महाभारताचे जन्मस्थान धोक्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


pak university_1 &nb

 
 
या दगडाच्या खाणी नि त्यांची राक्षसी दगडफोडी यंत्रं खाणी खणत-खणत आता चहुबाजूंनी तक्षशिला संरक्षित परिसरावर आक्रमण करत आहेत. तक्षशिला विद्यापीठ हा आपलाच प्राचीन ठेवा आहे, याची मनोमन जाण असलेले थोडेसे शहाणे लोक आणि जगभरचे पुरातत्त्व विशेषज्ञ तक्षशिलेवरच्या या नव्या आक्रमणाने धास्तावले आहेत.

 


सर जॉन हर्बर्ट मार्शल याने १८१३ साली तक्षशिला विद्यापीठाच्या अवशेषांचं उत्खनन सुरू केलं. हे काम पुढे २० वर्षे सुरू होतं. या उत्खननातून प्राचीन भारताचा एक वैभवशाली ठेवा आधुनिक जगाला ज्ञात झाला. पश्चिम पंजाब प्रांतात असल्यामुळे फाळणीनंतर तक्षशिला गाव अर्थातच पाकिस्तानात गेलं. वास्तविक तक्षशिलेचा सगळा इतिहास हा हिंदू, वैदिक आणि बौद्ध परंपरेचा इतिहास होता. पण, ‘आमचा इतिहास पाच हजार वर्षांचा आहे आणि पाणिनी हा आमचाच होता,’ असं म्हणणार्‍या पाकिस्तानी विद्वानांनी (सुदैवाने) तक्षशिला हा आमचा ठेवा आहे, असं मानलं. तरीही ‘शासन’ नावाच्या एका सुस्त यंत्रणेपर्यंत ही सगळी महत्त्वाची बाब पोहोचून त्यांनी तक्षशिलेच्या अवशेषांना पुरातत्त्वदृष्ट्या संरक्षितअसा दर्जा बहाल करायला १८८२ साल उजाडलं. त्यातही मठ्ठ शासन यंत्रणा हलली ती पाकिस्तानी विद्वानांमुळे नव्हेच, तर अमेरिकेमुळे. अमेरिकास्थित ‘युनेस्को’ या जागतिक संस्थेने तक्षशिलेच्या संंपूर्ण परिसरालाच ‘वर्ल्ड हेरिटेज साईट’ म्हणून घोषित केल्यामुळे पाकिस्तान सरकारला वरील हालचाल करावीच लागली. परंतु, नंतर वेळोवेळी सरकारी अध्यादेश काढून हे ‘संरक्षित’ क्षेत्र आकुंचित करण्यात आलं. याला कारण खाणमालकांच्या लॉबीचा दबाव. तक्षशिला परिसर हारो या नदीच्या खोर्‍यात येतो. ‘हारो-हारु-सारु’ असा या शब्दाचा उगम आहे. यावरून ही सरस्वती नदीची उपनदी असावी आणि सरस्वतीप्रमाणेच ती सुकून गेली असावी, असा अंदाज आहे, तर या सुकलेल्या नदीच्या पात्रात फार मोठ्या प्रमाणावर दगडाच्या खाणी आहेत. दर दिवसाला किमान हजार-पंधराशे ट्रक्स इथून दगडाच्या खडीचा उपसा करत असतात. या दगडाच्या खाणी नि त्यांची राक्षसी दगडफोडी यंत्रं खाणी खणत-खणत आता चहुबाजूंनी तक्षशिला संरक्षित परिसरावर आक्रमण करत आहेत. आपण भारताचा कितीही द्वेष केला, तरी आपणही मूळचे भारतीयच आहोत आणि त्यामुळे तक्षशिला विद्यापीठ हा आपलाच प्राचीन ठेवा आहे, याची मनोमन जाण असलेले थोडेसे शहाणे लोक पाकिस्तानातही आहेत. ते लोक आणि जगभरचे पुरातत्त्व विशेषज्ञ तक्षशिलेवरच्या या नव्या आक्रमणाने धास्तावले आहेत.
 
