जॉर्न स्मायलीचा बाप जॉन ल कॅरे गेला...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
4 _1  H x W: 0
 
 
 
 
परवा १२ डिसेंबर, २०२० रोजी जॉन ल कॅरे मरण पावला. गेल्या १४ महिन्यांच्या काळात त्याने आणखी काहीलिहिलं आहे का, याबद्दल त्यांच्या अधिकृत प्रवक्त्याने अजून काही घोषणा केलेली नाही.
 
 
त्याचं मूळ नाव होतं डेव्हिड जॉन मूर कॉर्नवेल. पण, साहित्यक्षेत्रात तो प्रसिद्ध होता ‘जॉन ल कॅरे’ या नावाने. कारण, १९६१ साली त्याची पहिली गुप्तहेर कादंबरी ‘कॉल फॉर द डेड’ प्रसिद्ध झाली, तेव्हा तो पश्चिम जर्मनीच्या बॉन राजधानीत ब्रिटिश दूतावासात राजनैतिक अधिकारी होता. सरकारी नोकरांनी पुस्तकं वगैरे लिहिणं कोणत्याही सरकारला मान्य नसतं, त्यामुळे ‘जॉन ल कॅरे’ हे टोपणनाव घेतलं.
 
 
१९६२ साली त्याचं, ‘अ मर्डर ऑफ क्वालिटी’ हे दुसरं पुस्तक आलं. पहिल्या इतकंच तेदेखील वाचकांना आवडलं. मग लगेच १९६३ साली त्याचं ‘द स्पाय हू केम इन फ्रॉम कोल्ड’ हे तिसरं पुस्तक आलं. ते इतकं कमालीचं गाजलं की, मग मात्र त्याला खर्‍या नावाने प्रकट व्हावंच लागलं; अर्थातच त्यामुळे सरकारी नोकरी सोडावी लागली. पण, लगेचच त्याच्या त्याच पुस्तकावर मार्टिन रिट् या प्रसिद्ध अमेरिकन निर्माता-दिग्दर्शकाने त्याच नावाचा चित्रपट काढला. त्यात प्रख्यात अभिनेता रिचर्ड बर्टन नायकाच्या भूमिकेत होता.
 
 
‘पॅरामाऊंट पिक्चर्स’ या कंपनीने वितरित केलेला हा चित्रपट तिकीटबारीवरही प्रचंड गाजला. त्यामुळे जॉन ल कॅरेला नोकरी करण्याची गरजही उरली नाही. तो गुप्तहेर कथा लिहित राहिला, त्यांच्यावर चित्रपट आणि दूरदर्शन मालिका येत राहिल्या. अगदी आयुष्याच्या अंतापर्यंत तो लेखन करीतच होता, असं म्हणायला हरकत नाही. कारण, ऑक्टोबर २०१९मध्ये त्याची ‘एजंट रनिंग इन द फिल्ड’ ही अखेरची गुप्तहेर कादंबरी प्रसिद्ध झाली, तेव्हा तो ८८ वर्षांचा होता. परवा १२ डिसेंबर, २०२० रोजी तो मरण पावला. गेल्या १४ महिन्यांच्या काळात त्याने आणखी काही लिहिलं आहे का, याबद्दल त्यांच्या अधिकृत प्रवक्त्याने अजून काही घोषणा केलेली नाही.
 
 
पाश्चिमात्य साहित्य समीक्षकांच्या मतानुसार वाचकाला निखळ आनंद देणारं, त्याचं मनोरंजन करणारं किंवा ज्या कथानकाचा शेवट आनंदी असतो, असं साहित्य हे खरं साहित्य नव्हेच. ते झालं रंजनवादी साहित्य. प्रत्यक्षातलं मानवी जीवन हे फार कठोर आहे, क्रूर आहे. ते माणसाला ठायीठायी रडवतं. आनंद मिळेल असं वाटत असतानाच माणसाच्या नशिबी दारुण दु:ख येत. त्याचं चित्रण जे करतं, ते खरं साहित्य. थोडक्यात, आपल्या परिचित भाषेत सांगायचं, तर पडद्यावर धमाल करून सोडणारा शम्मी कपूर किंवा किशोर कुमार हे खरे नायक नव्हेतच, ते आपले नुसते रंजनवादी नायक आणि प्रेयसी किंवा बायको दुसर्‍याचा हात धरून पळाली म्हणून दारू पिऊन टेर होणारे आणि ट्यॅ ट्यॅ करून रडणारे दिलीपकुमार सारखे नायक हे खरे नायक!
 
तसाच त्यांचा आणखी एक सिद्धांत आहे की, माणूस हा संपूर्ण चांगला किंवा संपूर्ण वाईट असा कधीच नसतो. ‘सुष्ट’ आणि ‘दुष्ट’ अशा दोन्ही प्रवृत्ती एकाच माणसात असतात, त्यामुळे साहित्यात खलनायक हा काळाकुट्ट दुर्गुणांचा अर्क आणि नायक हा पांढरा शुभ्र, सद्गुणांचा अर्क, अशी जी विभागणी केली जाते, ती चुकीची आहे. आता पश्चिमी समीक्षकांनी काहीही म्हटलं की, आपल्याकडच्या समीक्षकांनी त्याची री ओढलीच पाहिजे आणि झोडपून काढायला रामायण-महाभारत आहेच. मग लगेच, राम-लक्ष्मण, कृष्ण-पांडव हे पांढरे शुभ्र आणि रावण, कौरव, कर्ण हे काळेकुट्ट ही मांडणी चुकीची आहे, वगैरे विद्वता पाजळली जाते.
 
असो, तर असंच जॉन ल कॅरेबाबतही घडलं पाश्चिमात्य साहित्यातही बहुसंख्य लेखक आपल्या कथानकात शेवटी, सत् प्रवृत्ती असत् प्रवृत्तीवर मात करून विजयी होते, असंच दाखवतात. खुद्द ब्रिटिश लेखकांमध्ये उदंड लोकप्रियता लाभलेले सर आर्थर कॉनन डॉयल, अ‍ॅगाथा ख्रिस्ती यांच्यासारखे लेखकही खलनायक आणि नायक यांना अगदी काळ्या-पांढर्‍या रंगातच रंगवतात. पण, तरी कॉनन डॉयलचा शेरलॉक होम्स किंवा अ‍ॅगाथाचा हरक्यूल पॉयरो हे मुख्यत: गुन्हेसंशोधन आहेत, शत्रू देशाची गुप्त रहस्ये भेदणारे आंतरराष्ट्रीय गुप्तहेर नव्हेत.
 
 
आंतरराष्ट्रीय गुप्तहेरांच्या कारवायांवर पुस्तकं लिहून अमाप लोकप्रियता मिळविली होती, ती इयान फ्लेमिंगने. ‘कॅसिनो रॉयल’ ही त्याची पहिली गुप्तहेर कादंबरी १९५३ साली प्रकाशित झाली. पुढच्या दहा वर्षांत त्याच्या आणखी ११ कादंबर्‍या आल्या. त्या सगळ्याच अत्यंत गाजल्या. 1963च्या सप्टेंबर महिन्यात जेव्हा जॉन ल कॅरेच्या ‘द स्पाय हू केम...’ने वाचकांचं एकदम लक्ष वेधून घेतलं, तेव्हा इयान फ्लेमिंगच्या ‘डॉ. नो’ या कादंबरीवर चित्रपट निघून तो तिकीटबारीवर प्रचंड लोकप्रिय होऊन वर्ष होत आलं होतं.
 
 
इयान फ्लेमिंगच्या ‘जेम्स बाँड’ या कथानायकाने जनमानसावर जणू गारुड केलं होतं. तसंच त्याने आंतरराष्ट्रीय गुप्तहेर या माणसाची एक प्रतिमा जनमानसात रूढ केली होती. हा नायक उंच, तगडा, देखणा, कुशल संभाषणपटू, उत्तम नेमबाज आणि पक्का देशभक्त असतो. ब्रिटिश राष्ट्राचं सर्वतोपरी हितरक्षण हे त्याचं सर्वोच्च ध्येय असतं. त्यापासून कामिनी, कांचन, अधिकारपद आदी कोणतेही लोभ-मोह त्याला विचलित करू शकत नाहीत. थोडक्यात, इयान फ्लेमिंगचा गुप्तहेर नायक हा पांढरा शुभ्र, सद्गुणांचा पुतळा आहे, तर खलनायक जे मुख्यत: सोव्हिएत गुप्तहेर आहेत, ते दुष्ट आणि दुर्गुणांचे गाळीव अर्क आहेत.
 
