मुंबई : संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या हिंदू साधूंच्या हत्याकांडातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करतानाच कासा परिसरातील जनजाती समाजाला भडकावून त्यांना हिंसेसाठी प्रवृत्त करणाऱ्या डाव्या व ख्रिश्चन विचारांच्या विविध संघटनांची सखोल चौकशी करण्याची मागणी वनवासी कल्याण आश्रमाने केली आहे.
पालघर जिल्ह्यातील साधूंच्या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर वनवासी कल्याण आश्रमाने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्या निवेदनात म्हटले आहे की, सनातन -हिंदू धर्माच्या विकास व संवर्धनात साधू परंपरेचे खूप मोठे योगदान आहे. समाजासाठी सर्वसंगपरित्याग करणाऱ्या साधू परंपरेतील लाखो साधुसंतांनी हा देश एकसंघ ठेवण्यात मोठी भूमिका बजावली आहे मात्र याच परंपरेतील दोन साधूंची व त्यांच्या सोबत असलेल्या वाहन चालकाचीअत्यंत निर्घृणपणे हत्या करून पालघर जिल्ह्यातील गडचिंचले ग्रामस्थांनी क्रूरतेचा कळस गाठलाआहे. या घटनेचा वनवासी कल्याण आश्रम तीव्र शब्दात धिक्कार करीत आहे. साधूंच्या हत्याकांडाची दुर्दैवी घटना जरी अचानक घडली असली तरीदेखील त्यामागे डाव्या व ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या चिथावणीखोर व फुटीरवादी कार्याचा खूप मोठा हात आहे असा वनवासी कल्याण आश्रमाला वाटते. गेल्या कित्येक वर्षांपासून डहाणू तालुक्यातील कासा परिसरात डाव्या विचारांच्या संघटना तसेच ख्रिश्चन मिशनऱ्यांचे प्रभावी काम आहे. या विचारांच्या संघटनांनी विविध एनजीओच्या माध्यमातून या परिसरातील भोळ्याभाबड्या जनजाती बांधवांना भडकावण्याचे काम सातत्याने केले आहे. जनजाती समाजाचे धर्मांतर करण्यासोबतच त्यांच्यामध्ये हिंदू धर्म,परंपरा,संस्कृती रीती -रिवाज,सण -उत्सव याबाबत एक घृणतेची भावना या सगळ्या संघटनांनी निर्माण केली आहे. गेली अनेक वर्षे सातत्याने केलेल्या या प्रचाराचा परिणाम साधूंच्या हत्याकांडात झाल्याचे कल्याण आश्रमाचे म्हणणे आहे.
या प्रकरणी अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे कम्युनिस्ट पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते असल्याने त्यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे ती म्हणजे कम्युनिस्ट व ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून जनजाति समाजाला चिथावणी देणाऱ्या व हिंसेला प्रवृत्त करणाऱ्या कारवाया याच कारणांमुळे साधूंची हत्या करण्यात आली. या प्रकरणात आणखी खूप आरोपी बाहेर मोकाट असून जे या घटनेत प्रत्यक्ष सहभागी झाले नसले तरी हिंदू धर्माच्या विरोधात ज्यांनी सातत्याने जनजाति बांधवांमध्ये फुटीरतेची बीजे रोवली अशा सर्व संघटना तसेच त्यांच्या नेत्यांची व प्रमुख कार्यकर्त्यांची रीतसर चौकशी करण्याची मागणी देखील वनवासी कल्याण आश्रम करीत आहे. 'अतिथी देवो भव' ही जनजाती परंपरा असून देशभरातील ११ कोटी समाज या संस्काराचे आजही शब्दश: पालन करीत आहे.असा संस्कारशील समाज साधूंची हत्या करण्यास प्रवृत्त होईल यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. मात्र देशाच्या काही भागात कम्युनिस्ट व ख्रिश्चन मिशनऱ्यांनी हे सनातन हिंदू संस्कार नष्ट करण्याचे प्रयत्न चालवले असून अशा प्रयत्नांना थारा न देता या सर्व फुटीरवादी संघटनांना जनजाति समाजाने एकजुटीने विरोध करावा. तसेच सर्व संवेदनशील नागरिकांनी देखील या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करावा असे आवाहनही वनवासी कल्याण आश्रमाने केले आहे. जनजाती समाज हा सनातन हिंदू धर्माचे अभिन्न अंग असल्याने आपल्या सनातन परंपरा, देव-देवता सण-उत्सव,साधुसंत तसेच सर्व हिंदू प्रतीकांचा जनजाती समाज यापुढेही सन्मान करीत राहील, अशी खात्री देखील वनवासी कल्याण आश्रमाने व्यक्त केली आहे. या निवेदनावर वनवासी कल्याण आश्रमाच्या कोकण प्रांताध्यक्षा सौ ठमाताई पवार, देवगिरी प्रांताचे अध्यक्ष श्री. चैत्राम पवार, विदर्भ प्रांताचे अध्यक्ष श्री. विनायकराव इरपाते, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष डॉ. भरत केळकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत