‘ध्रुवीकरणा’चा डाव यशस्वीच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Feb-2020   
Total Views |

bhau torsekar_1 &nbs


एक गठ्ठा मुस्लीम मते आपल्यालाच मिळावीत, म्हणून काँग्रेसला ध्रुरवीकरण करायचे असले तरी त्यात भाजपची जाणता-अजाणता मदत मात्र आवश्यक होती आणि भाजपने ती मदत पुरवली, हेही मान्य करावेच लागेल. हिंदू मतांचे ध्रुरवीकरण होऊन सर्व मते आपल्याला मिळतील, अशी भाजपची अपेक्षा कधीच नव्हती. कितीही आटापिटा केला तरी सर्व हिंदू आपल्यामागे एकवटणार नाहीत, हे एव्हाना भाजपच्या लक्षात आले आहे. पण, भाजपने हिंदुत्वाचा गवगवा केला, मग मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण व्हायला हातभार लागतो, हे देखील तितकेच सत्य आहे.


दिल्ली विधानसभेचे निकाल लागेपर्यंत खुद्द केजरीवाल यांनाही आपल्या इतक्या मोठ्या यशाची खात्री नव्हती. अगदी ‘एक्झिट पोल’चे आकडे बघूनही त्यांना इव्हीएमवर शंका घ्यायचा मोह आवरला नव्हता. पण, निकाल लागले आणि मतदाराने कसे कामाला मत दिले, त्याचा डंका सर्वत्र वाजू लागला. खुद्द ‘आप’चे कार्यकर्ते, नेतेही त्याची ग्वाही देऊ लागले. दुसरीकडे पोपटपंची करणारे राजकीय विश्लेषकही भाजपचा डाव कसा फसला, त्याचे दाखले देत ध्रुरवीकरण फसल्याचे ढोल वाजवू लागले. हे फसलेले ‘ध्रुरवीकरण’ काय भानगड आहे? तर भाजपने ‘नागरिकत्व कायदा सुधारणा’ व शाहीनबागचा प्रचारात अतिरेकी वापर केलेला होता. त्यात मुस्लिमांचा पुढाकार असल्याने त्याच मार्गाने भाजप हिंदू-मुस्लीम असे मतदारांचे ध्रुवीकरण करत असल्याचा आरोप सर्रास केला जात होता. तसे झाले नाही म्हणून तो भाजपचा डाव फसला, हा निष्कर्ष काढला जातो आहे. पण, वास्तवात दोन्ही बाबी चुकीच्या आहेत. कारण, या मतदानात ध्रुरवीकरण नक्कीच झाले आणि त्यासाठीचा काँग्रेसचा डाव मात्र पुरता तोंडघशी पडला आहे. कारण, ध्रुरवीकरणचा डाव भाजपचा नव्हता, तर आपले नामशेष झालेले अस्तित्व टिकवायला काँग्रेस पक्षाने तो पद्धतशीरपणे केलेला डाव होता. ते ध्रुरवीकरण यशस्वी झाले. मात्र, त्याचा लाभ केजरीवाल यांना मिळून गेला आणि काँग्रेस राजधानी दिल्लीत आणखी धुळीस मिळाली. विश्लेषणात त्याचा ऊहापोह आवश्यक असताना भाजपच्या अपयशाने सुखावलेल्यांना वास्तव कसे बघता येणार? विश्लेषण गेले चुलीत, भाजप अपयशाचा उत्सव सुरू झाला आणि तिथेच वास्तवाचा बळी गेला आहे. हे ध्रुरवीकरण काय असते आणि त्याचा लाभ केजरीवाल यांना आणि नुकसान काँग्रेसचे कसे झाले, त्यासाठी बारकाईने निकालांचा अभ्यास करावा लागतो. आधी उत्तर काढून नंतर गणित वा समीकरण मांडल्याने विश्लेषण होत नसले तरी दिशाभूल मात्र करता येते.