 
जॉन ल कॅरेचा गुप्तहेर नायक ‘जॉर्ज स्मायली’ हा जेम्स बाँडसारखा चॉकलेट हिरो अजिबात नाही. तो सामान्य माणूस आहे. ठेंगणा, जाडगेला, एखाद्या सरकारी कचेरीत कारकून शोभेल असा. तो देशभक्त जरूर आहे. पण, आपल्या खात्यातले वरिष्ठ आणि त्यांचेही वरिष्ठ असलेले राजकारणी नेते, मंत्री इत्यादी लोक हे देशापेक्षा पक्षीय राजकारण, पदोन्नती इत्यादी गोष्टींना जास्त महत्त्व देतात, हे त्याला पुरेपूर माहीत आहे. तो कोणत्याही मोहक भ्रमात नाही. या वरिष्ठांच्या बुद्धिबळाच्या खेळातलं आपण एक सामान्य प्यादं आहोत नि वेळ पडल्यास प्याद्याचा बळी दिला जातो. तीच वेळ आपल्यावरही येऊ शकते, याची त्याला पूर्ण जाणीव आहे.
 
 
त्याचबरोबर आपलं काय काय आहे, हेही त्याला पक्कं माहिती आहे. शत्रूच्या गोटात आपली माणसं घुसवणं, आपल्याला सतत माहिती पुरविणारी हेरजाळी निर्माण करणं आणि त्यांच्याद्वारे येणार्‍या माहितीतून शत्रूच्या भावी बेतांची वित्तंबातमी काढत राहून ती आपल्या वरिष्ठांना त्वरेने पोहोचविणं, हे आपलं काम आहे, हे जॉर्ज स्मायलीला अचूक माहिती होतं. ते तो अगदी कमाल कार्यक्षमतेने करत होता.
 
हे त्याचं सामान्य असणं, कोणताही अमानवी गुण नसतानाही कार्यक्षम हेरजाळी निर्माण करणं, हे वाचकांना भावलं आणि जेम्स बाँडप्रमाणेच जॉर्ज स्मायलीही लोकप्रिय कथानायक झाला. पाश्चिमात्त्य साहित्य आणि चित्रपट समीक्षकांनाही लगेच इयान फ्लेमिंग आणि जेम्स बाँड यांना ‘रंजनवादी’, तर जॉन ल कॅरे आणि जॉर्ज स्मायली यांना ‘वास्तववादी’ ठरवून टाकलं. समीक्षक काही म्हणोत, रसिक वाचक आणि रसिक प्रेक्षक यांना दोघेही आवडले. अगदी खरं पाहायचं म्हटलं, तर इयान फ्लेमिंगच्या कादंबर्‍यांमधला बाँड हा अतिमानवी, सुपरमॅन नाही. पण, तो पक्का देशभक्त मात्र नक्कीच आहे आणि एकट्याने शत्रूची कारस्थानं उधळून लावण्याची त्याची क्षमता आहे. भरपूर अभ्यासाने त्याने ती क्षमता मिळविली आहे. पण, बाँड चित्रपटांनी मात्र त्याला सुपरमॅन बनवून टाकलं आहे.
 
