रानवेडा ‘मृगांक’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2020   
Total Views |
mrugank prabhu_1 &nb





काही माणसांना चाकोरीबद्ध जीवन जगण्यात अजिबात रस नसतो. त्यांची रमण्याची एक जागा असते. या जागेत रमून ते जगासाठी महत्त्वाचे काम करत असतात. अशा प्रकारे प्राणिशास्त्रात रमलेल्या मृगांक प्रभूविषयी...

या माणसाच्या पायाला जंगलाची ओढ. साचेबद्ध नोकरी किंवा व्यवसाय करण्यामध्ये त्याला मुळात रसच नव्हता. म्हणून तो रानवाटांवर रमला. तेथील जीवांशी त्याने गट्टी केली. उभयचर त्याचे सोबती झाले. त्यांच्या शोधार्थ त्याने पश्चिम घाट पालथा घातला. पश्चिम घाटामधील या प्रवासात त्याने बेडकांच्या नऊ नव्या प्रजातींचा शोध लावला. सध्या तो पर्यावरण क्षेत्रात प्रतिष्ठित असलेल्या ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’मध्ये (बीएनएचएस) शास्त्रज्ञ म्हणून काम करत आहे. संस्थेसोबतच्या या प्रवासात त्याने पर्यावरणीय परिणाम जाणून घेणार्‍या विविध प्रकल्पांमध्ये काम तर केलेच आहे; शिवाय पक्ष्यांचे स्थलांतर जाणून घेण्यासाठी सुमारे ८ ते १० हजार पक्ष्यांना त्याने ’रिंग’ (कडी) बसवली आहे. दिलेल्या कामाप्रति प्रामाणिक असलेला हा रानवेडा माणूस म्हणजे मृगांक प्रभू.


कोल्हापूरमधील आपल्या मावशीच्या गावी मृगांकचा दि. १० सप्टेंबर, १९८६ साली जन्म झाला. त्याच्या बालपणाचा काही काळ कोल्हापूरमध्येच गेला. त्याचे वडील पोलीस खात्यात नोकरीला होते. त्यामुळे त्यांच्या बदलीनुसार या कुटुंबाचेही आपसुकच स्थलांतर व्हायचे. सिंधुदुर्गातील सावंतवाडीत मृगांकचे पहिली इयत्तेपर्यंत शिक्षण झाल्यानंतर हे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. डोंबिवली आणि बदलापूरमध्ये त्याने प्राथमिक-माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. सिंधुदुर्गातील बालपणामुळे त्याला निसर्गाची गोडी लागली होती. गावतल्या गुरा-ढोरांमध्ये, पक्ष्यांच्या चिवचिवाटामध्ये तो रममाण व्हायचा. निसर्गाप्रति मनात असलेल्या याच आवडीचे रुपांतर पुढे महाविद्यालयीन शिक्षणामध्ये झाले. उल्हासनगरमधील आर. के. तलरेजा महाविद्यालयातून त्याने बीएस्सी आणि एमएसस्सीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. बारावीनंतर त्याने जीवशास्त्र विषयामध्ये शिक्षण पूर्ण करावे, असा घरच्यांचा आग्रह होता. मात्र, त्याने मनोमनी प्राणिशास्त्रात शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. भविष्यात या मुलाचे प्राणिशास्त्रात ‘करिअर’ होईल का ? याबाबतची शंका त्यांच्या आईवडिलांना होती. परंतु, मृगांकला साचेबद्ध नोकरी करणे पसंत नसल्याने त्याचा निर्णय पक्का होता.


कीटकशास्त्रातून एमएसस्सीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हाताशी काही तरी काम मिळवण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी ‘ऑरकूट’च्या माध्यमामुळे बंगळुरूमधील ’अशोका ट्रस्ट’मध्ये काही महिन्यांचे ‘फिल्ड असिस्टंट’चे काम असल्याचे त्याला समजले. जंगलात फिरून काम करण्याची संधी असल्याने मृगांकने ती संधी हेरून २००९ मध्ये तो बंगळुरूला रवाना झाला. झाडांच्या गर्द झाडीत (कॅनोपी) अधिवास करणार्‍या जीवांची परिसंस्था अभ्यासण्याचे काम त्याला करायचे होते. ३० झाडांच्या केलेल्या सर्वेक्षणात मृगांकला चार ते पाच हजार कीटक सापडले. त्यांची ओळख पटवण्याचे कामही त्यानेच केले. त्याविषयी ’आंतरराष्ट्रीय कॅनोपी परिषदे’त सादरीकरण केले. यावेळी त्याला पर्यावरण क्षेत्राची व्याप्ती समजली. २०१० मध्ये तो पुन्हा मुंबईत परतला.


