वाचाळता पुरे झाली!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Feb-2020   
Total Views |
vv1_1  H x W: 0




आताही इथे महाराष्ट्रात भाजपने विद्यमान सरकारला नावे ठेवण्यापेक्षा भविष्यातल्या राजकारणाची मांडणी करण्याला महत्त्व आहे. त्यात शिवसेना असेल किंवा नाही आणि सरकार मोडून सेना भाजपसोबत येईल किंवा नाही, या गोष्टींचा ऊहापोह फक्त टिंगलटवाळीचा विषय होऊ शकतो. शिवसेनेने आपला मार्ग चोखाळला आहे आणि भाजपनेही आपली भूमिका घेऊनच सत्तेबाहेर बसणे स्वीकारले आहे. मग ही मोडतोडीची भाषा कशाला?

महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी मध्यंतरी केलेले वक्तव्य कितीसे आवश्यक आहे? किंबहुना, अनेक भाजप नेत्यांनी नित्यनेमाने जाहीर वक्तव्ये करण्याची खरोखरच गरज आहे का? कारण, त्यांनी सत्ता गमावलेली आहे, म्हणून त्यांच्या कुठल्याही वक्तव्याकडे ‘वैफल्यग्रस्त’ म्हणूनच बघितले जाणार आहे. त्यातून त्यांची ‘टवाळी’ फक्त होऊ शकते. पक्षाला त्याचा लाभ मिळण्याची शक्यता नसताना असली वक्तव्ये कशाला केली जातात, तेच समजत नाही. किंबहुना, अशाच अनाठायी तोंडपाटीलकीमुळे काँग्रेस पक्षाने आपले सर्वाधिक नुकसान करून घेतलेले आहे. एका पक्षाला जो धडा जनता देते, तो त्यांच्यापुरता मर्यादित नसतो, तर उर्वरित पक्षांसाठीही तो धडा असतो. मुद्दा असतो, त्यातून शिकण्याचा. “काँग्रेस जाणीवपूर्वक शिवसेनेला हिंदुत्वापासून दूर घेऊन जाते आहे,” असे पाटील यांनी केलेले वक्तव्य, खरेच आवश्यक होते का? शिवाय आपण ‘शिवसेनेचे हितचिंतक’ म्हणून बोलल्याचे त्यांनी म्हटले आहे. पण अशा हितचिंतकाची शिवसेनेला गरज आहे का? शिवाय त्या पक्षाला आपले हित कळत नाही का? एका पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने दुसर्‍या पक्षाचा हितचिंतक असण्याचे काहीही कारण नसते. त्यापेक्षाही त्याने आपल्याच पक्षाच्या हिताला प्राधान्य दिले पाहिजे आणि आज भाजपचे हित नसती विधाने करण्यात नाही. राजकीय घटनाक्रमाला आपल्या गतीने पुढे जाऊ देण्यात भाजपचे हित सामावलेले आहे. मध्यावधी निवडणुका होतील तेव्हा होतील आणि शिवसेनेचे हित-अहित त्या पक्षाच्या नेतृत्वाला वाटायला हवे. भाजपच्या नेत्याला तसे काही वाटून उपयोग नसतो. इथे भाजपच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कित्ता गिरवण्याची गरज आहे. किती आरोप झाले म्हणून त्याला मोदी सहसा उत्तर देत नाहीत. किंबहुना, मागल्या १३-१४ वर्षांमध्ये त्यांनी माध्यमांशी बोलणेही बंद केलेले आहे. तो सर्वात मोठा धडा आहे.