 
इयान फ्लेमिंग आणि जॉन ल कॅरे हे दोघेही एकेकाळी स्वतःच ब्रिटिश गुप्तहेर होते. मग त्यांच्या कथानायकांमध्ये असा फरक का असावा? दोन्ही लेखकांच्या पूर्वायुष्यात त्याचं उत्तर सापडतं. इयान फ्लेमिंग हा श्रीमंत घरातला होता. त्याचा बाप ब्रिटिश पार्लमेंटात खासदार होता आणि पहिल्या महायुद्धात ब्रिटिश सैन्यात भरती होऊन लढताना तो ठार झाला. स्वतः इयान दुसर्‍या महायुद्ध काळात ब्रिटिश नौदलात, विशेषतः नौदलाच्या वेगळ्या हेरखात्यात कमांडरपदावर कार्यरत होता. नागरी सेवकांपेक्षा सैनिक सेवक हे अधिक शिस्तबद्ध असतात. तसंच त्यांच्या प्रशिक्षणात त्यांच्यावर देशभक्तीचे असे प्रखर संस्कार केले जातात की, सैनिकी सेवक हे स्वदेशाशी गद्दारी करून शत्रूला फितूर होण्याचं प्रमाण तुलनेने कमी असतं. फ्लेमिंगचे हे सगळे गुण आपल्याला बाँडमध्ये उतरलेले दिसतात. अगदी कमांडर या त्याच्या हुद्यासकट!
 
या उलट जॉन ल कॅरेचा बाप हा चक्क एक नामांकित गुंड होता. तत्कालीन ईस्ट लंडनमधल्या रॉनी क्रे आणि रेगी क्रे या जुळ्या भावांच्या गुंड टोळीत सामील होऊन त्याने एकही गुन्हा करण्याचं बाकी ठेवलं नव्हतं. शिवाय जॉन ल कॅरेचा जन्म १९३१ सालचा. दुसरं महायुद्ध सुरू झालं, तेव्हा तो फक्त आठ वर्षांचा होता नि संपलं तेव्हा फक्त १४ वर्षांचा होता. त्यामुळे त्याला कोणत्याच दलातील सैनिकी जीवनाचा अनुभव नव्हता. त्याने फ्रेंच आणि जर्मन भाषेत प्रावीण्य मिळविल्यामुळे ‘फॉरिन सर्व्हिस’वाल्या लोकांनी त्याला उचलला. ब्रिटनच्या गुप्तचर विभागाची दोन खाती आहेत-
 
 
‘एम.आय.५’ हे अंतर्गत हेरगिरी करतं आणि दुसरं ‘एम.आय.६’ हे शत्रू किंवा मित्रराष्ट्रांवर नजर ठेवतं. ‘एम.आय.६’ने जॉन ल कॅरेला भरती करून घेऊन ‘डिप्लोमॅट-मुत्सद्दी’ या आवरणाखाली बॉन या पश्चिम जर्मनीच्या राजधानीतल्या ब्रिटिश वकिलातीत पाठवलं. त्याचं काम शत्रूची हेरजाळी उद्ध्वस्त करणं हे नसून, शत्रूच्या हेरजाळ्यांमध्ये आपली माणसं घुसवणं किंवा शत्रूच्या प्रदेशात आपले हस्तक निर्माण करणं, असं होतं. हेच सगळे गुण त्याचा कथानायक जॉर्ज स्मायली याच्यात उतरलेले आपल्याला दिसतात, म्हणजेच जेम्स बाँडची हेरगिरी आणि जॉर्ज स्मायलीची हेरगिरी यांच्यात मुळात गुणात्मकच फरक आहे. शत्रू प्रदेशात विद्ध्वंस घडवून आणणं, हे बाँडचं काम आहे, तर शत्रू प्रदेशात आपल्याला अनुकूल माणसं उभी करणं, हे स्मायलीचं रचनात्मक काम आहे.
 
 
ते कसंही असो. रसिक, जाणत्या वाचकांना त्यांच्या सगळ्या गुणदोषांसकट दोघेही आवडतात. जॉन ल कॅरेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, तो सोव्हिएत राज्यव्यवस्थेवर जितकी झोड उठवायचा, तितकीच मायदेश ब्रिटन आणि मित्रदेश अमेरिका यांच्या कथित लोकशाही व्यवस्थेवरही करायचा. ब्रिटनमधले हुजूर आणि मजूर हे दोन्ही प्रमुख पक्ष सारखेच टाकाऊ असून ‘ब्रेक्झिट’चा निर्णय हा शुद्ध मूर्खपणा आहे, असं त्याचं मत तो जाहीरपणे सांगायचा. २०१९मध्ये प्रसिद्ध झालेली त्याची शेवटची कादंबरी ‘ब्रेक्झिट’वरच आधारलेली आहे.



@@AUTHORINFO_V1@@