कर्नल माईक होअर - सी.ए. की पेंढारी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
mad mike_1  H x


१९६१ ते १९६५ या कालखंडात काँगोमध्ये माईक होअरने गव्हेरा आणि त्यांच्या साम्यवादी ‘सिंबा’ बंडखोरांना असा काही चोप दिला की, सगळं जग थक्क झालं. माईकला ‘मॅड माईक’ हे टोपणनाव याच काळात लष्करी तज्ज्ञांनी आणि पत्रकारांनी दिलं.


आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडच्या एका नवस्वतंत्र देशात बंड होतं. जनरल नदोफा हा लष्करी अधिकारी ज्युलियस लिंबानी या राष्ट्राध्यक्षाला कैद करून सत्ता हडप करतो. यामागे आफ्रिकेतल्या टोळीवाल्यांची जुनी हाडवैरं असतात. जनरल नदोफाची टोळी लिंबानीच्या टोळीपेक्षा अधिक आक्रमक आणि लढाऊ असते. लवकरच नदोफा लिंबानीला ठार मारणार असतो.


इकडे लंडनमध्ये वेगळंच नाटक सुरू होतं. आफ्रिकी देशांच्या खनिज संपत्तीवर डोळा ठेवून असलेला सर एडवर्ड हा फार मोठा मर्चंट बँकर, कर्नल अ‍ॅलन फॉकनर याला सुपारी देतो. फॉकनरने नदोफाच्या तुरुंगावर धाड घालून लिंबानीला सोडावायचं. त्याच्या टोळीकडे त्याला सुपूर्द करायचं आणि मग त्या टोळीने नदोफाच्या टोळीविरुद्ध पुन्हा बंड करायचं, अशी ही सुपारी असते.


कर्नल फॉकनर आणि त्याची ५० लढवय्यांची तुकडी मोठ्या हिकमतीने लिंबानीची सुटका करून, त्याला त्याच्या गावी आणते, पण लिंबानीची माणसं अगदीच पेद्रू असतात. नदोफाच्या टोळीविरुद्ध बंड करण्याएवढे त्राणच त्यांच्यात नसतात. आता काय करायचं? लिंबानीला घेऊन लंडन गाठायचं, पण बदनाम सर एडवर्डने त्यांचे खाणीचे अधिकार पदरातपाडून घेऊन सर एडवर्ड हा लिंबानी आणि त्याच्यासह कर्नल फॉकनरलाही वार्‍यावर सोडून देतो. आपण पूर्णपणे फसलोत आणि आता जनरल नदोफाच्या टोळीवाल्यांकडून ठार होणं, हेच आपल्या नशिबी आहे हे लिंबानी, फॉकनर आणि त्याच्या ५० माणसांना समजून चुकतं. पण, ते जातिवंत लढवय्ये असतात. कमालीच्या हिकमतीने आणि हिंमतीने ते एक डाकोटा विमान पळवतात आणि लंडनकडे सुटतात. ५० पैकी फक्त १३ जणं जीवंत परततात. ज्याच्या सुटकेसाठी एवढा अट्टाहास केला, तो पदच्युत राष्ट्राध्यक्ष लिंबानीदेखील मरतो. कर्नल फॉकनर सर एडवर्डच्या आलिशान प्रासादात घुसतो. आपल्या मृत सहकार्‍यांच्या कुटुंबीयांसाठी त्याच्याकडून जबर शुल्क वसूल करतो आणि अखेर दगलबाजी केल्याबद्दल त्याला ठार मारतो.


१९७८ साली पडद्यावर आलेल्या ‘दि वाईल्ड गीज’ या चित्रपटाची ही कथा आहे. यात कर्नल अलन फॉकनर ही भूमिका सर रिचर्ड बर्टन या विख्यात ब्रिटिश अभिनेत्याने केली होती. रॉजर मूर, रिचर्ड हॅरिस आणि हार्डी कू्रगर हे अन्य लोकप्रिय अभिनेते त्याच्या साहाय्यकांच्या भूमिकांमध्ये होते. सर एडवर्ड या खलनायकाच्या भूमिकेत होता ज्येष्ठ अभिनेता जेम्स मेसन.


हे सगळं तपशीलाने सांगण्याचं कारण म्हणजे या चित्रपटाची कथा बरीचशी खरी होती आणि नायक कर्नल फॉकनर याची व्यक्तिरेखाही एका खर्‍या व्यक्तीवरून बेतण्यात आली होती. त्या खर्‍या व्यक्तीचं नाव होतं कर्नल टॉमस माईक होअर उर्फ ‘मॅड माईक.’ गंमत म्हणजे, हा चित्रपट बनवला जात असताना त्यावर देखरेख करायला ‘मॅड माईक’ तिथे जातीने हजर होता.


माईकचा जन्म कोलकात्याचा (तत्कालीन कलकत्ता किंवा इंग्रजांच्या उच्चारानुसार ‘खॅलखॅटा.’) आपल्या दृष्टीने सगळेच इंग्रज सारखे असले तरी माईक होअर हा आयरिश म्हणजे आयर्लंडचा म्हणजे कॅथलिक होता. इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्स या ब्रिटनमधल्या अन्य प्रांतांचे लोक हे प्रोटेस्टंट असतात. पंथभेदामुळे याचं आपसात अजिबात जमत नाही.


