उत्तरांच्या प्रतिक्षेतील प्रश्न!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2020   
Total Views |
delhi violence _1 &n



एक ठिणगीदेखील राजवाडा भस्मसात करू शकते. ज्यांच्याशी लढायचे आहे, ते कोण आहेत? त्यांची व्यूहरचना काय आहे? ते काय करू इच्छितात? याबद्दल त्यांची योजना कोणती? इत्यादी प्रश्नांचा थंड डोक्याने विचार करण्याची गरज असते. अशी काही योजना आहे का? तिचा विचार केला जातो का? विचार करणारी ‘थिंक टँक’ कोणती? हे प्रश्न आहेत, पण त्याची उत्तरे माहीत नाहीत.

दोन व्यक्ती भेटल्या की, एकमेकांना प्रश्न करतात की, ‘कसे आहात? कसे चालले आहे?’ ज्याला प्रश्न विचारला आहे, तो उत्तर देतो की, ‘ठीक चालले आहे.’ हाच प्रश्न देशाचा नागरिक म्हणून जर विचारला, तर ज्याला प्रश्न विचारला तो उत्तर देतो की, सर्व गोंधळ चालू आहे. प्रश्नच प्रश्न आहेत, काय होणार आहे, हे समजत नाही.


समाज म्हटला की प्रश्न आले. जगात असा एकही समाज नाही की, ज्याच्यासमोर प्रश्न नाहीत. चीनपुढे कोरोना व्हायरसचा प्रश्न आहे, अरब देशांपुढे बंडाळीचा प्रश्न आहे, इराणपुढे अमेरिकेचा प्रश्न आहे, अमेरिकेपुढे मेक्सिकन घुसखोरांचा प्रश्न आहे, अमेरिकन संविधानाचे शिल्पकार जेम्स मेडिसन म्हणतात की, “जर मनुष्यसमाज जर देवदूतांचा बनला असेल तर आणि देवदूतांचे राज्य असेल तर संविधानाची गरज नाही.” येथे संविधान म्हणजे कायदा. म्हणजे कायद्याची आवश्यकता राहणार नाही. समाज माणसांचा बनलेला असतो. मनुष्याचा स्वभाव भांडणे करीत राहणे, हा आहे. आपल्या देशाचा विचार केला तर अनेक प्रश्न पुढे येतात. दिल्लीत शाहीनबागेत मुस्लीम महिलांचे धरणे चालू आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीच्या वेळी दिल्लीत दंगा केला गेला. त्यात ५० हून जास्त लोक ठार झाले. करोडो रुपयांची संपत्ती नष्ट झाली. या दंग्याचे खापर शरद पवारांनी भाजप सरकारवर फोडले. ‘गार्डियन’सारख्या वर्तमानपत्रातून ‘हिंदूंनी दंगा केला आणि मुसलमानांना मारले,’ असा मोठा लेख आला. देशभर मुसलमान समाज अस्वस्थ झालेला आहे. त्यामुळे देश ज्वालामुखीवर बसला आहे, असे काहीजणांचे म्हणणे आहे. सोशल मीडियावरून मुसलमान कसे आक्रमक आहेत, याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. हिंदू कसे भयानक आहेत, याचेही व्हिडिओ प्रसारित झाले आहेत. हतबल पोलीस, निष्क्रिय शासन यावर भरपूर चर्चा सोशल मीडियावर चालू आहे. प्रश्नच प्रश्न आहेत, खरे उत्तर कोणते काही समजत नाही.


मुस्लीम प्रश्नाबरोबर दलित प्रश्न आहेत. देशात रोज कुठे ना कुठे दलितांवर अत्याचाराची घटना घडते. या अत्याचाराची कारणे वेगवेगळी असतात, पण त्याला जातीय रंग दिला जातो. दलित कसे असुरक्षित आहेत, यावर चर्चा सुरू होतात. शहरी नक्षलवादी या घटनांचे डॉक्युमेंटेशन करतात, व्हिडिओ काढतात आणि ते सर्वत्र फिरवतात. उद्देश असा असतो की, केंद्रातील भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून मुसलमान आणि दलित असुरक्षित झाले आहेत. त्यांनी एकत्र आले पाहिजे आणि लढा दिला पाहिजे. तीन वर्षांपूर्वी भीमा-कोरेगाववरून महाराष्ट्रात तणाव व हिंसाचार निर्माण झाला. त्या मार्गाने दलितांनी गेले पाहिजे, असे नक्षलवादी सांगतात. दलित आपल्या समाजाचे अंग आहेत. त्यांना सन्मान आणि प्रतिष्ठा सर्व समाजाने दिली पाहिजे. यादृष्टीने समाजात संघप्रेरणेतून हजारो कामे चालतात. तथापि, या प्रश्नाला जो राजकीय रंग आणि धार दिली जाते, त्याला राजकीय उत्तर काय? ते कुणी द्यायचे? तो देणारा सशक्त चेहरा कोणता? या प्रश्नाची उत्तरे समजत नाहीत.


