ट्रम्प दौर्‍यादरम्यान दिल्लीत हिंसाचाराचा व्यापक कट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Feb-2020   
Total Views |
Delhi riots and Donald Tr




ट्रम्प यांची भारतभेट निर्विघ्नपणे पार पडली. पुरोगाम्यांना अपेक्षित असलेली टीका काही ट्रम्प यांनी केली नाही. याउलट दोन दिवस नरेंद्र मोदींची तोंडभरून स्तुती केली. राजकीय स्वार्थासाठी या मंडळींनी भारत-अमेरिका संबंधांनाही पक्षपाती स्वरूप देण्याचा जो प्रयत्न केला, त्याचा निषेध करायलाच हवा.

 
 

अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध द्विपक्षीय आहेत. सरकार बदलले की, संबंध बदलत नाहीत. भाजपचा भारत-अमेरिका अणुकराराच्या मसुद्याला विरोध होता. या मुद्द्यावर डॉ. मनमोहन सिंह सरकारविरुद्ध अविश्वास ठराव मांडला गेला असता, भाजपने मार्क्सवादी पक्षांची साथ दिली होती. पण, २०१४ साली सत्तेवर आल्यानंतर भाजपने या कराराचा मान राखला. कारण, तो भारताने केला होता. आजवर सर्व राजकीय पक्ष अशा प्रकारची प्रगल्भता दाखवत आले आहेत. पण, हा काळ वेगळा आहे. २०१४ साली नरेंद्र मोदी ज्या भरघोस यशासह भारताचे पंतप्रधान झाले, ते यश अजूनही बर्‍याच जणांच्या गळी उतरले नाहीये.

 
 

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या भारत दौर्‍यात त्यांच्या पोटातील मळमळ आजही बाहेर येते. याच लोकांनी २००२ सालच्या गुजरात दंगलींचे निमित्त करून मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना अमेरिकेचा व्हिसा मिळू नये म्हणून प्रयत्न केले होते आणि त्याला बर्‍यापैकी यशही मिळाले होते. या काळात नरेंद्र मोदींनीही अमेरिकेला जायचे टाळल्यामुळे झाकली मूठ सव्वालाखाची राहिली. पण, २०१३ साली जेव्हा नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान होऊ शकतात, असे स्पष्ट होऊ लागले तसे अमेरिकेने गुजरात सरकारशी संबंध पुनर्प्रस्थापित केले. अमेरिकेचे राजनयिक अधिकारी मोदींना भेटू लागले. पंतप्रधान झाल्यावर मोदींनी वैयक्तिक मानापमान बाजूला ठेवून भारत आणि अमेरिका संबंध एका नवीन उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. सुरुवातीला बराक ओबामांसोबत आणि नंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत वैयक्तिक मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित केले.

 
 

२०१९ साली नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने ३००हून अधिक जागा जिंकत आपल्या विजयाचा पाया अजून मजबूत केला. आपल्या दुसर्‍या टर्ममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताची सुरक्षा आणि अस्मितेशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांची, ज्यांचा गुंता स्वातंत्र्यानंतरच्या सत्तर वर्षांमध्ये सुटला नव्हता, तड लावायचा चंग बांधला असून त्यांना गृहमंत्री म्हणून अमित शाह यांची मोलाची साथ मिळत आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेससह डाव्या पक्षांमधील वैचारिक दरी आणखी वाढली आहे. तीच गोष्ट डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दलही बोलता येईल. अपघाताने राजकारणात आलेल्या आणि थेट राष्ट्राध्यक्ष झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेतील पुरोगामी आणि स्वयंघोषित उदारमतवादी अगदी मनापासून द्वेष करतात.

 
 

ट्रम्प यांचे चारित्र्य धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाही, हे मान्य केले तरी ज्या त्वेषाने त्यांना विरोध केला गेला, ते पाहता त्यांना काम करू न देण्याचा इरादा दिसून येत होता. अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणात रिपब्लिकन पक्षाची किंवा डोनाल्ड ट्रम्प यांची बाजू घेण्याचा या लेखाचा उद्देश नाही. पण, ट्रम्प यांनी सुरू केलेले व्यापारी युद्ध असो, इराणसोबत झालेल्या करारातून घेतलेली माघार, अमेरिकेतील मध्यावधी निवडणुका असो वा ट्रम्प यांच्या पदच्युतीसाठी चालवला गेलेला महाभियोग... या मंडळींनी ट्रम्प काही आता फारकाळ टिकणार नाहीत, अशीच भूमिका घेतली. पण, ट्रम्पही या लोकांची बारशी जेवून आले असल्यामुळे त्यांना पुरून उरले. गेल्या चार वर्षांत अमेरिकेची अर्थव्यवस्था अधिक वेगाने वाढू लागली, बेरोजगारी कमी झाली. अनेक देशांनी अमेरिकेशी संघर्ष करण्यापेक्षा तिच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. आज अशी परिस्थिती आहे की, जे ट्रम्प वर्ष-दोन वर्षं टिकणार नाहीत अशा वल्गना केल्या जात होत्या, ते पुढील चार वर्षांसाठी पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यताच जास्त आहे.

