जनआकांक्षांची ‘अक्षता’पूर्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2020   
Total Views |

Akshata Tendulkar_1 
‘कोविड’संकटाच्या काळात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी झपाटून काम केल्याचे आपण पाहिले. यामधीलच एक नाव म्हणजे, पक्षाच्या धडाडीच्या कार्यकर्त्या आणि माहिम विधानसभा अध्यक्ष अक्षता तेंडुलकर. माहिम विधानसभा क्षेत्रातील सर्व घटकांना त्यांनी गेल्या सात महिन्यांमध्ये सर्वतोपरी मदत केली. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदी नवख्या असणाऱ्या तेंडुलकर यांनी लोकांचा विश्वासग्रहण केला आहे. त्यांनी ‘कोविड’काळात केलेल्या कामाचा हा आढावा....

अक्षता तेंडुलकर
राजकीय पक्ष : भाजप
पद : माहिम विधानसभा अध्यक्षकार्यक्षेत्र : माहिम
संपर्क क्र. : ७७३८८ ०५०२५

‘प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि शेवटी स्वत:’ या भारतीय जनता पक्षाच्या तत्त्वाने काम करणाऱ्या व्यक्ती म्हणजे माहिम विधानसभा अध्यक्ष अक्षता तेंडुलकर. ‘कोविड’संक्रमणाच्या काळात भारतीय जनता पक्षाच्या या सूत्राचे त्यांनी प्रामाणिकपणे पालन केले. माहिम विधानसभा क्षेत्रातील गरजू लोकांना त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांच्या मदतीने सहकार्य केले. ‘कोविड’ संक्रमणाच्या सुरुवातीच्या काळात आरोग्य तपासणी केंद्र, रक्तदान शिबीर, माफक दरात भाजीविक्री केंद्र, खाद्य पाकिटांचे वाटप, मास्क-सॅनिटायझर वाटप आणि गणेशोत्सवकाळात विविध सुविधांचे आयोजन त्यांनी माहिम विधानसभाक्षेत्रात केले. त्यामुळे शिवसेनेचा बाल्लेकिल्ला असलेल्या माहिममधील लोकांचा विश्वास संपादन करण्यात त्यांना यश मिळाले आहे. अक्षता तेंडुलकर यांनी आपल्या राजकीय क्षेत्राच्या कामाची सुरुवात माहिम महिला मोर्चाच्या अध्यक्ष या पदावरून केली. कामात झपाटून जाण्याच्या त्यांच्या गुणवैशिष्ट्यांमुळे माहिममधील लोकांचा विश्वास त्यांनी अल्पावधीतच मिळविला. त्यांना मिळत असलेला लोकांचा प्रतिसाद पाहून पक्षानेही त्यांच्या जबाबदारीत भर टाकली. त्यांच्यावर माहिम विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. यंदा फेब्रुवारी महिन्यात या पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतरच त्या कामामध्ये सरावत होत्या. अशातच महिन्याभरात कोरोनाचे संकट आले. ‘लॉकडाऊन’मुळे सर्व कामकाज ठप्प झाले. त्यामुळे लोकांना दैनंदिन जीवनापासून आरोग्य सुविधांमधील समस्यांचा सामना करावा लागत होता. अशा परिस्थितीत पदावर नवख्या असूनही तेंडुलकर यांनी पदर खोचला आणि धडाडीने कामाला सुरुवात केली.
 
 
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांच्या अस्तित्वाचा प्रश्न गंभीर होता. हातावर पोट असणाऱ्या या लोकांची पुरती बोळवण झाली होती. त्यांच्या खाण्यापिण्याचे हाल झाले होते. माहिममध्ये अशा निर्वासित कामगारांची संख्या साधारण एक हजारांच्या आसपास होती. त्यावेळी तेंडुलकर यांनी या सर्व कामगारांच्या दोन वेळेच्या जेवणाची सोय केली. शिवाय, महानगरपालिकेच्या वतीने येणारे जेवणाचे डब्बे गरुजूंपर्यंत पोहोचविण्याचे काम केले. सोबतच विधानसभाक्षेत्रातील स्थानिक लोकांना फूड पॅकेट वाटपाचे काम त्यांनी हाती घेतले. जवळपास ६५ हजार ६१८ भोजन पाकिटे वितरीत करण्यात आली. आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांच्या मदतीने त्यांनी विभागात जवळपास चार हजार ३५७ रेशन पाकीट मोफत वितरीत केली. यामध्ये तांदळापासून अगदी कणकेपर्यंत सर्व जिन्नस समाविष्ट होते. या योजनेचा लाभ विभागातील जवळपास चार हजारांहून अधिक लोकांनी घेतला. यासाठी स्थानिक कार्यकर्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मदत झाल्याचे त्या आवर्जून सांगतात.
 
