‘आत्मनिर्भर’ म्हणजे काय?

    16-May-2020   
Total Views | 784


aamtanirbhar_1  



पायाभूत सुविधांवर किंवा संशोधन विकासावर खर्च केल्यामुळे गरिबी संपते म्हणजे काय? त्यालाच साध्या भाषेत ‘आत्मनिर्भरता’ म्हणतात. पण, वाडगा घेऊन फिरण्यालाच ‘गरिबांचे कल्याण’ ठरवून बसलेल्यांना ‘आत्मनिर्भर’ शब्दाचे आकलन म्हणूनच होऊ शकणार नाही. कोरोनातून अर्थव्यवस्था बाहेर काढताना मोदी सरकारने आणलेले ‘पॅकेज’, ही नुसती उधळपट्टी वा खिरापत नसून विकास, पायाभूत सुविधा यातून गरिबांना सुसह्य जीवनाकडे घेऊन जाण्याची योजना आहेच.

 


ज्यांना सतत परावलंबी जगायला शिकवलेले असते, त्यांना ‘स्वावलंबी’ म्हणजे काय, ते समजू शकत नाही. तो त्यांचाही दोष नसतो. मानसिक किंवा बौद्धिक विकास होताना ज्या गोष्टी ‘ज्ञान’ म्हणून त्यांच्या मेंदूमध्ये ‘डाऊनलोड’ केलेल्या असतात, त्यांना नव्या गोष्टी समजूही शकत नाहीत. किंबहुना, दुसर्‍या सॉफ्टवेअरचे आदेश समजणे शक्य नसेल, तर त्याचे आकलन होऊन तसे काम करणेही अशक्य असते. साहजिकच परावलंबित्व म्हणजेच स्वावलंबन’ असे मनात भिनलेले असेल, तर ‘आत्मनिर्भर’ म्हणजे काय, त्याचे आकलन अशा लोकांना खुळेपणा वाटणे स्वाभाविक आहे. हातात वाडगा घेऊन कुठल्याही दारात उभे राहाणे हाच त्यांना रोजगार वाटत असतो. एकदा तेच धोरण वा विचारधारा बनली, मग तेच तत्वज्ञान होऊन जाते. साहजिकच कुठल्याही समस्या वा उपायांवर वाडगा घेऊन भीक मागणे, हा हक्क मानला जाऊ लागतो. कोरोनानंतर जी परिस्थिती उद्भवली आहे, त्यावरचा उपाय म्हणून देशातले वा प्रस्थापितांचे बहुतांश समर्थक प्रत्येक बाबतीत ‘पॅकेज’साठी वाडगा घेऊन रांगेत उभे ठाकले, तर नवल नाही. पण, त्यांच्या वाडग्यात कोणी तरी काही तरी टाकायचे, तर ते आणायचे कुठून व कसे, याचा पर्याय उपाय त्यांना सांगता येत नाही. त्यामुळेच पंतप्रधानांनी जाहीर केलेले २० लाख कोटी रुपयांचे ‘पॅकेज’ रोखीतली रक्कम नसेल, तर त्यांना सगळे ‘पॅकेज’ देखावा वाटल्यास आश्चर्य मानण्याचे कारण नाही. कारण, त्यांनी आजवर हातात वाडगा घेण्यालाच गरिबी दूर करण्याला उपाय मानलेले आहे. त्यांना कष्टातून संपत्ती निर्माण होते वा त्यातून सबलीकरण होऊ शकते, हे कसे कळावे? कारण, त्यांना अमर्त्य सेन वा रघुराम राजन किंवा अभिजित बॅनर्जी ठाऊक असतात, वाचलेले असतात. पण, ‘समावेशी विकासाचा जाणकारम्हणून ओळखला जाणारा रॉबर्ट चेंबर्स ठाऊकही नसतो वा नसावा. ठाऊक असता, तर त्यांना मोदींनी ‘पॅकेज’मधून काय योजलेले आहे, त्याचा अंदाज आला असता.

 
 