‘गुजरात दंगली’चे भांडवल करून मोदींना सतत माध्यमांनी हैराण करून सोडलेले होते. पाच-सहा वर्षे उलटून गेली तरी बहुतांश पत्रकार दंगलीविषयी बोलूनच त्याचा विपर्यास करीत होते. त्याला कंटाळून बहुधा मोदींनी पत्रकारांशी असलेला संवादच बंद करून टाकला. २००७ नंतरच्या काळात मोदींनी कुठल्याही पत्रकाराला मुलाखत देणे साफ बंद करून टाकले. त्यासाठी त्यांच्यावर पळपुटेपणाचा वा माध्यमांना घाबरत असल्याचा आरोपही होत राहिला. पण, आपल्या जाहीर भाषणाखेरीज कुठल्याही मुलाखती देण्याचे मोदींनी साफ बंद केले. त्यांचे काय नुकसान झाले? त्यांनी तीनदा गुजरात विधानसभेत सहज बहुमत मिळवले आणि ते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आले. तेव्हा त्यांच्या मुलाखतीसाठी बहुतांश माध्यमे लाचारासारखी वाडगा घेऊन फिरत होती. यातला पहिला धडा असा की, जेव्हा आपल्या वक्तव्याचा विपर्यासच केला जाणार आहे, तेव्हा अशी वक्तव्ये देण्यापेक्षा सोशल मीडियातून आपले मत मांडून बाजूला व्हावे. त्यातून तुमच्या विरोधकांना दारुगोळा पुरवण्याची चूक तुमच्याकडून होत नाही. यातील फायदा बघायचा असेल, तर गेल्या दोन-तीन वर्षांपासून काँग्रेसचा झालेला लाभ बघता येईल. काँग्रेसने लोकसभेच्या मतदानापूर्वीच बहुतांश वाहिन्यांवरून आपले प्रवक्ते बाजूला काढले होते. तीन राज्यांमध्ये भाजपची सत्ता हिसकावून घेण्यात काँग्रेस यशस्वी ठरली. त्यात ही प्रवक्त्यांची अनुपस्थिती मोठे योगदान देऊन गेलेली आहे. आताही इथे महाराष्ट्रात भाजपने विद्यमान सरकारला नावे ठेवण्यापेक्षा भविष्यातल्या राजकारणाची मांडणी करण्याला महत्त्व आहे. त्यात शिवसेना असेल किंवा नाही आणि सरकार मोडून सेना भाजपसोबत येईल किंवा नाही, या गोष्टींचा ऊहापोह फक्त टिंगलटवाळीचा विषय होऊ शकतो. शिवसेनेने आपला मार्ग चोखाळला आहे आणि भाजपनेही आपली भूमिका घेऊनच सत्तेबाहेर बसणे स्वीकारले आहे. मग ही मोडतोडीची भाषा कशाला?

एक गोष्ट साफ आहे, शिवसेनेने दोन्ही काँग्रेससोबत जाताना सत्तेसाठी मोठा जुगार खेळलेला आहे. आपल्याच विचाराशी दोन्ही मित्रपक्ष समरस होणारे नाहीत, हे शिवसेनेला कळते. त्यातून वारंवार सेनेची होणारी कोंडी भाजप नेत्यांना कळते आणि सेनेच्या नेतृत्वाला समजत नाही, अशा भ्रमात राहण्याचे कारण नाही. पण, शिवसेना सूडाला पेटलेली असेल तर तुम्ही डिवचणार तितके त्यांना तोंड दाबून बुक्क्याचा मार खात दोन्ही काँग्रेससोबतचे सरकार टिकवून धरावेच लागणार आहे. दारात समोरचा शेजारी भांडायला उभा असताना घरातली धुसफूस झाकून ठेवावीच लागत असते. त्यामुळे भाजपचे नेते-प्रवक्ते जितके डिवचतील, तितके शिवसेनेला मित्रपक्षांचे जोडे खाऊनही खूश असल्याचे दाखवावेच लागणार. नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रक्षेपित झालेली मुलाखत वा त्यांची वेळोवेळी आलेली वक्तव्ये ऐकली, तरी त्यातली वेदना लपून राहत नाही. सरकार स्थापन करून दोन महिन्यांचा कालावधी उलटलेला आहे, पण आपण केलेले कृत्य वा घेतलेला निर्णय योग्य असल्याचे अजून उद्धवराव स्वत:लाच पटवल्यासारखे बोलत असतात. ‘आपले सरकार व त्याने आतापर्यंत घेतलेले निर्णय’ याविषयी बोलण्यापेक्षा ‘असे चमत्कारिक सरकार कशाला स्थापन केले’ त्याचाच खुलासा देणे कायम चालू आहे. त्याचा अर्थच त्यांनाही मनाने केले ते पटलेले नाही. ते दुखणे सातत्याने वक्तव्यातून समोर येत असते. नव्याने मित्र झालेल्या पक्षांचे गुणगान व सहकार्याचे कौतुक करण्यापेक्षा त्यांचा वेळ भाजपशी युती मोडल्याचे खुलासे देण्यात जातो, ही वेदना आहे. त्या वेदनेवर भाजपच्या प्रवक्त्यांची विधाने मीठ चोळत असतात. तितके त्यांना आपले दुखणे लपवणे भाग आहे. अर्ध्या सत्तेसाठी व मुख्यमंत्रिपदासाठी महायुती मोडून मांडलेला संसार सुखाचा नाही, हे सत्य आहे. पण, ते दुखणार्‍याला जाणवण्यापर्यंत प्रतीक्षा महत्त्वाची असते.