प्रभू रामचंद्राने शिवधनुष्याचा भंग करून सीतेला स्वयंवरात जिंकलं. त्याचवेळी जनक राजाने आपल्या भावांच्या मुली उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती यांचे विवाह अनुक्रमे लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्याशी करून दिले. पुढे राम-सीतेला जसे कुश-लव हे जुळे मुलगे झाले, तसेच त्याच्या बंधूंनाही मुलं झाली. प्रभू रामचंद्राने आपले जीवितकार्य संपवताना या सर्व राजपुत्रांना राज्य वाटून दिलं. भरत-मांडवी यांचा पुत्र तक्ष याच्या वाटणीला आजच्या पंजाबपासून आजच्या उझबेकिस्तानपर्यंतच प्रदेश आला. म्हणजे आधुनिक दृष्टीने पाहिल्यास आजचा पंजाब, अफगाणिस्तान, ताजिकीस्तान आणि उझबेकिस्तान एवढा भूभाग त्याच्या राज्यात होता. तक्षाने आपली राजधानी जिथे वसवली, ती नगरी पुढे ‘तक्षशिला’ म्हणून विख्यात झाली आणि उत्तरेकडेही त्याने आणखी एक शहर वसवलं. त्याचं नाव तक्ष खंड. म्हणजेच ‘ताश्कंद’ उझबेकिस्तानची आजची राजधानी. रामायणाचा काळ नेमका कोणता, हे निश्चित झालेलं नाही. पण, महाभारताचा काळ निश्चित झालेला आहे. इसवी सनापूर्वी तीन हजार वर्षे म्हणजे सध्याच्या काळापूर्वी पाच हजार वर्षे महाभारत युद्ध झालं. सम्राट युधिष्ठिर हस्तिनापूरच्या सिंहासनावर विराजमान झाला. पांडवांच्या महानिर्वाणानंतर अर्जुनपुत्र अभिमन्यू याचा मुलगा परिक्षित हा कुरुवंशाचा सम्राट बनला. पण, त्याची राजधानी हस्तिनापूर किंवा इंद्रप्रस्थ नव्हती. ती होती तक्षशिला. परिक्षित राजा सर्पदंशाने मरण पावला. म्हणून त्याचा मुलगा राजा जनमेजय याने बारा वर्षे अखंड सर्पसत्र नावाचा महायज्ञ केला. तो या तक्षशिला नगरीतच. या यज्ञाला महर्षी व्यास स्वतःदेखील उपस्थित होते. त्यांनी रचलेले महाभारत काव्य त्यांचे शिष्य वैशंपायन ऋषी यांनी, त्यांच्या आज्ञेनुसार सर्व उपस्थितांना ऐकवलं, ते इथेच. म्हणजे तक्षशिला त्या काळी संपूर्ण भारताची साम्राज्यधानी होती. परंतु, काळाच्या ओघात तिचं हे राजकीय महत्त्व ओसरत गेलं. राजकीय प्रभावाची केंद्रं पंचनद्यांच्या खोर्‍यांमधून (किंवा खरं म्हणजे सिंधु-सरस्वती खोर्‍यातून) पुन्हा गंगा-यमुनेच्या खोर्‍यात सरकली. काशी, कान्यकुब्ज (कनोज), पाटलीपुत्र (पटना) या जुन्या-नव्या राजधान्या पुनरुज्जीवित झाल्या. कदाचित हे कुरुवंशाची राजकीय शक्ती कमी झाल्यामुळे असेल किंवा कदाचित सरस्वतीचा प्रवाह आटल्यामुळेही असेल.
 