 
 
Akshata Tendulkar_1 
 
 
 

 "‘कोविड’च्या या काळात माझ्या प्रेरणेचे मुख्य स्रोत म्हणजे भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी. ७० वर्षांचे आमचे पंतप्रधान, सतत हसतमुखाने, चेहऱ्यावर कुठेही त्रास, दुःखाचा लवलेश न आणता दिवसरात्र भारतवासीयांसाठी काम करत आहेत. त्यांच्याकडून मिळणारी ही ऊर्जाच माझ्या प्रेरणेचे गमक आहे. सोबतच आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांचा पाठिंबा आणि प्रेरणेमुळेच कार्यकर्ते जनसेवेचे कार्य करत आहोत."

 
 
आरोग्य केंद्र आणि खासगी डॉक्टरांचे क्लिनिक बंद असल्यामुळे ‘कोविड’ व्यतिरिक्त इतर रुग्णांचे बरेच हाल झाले होते. अशा वेळी तेंडुलकर यांनी विधानसभा क्षेत्रात आरोग्य तपासणी केंद्र उभारली. याअंतर्गत एकूण २५ केंद्र उभारण्यात आली. या केंद्रामध्ये ‘कोविड’ व्यतिरिक्त इतर रुग्णांची आरोग्य तपासणी केली. या केंद्रांना माटुंगा रेल्वे कॅम्प, प्रकाश नगर, मच्छीमार नगरमधील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. यासोबत विभागात ‘आर्सेनिक अल्बम-३०’ आणि आयुष मंत्रालयाद्वारे प्रमाणित असलेला आयुर्वेदिक काढा आणि इम्युनिटी बुस्टर किटचे वाटप करण्यात आले. एकूण १५ हजार किट नागरिकांना दिले. माहिम - दादर विभागात कोरोना संक्रमणाचे संकट वाढल्यानंतर त्या अनुषंगाने आरोग्य शिबिरांचे आयोजन तेंडुलकर यांनी केले. माहिम विधानसभेतील भागामध्ये मोफत ताप तपासणी, ऑक्सिजन पातळी आणि बी.जे.एस. या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे राबविली. यासोबतच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फेस मास्क आणि सॅनिटायझरचे वितरण नागरिकांमध्ये करण्यात आले. विभागातील सोसायट्या, झोपडपट्टी वसाहत, चाळी आणि सामाजिक संस्थांना इलेक्ट्रॉनिक फवारणीयंत्र आणि सोडियम हायपोक्लोराईड औषधांचे वितरण त्यांनी केले. विधानसभा क्षेत्रातील पोलीस आणि डॉक्टरांना फेस मास्क आणि ‘पीपीई’ किट दिले.
 
नागरिकांना घराबाहेर पडता येत नसल्याकारणाने त्यांच्याकडे जीवनावश्यक वस्तूंची वानवा निर्माण झाली होती. ही कमतरता लक्षात घेऊन तेंडुलकरांनी नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी स्वस्त दरात भाजी आणि फळे उपलब्ध करून दिली. त्यासाठी शेतकऱ्यांचा माल थेट लोकांपर्यंत पोहोचविला, त्यामुळे शेतकरी आणि नागरिक या दोघांचाही आर्थिक फायदा झाला. गणेशोत्सवादरम्यान चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. ई-पास सक्तीमुळे चाकरमान्यांची दलालांकडून आर्थिक लुटालूट झाली. शिवाय, मानसिक मनस्ताप सहन करावा लागला तो वेगळाच. या चाकरमान्यांच्या मदतीलाही तेंडुलकर धावून गेल्या. गणेशोत्सवानिमित्त कोकणात आणि इतर विभागांमध्ये जाणाऱ्या गणेशभक्तांना त्यांनी मोफत बससेवा उपलब्ध करून दिली. तसेच कोरोनाकाळामध्ये गर्दी होऊ नये म्हणून ‘गणेश विसर्जन दारोदारी’ या संकल्पनेमधून विभागातील गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी फिरत्या तलावाचे नियोजन त्यांनी भाजयुमोच्या वतीने केले. लोकहिताची कामे करण्याबरोबरच नागरिकांच्या सुविधांबाबत कमी पडणारे प्रशासन आणि सरकारलाही त्यांनी वेळोवेळी धारेवर धरले. वाढीव वीजबिल, खासगी रुग्णालयांची लूट व ढिसाळ कारभार या विरोधात त्यांनी वेळोवेळी आंदोलनाचा पवित्रा घेतला. लोकोपयोगी कामांसाठी पैसा हा लागतोच. आमदार आशिष शेलार यांनी पक्षामार्फत उपलब्ध करून दिलेल्या आर्थिक मदतीमुळेच हे लोककार्य शक्य झाल्याचे तेंडुलकर प्रामाणिकपणे सांगतात.
 
@@AUTHORINFO_V1@@