प्रा. डॉ. कर्नल केन अलिबेक आणि बायोप्रिपरेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
dr_1  H x W: 0


डिसेंबर १९९२ मध्ये डॉ. अलिबेकने अमेरिकेत राजकीय आश्रय घेतला आणि ‘बायोप्रिपरेट’ या नावाचा अमानुष प्रकल्प अमेरिकेसह सगळ्या जगासमोर उघड झाला. डॉ. अलिबेकने या विषयावर पुस्तकच लिहिलं.


त्याचं खरं नाव आहे कनतजहान बैजकुली अली बेग. त्याच्या मायबोली ‘कझाकी’ भाषेनुसार या नावाचा उच्चार होतो, ‘कनतझान बाईझकुली अलिबेकोव्ह. पूर्वायुष्यात याच नावाने तो जास्त प्रसिद्ध होता - डॉ. कर्नल अलिबेकोव्ह. पण, १९९१ मध्ये सोव्हिएत संघ कोसळला. तेव्हा त्याने सैन्यातून निवृत्ती घेतली आणि ‘बायोप्रिपरेट’चाही राजीनामा दिला. १९९२ मध्ये तो सरळ अमेरिकेत आला. त्याने अमेरिकेत राजकीय आश्रय घेतला आणि पाश्चिमात्त्य पद्धतीचे नाव घेतलं डॉ. केनेथ किंवा केन अलिबेक.


एक कोरोना व्हायरस बाहेर पडलाय, तर अवघी मानवजात हादरून गेलीय. जगभर हाहाकार माजलाय. ‘बायोप्रिपरेट’ या सोव्हिएत रशियाच्या महत्त्वाकांक्षी जैवयुद्ध कार्यक्रमात एकंदर अकरा प्राणघातक रोगांचे विषाणू बनवणं चालू होतं. रशियन प्रदेशात त्यातही मुख्यतः युरोपियन रशियन प्रदेशात एकंदर १८ ठिकाणी ‘बायोप्रिपरेट’च्या प्रयोगशाळा आणि कारखाने सुरू होते. विविध रोगांवर संशोधन करणं, त्यांना प्रतिबंधक अशा लसी तयार करणं, प्रतिजैविक औषधं तयार करणं, असं वरकरणी अत्यंत सोज्ज्वळ रूप या कारखान्यांना देण्यात आलं होतं. हे कारखाने नागरी स्वरुपाचे आहेत आणि मानवी तसेच कृषिविषयक रोग व त्यावरील प्रतिबंधक औषधांचं उत्पादन इथे चालतं, अशी सर्वसामान्य रशियन जनतेची आणि जगाचीही समजूत होती. या १८ कारखान्यांमध्ये मिळून तब्बल ३० हजार लोक कार्यरत होते. आपले कारखाने नागरी स्वरुपाचे असले, तरी आपले सगळे वरिष्ठ अधिकारी हे रशियन लष्करातले लोक असतात, एवढंच त्यांना माहिती होतं. आपल्या प्रयोगशाळांनी शत्रू सैन्यावर किंवा शत्रू देशावर वापरण्यासाठी ११ प्राणघातक रोगांचे विषाणू बनवण्यात यश मिळवलंय, याचा त्यांना पत्ताही नव्हता. ब्युबॉनिक प्लेग, देवी, अ‍ॅन्थ्रॅक्स, एन्सेफलायटिस, ट्युलारेमिया, स्पॅनिश फ्लू, कुसेलॉसिस, मारबर्ग व्हायरस, माचुपो व्हायरस, व्हीपॉक्स आणि एबोलापॉक्स हे ते ११ विषाणू होतं. विषाणू बनवण्यात यश मिळवणे, याचा अर्थ विषाणूंची कृत्रिमरित्या निर्मिती करणे, प्रयोगशाळेबाहेर नैसर्गिक वातावरणात त्यांचा नाश न होता, उलट प्रसार, फैलाव होणे आणि बॉम्बमध्ये ते भरून क्षेपणास्त्रे किंवा अन्य शस्त्रांमार्फत ते शत्रू सैन्यावर वा शत्रू प्रदेशावर फेकता येणे.


यापैकी देवी, प्लेग आणि फ्लू हे आपणा भारतीयांच्या परिचयाचे आहेत. १०० वर्षांपूर्वीच्या काळात भारतात माणसाला देवी येणं, हे सर्रास होतं. १८९६ साली भारतात ब्युबॉनिक प्लेगची साथ आली. ही १९१७ सालपर्यंत मधूनमधून चालूच होती. या कालखंडात भारतात ९८ लाख लोक प्लेगला बळी पडले. प्लेग प्रतिबंधासाठी लोकांवर जुलूम केले म्हणून इंग्रज अधिकारी रॅन्ड याला चाफेकर बंधूंनी पुण्याच्या गणेशखिंडीत उडवला होता. ‘फ्लू’ किंवा ‘फ्ल्यू’ किंवा ‘इन्फुएंझा’ या रोगाची साथ भारतात १९१८ ते १९२० या काळात आली होती आणि तिच्यात किमान सव्वा कोटी लोक मेले. या दोन्ही साथींच्या वेळी भारतावर इंग्रजांचं राज्य होतं. त्यामुळे बळींचे आकडे इंग्रजांनी दिलेले आहेत. म्हणजेच खरी संख्या त्याहून मोठीच असणार.