प्रेमात पडून घरातून पळालेल्या मुलीचा घरातल्या विरोधावर अधिक राग असतो. तिला अशा दुखावलेल्या स्थितीत डिवचून काहीही साध्य होणार नसते. उलट ती नवविवाहिता आपल्याच आईबापाच्या विरोधात पोलिसात तक्रारही देत असते. तिला कोणी फसवणारा नवरा भेटलेला असेल, तर त्याने तिचा भ्रमनिरास करण्यापर्यंत प्रतीक्षा करणे भाग असते. उलट ती कशी फसली वा चुकली, त्याचा पाढा वाचत राहिल्यास ती अहंकारापायी चटके सोसूनही सासरी खूश असल्याचे नाटक रंगवित राहते. हा आपला व्यवहारातला नित्याचा अनुभव आहे. तिला चटके बसण्यापर्यंत आणि ते दुखण्यापर्यंत आपण शांतता राखावी लागते. जितके तिला डिवचण्याचा प्रयत्न कराल, तितकी ती आपल्या त्याच चुकीच्या निर्णयाला घट्ट चिकटून बसत असते. म्हणून भाजपच्या नेते, प्रवक्त्यांनी अकारण चालवलेली वक्तव्ये निरूपयोगीच नाहीत, तर त्यांच्याच पक्षाला हानिकारक आहेत. राजकारणात असो किंवा कौटुंबिक जीवनामध्ये अहंकाराच्या आहारी जाऊन उचललेले टोकाचे पाऊल, मागे घेताना खूप घालमेल होत असते. त्यापेक्षा मरणही सोपे वाटत असते. अशावेळी त्या निर्णयाचा मानकरी असतो, त्याला आपली चूक समजण्यास मदत करण्याला महत्त्व असते. म्हणूनच शिवसेनेला छेडण्यापेक्षाही त्रयस्थपणे त्याकडे बघणे भाजपला शिकले पाहिजे. बिहारच्या अशाच आघाडीत नितीशकुमार यांची कोंडी झाल्यावर एका दिवशी त्यांनीच ती मोडली होती ना? त्यासाठी कोणी मोठे डावपेच खेळलेले नव्हते. लालूंच्या कुटुंबाने नितीशचा भ्रमनिरास करण्यापर्यंत सुशील मोदींनी संयम राखला होता ना? कुमारस्वामी यांची स्थिती वेगळी नव्हती. तेथील जनता दल काँग्रेस आमदारांचा धीर सुटण्यापर्यंत येडियुरप्पा शांत राहिले होते ना? मग महाराष्ट्रातील आघाडी कुठे वेगळी आहे? गळू पिकल्याशिवाय फोडायचे नसते म्हणतात. येथील भाजप नेत्यांना हे जितक्या लवकर कळेल तितके शिवसेनेपेक्षा त्यांच्याच पक्षाच्या हिताचे असेल.
@@AUTHORINFO_V1@@