बोरिवली नॅशनल पार्कमध्ये नव्या वाघाची डरकाळी; नागपूरहून 'RT-1' वाघ रवाना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Dec-2020   
Total Views |

tiger_1  H x W:


शनिवारी मुंबईत आगमन 

मुंबई (अक्षय मांडवकर) - गेल्या महिन्यात बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'ने वाघिणीचे स्वागत केल्यानंतर आता पुन्हा एकदा उद्यान प्रशासन नव्या वाघाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. नागपूरच्या गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातून 'आरटी-वन' (RT1) हा वाघ मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. उद्यानाचे वन्यजीव बचाव पथक या वाघाला घेऊन शनिवारी मुंबईत दाखल होईल. मानव-वाघ संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आठ लोकांना ठार केल्याबद्दल आॅक्टोबर महिन्यात 'आरटी-वन' वाघाला बंदिस्त करण्यात आले होेते.
 
 
गेली वर्षभर चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा उपविभागात 'आरटी-वन' वाघ वावरत होता. यादरम्यान त्याने येथील वन व्याप्त क्षेत्रातील गावांमध्ये आठ ग्रामस्थांना ठार केले होते. त्यामुळे राज्याचा प्रधान वनसंरक्षकांनी त्याला पकडण्याचे आदेश फेब्रुवारी महिन्यात दिले होते. या वाघाला पकडण्यासाठी चंद्रपूर वन विभागाने मोठा फौजफाटा तैनात केला होता. अखेरीस २७ आॅक्टोबर रोजी मध्य रेल्वेच्या विरुर ते सिंधी या स्थानकांदरम्यान असलेल्या एका छोट्या पुलाखाली लावलेल्या पिंजऱ्यांमध्ये हा वाघ अडकला. त्यानंतर 'आरटी-वन' वाघाची रवानगी गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात करण्यात आली. दरम्यानच्या काळात 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'तील व्याघ्र विहाराकरिता एक प्रौढ नर वाघ देण्याची विनंती प्रशासनाने वन विभागाकडे केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत गुरुवारी या वाघाला गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातून मुंबईला पाठविण्यात आले आहे. 
 
 
राष्ट्रीय उद्यानाचे पथक 'आरटी-वन' वाघाला घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले असून शनिवारी ते राष्ट्रीय उद्यानात दाखल होईल, अशी माहिती उद्यानाचे संचालक आणि वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'ला दिली. या वाघाच्या आगमनाने उद्यानाच्या व्याघ्र विहारातील वाघांची संख्या सात होणार आहे. यामध्ये पाच मादी आणि दोन नर असल्याचे त्यांनी सांगितले. उद्यानातील व्याघ्र सफारीला चालना देण्याबरोबरच प्रजननाच्या दृष्टीने नव्या वाघाचे आगमन होणार आहे. हा वाघ सात ते आठ वर्षांचा प्रौढ आहे. गेल्या महिन्यात चंद्रपूरहून ११ महिन्यांच्या वाघिणीला मुंबईला पाठविण्यात आले होते. सद्यपरिस्थित राष्ट्रीय उद्यान पर्यटनासाठी खुले करण्यात आले असले आहे. मात्र, येथील व्याघ्र आणि सिंह सफारी बंद आहे. त्यामुळे पर्यटकांना या नव्या वाघांचे दर्शन सफारी खुली होईपर्यंत करता येणार नाही. 

 
@@AUTHORINFO_V1@@