पहिली गोष्ट म्हणजे, ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’चा अवास्तव प्रचार भाजपने केला, ही चूक मान्य करावीच लागेल. स्थानिक मतदानात व निवडणुकीत राष्ट्रीय वा परराष्ट्र धोरणाचे मुद्दे फारसे यशस्वी ठरत नसतात. त्यापेक्षा स्थानिक मुद्दे निर्णायक ठरत असतात. त्यामध्ये स्थानिक नेता व प्रादेशिक विषय अगत्याचे असतात. दिल्लीकरांसाठी भाजपने आकर्षक मुख्यमंत्रिपदाचा चेहरा दिलेला नव्हता आणि ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ वा शाहीनबाग येथील धरण्याला महत्त्व दिले. त्यापेक्षा शहरी लोकसंख्येच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर केजरीवाल आपला प्रचार केंद्रित करून होते. उलट काँग्रेसही भाजपप्रमाणेच राष्ट्रीय मुद्दे घेऊन मैदानात उतरली होती. आपली मते फारशी नाहीत, पण एखाद-दुसरा आमदार आला, तरी नव्याने पक्षाला पालवी फुटावी इतकीच काँग्रेसची अपेक्षा होती. त्यातला अधिकचा हिंदू मतदार आपण मिळवू शकतो, हा आत्मविश्वास काँग्रेसने पूर्णपणे गमावला आहे आणि म्हणूनच अधिकाधिक मुस्लीम मतदार आपल्याकडे खेचून तितके तुटपुंजे यश मिळवण्यासाठी काँग्रेसने ध्रुरवीकरणाचा डाव खेळला होता. फक्त डाव नाही, तर त्यासाठी आपली सर्व प्रतिष्ठा पणाला लावलेली होती. विधानसभा प्रचारापेक्षाही काँग्रेसने आपली ताकद शाहीनबागमध्ये ओतली होती. शशी थरूर यांच्यापासून प्रत्येक नेत्याला तिकडे जाऊन काँग्रेस मुस्लिमांचा पक्ष असल्याचे सिद्ध करण्याच्या कामासाठी जुंपलेले होते. त्यातून एकगठ्ठा मुस्लीम मते आपल्याला मिळवून एक-दोन आमदार निवडून यावेत, अशी इच्छा बाळगली होती. म्हणजे मुस्लीम मतांचे ध्रुरवीकरण ही काँग्रेसची रणनीती होती. तो आम आदमी पक्षासाठी धोक्याचा इशारा होता. तरीही केजरीवाल अतिशय सावधपणे त्याकडे बघून होते आणि अशा मूर्खपणातून आपला हिंदू मतदार विचलित होऊ नये, याची पुरती काळजी त्यांनी घेतली होती. तिथेच काँग्रेसचा ध्रुरवीकरणाचा डाव फसला.


एक मात्र मान्य करावे लागेल ते म्हणजे, एक गठ्ठा मुस्लीम मते आपल्यालाच मिळावीत, म्हणून काँग्रेसला ध्रुरवीकरण करायचे असले तरी त्यात भाजपची जाणता-अजाणता मदत मात्र आवश्यक होती आणि भाजपने ती मदत पुरवली, हेही मान्य करावेच लागेल. हिंदू मतांचे ध्रुरवीकरण होऊन सर्व मते आपल्याला मिळतील, अशी भाजपची अपेक्षा कधीच नव्हती. कितीही आटापिटा केला तरी सर्व हिंदू आपल्यामागे एकवटणार नाहीत, हे एव्हाना भाजपच्या लक्षात आले आहे. पण, भाजपने हिंदुत्वाचा गवगवा केला, मग मुस्लीम मतांचे ध्रुरवीकरण व्हायला हातभार लागतो, हे देखील तितकेच सत्य आहे. कारण, मुस्लीम योजना व आश्वासनांची खैरात केलेली होती. भाजपला स्थानिक मुद्दे घेता आले नाहीत, की चेहरा पेश करता आला नाही. त्यातच काँग्रेसच्या सापळ्यात भाजप फसला आणि शाहीनबागेला त्यांनी प्रचारात प्राधान्य दिले. त्यात केजरीवालांच्या पक्षाला ओढण्याचा प्रयत्नही केला. पण, त्यांनी सावधपणे भाजपला दाद दिली नाही आणि हिंदू मतांच्या मनात ‘आप’विषयी संशय निर्माण होऊ दिला नाही. तिथे त्या पक्षाची हिंदू मते शाबूत राहिली आणि जिंकायला आवश्यक असलेला मुस्लीम मतांचा गठ्ठा काँग्रेसने त्यांच्या झोळीत टाकला. त्यात भाजपने अनावश्यक मुद्दे वापरून हातभार लावलेला आहे. त्यामुळे दिल्लीत ध्रुरवीकरण झाले नाही, या बाष्कळ बडबडीत अर्थ नाही. पण, ते ध्रुरवीकरण भाजपने केले नव्हते, तर काँग्रेस पक्षाने खेळलेला तो डाव होता. त्याला भाजपचा हातभार लागला आणि लाभ मात्र ‘आप’ला मिळून गेला.



@@AUTHORINFO_V1@@