पुढचा प्रश्न आहे, महिलांवरील वाढत्या अत्याचाराचा. महिलेला जिवंत जाळले, सामूहिक बलात्कार केला, तिचा खून करण्यात आला, तिच्यावर सिड फेकण्यात आले, अशा बातम्या वारंवार येत राहतात. मध्येच कुणीतरी महिलांबद्दल अनुचित उद्गार काढतो, त्यावरून रणधुमाळी सुरू होते. मुस्लीम आणि दलित यांच्याप्रमाणे महिलादेखील असुरक्षित आहेत, असा जोरदार प्रचार चालू राहतो. या प्रचाराचे हे राजकीय टोक झाले. त्याचा हेतू भाजप सरकार आणि ज्या हिंदुत्वाच्या विचारधारेवर शासन चालते, हे सर्व मुस्लीम, दलित आणि महिला यांच्या विरोधात आहे. महिलांवर अत्याचार होतात. ते कालही होत होते, आजही होतात, उद्या होणार नाहीत, याची शाश्वती कुणी देऊ शकत नाही. हा प्रश्न समाजाच्या मानसिकतेशी, नैतिकतेशी जोडलेला आहे. त्याचा संबंध कुणाचे सरकार अधिकारावर आहे, याच्याशी नाही. राजकीय पोळी भाजण्यासाठी या घटनांचा उपयोग होतो. त्याला राजकीय उत्तर कोणते? ते कोणी द्यायचे? ते देणारे सशक्त चेहरे कोणते? अपप्रचाराला योग्य उत्तरे देण्याची तयारी असते का? ती कशी करायची असते? या प्रश्नांचीदेखील उत्तरे माहीत नाहीत.


यानंतरचा प्रश्न येतो रोजगाराचा. देशाचा विकास होत आहे. घरोघरी गॅस पोहोचविण्याचे काम चालू आहे. रस्तेबांधणी चालू आहे. शहरांच्या पायाभूत सुविधा वाढविण्याचे काम चालू आहे आणि त्याच वेळी सुशिक्षित बेकारांची संख्याही वाढत चालली आहे. तंत्रज्ञान बदलत राहते. जुन्या नोकर्‍या जातात, नवीन नोकर्‍या उपलब्ध होतात. नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्याची योजना कोणती? ती सहज उपलब्ध होते का? पुढच्या दहा वर्षांत कोणते नवीन रोजगार उपलब्ध होणार आहेत? त्यासाठी कशा प्रकारचे शिक्षण अपेक्षित आहे? ते कुठे उपलब्ध होतील? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे राज्यसत्तेने शोधायची असतात. उत्तरे शोधण्याची जी कामे चालू आहेत, त्याचा प्रचार होतो का? तो कोण करतो? या प्रश्नांची उत्तरेदेखील माहीत नाहीत.


असे अनेक प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नांची त्याच्या त्याच्या स्वरूपाप्रमाणे रूपे अनेक आहेत. मुस्लिमांचा प्रश्न धार्मिक समरसतेचा आहे. दलितांचा प्रश्न सामाजिक समरसतेचा आहे. महिलांचा प्रश्न सामाजिक सन्मान आणि सुरक्षिततेचा आहे. या संदर्भात संघप्रेरणेतून देशात प्रचंड काम चालू असते. ते चालू असल्यामुळे हे प्रश्न प्रचंड भडका निर्माण करणारे होत नाहीत, परंतु या सर्व प्रश्नांना राजकीय कंगोरे आहेत, त्यांना राजकीय अंग आहे. राजकीय अंगाला राजकीय अंगानेच उत्तर द्यावे लागते.


अनेक विरोधी राजकीय नेते धूर्तपणे आणि कुटील राजकीय नीतीचे डाव खेळून भाजपची आणि भाजप विचारधारेची विश्वासार्हता संपविण्याच्या मागे आहेत. त्यांना कमी लेखण्याचे किंवा दुर्बळ समजण्याचे धोरण घातक आहे. एक ठिणगीदेखील राजवाडा भस्मसात करू शकते. ज्यांच्याशी लढायचे आहे, ते कोण आहेत? त्यांची व्यूहरचना काय आहे? ते काय करू इच्छितात? याबद्दल त्यांची योजना कोणती? इत्यादी प्रश्नांचा थंड डोक्याने विचार करण्याची गरज असते. अशी काही योजना आहे का? तिचा विचार केला जातो का? विचार करणारी ‘थिंक टँक’ कोणती? हे प्रश्न आहेत, पण त्याची उत्तरे माहीत नाहीत. प्रश्न गंभीर आहेत आणि आम्ही सर्व त्यांच्या समर्पक उत्तरांच्या प्रतिक्षेत आहोत. यथावकाश उत्तरे मिळतील का?
@@AUTHORINFO_V1@@