‘डिजिटल पेमेंट्स’चे पर्याय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2020   
Total Views |

Digital_1  H x
 
 
 
‘डिजिटल पेमेंट्स’ सध्या कोरोनाच्या साथीच्या दिवसांत वाढावी, असे सरकारी यंत्रणांना वाटत आहे. कारण ही वाढली की, माणसामाणसांतील संपर्क कमी होईल व कोरोनाच्या सध्याच्या काळात याचीच गरज आहे. तसेच, डिजिटल पेमेंट्समुळे ग्राहकांना चांगली सेवा मिळते. चलनातील रोकड कमी होते.
१ जानेवारी, २०२१ पासून ग्राहकांच्या दृष्टीने आर्थिक व्यवहार करताना त्यांना काही बदलांना सामोरे जावे लागणार आहे. त्यापैकी एक बदल म्हणजे, ‘पॉझिटिव्ह पे सिस्टीम’ धनादेशाद्वारे पैसे देण्यासाठी ‘पॉझिटिव्ह पे’ ही स्वयंचलित रोकड व्यवस्थापन सेवा असणार असून, धनादेशाशी संबंधित गैरव्यवहारांची तपासणी ही सेवा करणार आहे. बँक या माध्यमातून चेक देणारी व्यक्ती किंवा संस्था तसेच धनादेश ज्याला दिला असेल, त्याची तपासणी करेल. या दरम्यान, काही गडबड आढळल्यास धनादेश देणाऱ्यास तो परत दिला जाईल. ही प्रणाली १ जानेवारी, २०२१ पासून सर्व बँकांतून सुरू होणार आहे. या प्रणालीविषयी - मोठ्या रकमांचे धनादेश वटविण्यापूर्वी तपशील तपासण्यासाठी उपयुक्त. ग्राहकाने चेक दिल्यानंतर ज्याला चेक दिला आहे त्याची माहिती एसएमएस, एटीएम अथवा मोबाईल अॅपच्या मदतीने बँकेला कळवावी लागेल. ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या चेकबाबतच हे तपशील द्यावे लागतील. ‘चेक क्लिअर’ करण्यापूर्वी सर्व तपशील तपासला जाणार आहे. ग्राहकाने दिलेला चेक आणि अन्य तपशिलांमध्ये फरक जाणवल्यास त्याची माहिती त्वरित चेक ट्रंकेशन सिस्टीमला दिली जाईल. ‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’तर्फे सध्याच्या चेक ट्रंकेशन सिस्टीममध्ये ‘पॉझिटिव्ह पे’ प्रणाली विकसित केली जाईल. लवकरच बँकांकडे ही प्रणाली सोपविली जाईल. ‘पॉझिटिव्ह पे’ प्रणाली मिळाल्यावर बँका ती त्यांच्या सर्व खातेदारांना ५० हजार व त्यापेक्षा अधिक रकमेच्या धनादेशांसाठी लागू करतील. ही प्रणाली सुरुवातीला खातेदारांसाठी ऐच्छिक राहील.
दुसरा बदल - नुकत्याच जाहीर झालेल्या पतधोरणात कॉन्टॅक्टलेस (संपर्कविरहित) कार्ड व्यवहार करण्याची रक्कम जी फक्त रुपये दोन हजार होती, ती येत्या १ जानेवारीपासून पाच हजार रुपये करण्यात येणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने जाहीर केले. यामुळे डिजिटल व्यवहारांत वाढ होईल व लोकांचा सध्याच्या कोरोनाच्या काळात वस्तूंशी कमी संपर्क येईल. या व्यवहारात ग्राहकांना ‘पासवर्ड’ किंवा ‘पिन’ (पर्सनल आयडेन्टीफिकेशन नंबर) एटीएममध्ये ‘टाईप’ करावा लागत नाही. रिझर्व्ह बँकेने ग्राहकांच्या सुटकेसाठी कार्ड वापरून कोणताही व्यवहार दोन हजार रुपयांहून अधिक रकमेचा केला, तर त्याच्या रजिस्टर्ड मोबाईलवर ‘ओटीपी’ (वन टाईम पासवर्ड) येणार व तो यंत्रणेला कळविल्यानंतरच दोन हजारांहून अधिक रकमांचे व्यवहार करता येणार. बँक बचत किंवा चालू खाते उघडणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला डेबिट कार्ड देते. हे डेबिट कार्ड ग्राहक देशांतर्गत एटीएममध्ये आणि पॉईंट ऑफ सेल टर्मिनल्सवर म्हणजे, खरेदीसाठी, पेट्रोल भरण्यासाठी, हॉटेलचे बिल भरण्यासाठी वगैरे वगैरे कारणांसाठी वापरू शकतो.
भारतात किंवा परदेशात ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी तसेच कॉन्टॅक्टलेस पेमेंट सुविधेसाठी बँकेकडून या सेवा मुद्दाम घ्याव्या लागतात. कोणाही ग्राहकाने ऑनलाईन व्यवहार करण्याची सोय घेतली असेल किंवा कॉन्टॅक्टलेस पेमेंटची सोय घेतली असेल व या सेवांचा ग्राहक जर वापर करीत नसेल तर या सेवा बँकेने रद्द कराव्यात, असा फतवा रिझर्व्ह बँकेने काढला असून, १ ऑक्टोबर, २०२० पासून हा अमलात आलेला आहे. बँकेने समजा न वापरण्यामुळे अशा सेवा बंद केल्या असतील, तर त्या बँकेकडून पुन्हा सुरू करून घेता येतात. कॉन्टॅक्टलेस व्यवहार करण्यासाठी एटीएमच्या किंवा पीओएस टर्मिनलच्या जवळ ते कार्ड धरावे, जर याने व्यवहार होत नसेल तर कार्डावर, हलकासा फटका मारावा. हे कार्ड, कार्ड रिडमपासून फक्त चार सेंटिमीटर अंतरापर्यंतच हवे, तरच व्यवहार होऊ शकतो. हा व्यवहार सुरक्षिततेच्या दृष्टीने कमी जोखमीचा आहे. ग्राहकांसाठी हे कार्ड वापरणे हा चांगला अनुभव आहे. वरिष्ठ नागरिक ज्यांना डिजिटल व्यवहारांची भीती वाटते, असे वरिष्ठ नागरिकही कार्डाने कॉन्टॅक्टलेस व्यवहार सहजपणे करू शकतात. हे कार्ड जर हरविले तर त्वरित ब्लॉक करावे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, भारतात ५.१ दशलक्ष (५१ लाख) पीओएस टर्मिनल्स आहेत. कॉन्टॅक्टलेस कार्ड व्यवहार हे नवे तंत्रज्ञान असल्यामुळे या नव्या तंत्रज्ञानाशी मिळतेजुळते बदल पीओएस टर्मिनल्स मध्येही करावे लागतील.
बँकिंग अॅप्स (आयएमपीएस)
तंत्रज्ञानात वरचेवर आणि जलद बदल होत असल्यामुळे ‘आयएमपीएस’ला आता पारंपरिक ऑनलाईन पेमेंट चॅनेल मानावे लागेल. हे व्यवहार करताना, ज्याला पैसे द्यायचे आहेत किंवा पाठवायचे आहेत, त्याच्या बँक खात्याचा सर्व तपशील माहीत असावा लागतो. मोठ्या रकमांच्या व्यवहारांसाठी हे चॅनेल चांगले आहे. बऱ्याच बँका या अॅपद्वारे कमाल दोन लाख रुपयांपर्यंतचा प्रत्येक व्यवहार करू देतात. ग्राहक दिवसाला असे पाच व्यवहार करू शकतात. कारण आयएमपीएस दररोजच्या व्यवहारांची कमाल मर्यादा दहा लाख रुपये आहे. बहुतेक, बुकिंग अॅप्स हे नेट बँकिंग प्रणालीने वापरता येतात. आयएमपीएस व्यवहार कोणत्याही ‘डिव्हाईस’वरून करता येतो. ज्याला पैसे देणार त्याच्या खात्याचा संपूर्ण तपशील भरावा लागतो व ही प्रक्रिया मोठी असून बऱ्याच विंडो ओपन करून त्यात तपशील भरावा लागतो.
 
