मेघालयातून 'स्नेकहेड' माशाच्या नव्या प्रजातीचा शोध: मत्स्यपालनात मागणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2020   
Total Views |

channa _1  H x

मत्स्यपालनातील मागणीमुळे संवर्धन गरजेचे 

मुंबई (अक्षय मांडवकर) - हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या मेघालयमधून 'स्नेकहेड' या मत्स्यप्रजातीमधील नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे. 'चन्ना' कुळातील या नव्या मत्स्यप्रजातीचे नामकरण 'चन्ना एरिस्टोनी' असे करण्यात आले आहे. आकर्षक चमकदार रंग असणाऱ्या 'चन्ना' कुळातील माशांना मत्स्यपालन व्यवसायात मोठी मागणी असल्याने त्यांच्या मासेमारीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
 
 
मेघालयामधील छोट्या डोंगराळ प्रवाहांमध्ये 'चन्ना एरिस्टोनी' या नव्या 'स्नेकहेड' प्रजातीचा प्रामुख्याने अधिवास आहे. सापासारखे तोंड असल्यामुळे माशांच्या या प्रजातींना 'स्नेकहेड' म्हटले जाते. शरीरावरील विविध चकमणाऱ्या आकर्षक रंगासाठी या प्रजाती ओळखल्या जातात. नव्याने उलगडलेल्या 'चन्ना एरिस्टोनी' या 'स्नेकहेड'चे शरीर निळ्या-हिरव्या रंगाचे, चमकादर निळ्या रंगाचा पाठीचा कणा /पर आणि शरीरावर तपकिरी-लाल रंगाचे गोलकार टिपके आहेत. संशोधक प्रवीणराज जयसिन्हा, अरुमुगम उमा, एन.मौलीथरन, गजेंद्र सिंह, बंकित के.मुखिम आणि तेजस उद्धव ठाकरे यांनी या नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. बुधवारी 'अमेरिकन अमेरिकन सोसायटी ऑफ इचिथोलॉजिस्ट आणि हर्पेटोलॉजिस्ट'च्या 'कोपिया' या नियतकालिकामध्ये या शोधाचे वृत्त प्रकाशित झाले. 


channa _1  H x  
 

गेल्या काही वर्षांमध्ये 'स्नेकहेड' मत्स्यप्रजातींच्या शास्त्रीय वर्गीकरणाकडे संशोधकांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. कारण, अनेक मत्स्यप्रजातींचे विक्री करणारे व्यापारी आणि मत्स्यप्रेमींनी या नव्या प्रजाती संशोधकांच्या नजरेस आणून दिल्या आहेत. मेघालयातील मत्स्यप्रेमी एरिस्टोन एम.रेंडॉन्ग्संगी यांना सर्वप्रथम २०१९ मध्ये 'चन्ना एरिस्टो'नी ही नवी प्रजात आढळून आली होती. या प्रजातीचे छायाचित्र आम्हाला मिळाल्यानंतर त्यामध्ये नावीन्य असल्याचे लक्षात आले. त्यानंतर या प्रजातीचे नमुने गोळ्या करण्यासाठी आमच्या टीमने थेट मेघालय गाठल्याची माहिती संशोधक प्रविणराज जयसिन्हा यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. आकारशास्त्र, हाडांचे निरीक्षण आणि गुणसूत्रांच्या (डीएनए) आधारे निरीक्षण केल्यानंतर ही प्रजात 'चन्ना' कुळात नवीन असल्याचे आमच्या लक्षात आले. एरिस्टोन एम.रेंडॉन्ग्संगी यांनी या प्रजातीला आमच्या निदर्शनास आणून दिल्याने तिचे नामकरण त्यांचा नावाने 'चन्ना एरिस्टोनी' असे केल्याचे त्यांनी सांगितले. या माशाचा कमाल आकार हा १८० ते २०० सेमी असून लहान कीटक, मासे आणि किड्यांवर तो उपजीविका करतो. 
 

अधिवासाचे संवर्धन गरजेचे 
पूर्व हिमालय प्रदेशामधून यापूर्वी शोधलेल्या 'चन्ना पॅरदालिस' आणि 'चन्ना बिपुली' या दोन प्रजातींशी 'चन्ना एरिस्टोनी' ही प्रजात साधर्म्य साधते. मात्र, डीएनए चाचणी आणि आकारशास्त्राच्या आधारे आम्ही या नव्या प्रजातीचे नावीन्य समोर आणले आहे. ही प्रजात मेघालयातील खासी डोंगररांगांमधील अंतर्गत प्रवाह आणि छोट्या तळींमध्ये आढळते. तिला वर्षभर थंड तापमानासह आॅक्सिजनयुक्त पाण्याची गरज असते. अधिवासाचे झालेले नुकसान आणि आंतरराष्ट्रीय मत्स्यपालन व्यवसायातील मागणीमुळे या प्रजातीला धोका आहे. - तेजस ठाकरे, संशोधक 
 
'चन्ना' कुळाविषयी
'चिन्नडे' या गटामधील 'चन्ना' कुळामध्ये 'स्नेकहेड'च्या ४८ प्रजातींचा समावेश आहे. पूर्व हिमालयीन प्रदेशात प्रदेशनिष्ठ 'स्नेकहेड'मध्ये विलक्षण भिन्नता आहे. पूर्व हिमालय प्रदेशातील ४८ पैकी एकूण १० 'चन्ना' प्रजाती या प्रदेशनिष्ठ आहेत. त्यापैकी ११ प्रजाती ईशान्य भारतातील राज्यात आढळतात. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@