुरुवात केली. विदेशात प्रवास केला. मात्र, तोपर्यंत त्यांनी कोणत्याही प्रकारचे शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेतले नव्हते. त्यावेळी त्यांना नृत्य शिकण्यासाठी संगीत नाटक अकादमीची शिष्यवृत्ती मिळाली. या शिष्यवृत्तीच्या बळावर त्यांनी दिल्लीमध्ये कथ्थकच्या लखनौ घराण्याचे गुरु पं. शंभू महाराज आणि जयपूर घराण्याचे गुरु पं. सुंदर प्रसाद यांच्याकडे विधीवत नृत्याचे शिक्षण घेतले. हे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या पुन्हा आपल्या मूळ घरी अहमदाबादला परतल्या. याठिकाणी आल्यावर त्यांच्याकडे एकीकडे दोन दिग्गज गुरुंकडून मिळालेले शास्त्रीय नृत्याचे पारंपरिक ज्ञान होतेच. शिवाय राम गोपाळ यांच्यासोबत विदेशभर नृत्याचे कार्यक्रम केल्यामुळे जागतिक कलेची समजदेखील होती. त्याबळावर त्यांनी कथ्थकच्या सादरीकरणामधील नृत्यरचनेपासून वेशभूषा, संगीत, ध्वनी संयोजन आणि प्रकाशयोजनेमधील स्वत:चे निकष तयार केले. त्याला समकालीन वातावरणामधील विषयांची जोड दिली आणि सादरीकरणाला सुरुवात केली.
 
कथ्थक सादरीकरणाचे मूळ त्याच्या एकल प्रस्तुतीमध्ये होते. कुमुदिनींनी हे एकल स्वरुप आणि त्याचे चरित्र बदलले. या नृत्य प्रकारातील हस्तकांच्या शारीरिक हालचालींना अखंड ठेवून समकालीन हस्तकांची आणि मुद्रांची जोड दिली. महत्त्वाचे म्हणजे, या संपूर्ण प्रकाराला सांघिक नृत्यरचनेची जोड देऊन रंगमंचावरील नृत्य सादरीकरण प्रभावी आणि मोहक बनवले. एक तयारीपूर्ण व चांगली विचार मांडणारी संकल्पना आणि तिच्या प्रयोगात्मक प्रस्तुतीमधील व्यावसायिकीकरणामुळे कुमुदिनी यांनी नृत्यक्षेत्रात नाव कमविले. १९८० साली दिल्लीच्या कथ्थक महोत्सवात त्यांनी नृत्यरचित केलेल्या ‘युगल’, ‘धाबकर’, ‘अत: किम’ या प्रस्तुती गाजल्या. हिंदी चित्रपट सृष्टीनेेदेखील त्यांची प्रतिभा ओळखली. ‘उमराव जान’ या प्रसिद्ध चित्रपटासाठी त्यांनी पं. गोपीकृष्ण यांच्यासोबत केलेले नृत्य दिग्दर्शनाच्या कामाचे कौतुक झाले. परंतु, चित्रपट जगातील प्रलोभनांनी त्या बांधल्या गेल्या नाहीत. चित्रपटसृष्टीत न रमता त्या पुन्हा आपल्या मूळ नृत्यरचनांमध्ये रमल्या.
 
१९६७ साली त्यांनी अहमदाबादमध्ये ’कदंब’ या नावाने आपल्या नृत्यसंस्थेची स्थापना केली. चांगल्या घरातील मुलींसाठी पूर्णपणे निषिद्ध असणार्‍या कथ्थकसारख्या शास्त्रीय नृत्यशैलीचे धडे देणार्‍या एखाद्या नृत्यसंस्थेची स्थापना प्रथमच कुमुदिनी यांनी या शहरात केली. सुरुवातीला त्यांच्याकडे केवळ तीन विद्यार्थी शिकण्यासाठी येत होते. ’कदंब’च्या स्थापनेच्या प्रारंभी त्यांना शहरातील कोणीही तबलावादक साथसंगत देण्यासाठी तयार होत नव्हता. सुदैवाने पंडित ओंकार नाथ ठाकूर यांचे शिष्य अतुल देसाई यांच्याशी अचानक झालेल्या भेटीत आणि मैत्रीमुळे त्यांच्या समोरील संगीतामधील अडचणी कमी झाल्या. अतुल देसाई कुमुदिनींच्या सर्जनशील विचारसरणीचे साथीदार बनले. त्यांच्या नृत्य कल्पनेला साथ देण्यासाठी ते वाद्य रचनांमध्ये सामील झाले. दोघांच्या विचारांमधील भिन्नता बर्‍याचदा कलहाच्या उंबरठ्यावर पोहोचली. परंतु, देसाई यांच्या चमत्कारिक संगीत रचनांनी कुमुदिनींच्या अनोख्या नृत्य प्रकारात जीव ओतला.
 
दि. १७ मे रोजी कुमुदिनी यांनी वयाच्या नव्वदाव्या वर्षात पदार्पण केले आहे. कला क्षेत्रात मोलाच्या योगदानाबद्दल त्यांना ‘पद्मभूषण’ आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि ‘रत्न-सदस्यता’ यांसह अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. त्यांनी अहमदाबादमध्ये स्थापित केलेल्या ‘कदंब’ या नृत्यसंस्थेमधील प्रशिक्षित कलाकारांना सक्षम गुरू आणि नृत्य रचनाकार म्हणून जागतिक नावलौकिक मिळवून दिला आहे. भारतीय शास्त्रीय नृत्यामधील कथ्थक नृत्यशैलीमध्ये बदल घडवून आणणार्‍या चिंतनशील विचारवंत आणि सादरकर्त्या म्हणून आज त्यांचे नाव आज आदराने घेतले जाते. दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून त्यांच्या कार्याला सलाम!
 
 

@@AUTHORINFO_V1@@