वॉलेट्स आणि यूपीआय
 
काहीकाळ वॉलेट्स प्रणाली फार लोकप्रिय होती, कारण प्रत्येक व्यवहारात ‘डिस्काऊंट’ मिळत असे व ही पद्धती ‘युजर फे्ंरडली’ म्हणजे वापरणाऱ्यांसाठी सोपी आहे. सध्या ‘यूपीआय’ अॅपचा वापर वाढला आहे. ‘गुगल पे’ अॅप वापरणाऱ्यांची संख्याही फार मोठी आहे. यूपीआय अस्तित्वात आल्यानंतर वॉलेट्सचा वापर कमी झाला. बरेच ग्राहक वॉलेट्सपेक्षा यूपीआयला महत्त्व देतात, वॉलेट प्रणाली वापरताना सुरुवातीला पैसे जमा करावे लागतात. मग व्यवहार सुरू होतो. यूपीआयमध्ये थेट एका बँकेतून दुसऱ्या बँकेत रक्कम जाते. छोट्या रकमांच्या व्यवहारांसाठी यूपीआय कार्यरत करण्यात आले. यूपीआयमार्फत सर्वाधिक इलेक्ट्रॉनिक ट्रान्स्फर्स केली जातात व यूपीआय वापरणाऱ्यांच्या संख्येत वाढ होतच आहे. व्यापाऱ्यांना कमी खर्चात या प्रणालीतून पैसे मिळतात, यासाठी यंत्र लागत नाही. पैसे पाठविणाऱ्याला व स्वीकारणाऱ्याला कोणत्याही पायाभूत सोयी लागत नाहीत. फक्त ‘क्यूआर’ (क्विक रिस्पॉन्स) कोड हवा, हा स्कॅन करून पेमेंट करता येते. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला रक्कम हस्तांतरित करायची असेल, तर ती यूपीआय आयडीमार्फत करता येते. हल्ली कित्येक कार्ड न वापरता हातातल्या मोबाईलवरूनच सर्व व्यवहार करतात, सर्व युटिलिटी बिल्स हल्ली हातातल्या फोनवरून करता येतात, बँकिंग व्यवहार, खाते उघडणे, मुदत ठेवीत रक्कम गुंतविणे इत्यादी बँकिंग व्यवहारही हातातल्या मोबाईलवरून करता येतात, ‘गुगल पे’द्वारा पेमेंट करताना ‘गुगल पे’ हे ग्राहकाच्या बँक खात्याला संलग्न करावे लागते. कोणीही व्यक्ती यूपीआयद्वारे प्रत्येक व्यवहार कमाल एक लाख रुपयांपर्यंतचाच करू शकते, म्हणजे एक लाख रुपयेच ट्रान्स्फर करू शकते, रोजची मर्यादा ही एक लाख रुपयेच आहे. यूपीआयद्वारे २४ तासांत जास्तीत जास्त दहा व्यवहार करण्यास मुभा आहे. या काळात फळविक्रेत, भाजीविक्रेते हेदेखील हे अॅप वापरतात, कारण यात व्यवहार खर्च कमी आहे व एकदा ‘सेट अप’ करावा लागतो, प्रत्येक व्यवहाराच्या वेळी, व्यवहाराची रक्कम किती असो, ‘पासवर्ड’चा वापर करावाच लागतो, ही प्रणाली मोबाईल नेटवर चालते, जर नेट बंद असेल किंवा उपलब्ध नसेल तर व्यवहार होऊ शकत नाहीत. जर तुम्ही डिव्हाईस बदलले तर पुन्हा ‘सेट अप’ बदलावा लागतो.
भविष्यातील डिजिटल पेमेंट प्रणाली एनएफसी (नीअर फिल्ड कम्युनिकेशन) असणार आहे. ही कॉन्टॅक्टलेस कार्डसारखी असेल, यूपीआय नेटवर्क चालविणारी ‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ एनएफसी, यूपीआयशी संलग्न करणाऱ्या प्रक्रियेवर काम करीत आहे. एनएफसी प्रणाली येईपर्यंत कॉन्टॅक्टलेस कार्ड जास्त सोयीचे आहे व यूपीआय प्रणाली जास्त व्यवहारी आहे, दरम्यान, ग्राहकांच्या सोयीसाठी बँकांच्या आरटीजीएस आणि एनईएफटी सेवा आता २४ तास चालू ठेवण्यात आल्या आहेत.
@@AUTHORINFO_V1@@