असो, तर हे दाखले एवढ्याचसाठी दिले की, त्यावेळी या साथी निसर्गतःच फैलावल्या होत्या. त्यात नुसत्या भारतातच इतकी प्राणहानी झाली. आता जर कुणी मुद्दाम सर्वत्र अशा विषाणूंची फवारणी केली, तर काय होईल, कल्पना करून पाहा.


नुसत्या कल्पनेनेही आपण हादरून जाऊ. पण १९१४ ते १९१८ आणि १९३९ ते १९४५ अशा काळात झालेल्या अनुक्रमे पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धात उभय प्रतिस्पर्धी पक्षांचे शास्त्रज्ञ अशा जैविक युद्धाची तयारी करत होते. असं युद्ध आगामी काळात झालंच तर ते अणुबॉम्ब किंवा हायड्रोजन बॉम्बपेक्षाही भयानक असेल हे ओळखून जगभरच्या ११९ देशांनी एकत्र येऊन ‘जैविकशस्त्रात्र बंदी करार’ या नावाचा एक करार १९७२ साली केला. या करारान्वये जैविक शस्त्रांचा वापर करणेच नव्हे, तर जैविक शस्त्रे विकसित करणेही बंद करणे बंधनकारक होते. सोव्हिएत रशियानेही या करारावर सही केली होती.


पण, ही गोष्ट युरी ओव्हचिनिकोव्ह या रशियन शास्त्रज्ञाला पसंत पडली नाही. ओव्हचिनिकोव्ह हा ‘सोव्हिएत अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्स’ चा प्रमुख संचालक होता. ही संस्था रशियातली सर्वोच्च विज्ञान संस्था होती. ओव्हचिनिकोव्ह स्वतः अत्यंत बुद्धिमान असा बायोऑर्गोनिक केमिस्ट होता. ‘मॉलिक्युलर बायोलॉजी’ आणि ‘जेनेटिक्स’ या दोन विज्ञान शाखांचा मिलाफ करून जैविक शस्त्रात्रे बनवण्याचे प्रयोग तो स्वतःच करत होता. शिवाय तो सोव्हिएत राजकीय क्षेत्रातल्या सर्वोच्च अशा कम्युनिस्ट पक्ष केंद्रीय समितीचा सभासद होता. म्हणजेच ओव्हचिनिकोव्ह पहिल्या प्रतीचा वैज्ञानिकही होता आणि सत्तेच्या सर्वोच्च वर्तुळात वावरणारा वजनदार राजकीय कार्यकर्ताही होता.


युरी ओव्हचिनिकोव्हने सोव्हिएत राष्ट्राध्यक्ष लिओनिद ब्रेझनेव्ह यांना पटवलं की, भले आपण जैविक शस्त्रास्त्र बंदी करारावर सही केली असेल, पण आपण जैविक शस्त्रास्त्रांचं संशोधन आणि विकसन (रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलमेंट) चालू ठेवलं पाहिजे. यातूनच १९७३ साली ‘बायोप्रिपरेट’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम प्रकट झाला.


आता आपण थोडं डॉ. केन अलिबेककडे पाहूया. मध्य आशियात कझाकस्तान, किरगिजीस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि ताजिकिस्तान असे पाच देश आहेत. आधुनिक मानववंशशास्त्रानुसार तुर्क हा एक वंश आहे. त्या तुर्कांची ही मूळ भूमी. कझाकस्तान हा या सगळ्यांमध्ये मोठा देश. त्याच्या सरहद्दी रशिया, मंगोलिया आणि चीन अशा तिघांनाही भिडलेल्या आहेत. प्राचीन काळी भारतावर आक्रमण करणारी ‘शक’ नावाची जमात साधारणपणे याच प्रदेशातली. रशियन झार सम्राटांचं या प्रदेशावर बारीक लक्ष होतं. कझाकस्तान-उझबेकिस्तान-अफगाणिस्तानमार्गे पलीकडे इराणकडून नि दुसरीकडे भारतातल्या सिंध प्रांतातून हिंदी महासागरापर्यंत पोहोचण्याचं झार लोकांचं भव्य स्वप्न होतं. १९१७ साली कम्युनिस्ट क्रांतीमुळे झारशाहीच संपली. पण, नवे सोव्हिएत सत्ताधीश झारांपेक्षाही सत्तालालची होते. त्यांनी १९२० सालीच कझाकस्तान जिंकला. पुढे १९३६ साली ‘कझाक सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक’ या नावाने ‘कझाकस्तान सोव्हिएत प्रजासत्ताक’ संघाचा एक प्रांत बनला. सोव्हिएत सत्ताधारी लेनिन आणि स्टॅलिन यांनी सोव्हिएत संघातल्या प्रत्येक प्रांतात अतिशय पद्धतशीरपणे, रशियन म्हणजेच स्लाव्ह वंशाच्या नागरिकांची मोठी लोकसंख्या राहील असं पाहिलं. अगदी आजही कझाकस्तानात मूळ कझाक लोक ६५ टक्के, तर रशियन लोक २१ टक्के एवढं प्रमाण आहे.