’इंडियन इस्टिट्यूट ऑफ सायन्स’साठी मृगांकला पश्चिम घाट पालथा घालण्याची संधी मिळाली. तीन वर्षांसाठी डांगपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या पश्चिम घाटात उभयचरांवर त्याला काम करायचे होते. २०१० साली त्याने या कामाला सुरुवात केली. पश्चिम घाटामध्ये त्याने झोकून काम केले. त्याचे फळ म्हणजे या कामादरम्यान त्याने बेडकांच्या नऊ नव्या प्रजातींचा शोध लावला. २०११ साली वडिलांच्या खालावलेल्या प्रकृतीमुळे त्याला घरी परतावे लागले. पण, दोन वर्षांचा हा काळ आयुष्यातील समृद्ध काळ असल्याचे मृगांक सांगतो. त्यानंतर त्याने वर्षभर पुण्यातील ’पर्यावरण शिक्षण केंद्रा’मध्ये निसर्ग शिक्षण क्षेत्रात काम केले.


२०१२ साली ’बीएनएचएस’चे साहाय्यक संचालक डॉ. राहुल खोत यांच्या पाठिंब्यामुळे मृगांक ’बीएनएचएस’मध्ये रुजू झाला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पर्यावरणावर होणार परिणाम तपासण्याचे काम ’बीएनएसएच’कडे होते. या प्रकल्पात तो काम करु लागला. याच दरम्यान संस्थेकडे असलेल्या ’मुंबई पोर्ट ट्रस्ट’च्या एका प्रकल्पांतर्गत त्याच्यासमोर पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाचा उलगडा झाला. ’बीपीटी’च्या या प्रकल्पांतर्गत काही स्थलांतरित पक्ष्यांना ‘रिंग’ म्हणजेच त्यांच्या पायात कडी बसविण्याचे काम करायचे होते. या कामासाठी ’बीएनएचएस’चे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ डॉ. बालचंद्रन तामिळनाडूवरून मुंबईला येणार होते. त्यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी मृगांकवर होती. बालचंद्रन यांनी दोन ते तीन दिवसांत पक्ष्यांना रिंग लावण्याचे काम केले. मात्र, मृगांकसाठी हे दिवस महत्त्वाचे होते. त्याने हे काम ‘याची देही याची डोळा’ पहिल्यांदाच पाहिले. त्यामधील बारकावे जाणून घेतले. २०१७ मध्ये ’मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’च्या (एमएमआरडीए) ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पांतर्गत पक्ष्यांना ‘रिंग’ करण्याची जबाबदारीच मृगांकवर येऊन पडली. त्याने ती स्वीकारली आणि मुंबईत स्थलांतरित पक्ष्यांना रिंग लावण्याच्या कामाला सुरुवात केली. गेल्या सात वर्षांमध्ये मृगांकने जवळपास आठ ते दहा हजार स्थलांतरित पक्ष्यांना रिंग लावण्याचे काम केले आहे. बदलापूरमध्ये त्याने मित्रांसमेवत स्थापन केलेल्या ’निसर्ग ट्रस्ट’ संस्थेमार्फत पर्यावरण जनजागृतीचे काम केले जाते. बदलापूरमध्ये ट्रस्टचे ग्रंथालय असून त्यामध्ये चार लाख पुस्तकांचा संग्रह आहे. मृगांक आपल्या कामाप्रति प्रामाणिक असल्याने त्याने यशाच्या अनेक पायर्‍या गाठल्या आहेत. त्याला पुढील वाटचालीस दै. ’मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा...!


@@AUTHORINFO_V1@@