सापाच्या तोंडातील बेडूक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-May-2020   
Total Views |


uddhav thackeray_1 &


आता राजकारणासाठी रडारड चालू आहे. महाराष्ट्राचे हित, मराठी माणसाचे हित असले भावनिक मुद्दे पुढे आणण्यात आले आहेत. सापाच्या तोंडात जात असतानादेखील बेडकाने जीभ बाहेर काढली नाही तर तो बेडूक कसला?


देशात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असतानादेखील, पक्षीय राजकारण काही संपत नाही. एक गोष्ट आठवते, एका सापाने एका बेडकाला धरले, साप त्याला गिळू लागला. इतक्यात बेडकाच्या समोर काही कीटक आले. सापाच्या तोंडात जात असतानादेखील त्या बेडकाने जीभ बाहेर काढली आणि कीटक खाण्याचा तो प्रयत्न करू लागला. सत्तेचे पक्षीय राजकारण करणार्‍या सर्वच नेत्यांची स्थिती सापाच्या तोंडातील बेडकासारखी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना महामारीशी लढण्याची तयारी त्यांच्या पद्धतीने केली. २४ मार्चला त्यांनी देशात ‘लॉकडाऊन’ची घोषणा केली. लगेच राजकारण सुरू झाले. काही मुख्यमंत्री म्हणाले, “आमच्याशी सल्लामसलत केली नाही.” ममता बॅनर्जी म्हणाल्या, “आर्थिक अपयश झाकण्यासाठी कोरोनाची ढाल पुढे करण्यात आली आहे.” महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले, “आम्ही अगोदरच ‘लॉकडाऊन’ केले. आमचे अनुसरण नरेंद्र मोदी यांनी केले.वेगवेगळ्या राज्यांत अडकलेल्या मजुरांना रेल्वेने आपापल्या राज्यांत नेऊन सोडण्याचा निर्णय झाला. सोनिया गांधी म्हणाल्या, “या प्रवाशांचे रेल्वे भाडे आम्ही देऊ.” सोनिया गांधी यांनी आतापर्यंत पंतप्रधान मोदी यांना सात पत्रे लिहिली आहेत. केंद्र सरकार कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी जे उपाय करीत आहेत, त्यांना काँग्रेसचा पाठिंबा दिला. या पाठिंब्याला अनेक ‘पण’ जोडले. त्या म्हणतात, “मीडियाला जाहिराती देणे बंद करावे. खासदारांच्या पगारातील ३० टक्के कपातीची रक्कम असंघटित मजुरांसाठी खर्च करावी. विदेशवार्‍या स्थगित कराव्या इत्यादी.न मागितलेले सल्ले देणं हे विरोधी पक्षाचे काम असतं. सल्ला देण्याइतकी सोपी गोष्ट जगात कोणतीही नाही. सल्ला देणार्‍याला दुसरे काही करायचे नसते. तो म्हणायला मोकळा असतो की, मी हे पूर्वीच सांगितले होते, हे उपाय मीच सुचविले होते. असे फुकटचे श्रेय घेण्यास कोणाचे काही जात नाही. नेहमीप्रमाणे राहुल गांधी यांनी या विषयावर तोंड उघडले. ते म्हणतात, “या परिस्थितीत सर्व पक्षांनी एकत्र आले पाहिजे, ‘लॉकडाऊन’ हा कोरोना व्हायरसवरील अंतिम उपाय नव्हे. ‘लॉकडाऊन’ उठवल्यानंतर व्हायरसचे परिणाम चालूच राहतील. या रोगाशी लढण्यासाठी मोठ्या प्रमाणात ‘व्हायरस टेस्टिंग’ सुरू केले पाहिजे. आज ज्या गतीने ‘टेस्टिंग’ सुरू आहे ते फार कमी आहे. आज एका जिल्ह्यात सरासरी ३५० टेस्ट होतात. हे फार कमी आहे. राहुल गांधींचे हे वक्तव्य गल्लीतील एखादा कथाकथित नेतादेखील करू शकतो. ‘लॉकडाऊन’ हा कोरोनावरील उपाय आहे, हे कोणी सांगितलं? कोरोनावर प्रभावी औषध योजना अजून निर्माण झालेली नाही. हे राहुल गांधी सोडून सर्व जगाला माहीत आहे. सर्व जिल्ह्यात जास्तीत जास्त परीक्षण करण्यासाठी एक यंत्रणा लागते. ती महिन्या दोन महिन्यात उभी राहत नाही. ७० वर्षे राहुल गांधी परिवाराने देशावर राज्य केले, तेव्हा ते काय करीत होते? ज्याला राष्ट्रीय नेता व्हायचे आहे, त्याने हास्यास्पद सूचना करू नयेत.
 