 

परंतु, तक्षशिलेचं शैक्षणिक महत्त्व जराही कमी झालं नाही. उलट ते वाढतच गेलं. तत्कालीन जगाच्या सर्व प्रदेशांमधून विद्यार्थी तक्षशिलेत शिक्षण घेण्यासाठी येत होते, असा उल्लेख जातक साहित्यात येतो. भगवान गौतमबुद्धांचं महानिर्वाण इसवी सनापूर्वी पाचशे वर्षांअगोदर झालं, हा सिद्धांत आता जगभर मान्य झालेला आहे. जातक साहित्य भगवानांच्या निर्वाणानंतर निर्माण होत गेलं. म्हणजे इसवी सन पूर्व किमान ५०० वर्षे तक्षशिला विद्यापीठ जगभर गाजत होतं. आजच्या ऑक्सफर्ड, केेंब्रिज आणि हार्वर्ड विद्यापीठांप्रमाणेच तक्षशिला हे उच्चशिक्षणासाठी असलेलं विद्यापीठ होतं. वेद, वेदान्तादी सहा शास्त्रं आणि १८ विद्या यांचं उच्चशिक्षण इथे मिळत असे. या १८ विद्यांमध्ये इतिहास, पुराण, गणित, खगोल, शरीरविज्ञान, सर्पदंशज्ञान, भूतविद्या, हस्तिविद्या, मृगया, आयुर्वेद, धनुर्वेद, मूर्तिकला, चित्रकला, शिल्पकला यांचा समावेश होता. शिल्पकला म्हणजे अभियांत्रिकी विद्या म्हणजेच इंजिनिअरिंग. इथे राजपुत्रांसाठी युद्धकला शिकवण्यासाठी खास सोय असून एके वेळी तिथे १०३ राजपुत्र शिक्षण घेत होते, असा उल्लेख ‘महासूतसोम’ या जातकात आहे. भगवान बुद्धाने कोणतंही मत नाकारत न बसता स्वतःचं मत निर्माण केलं. परंतु, त्याच्या मतामध्ये अनेक मुद्दे वरकरणी वेदान्तमतविरोधी असल्यामुळे त्याच्या निर्वाणानंतर वेदान्तमत विरुद्ध बौद्धमत’ असा विरोध बराच काळ चालला. पण, तक्षशिला विद्यापीठाचं वैशिष्ट्य असं राहिलं की, तिथे वेद-वेदान्ताबरोबरच बौद्धमताचंही अध्ययन-अध्यापन सुरू झालं आणि अनेक शतकं सातत्याने सुरू राहिलं. फाहियान या चिनी प्रवाशाने इसवी सन ४०५ या वर्षी तक्षशिला विद्यापीठाला भेट दिली होती. त्याचा वृत्तांत त्याने लिहून ठेवला आहे. परंतु, त्याच म्हणजे इसवी सनाच्या पाचव्या शतकात तक्षशिला विद्यापीठ काळाच्या भक्ष्यस्थानी पडलं आणि हा काळ म्हणजे हूण नावाचे परकीय आक्रमण होतं. इसवी सनापूर्वी भारतावर शक, कुशाण, पर्शियन आणि ग्रीक यांची आक्रमणं साधारणपणे वायव्येकडूनच झाली होती. पण, त्यांच्या आक्रमणात अल्लादपणे सुरक्षित राहिलेली तक्षशिला या हूणांनी जाळून, लुटून उद्ध्वस्त केली. हे हूण लोक मंगोलियातून आले होते म्हणतात.

