महाराष्ट्रात माळढोक परतला; पुनरुज्जीवन होणे कठीण!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Mar-2020   
Total Views |
माळढोक_1  H x W

 
 
 

 राज्यात माळढोकचे पुनरुज्जीवन किंवा त्यांच्या संख्येत वाढ ही केवळ एक-दोन पक्ष्यांच्या भरवशावर होणार नाही.

 
 
 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) -  महाराष्ट्रातून नामशेष झाल्याची शंका असलेला माळढोक पक्षी पुन्हा एकदा राज्यात परतला आहे. सोलापूरमधील नानज माळढोक अभयारण्यात आठवड्यापूर्वी माळढोक मादीचे दर्शन घडले आहे. अभयारण्याला लागून असलेल्या मार्डी गावातील भगवान कदम यांच्या खासगी शेतात २ मार्च रोजी या मादीचा वावर आढळून आला. अभयारण्यालगत आढळणार्याय माळढोक पक्ष्याची माहिती दिल्यास वनविभागाकडून ५०० रुपयांचे बक्षीस देण्यात येते. त्यामुळे कदम यांनी तातडीने ही माहिती वनविभागाला कळवली. तेव्हापासून वनविभागाचे कर्मचारी या पक्ष्यावर नजर ठेवून आहेत. महाराष्ट्रात माळढोक पक्ष्याच्या संवर्धनासाठी १९७९ साली सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यांतील गवताळ अधिवास मिळून नानज अभयारण्याची निर्मिती करण्यात आली. सुरुवातीला हे अभयारण्य ८,४०० चौरस किलोमीटर इतक्या क्षेत्रावर पसरले होते. या अभयारण्यात सर्वांत मोठा भाग नाणज या गावातला आहे.
 
 
दशकभरापूर्वी प्रजननाच्या दृष्टीने अनुकूल असलेली या परिसरातील माळढोक पक्ष्यांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये चांगलीच घसरली. नष्ट होणारा अधिवास आणि मानवी हस्तक्षेपामुळे नानज अभयारण्यात हे पक्षी दिसेनासे झाले. सोलापूरबरोबरच विदर्भातही वरोरा आणि उमरेड तालुक्यात मोळढोकचा अधिवास होता. मात्र, या ठिकाणीही गेल्या तीन ते चार वर्षांमध्ये माळढोकची नोंद झालेली नाही. २०११ सालापर्यंत महाराष्ट्रात माळढोक पक्ष्यांची संख्या अंदाजे २५ ते ३० इतकी होती. 'भारतीय वन्यजीव संस्थान'ने (डब्लूआयआय) २०१३ पासून देशभरात माळढोक संवर्धनासाठी एक कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमाअंतर्गत २०१७ मधील सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रातील माळढोक अधिवास क्षेत्रात सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र, या सर्वेक्षणादरम्यान ’डब्लूआयआय’च्या संशोधकांना एकही माळढोक पक्षी आढळून आला नाही. त्यामुळे राज्यातून हा पक्षी नामशेष झाला असून त्याचे पुनरुज्जीवन होणे कठीण असल्याचे दिसत होते. परंतु, आता नानज अभयारण्यात माळढोक मादीचे दर्शन घडल्याने आशेची पालवी फुटली आहे. असे असले तरी, माळढोकचे पुनरुज्जीवन होण्यासाठी किंवा त्यांची संख्या वाढविण्यासाठी केवळ एकच मादी पक्षी उपयोगाची नाही, हे देखील तितकेच खरे!
 
 
 
 
 
 
 
 
पुनरुज्जीवनात अडचणी
 
 
माळढोक हा पक्षी केवळ भारत आणि पाकिस्तानमध्ये आढळतो. माळरान आणि गवताळ प्रदेश हे या पक्ष्याचे मुख्य अधिवास क्षेत्र. परंतु, सरकारी कागदांवर या जमिनींची नोंद ‘पडीक जमीन’ वा ‘गायरान’ अशी असल्याने या परिक्षेत्राच्या संवर्धनासाठी पाऊल उचलले गेले नाही. परिणामी, याचा फटका माळढोकचा अधिवास आणि संख्येवर बसला. देशात १९८० च्या दशकात साधारण १,५०० ते २,००० माळढोक होते. परंतु, अधिवास नष्ट झाल्यामुळे भारतात आता त्यांची संख्या अंदाजे २०० वा त्याहून कमी उरली आहे. राजस्थानमधल्या डेझर्ट नॅशनल पार्कमध्ये सर्वाधिक म्हणजे १०० पेक्षाही माळढोक असण्याची शक्यता आहे, तर आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यांमध्येसुद्धा माळढोक आहेत. मात्र, मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेर आणि गुजरातमध्ये माळढोकची संख्या कमालीची घटली आहे. महाराष्ट्रात नाणज येथील माळरानालाच माळढोककरिता संरक्षित क्षेत्राचा दर्जा लाभला आहे. विदर्भातील अधिवास अजूनही असंरक्षित आहे. त्यामुळे प्रथमत: या क्षेत्राला संरक्षण देणे गरजेचे आहे. परंतु, हे संरक्षण देताना या ठिकाणी नानज अभयारण्यासारख्या चुका घडणार नाहीत, याचीही काळजी घेतली पाहिजे. नानजमध्ये सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका माळढोकला बसला. ज्या शेतात माळढोक दिसेल, ते शेत अभयारण्यात समाविष्ट करून घेण्यात आले. याला शेतकर्यांयनी विरोध केला. तसेच अभयारण्याचे संवेदनशील क्षेत्र निश्चित नसल्याने उद्योगांना परवानगी मिळत नव्हती. त्यामुळे उद्योजकांकडूनही नाराजीचा सूर उमटत होता. जानेवारी महिन्यात अभयारण्याचे संवदेनशील क्षेत्र निश्चित करुन त्यामधील काही क्षेत्र केवळ उद्यागोधंद्याच्या वाढीसाठी वगळण्यात आले. राज्यात माळढोकचे पुनरुज्जीवन किंवा त्यांच्या संख्येत वाढ ही केवळ एक-दोन पक्ष्यांच्या भरवशावर होणार नाही. त्यासाठी, प्रजनन प्रकल्पही हाती घेणे आवश्यक आहे. राजस्थानमध्ये कृत्रिम पद्धतीने (एक्स सीटू) माळढोकची अंडी उबविण्याचा प्रकल्प सुरू आहे. याच पद्धतीचा प्रकल्प महाराष्ट्रात राबविण्याचा वनविभागाचा विचार सुरू आहे. तसेच, माळढोक पक्ष्यांचा वावर नाही म्हणून त्यांच्यासाठी संरक्षित केलेल्या क्षेत्रांचा दर्जा काढून घेणे उचित ठरणार नाही. कारण, उरल्यासुरल्या संरक्षित माळरान क्षेत्रांवरच माळढोक पक्ष्यांच्या पुनरुज्जीवनाचे भविष्य अवलंबून आहे.
@@AUTHORINFO_V1@@