इथे मुद्दाम आठवण द्यायला हवी की, अंदमानच्या सेल्युलर जेलचा सर्वेसर्वा जेम्स बारी, ज्यांचं वर्णन वीर सावरकरांनी ‘बारी बाबा’ या शब्दांत केलं आहे. तो आयरिश होता. एकदा तो सावरकरांना हिंदूंमधल्या जातीभेदावरून प्रवचन देऊ लागला. तेव्हा सावरकरांनी त्याला कॅथलिक आणि प्रोटेस्टंट यांच्यात पंथभेदांमुळे कशी भीषण रक्तपाती युद्ध झाली आहेत, हे ऐकवून त्याचं थोबाड बंद केलं होतं.


असो. तर माईक होअर कोलकत्यात जन्मला. त्याचा बाप हुगळी नदीत बोट चालवायचा. माईकचं सगळं शिक्षण मात्र इंग्लंडमध्ये झालं. तो ऐन विशीत शिरला आणि दुसरं महायुद्ध सुरू झालं. माईक अर्थातच सैन्यात भरती झाला. ‘लंडन आयरिश रायफल्स’ ही त्याची बटालियन ‘रॉयल आर्मड् कोअर’ या सैन्य विभागाला जोडण्यात आली. हा सैन्य विभाग जनरल विल्यम स्लिम या अतिशय कुशल सेनापतीच्या हाताखाली ब्रह्मदेशात तैनात झाला. ब्रह्मदेशात जपानी सैन्याविरुद्ध झालेल्या लढाया फार गाजलेल्या आहेत. जपानी अत्यंत शूर आणि तितकेच क्रूर होते. त्यामुळे या लढाया फार कजाखी होत्या. माईक होअर सेकेंड लेफ्टनंट-लेफ्टनंट-कॅप्टन-मेजर-लेफ्टनंट कर्नल-कर्नल अशा बढतीच्या पायर्‍या वेगाने चढत गेला. अत्यंत मौल्यवान असा युद्धाचा प्रत्यक्ष अनुभव त्याने कमावला, पण अखेर युद्ध संपलं. मायदेशी परतलेल्या माईकने काय करावं? त्याने कॉमर्सची पदवी घेतली. एवढंच नव्हे, तर पुढे जात तो चक्क चार्टड अकाऊंटंट बनला.


पुढे तो ब्रिटनहून दक्षिण आफ्रिकेत दरबानला स्थलांतरित झाला. चार्टर्ड अकाऊंटंट म्हणून व्यवसाय सुरू होता. पण, माईकला स्वस्थ बसवत नव्हतं. त्याने जंगल सफार्‍या केल्या. केप टाऊन ते कैरो म्हणजे आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकापासून उत्तर टोकापर्यंत धाडसी प्रवास फरफटीवरून केला. कॅलहारी वाळवंटात अदृश्य झालेलं कॅलहारी हे प्राचीन शहर शोधून काढण्याचा उद्योग करून पाहिला. अखेर त्याने खाजगी सैन्य उभारलं. त्या सैन्याच्या गणवेशाच्या खांद्यावर बोधचिन्ह होतं- रानटी बदक किंवा वाईल्ड गूज.


गूज म्हणजे मोठं बदक. ‘गीज’ हे ‘गूज’ शब्दाचं अनेकवचन. रानटी बदक या पक्ष्याला बायबलचा संदर्भ आहे. आपल्या पुराणकथांमध्ये जसे गरूड, घुबड, श्येन, कपोत, गृध्र किंवा अगदी कावळा इत्यादी ग्रंथांना विशिष्ट शुभाशुभ संदर्भ, संकेत आहेत. तसेच बायबलमध्ये ‘वाईल्ड गूज’ या पक्ष्याला विशिष्ट संदर्भ आहेत. सतराव्या शतकात युरोपात कॅथलिक आणि प्रोटेस्टंट पंथीयांमध्ये अनेक लढाया झाल्या. त्यात इंग्लंड हा प्रोटेस्टंटांचा, तर फ्रान्स हा कॅथलिकांचा म्होरक्या होता आणि ‘दि वाईल्ड गीज’ हे बायबलशी संबंधित नाव धारण करणारा आयरिश कॅथलिक सैनिकांचा एक गट त्यात फ्रान्सच्या बाजूने उतरला होता. माईल्ड होअरच्या खांद्यावरच्या राजबदकांच्या बोधचिन्हाला एवढा खोल अर्थ होता. माईकने आपल्या खासगी सैन्याला नाव मात्र एकदम अत्याधुनिक दिले ‘फाईव्ह कमांडो.’