रॉबर्ट चेंबर्स हा जगातला एक प्रमुख विकास अर्थशास्त्र जाणकार आहे. त्याने गरीब, वंचित व दुर्लक्षितांना विकास योजनेत मुख्यस्थानी आणून बसवले. विकासाचा विचार करताना व धोरण आखताना अशा दुर्लक्षित वर्गाला मुख्य केंद्र मानले नाही, तर संतुलित विकास होऊ शकणार नाही, याचे भान असलेला तो अर्थशास्त्रज्ञ होता. म्हणूनच त्याने गरिबाला भीक घालणे वा उपकार वा दान म्हणून त्याच्या अंगावर काही फेकण्याची कल्पना झुगारली. त्याच गरीब-वंचिताला मानवी विकासाच्या मुख्यप्रवाहात सहभागी करून घेण्याची भूमिका त्याने हिरीरीने मांडली होती. ती मांडताना विकासाची फळे त्याच गरिबाच्या वाट्याला यावीत, असा विकास करताना त्याला स्वयंभू, स्वावलंबी बनवण्याचा विचार मांडलेला होता. आर्थिक शोषणावर आधारलेल्या अर्थकारणाला बाहेर काढून समावेशक विकास व त्यासाठी वंचितालाही त्यातला भागधारक बनवण्याची ही संकल्पना म्हणजेच ‘आत्मनिर्भरता’ असते. असा सामान्य दुर्लक्षित, कष्टकरी आपल्या श्रमातून नवी संपदा निर्माण करतो आणि आर्थिक व्यवहारातली श्रीमंती एकूण समाजाला संपन्नतेच्या मार्गावर घेऊन जाते. त्याच्या निम्नस्तरीय जीवनातले स्थैर्यच वरच्या वर्गाला श्रीमंतीकडे घेऊन जाणारे यंत्र असते. त्याची मांडणी चेंबर्सच्या विचारातून पुढे आली आणि त्याचा सगळा भर हा पायाभूत सुविधांच्या उभारणीवर होता. ग्रामीण पायाभूत सुविधा व त्यातही प्रत्येक गाव शहरांना जोडणारे सुसज्ज रस्ते, हा त्याचाच आग्रह होता. पण, इथे ‘अर्थशास्त्री’ म्हणून मिरवणार्‍या किंवा ‘विश्लेषक’ म्हणून नाचणार्‍यांनी कधी चेंबर्सच्या ‘गरिबी हटाव’चा अभ्यास तरी केला होता काय? भारतातल्या गरिबीलाही हटवण्यात त्याच्याच विचारांनी मोठा हातभार लावलेला आहे. पण, वाडगा संस्कृतीलाच ‘अर्थकारण’ समजून बसलेल्यांना चेंबर्स ठाऊकच नव्हता किंवा बोलायचेच नसेल. मग त्याच दिशेने पुढले पाऊल टाकणार्‍या मोदींचे आत्मनिर्भर पॅकेज’ कळण्याची शक्यता किती असेल?
 
 
तब्बल बारा वर्षांपूर्वी या संदर्भात ‘इकोनॉमिक टाईम्सचे संपादक स्वामीनाथन अय्यर यांचा एक खास लेख प्रसिद्ध झाला होता. तेव्हा सत्तेत असलेल्या सोनियाप्रणित युपीए सरकारने सरकारी तिजोरी खुली करून ज्या खिरापत वाटण्याच्या अनेक योजना सुरू केल्या, त्यात अन्न सुरक्षा वा मनरेगा नावाने लाखो कोटी रुपयांची उधळण सुरू झालेली होती. गरिबी हटवण्याच्या गर्जना चालल्या होत्या. पण, त्यातून किती गरिबी दूर होते? तत्पूर्वी वाजपेयी सरकारने ज्या पायाभूत योजनांवर पैसा खर्च करण्याचा सपाटा लावला होता, त्यातून किती गरिबी दूर होऊ शकते, त्याची तुलनात्मक आकडेवारी अय्यर यांनी त्या लेखात मांडलेली होती. स्वातंत्र्योत्तर काळात देशामध्ये अशी गरिबाला मदत देण्यावर अफाट रक्कम खर्च करण्यात आली. पण, त्यातून किती गरीब त्या गरिबीच्या रेषेतून वर आले? उलट गरिबीऐवजी पायाभूत सुविधांवर झालेल्या खर्चातून किती गरीब सावरले, त्याची तुलना त्यात आढळते. या संपूर्ण कालावधीमध्ये अशा गरीब कल्याणाच्या योजनेत प्रत्येक दहा लाख रुपये खर्चले, तर त्याचा किती गरिबांना लाभ मिळू शकला आहे? प्रत्येक दहा लाख रुपये शिक्षणाचे अनुदान म्हणून खर्च केल्यावर १०९ लोक गरिबीतून मुक्त होऊ शकले, तर तितकीच रक्कम जलसंधारणावर खर्च केल्याने ६७ लोकांना गरिबीतून मुक्ती मिळू शकली. प्रत्येक दहा लाख रुपयांचा खर्च कर्जमाफीत केल्यावर ४२ जण, वीजदरात सवलत दिल्याने २७ जण आणि खताच्या अनुदानातून फक्त २४ जण गरिबीच्या बाहेर पडू शकले. याच्या उलट परिस्थिती पायाभूत सुविधांनी गरिबांना दिलेल्या लाभाची आहे. प्रत्येक दहा लाख रुपयांचा खर्च रस्ते बांधणीवर झाला, तेव्हा तब्बल ३२५ लोक गरिबीच्या रेषेखालून वर आले, तर संशोधन विकासावर तितकीच रक्कम खर्च झाल्यामुळे ३२३ लोक ‘गरिबीमुक्त’ व्हायला हातभार लागला. या तुलनेला समजून घेतले पाहिजे, तर ‘आत्मनिर्भर पॅकेज’चे आकलन होऊ शकेल.
 
