जग हे बंदिशाळा… कोणी न येथे बरा चांगला!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Mar-2020   
Total Views |
italy _1  H x W



आजच्या घडीला इटाली, स्पेन, जर्मनी हे युरोपातील तीन देश आणि अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक वेगाने होत आहे. अमेरिकेची आर्थिक राजधानी असलेल्या न्यूयॉर्क शहरात जगभरातील कोरोनाग्रस्तांपैकी ५% म्हणजे १२००० हून अधिक रुग्ण आहेत.


कोरोनाच्या प्रसाराचा वेग वाढल्याने जगातील महत्त्वाचे देश एका पाठोपाठ लॉक डाउनची अवस्था घोषित करत आहेत. ३८२००० हून अधिक लोक कोरोनाने ग्रस्त असून त्यामुळे झालेल्या मृतांचा आकडा १६६००च्या वर गेला आहे. १ लाखाहून अधिक लोक त्यातून बरे झाले असले तरी परिस्थिती चिंताजनक आहे. सध्या सुमारे २०० कोटी लोक लॉक डाउनच्या अवस्थेत असून त्यातील अर्ध्याहून अधिक वाटा भारताने उचलला आहे. लॉक डाउनला मराठीत काय म्हणावे याबाबत गोंधळ आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २३ मार्च रोजीच्या पत्रकार परिषदेत त्यासाठी संचारबंदी हा शब्दप्रयोग केल्याने सगळीकडे गोंधळ उडाला. संचारबंदीसाठी इंग्रजीत ‘कर्फ्यु’ हा शब्द आहे आणि कर्फ्युमध्ये विशिष्ट वेळा वगळता सामान्य नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी असते. पोलिसांना व्यापक अधिकार दिले असतात आणि त्यांनी केलेल्या कारवाईविरोधात त्यांच्यावर कोर्टात खटला दाखल करता येत नाही. लॉक डाउन म्हणजे अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन आणि पुरवठा यांच्या व्यतिरिक्त अन्य सर्व प्रकारच्या गोष्टींवर बंदी घालण्यात येते. यात विविधं आस्थापनं, शाळा-कॉलेजं ते सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचाही समावेश असतो.
आजच्या घडीला इटाली, स्पेन, जर्मनी हे युरोपातील तीन देश आणि अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक वेगाने होत आहे. अमेरिकेची आर्थिक राजधानी असलेल्या न्यूयॉर्क शहरात जगभरातील कोरोनाग्रस्तांपैकी ५% म्हणजे १२००० हून अधिक रुग्ण आहेत. कोरोनाच्या फटक्यातून राव, रंक, नेता, अभिनेता असे कोणीही सुटले नाहीये. त्यात टॉम हॅंक्ससारखे ऑस्कर पुरस्कार मिळवलेले अभिनेते आहेत, बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात दोषी आढळल्याने तुरुंगाची हवा खात असलेल्या हार्वे वाइनस्टाइन या जगप्रसिद्ध निर्मात्यालाही संसर्ग झाला आहे, पत्नीला संसर्ग झाला म्हणून कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी तर डॉक्टरना संसर्ग झाला म्हणून जर्मनीच्या अध्यक्ष एंजेला मर्केल यांनी स्वतःला क्वारंटाइन केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ते ब्राझिलचे अध्यक्ष जाइर बोल्सोनारोंनाही चाचणीला सामोरे जावे लागले.
नव्यानेच पुरोगामित्त्वाची झूल पांघरलेल्या सामनाच्या कार्यकारी संपादकांना कोरोनामुळे विविध धर्मांचे देव कोरोनामुळे मैदान सोडून गेल्याचा साक्षात्कार झाला आहे. दुसरीकडे जगभरातून प्रत्यक्ष जमिनीवरुन माहिती संकलित करुन लिहिलेल्या आणि पुरोगामी विचारांच्या न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या विवियन यी यांच्या लेखानुसार वेगळे चित्र दिसते. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून विविध धर्मांची पवित्र तीर्थक्षेत्रं सामुहिक दर्शन आणि प्रार्थनांसाठी बंद झाली असली तरी अनेक देशातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी आणि तोकडेपणाही जनतेसमोर आल्यामुळे तेथील लोकांची देवावरील श्रद्धा आणखी दृढ झाली आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ज्या झपाट्याने वाढत आहे ते पाहाता त्यांच्यासाठी आवश्यक रुग्णालयं, त्यातील खाटा, मास्क, सॅनिटायझर आणि व्हेंटिलेटर्सची तरतूद करण्यास सर्वच देश कमी पडत आहेत. त्यामुळे सुरुवातीच्या काळात जरी विविध राजकीय पक्षांमध्ये तसेच विचारांच्या विचारवंतांमध्ये कोरोनाचा सामना करण्याबाबत एकजूट दिसली असली तरी जसा वेळ पुढे जात आहे तसे त्यांच्यातील मतभेद उफाळून येत आहेत.
भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन लोकांनी स्वयंशिस्तीचे अभूतपूर्व दर्शन घडवले. जनता कर्फ्यु यशस्वी केला. त्यामुळे अनेकांना मळमळीचा त्रास होऊन त्यांनी एक दिवसाच्या कर्फ्युने काय होणार आहे किंवा अहमदाबादसारख्या ठिकाणी अतिउत्साहात येऊन लोकांनी रस्त्यात येऊन केलेल्या मूर्खपणाचे सार्वत्रिकीकरण झाल्याचे आरोप करायला सुरुवात केली. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प किंवा ब्रिटनमध्ये बोरिस जॉन्सन यांनी कोरोनाच्या संकटाला प्रतिसाद द्यायला उशीर केला तसेच त्याबाबत आपली भूमिका १८० अंशांनी बदलली असा आरोप त्यांच्याविरुद्ध केला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचे निराकरण करण्यासाठी सुचवलेल्या सुमारे १.८ लाख कोटी डॉलरच्या मदतनिधीबाबत रिपब्लिकन आणि डेमॉक्रॅटिक पक्षांमध्ये तीव्र मतभेद असल्यामुळे अमेरिकेची संसद (कॉंग्रेस) त्याला मंजूरी देत नाहीये. इस्रायलमध्ये सलग तीन वेळा निवडणुका होऊनही सरकार स्थापन होऊ शकले नाही. आता कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पण बेंजामिन नेतान्याहू यांची सर्वपक्षीय सरकार स्थापन करण्याची सूचना विरोधी पक्षांच्या आघाडीला मान्य नाही. नेतान्याहूंना आणखी वेळ मिळू नये म्हणून संसदेच्या सभापतींना बदलायचा घाट त्यांनी घातला आहे.
भारतातही कॉंग्रेसने राहुल गांधी यांचे १२ फेब्रुवारीचे ट्विट मोदी सरकारने गांभीर्याने घेतले नाही असा आरोप केला आहे. अर्थव्यवस्था सावरण्यासाठी तसेच कोरोनामुळे बेरोजगार झालेल्या तसेच आर्थिक नुकसान सहन कराव्या लागणाऱ्या भारतीयांसाठी १० कलमी आर्थिक पॅकेजही सुचवले आहे. त्यातील बऱ्याच सूचना राज्य स्तरावर करता येण्यासारख्या आहेत. पण एकाही राज्यातील कॉंग्रेस किंवा कॉंग्रेस आघाडीचे सरकार त्या करत नाहीये कारण सगळ्यांच्याच अर्थव्यवस्थांची परिस्थिती तोळामासा आहे. त्यामुळे समाजमाध्यमांवर अनेकजण असल्या लोकशाहीपेक्षा हुकुमशाही बरी असे म्हणताना दिसत आहेत. अर्थात येणारा हुकुमशहा हा प्रभू रामाचा अवतार असेल अशी त्यांना खात्री असते. चीनचा माओ, रशियाचा स्टॅलिन किंवा उत्तर कोरियाच्या किम जॉंग उनप्रमाणे कोणी हुकुमशहा लाभला तर काय परिणाम होतील याची त्यांना कल्पनादेखील नाही. पण कोरोनाच्या संकटामुळे नागरीकांची स्वातंत्र्य अधिकाधिक संकुचित होत आहेत आणि त्याला तूर्तास तरी लोकांचा पाठिंबा लाभत आहे. घरी क्वारंटाइन करायला सांगितलेल्या लोकांनी बाजारात खरेदीला जाणे किंवा रेल्वेतून प्रवास करणे, घराबाहेर पडू नका असे सांगूनही समुद्रावर किंवा बागेत फिरायला बाहेर पडणे अशा गोष्टी केवळ भारतातच नाही तर जगात सर्वत्र होत आहेत. त्यामुळे नाइलाजाने का होईना सरकारला प्रशासन आणि पोलिसांना व्यापक अधिकार द्यावे लागत आहेत.
लोकशाही व्यवस्थेत पोलिस यंत्रणा अर्धा ते एक टक्का बेशिस्त किंवा वाईट प्रवृत्तींच्या लोकांना आवर घालण्यासाठी बनवलेली असते. त्याहून जास्त संख्येने जेव्हा लोक नियम तोडतात किंवा त्यांचे गांभीर्य ओळखत नाहीत तेव्हा त्यांचा वापर करण्यासाठी सरकारला तंत्रज्ञानाची कास धरावी लागते. आजच्या मोबाइल, इंटरनेट, कृत्रिम बुद्धीमत्ता आणि सोशल मिडियाच्या जगात हे शक्य झाले आहे. तुमच्या मोबाइल लोकेशनद्वारे सरकार कोट्यावधी लोकांवर एकाच वेळेस लक्ष ठेवू शकते. असे करणे नैतिक आहे का अनैतिक…. या माहितीचा वापर सरकार आणि तंत्रज्ञान कंपन्या कशाप्रकारे करु शकतात वगैरे मुद्यांवर साधक बाधक चर्चा होण्यापूर्वीच ते वापरण्याशिवाय सरकारला गत्यंतर नसेल असे चित्र सध्या तरी दिसत आहे. प्रसिद्ध भविष्यवेधी लेखक युवाल नोहा हरारी यांनी त्याबद्दल एक सुंदर लेख लिहिला आहे. ते म्हणतात की, जे निर्णय व्हायला पूर्वी वर्षानुवर्षं चर्चेची गुऱ्हाळं चालायची असे निर्णय काही तासात घेतले जातील. केवळ हुकुमशाही नाही तर लोकशाहीवादी देशही असे पाळत ठेवणारे तंत्रज्ञान वापरतील. केवळ व्यक्तीवरच पाळत ठेवली जाईल असे नाही तर त्याच्या आरोग्यावर उदा. त्याचा रक्तदाब, श्वसन इ. तसेच त्याच्या भावनांवरही पाळत ठेवली जाईल. त्यामुळे जग हे बंदीशाळा ही उक्ती कोरोनाचा प्रभाव ओसरल्यावरही कायम राहील अशी चिन्हं आहेत. येणारा काळ हा मोठ्या आव्हानांचा आहे.




@@AUTHORINFO_V1@@