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले. त्यांचे मंत्रिपद स्थिर होण्याच्या आतच कोरानाचे भयानक संकट उभे राहिले. उद्धव ठाकरे मीडियापुढे येतात आणि काही सूचना करतात. त्यांचे बोलणे, देहबोली हे सांगते की, ते शिवसैनिकांपुढे बोलत आहेत. ‘मला हे चालणार नाही, मी हे खपवून घेणार नाही, मला महाराष्ट्र कोरोनामुक्त करायचा आहे.’ ही भाषा शिवसैनिकांच्या सभेपुढे चांगली आहे. महाराष्ट्रातील सगळी जनता काही शिवसैनिक नव्हे. या जनतेशी कसा संवाद साधायचा, हे त्यांच्या सल्लागारांनी त्यांना शिकविले पाहिजे. ‘लॉकडाऊन’च्या काळात पालघर येथे दोन साधूंच्या हत्या झाल्या. आपली परंपरा हे सांगते की, साधू अवध्य असतात. त्यांचे रक्त सांडू नये. त्यातून अनर्थ निर्माण होतात. ते सर्वांना भोगावे लागतात. साधूंच्या हत्येची नैतिक जबाबदारी महाराष्ट्र शासनावर आणि गृहमंत्र्यांवर आहे. गृहमंत्र्यांनी पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठविले. खरं म्हणजे, गृहमंत्र्यांनाच घरी बसविले पाहिजे. केंद्र सरकारच्या हातात शासन बरखास्तीचे ३५६ कलम आहे. आता त्याचा वापर केला तर राजकारण केले, असा आरोप होईल. पालघरमध्ये चोर समजून संन्याशांना मारले आणि गृहमंत्र्यांनीदेखील चोर ठरवून संन्याशालाच मारले. पोलीस अधीक्षकला हटवल्याने गृहमंत्र्यांची नैतिक जबाबदारी संपत नाही. महाराष्ट्रातून इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटरगुजरातमध्ये स्थलांतरित करण्यात आले. यातूनच ‘गुजरात विरुद्ध महाराष्ट्र’ असा वाद सुरू करण्यात आलेला आहे. नरेंद्र मोदी आणि अमितभाई शाह गुजरातचे आहेत. भाषिक वाद उत्पन्न करूनच शिवसेनेचा जन्म झाला, या वादावरच ती वाढली. म्हणून आपल्या जीन्समध्ये जे आहे ते शिवसेना विसरू शकत नाही. ‘इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटर’ ही संस्था महाराष्ट्रात ठेवण्यासाठी १४ वर्षांचा कालावधी दिला गेला. त्या काळात काही झाले नाही. आता राजकारणासाठी रडारड चालू आहे. महाराष्ट्राचे हित, मराठी माणसाचे हित असले भावनिक मुद्दे पुढे आणण्यात आले आहेत. सापाच्या तोंडात जात असतानादेखील बेडकाने जीभ बाहेर काढली नाही तर तो बेडूक कसला?
 
