पक्ष्यांना 'लाॅकडाऊन' लागू नाही; पाच दिवस न थांबता 'या' पक्ष्याने केले अरबी समुद्रावरुन उड्डाण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2020   
Total Views |

bird_1  H x W:

 
 

'डब्लूआयआय'च्या संशोधकांनी पक्ष्यांना लावले सॅटेलाईट टॅग

 
 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) - आफ्रिकेतील सोमालिया प्रांतात हिवाळी स्थलांतरासाठी गेलेली 'लाॅंगलेंग' नामक मादी ससाणा (अमूर फाल्कन) भारतात दाखल झाली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रवासादरम्यान तिने पाच दिवस न थांबता अरबी समुद्रावरुन उड्डाण केले. उत्तर चीनमधील आपल्या प्रजनन क्षेत्राकडे तिचा प्रवास सुरू असून 'भारतीय वन्यजीव संस्थान'चे (डब्लूआयआय) संशोधक तिच्यावर लक्ष ठेवून आहेत. ससाणा पक्ष्यांचा स्थंलातर मार्ग जाणून घेण्यासाठी २०१६ मध्ये 'डब्लूआयआय'च्या संशोधकांनी 'लाॅंगलेंग'च्या शरीरावर सॅटेलाईट टॅग लावले होते.
 
 
 

bird_1  H x W:  
 
 
 
 
लांब पल्ल्याच्या स्थलांतरित पक्ष्यांच्या उड्डाण मार्ग आणि या मार्गावरील पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास करण्यासाठी २०१६ साली 'डब्लूआयआय'च्या संशोधकांनी 'केंद्रीय पर्यावरण विभागा'च्या परवानगीने काही ससाणा पक्ष्यांना सॅटेलाईट टॅग लावले होते. उत्तर चीनमध्ये प्रजनन करुन ससाणा पक्षी हिवाळ्यासाठी आफ्रिकेत स्थलांतर करतात. यादरम्यान ते भारतातील नागालॅंड आणि मणिपूर या राज्यांमध्ये आरामासाठी थांबतात. यावेळी संशोधकांनी त्यांना सॅटेलाईट टॅग लावले होते. गेल्या चार वर्षांपासून संशोधक या पक्ष्यांच्या स्थलांतर मार्गाचा बारकाईने अभ्यास करत आहेत. यामधील 'लाॅंगलेंग' नामक मादी पक्षी गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात हिवाळी स्थलांतरासाठी दक्षिण आफ्रिकेत दाखल झाली होती. हंगाम संपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेतून १७ मार्च 'लाॅंगलेग' सोमालियामध्ये दाखल झाली आणि २० मार्च रोजी तिने भारताच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू केल्याची माहिती 'डब्लूआयआय'चे संशोधक आर. सुरेश कुमार यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. भारतात दाखल होण्यासाठी तिने सतत पाच दिवस न थांबता अरबी समुद्रावरुन उड्डाण केले. गेल्या गुरुवारी, २३ एप्रिल रोजी ती मुंबईत दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले. या दरम्यान तिचा उडण्याचा वेग प्रतितास ४५ किमी होता. गेल्या चार वर्षांमध्ये साधारण १७५ ग्रॅमच्या 'लाॅंगलेंग'ने आठ वेळा अरबी समुद्रावरुन सुखरुपरित्या उड्डाण केले आहे.
 
 
 
 
 
मुंबईत दाखल झाल्यानंतर तिचा दक्षिण भारताच्या दिशेने प्रवास सुरू असून सध्या ती तामिळनाडूमधील कोली पर्वतरांगेत असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही टॅग केलेले इतर सर्व ससाणे हे आफ्रिकेमधून मुंबईत किंवा गुजरातमध्ये दाखल झाल्यावर सरळमार्गे ईशान्य भारतातील राज्यांमध्ये येऊन उत्तर चीनमध्ये जातात. मात्र, गेल्या तीन वर्षांमध्ये 'लाॅंगलेंग' दक्षिण भारतात जाऊन त्यानंतर उत्तर चीनच्या दिशेेने प्रवास करत असल्याची नोंद आम्ही केल्याचे, कुमार म्हणाले. म्हणजे गेल्या तीन वर्षांमध्ये तिच्या परतीच्या स्थलांतराचा मार्ग सारखाच असल्याचे संशोधकांच्यान निदर्शनास आले आहे. २०१६ मध्ये 'लाॅंगलेंग'ला नागालॅण्डमध्ये टॅग करण्यात आले होते. ईशान्य भारतातील देशांमध्ये स्थलांतर करणाऱ्या ससाण्यांची मोठ्या प्रमाणात शिकार  होत असे. त्यामुळे शिकार रोखण्याबरोबर लोकांमध्ये जनजागृती आणण्यासाठी हा सॅटेलाईट टॅग प्रकल्प राबविण्यात आला आणि स्थानिकांना या पक्ष्यांविषयी आपुलकी निर्माण करण्यासाठी टॅग केेलेल्या पक्ष्यांना स्थानिक गावांची नावे देण्यात आली. आर. सुरेश कुमार आणि त्यांची टीम 'लाॅंगलेंग' व्यक्तिरिक्त आफ्रिकेतून भारतात परतणाऱ्या इतर तीन ससण्यांच्या प्रवासावर लक्ष ठेवून आहेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@