१९६१ साली ‘फाईव्ह कमांडो’ला काँगो या मध्य आफ्रिकन नवस्वतंत्र देशाचा राष्ट्राध्यक्ष मोझे शोंबे याने पाचारण केलं. कम्युनिस्टांच्या ‘क्रांतीची निर्यात’ म्हणजे देशोदेशींची लोकशाही सरकारं क्रांती करून पाडायची नि तिथे कुणीतरी साम्यवादी हुकुमशहा बसवायचा, या महत्त्वाकांक्षी योजनेनुसार काँगोत क्रांती झाली होती. क्युबा देशाचा सु (की, कु) प्रसिद्ध हुकुमशहा फिडेल कॅस्ट्रो याचा दोस्त अर्नेस्ट चे गव्हेरा हा काँगोलीज साम्यवादी बंडवाल्यांना मार्गदर्शन करीत होता. ५०-६०च्या दशकांमध्ये गव्हेरा हा फारच प्रसिद्ध गनिमी लढवय्या होता. आपल्याकडची बुजगावणी कम्युनिस्टसुद्धा चे गव्हेरासारखी क्रांती भरतात (पक्षी : भार्तात) घडवून आणण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून होती. चे गव्हेराप्रमाणे भला मोठा हॅवाना सिमार फुंकण्याची ऐपत खिशात आणि छातीतही नसल्यामुळे बिचारी चारमिनार किंवा पिवळा हत्ती सिगरेटी फुंकीत क्रांतीची स्वप्नं पाहायची.


असो, तर काँगोचा राष्ट्राध्यक्ष शोंबे याने माईक होअरला चे गव्हेराचा मुकाबला करण्याची सुपारी दिली. १९६१ ते १९६५ या कालखंडात काँगोमध्ये माईक होअरने गव्हेरा आणि त्यांच्या साम्यवादी ‘सिंबा’ बंडखोरांना असा काही चोप दिला की, सगळं जग थक्क झालं. माईकला ‘मॅड माईक’ हे टोपणनाव याच काळात लष्करी तज्ज्ञांनी आणि पत्रकारांनी दिलं. स्वतः माईक आपल्या या कामगिरीबद्दल लिहितो की, “मी काँगोला कम्युनिझम या प्राणघातक कर्करोगापासून वाचवलं, याचा मला मोठा आनंद आहे.”


पुढे १९७८ साली याच कथेवर आधारित ‘दि वाईल्ड गीज’ चित्रपट आला. तो गाजला. पण खरी कथा इथे संपत नाही. १९८१ साली माईकच्या खाजगी सैन्याला म्हणजेच भारतीय भाषेत पेंढारी किंवा भाडोत्री सैन्याला सेशल्स देशाचा पदच्युत राष्ट्राध्यक्ष जेम्स मॅनशॅम याने सुपारी दिली. बंडखोरांचा पुढारी फ्रान्स अल्बर्ट रेने याच्याविरुद्ध प्रतिक्रांती करायची आणि मॅनशॅमला पुन्हा सत्ता मिळवून द्यायची.


माईक होअर आणि त्याचा चमू खेळण्यांच्या बॅगांच्या छुप्या तळांमध्ये ‘एके-४७’ रायफल्स दडवून सेशल्सची राजधानी माहे इथल्या विमानतळावर उतरला. पण, रेनेची माणसं सावध झाली. दोन्हीकडून जोरदार गोळीबार सुरू झाला. बंड फसलं. आता काय करणार? तेवढ्यात हरारेकडून मुंबईकडे निघालेलं ‘एअर इंडिया’चं एक बोईंग विमान माहे विमानतळावर इंधन भरण्यासाठी उतरलं. माईकने बंदुकीच्या धाकावर ते ताब्यात घेतलं. माईकची माणसं भराभर विमानात शिरली आणि ते दक्षिण आफ्रिकेकडे वळवण्यात आलं. भर समुद्रावर आल्यावर माईकने विमानचालक कॅप्टन उमेश सक्सेना यांना फर्मावलं, “विमानाचं एक दार उघडा. मला ही हत्यारं समुद्रात टाकून पुरावा नष्ट करायचाय.” कॅप्टन सक्सेनांना त्या स्थितीतसुद्धा हसू आवरेना. ते म्हणाले, “साहेब, हे तुमचं दुसर्‍या महायुद्धातलं डाकोटा विमान नाही. हे ‘एअरटाईट बोईंग ७७७’ विमान आहे. दार उघडलं तर हवेच्या दाबाने आपण सगळे कागदासारखे चुरगळून, समुद्रात भिरकावले जाऊ.”


असो. दक्षिण आफ्रिकेत माईकसकट सगळ्यांवर रीतसर खटला झाला आणि सगळ्यांना कमी-अधिक शिक्षा झाल्या. माईकला त्याचं काहीच वाटलं नाही. त्याला दुःख झालं ते लंडनच्या चार्टर्ड अकाऊंटंट असोसिएशनने त्याचं प्रमाणपत्र रद्द केलं याचं. तर असा हा कर्नल माईक होअर परवा २ फेब्रुवारी २०२० रोजी वयाच्या १००व्या वर्षी मरण पावला.


@@AUTHORINFO_V1@@