 
वर जी उदाहरणे दिलेली आहेत, त्यात दोन प्रकारच्या खर्चाची तुलना आहे. एक खर्च हा थेट सामान्य माणसाला मिळू शकणारा पैसा आहे किंवा त्याच्या नावावर सरकारी तिजोरीतून काढला जाणारा पैसा आहे. त्याच्या उलट दुसर्‍या गटातला खर्च हा गरिबांच्या नावाने सरकारी तिजोरीतून खर्च झालेला पैसा नाही. ज्याला सरसकट ‘विकासखर्च’ म्हणता येईलस, अशा सर्वांगीण विकासाच्या योजनेवर दहा लाख खर्च झाले, तर अधिक लोक ‘गरिबीमुक्त’ झाले आहेत. त्याच्या उलट जी रक्कम गरिबाच्या नावाने खर्च झालीच नाही, तिने अधिक लोक गरिबीतून मुक्त झालेले आहेत. मग दीर्घकाळ गरिबांच्या नावाने चाललेली खिरापत कशासाठी चालली वा उधळली गेली? आजही तशाच पद्धतीने मोदी सरकारने गरिबांच्या नावाने तिजोरी खुली करण्याचा आग्रह कशासाठी आहे? राहुल गांधींचे पिताश्री राजीव गांधी ३५ वर्षांपूर्वी म्हणाले होते, “शंभर रुपये गरिबांसाठी पाठवले किंवा खर्च केले; तर त्याच्यापर्यंत केवळ १२-१५ रुपये पोहोचतात. त्यातली ८५ टक्के रक्कम मधल्यामध्ये हडपली जाते.आजही तेच चालते. म्हणूनच फक्त खताच्या अनुदानाला लगाम लावण्याची पावले मोदी सरकारने उचलली आणि युरियाची टंचाई संपली. त्याही खर्चातली ६० हजार कोटींची बचत झाली. पायाभूत सुविधांवर किंवा संशोधन विकासावर खर्च केल्यामुळे गरिबी संपते म्हणजे काय? त्यालाच साध्या भाषेत ‘आत्मनिर्भरता’ म्हणतात. पण, वाडगा घेऊन फिरण्यालाच ‘गरिबांचे कल्याण’ ठरवून बसलेल्यांना ‘आत्मनिर्भर’ शब्दाचे आकलन म्हणूनच होऊ शकणार नाही. कोरोनातून अर्थव्यवस्था बाहेर काढताना मोदी सरकारने आणलेले ‘पॅकेज’, ही नुसती उधळपट्टी वा खिरापत नसून विकास, पायाभूत सुविधा यातून गरिबांना सुसह्य जीवनाकडे घेऊन जाण्याची योजना आहेच. पण, त्यातून त्यांना रोजगाराची हमी व उत्पन्नाची कायम हमी देणारीही आहे. मनाने परावलंबी व विचारांसाठीही वाडगा घेऊन पाश्चात्य देशात भीक मागणार्‍यांच्या आवाक्यात येणारी ती गोष्ट नाही.

 
 

भाऊ तोरसेकर

लेखक सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार, वाचकप्रिय ब्लॉगर असून स्थानिक राजकारणापासून ते आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सडेतोड भाष्य करण्यात त्यांची हातोटी आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर! म्हणाल्या, प्रत्येक गोष्टीला वेळ...

पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर! म्हणाल्या, "प्रत्येक गोष्टीला वेळ..."

(Rohini Khadse Breaks Silence After Husband Pranjal Khewalkar’s Arrest) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी येथे सुरू असलेल्या रेव्ह पार्टीतून अटक करण्यात आली. पुणे पोलिसांनी रविवारी मध्यरात्री ही कारवाई केली. प्रांजल खेवलकर यांच्यावर ही रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्टीदरम्यानचा व्हिडीओ पुढे आल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आता रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांन..

पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच...

पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, "दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच..."

(P Chidambaram's Remark on Pahalgam Terror Attack) पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. यामध्ये भारताने हवाई हल्ले करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. यासंदर्भातच विरोधी पक्षांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी केली होती, जी सत्ताधाऱ्यांनी मान्य केली. मात्र संसदेत चर्चेपूर्वी, ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी एका मुलाखतीत केलेले वक्तव्य समोर आले आहे. ज्यावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121