 


जेमतेम ५० वर्षांतच त्यांचा दम खलास झाला. भारतात यशोधर्मा या राजाने हूणांचा निर्णायक निकाल लावला. पण, तक्षशिलेचं वैभव संपलं ते संपलंच. विद्येची केंद्रं म्हणून आता पुन्हा गंगेकाठची वाराणशी आणि मगध (बिहार) प्रदेशातलं नालंदा पुढारु लागलं. पुढे मग कालचक्र फिरत राहिलं. वायव्येकडून भारतावर ‘इस्लाम’ ही नवी टोळधाड कोसळत राहिली. अरब आले, अफगाण आले, इराणी आले, तुर्क आले. तक्षशिलेच्या परिसरात रावळपिंडी हे शहर निर्माण झालं. पंजाब प्रांताची राजधानी शहर लाहोर याच्या खालोखाल ते शहर प्रसिद्धीस आलं. १८०२ साली ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन याने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याच्या प्रमुखपदी प्रसिद्ध पुरातत्वज्ञ सर जॉन हर्बर्ट मार्शल याची नेमणूक केली. मार्शलने आपल्या कारकीर्दीत मोहेंजोदडो, हडप्पा, सारनाथ, सांची या प्राचीन स्थळांप्रमाणेच तक्षशिला नगरीचंही उत्खनन कार्य सुरू केलं. त्याच्या वृत्तांतांमधून तक्षशिलेचा नाममहिमा पुन्हा एकदा जगभर दुमदुमला. जगभरचे पर्यटक मोहेंजोदडो, हडप्पाप्रमाणेच तक्षशिलेलाही भेट देऊ लागले. ती विशाल, सुनियोजित, पण आता उद्ध्वस्त असलेली प्राचीन नगरी पाहून चकित होऊ लागले. हळहळू लागले. आणि पुन्हा एक दिवस काळाचा तडाखा बसला. भारत सोडून जाणार्‍या ब्रिटिश सत्तेने पश्चिम पंजाबात पाकिस्तान नावाचा इस्लामी देश निर्माण केला आणि लाहोर भारताच्या सरहद्दीपासून खूप जवळ म्हणून या नव्या देशाच्या नेत्यांनी तक्षशिलेच्या अंगणातल्या रावळपिंडीलाच राजधानी बनवलं. पुढे तर उद्ध्वस्त तक्षशिलेच्या आणखी लगत इस्लामाबाद ही पाकिस्तानची नवी राजधानी उभी राहिली.
 
एकेकाळी ‘शूर्पारक’ उर्फ ‘सोपारा’ हे अत्यंत समृद्ध, श्रीमंत असं बंदर होतं नि त्याच्या दक्षिणेकडची मुंबई हे एक खेडं होतं. आज अडीच हजार वर्षांनंतर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे नि सोपारा किंवा नालासोपारा हे तिच्या उत्तरेकडचं हे उपनगरी रेल्वे स्थानक फक्त आहे. एकेकाळी भारताची राजकीय व नंतर शैक्षणिक राजधानी असलेली तक्षशिला आज पाकिस्तान नावाच्या दिवाळखोर देशाची राजधानी इस्लामाबादच्या आसमंतातलं एक उद्ध्वस्त शहर मात्र आहे. शासकीयदृष्ट्या पंजाब प्रांतातल्या रावळपिंडी जिल्ह्यातल्या सात तालुक्यांपैकी तक्षशिला किंवा स्थानिक पंजाबी-उर्दूमध्ये ‘तक्काशिला’ हे एक तालुक्याचं गाव आहे. रघुकुलोत्पन्न महाराज तक्ष आणि भरतवंशाचा सम्राट परिक्षित यांच्या राजधानी तक्षशिलेची काय ही अवनती! आणि आता खाणवाली दगडफोड कंत्राटदार मंडळी ते उद्ध्वस्त अवशेषही विकून खाण्याच्या मार्गावर आहेत. पाकिस्तानी पुरातत्त्व मंत्रालयाने तक्षशिला परिसरातील सर्व दगडखाणी बंद करून तो संपूर्ण परिसर राष्ट्रीय उद्यान’ म्हणून घोषित करावा, अशी जोरदार शिफारस वरिष्ठांकडे केली आहे. एकंदरीत तक्षशिलेचं भवितव्य अधांतरीच आहे.

 

 
@@AUTHORINFO_V1@@