'लाॅकडाऊन'मध्ये दक्षिण आफ्रिकेत डझनभर गेंड्यांची शिकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2020   
Total Views |
africa_1  H x W
 
 
 
 

बंद असलेल्या पर्यटनाचा फायदा शिकाऱ्यांनी उचलला

 
 
 
 
मुंबई (प्रतिनिधी) - कोरोना व्हायरसमुळे दक्षिण आफ्रिकेत जारी केलेला लाॅकडाऊन येथील जंगलांमध्ये नांदणाऱ्या गेंड्यांच्या मुळावर उठला आहे. दक्षिण आफ्रिका आणि त्याशेजारी असणाऱ्या बोत्सवाना प्रांतामध्ये लाॅकडाऊनदरम्यान सुमारे डझनभर गेड्यांची शिकार झाली आहे. लाॅकडाऊनमुळे आफ्रिकेतील पर्यटन रोडावले आहे. याच संधीचा फायदा उचलून शिकाऱ्यांनी गेंड्यांचा जीव घेण्यास सुरुवात केली आहे.
 
 
 
 
 
दक्षिण आफ्रिकेतील 'रायनो 911' ही संस्था जखमी गेंड्यांच्या बचावासाठी हेलिकाॅप्टर पुरवण्याचे काम करते. या संस्थेचे संस्थापक निको जेकब्स सांगतात की, गेले काही आठवडे हे दक्षिण आफ्रिकेतील गेंड्यांच्या संवर्धनासाठी वाईट ठरत आहेत. कारण, लाॅकडाऊन लागू झाल्यापासून दक्षिण आफ्रिकेतील पश्चिम प्रांतामधून नऊ गेंड्यांच्या शिकारीच्या घटना समोर आल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दक्षिण आफ्रिकेत २३ मार्चपासून लाॅकडाऊन लागू करण्यात आला. तेव्हापासून जेकब्स हे प्रत्येक दिवशी शिकार केलेल्या गेंड्यांच्या बचावासाठी हेलिकाॅप्टर घेऊन जात आहेत. २५ मार्च रोजी त्यांनी पांढऱ्या गेंड्याच्या दोन महिन्यांच्या पिल्लाला वाचवले. या पिल्लाच्या आईचा जीव शिकाऱ्यांनी घेतला होता. दुसऱ्या दिवशी त्यांनी दोन काळ्या मृत गेंड्यांना हेलिकाॅप्टरमधून वाहून आणले. शिकाऱ्यांनी या गेंड्यांची शिंगे काढून त्यांना मारून टाकले होते.
 

africa_1  H x W 
 
 
 
 
 
दक्षिण आफ्रिकेच्या शेजारी असणाऱ्या बोत्सवाना प्रातांमध्ये जवळपास सहा गेंड्यांची शिकार झाल्याची माहिती 'रायनो काॅन्झर्वेशन बोत्सवाना' या संस्थेने दिली आहे. गेल्या आठवड्यात सैनिकांनी दोन शिकाऱ्यांना ठार केल्याची माहिती बोत्सवाना सरकाराने दिली. लाॅकडाऊनमुळे येथील वन्यजीव पर्यटन पूर्णपणे थांबले आहे. हेच कारण गेंडयांच्या मुळावर उठले आहे. याविषयी 'वाईल्डलाईफ काॅन्झर्वेशन सोसासटी'चे टीम डॅव्हनपोर्ट सांगतात की, आफ्रिकेमध्ये गेंडा हा प्राणी केवळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बळावर संरक्षित नाही, तर पर्यटकांच्या उपस्थितीमध्येही त्यांचे संरक्षण होते. कारण, शिकारी हे जास्त पर्यटक असणाऱ्या क्षेत्रात शिकार करत नाहीत. लाॅकडाऊनमुळे पर्यटनच बंद असल्याने शिकाऱ्यांना गेंड्यांची शिकार करण्यासाठी मोकळे रान मिळाले आहे.
@@AUTHORINFO_V1@@