कोकणातून चतुराच्या नव्या प्रजातीचा उलगडा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-May-2020   
Total Views |
dragonfly _1  H


'कोकण राॅकड्वेलर' असे नामकरण

 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) - कोकण पट्ट्यामधून चतुराच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात मुंबईतील दोन तरुण संशोधकांना यश मिळाले आहे. या नव्या प्रजातीचे नामकरण कोकणाच्या नावे म्हणजे 'कोकण राॅकड्वेलर' असे करण्यात आले आहे. या चतुराचा वावर महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीच्या क्षेत्रात सर्वसामान्यपणे पाहावयास मिळतो. 
 
 
 
बालपणी चतूराच्या शेपटीला दोरा बांधून आपण सगळ्यांनीच त्याच्याबरोबर खेळण्याचा आनंद लुटला आहे. या चतूरांमध्ये एका नव्या प्रजातीची भर पडली आहे. गोड्या पाण्यातील अधिवासात चतुर हे पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वाचे कीटक आहेत. पश्चिम घाटात साधारण १०६ प्रजातीचे चतुर आणि टाचणीच्या प्रजाती आढळतात. त्यामधील ४० टक्के प्रजाती या केवळ पश्चिम घाटात आढळतात म्हणजेच त्या पश्चिम घाटाच्या प्रदेशनिष्ठ प्रजाती आहेत. नव्याने उलगडलेल्या 'कोकण राॅकड्वेलर' या प्रजातीचा समावेश 'ब्रॅडिनोपाया' या वर्गात होतो. या पोटजातीत जगात तीनच प्रजाती आढळतात. मात्र, आता या नव्या शोधामुळे ती संख्या चार झाली आहे. स्वतंत्र्य संशोधक म्हणून काम करणारे मुंबईतील शंतनु जोशी आणि डाॅ. दत्तप्रसाद सावंत यांनी नव्या चतुर प्रजातीचा उलगडा केला आहे. सोमवारी प्रसिद्ध झालेल्या 'झूटॅक्सा' या संशोधन पत्रिकेत या संशोधनाचे वृत्त प्रकाशित करण्यात आले आहे.
 
 

dragonfly _1  H 
 
डाॅ. दत्तप्रसाद सावंत यांनी २०१५ मध्ये 'कोकण राॅकड्वेलर'ला सर्वप्रथम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमध्ये छायाचित्रीत केले होते. त्यानंतर २०१७ मध्ये विजयदुर्गमध्ये ही प्रजात त्यांना आढळली होती. २०१८ पर्यंत ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहा ठिकाणी या प्रजातीचा वावर त्यांना आढळून आला. त्यानंतर या प्रजातीचे नमुने गोळा करुन शंतुन जोशी यांच्या मदतीने त्यांना बंगळूरू येथील 'नॅशनल सेन्टर फाॅर बायोलाॅजिकल सायन्स' या संस्थेत चाचणीसाठी पाठविल्याची माहिती सावंत यांनी दिली. याठिकाणी पार पडलेल्या चाचण्यांमध्ये ही प्रजात विज्ञानासाठी नवीन असल्याचे समोर आले.
 
 

कोकण किनारपट्टीच्या भागात आढळणारी ही चतुरांची प्रदेशनिष्ठ प्रजात असल्याची माहिती शंतनू जोशी यांनी दिली. ही प्रजात खडक आणि अगदी काँक्रीटच्या भिंतींवर बसणे पसंत करत असल्यामुळे आम्ही तिचे नाव 'कोकण रॉकड्वेलर' म्हणजे कोकणातील खडकांवरील रहिवासी असे ठेवल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यातील चतुरांच्या वैज्ञानिक विश्लेषणासाठी शास्त्रीय माहितीचे संकलन करण्याबरोबरच या मोहक कीटकांबद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्याचे लक्ष्य या दोन्ही संशोधकांचे आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@