 
 

अध्यक्षीय निवडणुकीला अवघे सात महिने उरले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विनंतीला मान देऊन डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार आणि अहमदाबादमध्ये सव्वा लाखांच्या सभेला संबोधित करणार, हे ट्रम्प आणि मोदीद्वेष्ट्या मंडळींच्या पोटदुखीला पुरेसे कारण होते. या दौर्‍याचा फज्जा कसा उडेल किंवा मग त्यात अकारण वाद निर्माण होऊन मोदींच्या भारताची प्रतिमा मलीन होईल यासाठी ते कामाला लागले. ट्रम्प यांच्या दौर्‍यापूर्वी ते काश्मीरबद्दल बोलतील, भारतातील धार्मिक स्वातंत्र्याच्या अभावाबद्दल बोलतील, तसेच नागरिकत्व कायद्याबद्दल बोलतील अशा बातम्या माध्यमांत पसरविण्यात आल्या. २४-२५ फेब्रुवारी रोजी ट्रम्प भारतात येणार, हे स्पष्ट होताच २३ फेब्रुवारी रोजी ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली. दिल्लीच्या निवडणुकांमध्ये शाहीनबागेचा मुद्दा खूप तापवण्यात आला होता. पण, आंदोलनाला सुरुवात होऊन ७० दिवस झाले तरी मोदी सरकारने नागरिकत्व कायद्याबाबत आपल्या भूमिकेत बदल करायला नकार दिला, तसेच आंदोलकांशी चर्चादेखील केली नाही.

 
 

अरविंद केजरीवाल यांच्या विजयामध्ये मुस्लीम मतदारांचा मोठा वाटा होता. काँग्रेसने शाहीनबागेच्या मुद्द्यावर सातत्यपूर्ण भूमिका घेतली असली तरी आम आदमी पार्टीच भाजपला हरवू शकते, या विचाराने तिला भरभरून मतदान झाले. निवडणूक निकालांना दोन आठवडे झाले तरी अरविंद केजरीवाल ना शाहीनबागेकडे फिरकले ना ‘सीएए’विरोधात त्यांनी भूमिका मांडली. दुसरीकडे या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होऊन आंदोलकांनी रस्ता अडवून बसू नये, यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी न्यायालयाने मध्यस्थ नेमले. त्यामुळे मग गृहमंत्री अमित शाह यांच्या घरावर मोर्चा नेण्याची रणनीती आखण्यात आली. राजधानी दिल्लीमध्ये सुरक्षाव्यवस्थेचा मुद्दा असल्यामुळे कुठे आंदोलन करावे, याबाबत स्पष्ट नियम आहेत. जंतरमंतरची जागा सर्व प्रकारच्या आंदोलनांसाठी मोकळी ठेवली आहे. पण, आंदोलनापेक्षा दिल्ली ठप्प करण्याचा उद्देश असल्यामुळे आंदोलकांनी आपला निर्णय कायम ठेवला. त्यांना पोलिसांनी अडवले, तेव्हा त्यांनी रस्त्यांमध्ये धरणे दिले.

 
 

ईशान्य दिल्लीत सीलमपूर भागाला मौजपूर आणि यमुना विहारला जोडणारे रस्ते अडवून धरले गेले. जाफराबाद मेट्रो स्टेशनला घेराव घातला गेला. शाहीनबाग आंदोलनामुळे नोएडामध्ये कामाला जाणार्‍या लाखो दिल्लीकरांना त्रास सहन करावा लागत होता. तोच प्रकार इतर ठिकाणीही करायचा प्रयत्न होत असलेला पाहून भाजप नेते कपिल शर्मा यांनी या आंदोलकांविरुद्ध मोर्चा काढला. त्याचे निमित्त करून ‘सीएए’ विरोधकांनी तुफान दगडफेकीला सुरुवात केली, वाहने तसेच दुकाने जाळण्यात आली. पेट्रोलपंप जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. महंमद शाहरुख नावाच्या युवकाने पिस्तूलातून आठ राऊंड गोळीबार केला. पोलिसांना पिस्तूल दाखवून मागे व्हायला सांगत असताना त्यांच्यापाठून चाल करून येणार्‍या जमावाने पोलिसांवरही दगडफेक केली. पोलिसांना गोळीबार करायला भाग पाडावे, अशा सूचना बहुदा त्यांना देण्यात आल्या असाव्यात. पण, दिल्ली पोलीस शांत राहिले.

 
 

गोळीबारात एका पोलीस हवालदारासह किमान चार जण मारले गेले असून दगडफेकीत ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. दिल्ली पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात एखादा आंदोलक जरी मारला गेला असता, तरी या लोकांनी त्याची आंतरराष्ट्रीय बातमी बनवून मोदी आणि ट्रम्पशी जोडली असती. अहमदाबादमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या भव्य सभेची तयारी सुरू झाल्यापासून ‘न्यूयॉर्क टाइम्स’ आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’सारख्या जगप्रसिद्ध वर्तमानपत्रांतून भारतीय तसेच भारतीय वंशाच्या पुरोगाम्यांनी बदनामीकारक बातम्या पसरविण्यास प्रारंभ केला. मग ते पंकज मिश्रा असोत वा राणा अय्युब...

 
 

हिंदू वर्चस्ववादी मोदींच्या राज्यात कशाप्रकारे गरिबांच्या झोपड्या दिसू नयेत म्हणून रस्त्यात भिंती बांधल्या जात आहेत, मुस्लीम धर्मीयांना गोहत्येचे निमित्त करून कशाप्रकारे ठेचून काढण्यात येत आहे, असा सूर आळवला गेला. असे सगळे होऊनही ट्रम्प यांची भारतभेट निर्विघ्नपणे पार पडली. त्यांना अपेक्षित असलेली टीका काही ट्रम्प यांनी केली नाही. याउलट दोन दिवस नरेंद्र मोदींची तोंडभरून स्तुती केली. राजकीय स्वार्थासाठी या मंडळींनी भारत-अमेरिका संबंधांनाही पक्षपाती स्वरूप देण्याचा जो प्रयत्न केला, त्याचा निषेध करायलाच हवा.








@@AUTHORINFO_V1@@