विषय एवढ्यावरच थांबत नाही. आपल्या देशातील डावी डोकी फार पुढे धावत असतात. त्यांनी एक कथा चालविलेली आहे, ती म्हणजे, कोरोना महामारीच्या आडून नरेंद्र मोदी स्वतःला देशाचे एकमेव रक्षक म्हणून स्थापित करायला निघालेले आहेत. देशाला संबोधन करण्याचे काम तेच करतात. कौशल्याने हिंदू विषयसूची पुढे आणतात. जनतेला टाळ्या वाजवायला सांगतात, दिवे लावायला लावतात. या सर्व हिंदू परंपरा आहेत. मोदी त्यांचा कौशल्याने उपयोग करीत आहेत. विविध योजना तेच जाहीर करतात. या सर्वांचा अर्थ असा की, ‘मीच तुमचा रक्षक आहे,’ असा ते देऊ इच्छितात. डाव्या डोक्यातून निघालेली दुसरी कल्पना अशी की, कोरोना व्हायरसच्या आडून मुस्लीम द्वेषाचे राजकारण खेळले जात आहे. निजामुद्दीन येथे मरकज ‘तबलिगी’ जमातीने कोरोना व्हायरस भारतात पसरविला, असा प्रचार चालू आहे. यापूर्वी ‘लव्ह जिहाद’ हा शब्द पुढे आणला. आता ‘कोरोना जिहाद’ असा शब्दप्रयोग वापरला जात आहे. मुसलमानांविरुद्ध खोटे व्हिडिओ आणि व्हॉट्सअपवर संदेश फिरविले जात आहेत. अल्लाने मुसलमानांना कोरोनापासून मुक्त ठेवले आहे. हिंदू काफ़िरांवर कोरोना सोडला आहे, असेही संदेश पसरविले जात आहेत. या म्हणण्याच्या समर्थनार्थ कोरोना व्हायरसच्या संदर्भात ज्यांना अटक केली जाते, त्यातील मुसलमान शोधून त्यांच्या कथा केल्या जातात. औरंगाबादजवळ रेल्वेगाडीखाली १६ मजूर मेले. समजा, त्यातील चार-पाच जणदेखील मुसलमान असते तर डाव्यांनी कथा रचली असती की, यांना रेल्वे खाली मुद्दाम ठार करण्यात आले. कधीकधी मनात विचार असा येतो की, मोदींच्या ऐवजी मनमोहन सिंग पंतप्रधान असते तर? मोदींकडे जनसंवादाचे जबरदस्त कौशल्य आहे. मनमोहन सिंग यांच्याकडे ते शून्य आहे. मोदी यांना देशाची भाषा समजते, लोकभाषा समजते, जनतेच्या आस्थेची प्रतिके समजतात. मनमोहन सिंग यांना उर्दू शेरोशायरी समजते, पाश्चात्त्य अभिजनांची भाषा त्यांना समजते. जनतेत आत्मविश्वास निर्माण करण्याच्या संदर्भात मोदींना १०० गुण दिले, तर मनमोहन सिंग यांना १० गुण द्यावे लागतील. मनमोहन सिंग यांची भाषा, देहबोली, वाणी, चालणे हे देशाच्या सर्वोच्च नेत्याची गरिमा वाढविणारी नसते.
 
‘टेन कमांडमेंट’ या चित्रपटातील एक प्रसंग आहे, राजपुत्र मोझेस याला इजिप्तमधून हकलवले जाते. तो वाळवंट तुडवत तिथल्या मेरिडीन प्रदेशात येतो. तिथल्या शेखच्या मोठ्या मुलीशी (सोफार) त्याचा विवाह होतो. ती एकदा त्याला म्हणते, “तुझे चालणे राजपुत्रासारखे आहे आणि तुझे लढणे एका योद्धयासारखे आहे. तू इजिप्तचा राजपुत्र आहे.” मोझेसला त्याचे आश्चर्य वाटते. परंतु, चाल आणि वागणं हे लपवून ठेवता येत नाही. आज मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, ही भाग्याची गोष्ट आहे. मोदी जे काही करतील त्याच्या विरुद्ध पचपच करत राहायची, हा गांधी परिवाराचा गुणधर्म आहे आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्री मित्रपरिवाराचादेखील गुणधर्म आहे. देशातील डाव्यांचे तर ते जगण्याचे टॉनिकच आहे. असे निरंतर पचपच करणारे पचपचीमुळेच संकटात येतात, त्याची ही एक कथा. एक कासव आणि दोन राजहंस यांची मैत्री असते. राजहंस त्याला उंच आकाशातून पृथ्वी कशी दिसते हे सांगत. कासवाला वाटले आपणही उंच आकाशात जाऊन पृथ्वी बघावी. हंस त्याला म्हणतो, “तू पाण्यात राहणारा, तुला आकाशात येता येणार नाही.” कासव म्हणतो, “काही तरी युक्ती करा आणि मलाही उंच आकाशात घेऊन जा.” हंस एक जाड काठी घेऊन येतो. कासवाचा स्वभाव बडबड करण्याचा असतो. हंस त्याला म्हणतो, “आम्ही चोचीने ही काठी धरतो, तू तोंडाने धर. तुला आकाशाचा फेरफटका मारून आणतो. पण एक खबरदारी घे. बोलण्यासाठी तोंड उघडू नकोस.त्याप्रमाणे दोन हंस आणि त्यावर लटकलेला कासव आकाशात जातात. लोकं हे दृश्य बघतात, त्यांना मोठी गंमत वाटते, ते आवाज करू लागतात. तो आवाज ऐकून कासव लोकं का ओरडत आहेत, हे विचारण्यासाठी तोंड उघडतो आणि वेगाने खाली येतो. आपटतो आणि मरतो. पचपच करणार्‍यांना पचपच करु द्या, आपण कोरोनाशी लढूया!

 
 
@@AUTHORINFO_V1@@