तर अशा कझाकस्तानात कनतझान बाईझकूली अलिबेकोव्ह हा अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी ‘मिलिटरी मेडिसिन’ या वैद्यकशास्त्राच्या विशेष शाखेत शिक्षण घेत होता. म्हणजेच शिक्षण झाल्यावर तो लष्करात डॉक्टर होणार, हे नक्की होतं. पण, त्याची हुशारी सोव्हिएत लष्करी उच्चाधिकार्‍यांच्या मनात भरली. मग त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी तपासण्यात आली. त्याचे वडील, आजे, पणजे सोव्हिएत रशियन राजवटीशी एकनिष्ठ आहेत, असं आढळल्यावर त्याची नेमणूक ‘इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड बायोकेमिस्ट्री’ या प्रयोगशाळेत करण्यात आली. शेतीतल्या विविध कीटकनाशक औषधांवर संशोधन आणि त्यांचं उत्पादन असं या संस्थेचं वरकरणी काम होतं. प्रत्यक्षात मात्र ही संस्था ‘बायोप्रिपरेट’च्या १८ कारखान्यांपैकी एक होती. पण, सुरुवातीला स्वतः डॉ. अलिबेकोव्हलाही या गोष्टीचा पत्ता नव्हता. १९७९ साली सोव्हिएत रशियातल्या एकॅतरिनाबर्ग या शहरातल्या ‘बायोप्रिपरेट’च्या एका प्रयोगशाळेत अपघात झाला. अपघाताने पल्मोनरी अ‍ॅन्थ्रॅक्स या प्राणघातक रोगाचे विषाणू हवेत पसरले. हां-हां म्हणता १०५ नागरिक मेले आणि खुद्द सोव्हिएत शास्त्रज्ञांसह अख्खं जग खडबडून जागं झालं. नक्कीच सोव्हिएत रशिया जैविक शस्त्रास्त्र विकसित करतो आहे. सोव्हिएत राज्यकर्त्यांनी मात्र दडपादडपी करून वेळ मारून नेली. पण, जग समजायचं ते समजून चुकलं.


१९८५ साली गोर्बाचेव्ह सत्तारूढ झाले. त्यांनी सोव्हिएत संघ विसर्जित केला. डिसेंबर १९९१ मध्ये कझाकस्तानने आपलं स्वातंत्र्य घोषित केलं. जानेवारी १९९२ मध्ये डॉ. अलिबेकने सैन्यातल्या कर्नल पदाचा आणि ‘बायोप्रिपरेट’ प्रकल्पाचा राजीनामा दिला. यावेळी तो प्रकल्पाचा सर्वोच्च प्रमुख होता. प्रकल्पाचा दुष्ट हेतू आपल्याला पसंत नसल्यामुळे आपण राजीनामा देत आहोत, असं त्यानं म्हटलं होतं. ओव्हचिनिकोव्ह आणि केन अलिबेक यांच्यात हा फरक होता.


डिसेंबर १९९२ मध्ये डॉ. अलिबेकने अमेरिकेत राजकीय आश्रय घेतला आणि ‘बायोप्रिपरेट’ या नावाचा अमानुष प्रकल्प अमेरिकेसह सगळ्या जगासमोर उघड झाला. डॉ. अलिबेकने या विषयावर पुस्तकच लिहिलं. त्याचं नाव आहे- ‘बायोहॅझर्ड : दि चीलिंग ट्रू स्टोरी ऑफ दि लार्जेस्ट कोव्हर्ट बायोलॉजिकल व्हेपन्स प्रोगॅम इन द वर्ल्ड-होल्ड फ्रॉम इनसाईड बाय द मॅन हू रॅन इट.’ हे लांबलचक नावाचं पुस्तक १९९९ साली प्रसिद्ध झालं. सध्या डॉ. अलिबेक अमेरिकेत ओहायो प्रांतात लोकस फर्मेंटेशन सोल्युशन्समध्ये उच्चपदावर कार्यरत आहे. शिवाय २०१० पासून तो आपल्या मायदेशात म्हणजे कझाकस्तानातही येऊन-जाऊन असतो. जीवरसायन शास्त्रज्ञाखेरीज ‘ऑटिझम’ म्हणजे ‘स्वमग्नता’ या विकारावरही त्याचं संशोधन आणि अध्यापन चालू आहे.


अरे हो, पण ‘बायोप्रिपरेट’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं पुढे काय झालं? माहीत नाही. रशियन फेडरेशन हा नवा देश त्याबद्दल काहीही सांगत नाही.

@@AUTHORINFO_V1@@