'स्वतःच्या अहंकारासाठी जनतेचं किती नुकसान करणार ?'

    16-Dec-2020
Total Views |

metro ashsih shelar_1&nbs




मुंबई :
कांजूरमार्ग मेट्रो कारशेडप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चपराक दिली आहे. कांजूर मेट्रो कारशेडचे काम ताबडतोब थांबवा, परिस्थिती जैसे थे ठेवा, असे आदेश उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे. यावरून भाजप आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.



ट्विट करत आशिष शेलारांनी म्हंटले की," आरेबाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश मान्य नाहीत.त्यानंतर कांजुरमार्ग मेट्रो कारशेडबाबत स्वतःच नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल मान्य नाही.आता उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय तरी मान्य करणार का? स्वतःच्या अहंकारातून अजून मुंबईकरांचे किती नुकसान करणार? अहंकार! अहंकार आणि अहंकार!!" असे म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.



कांजूर कारशेड प्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने मेट्रो कारशेडचे काम ताबडतोब थांबवण्याचे आदेश दिले. तसेच परिस्थिती जैसे थे ठेवण्याचेही आदेश कोर्टाने दिले आहेत. हे आदेश देतानाच कोर्टाने येत्या फेब्रुवारीत या प्रकरणावर अंतिम सुनावणी करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. यापूर्वीही उच्च न्यायालयाने १०२ एकर जागेचा भूखंड एमएमआरडीएला देत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात त्रुटी आढळल्या आहेत, असे मत नोंदविले होते.जिल्हाधिका-ऱ्यांनी आपला निर्णय मागे घेत, नव्याने सुनावणी घ्यावी. अन्यथा आम्ही त्या आदेशाची योग्यता ठरवू, असे मत न्यायालयाने यावर नोंदवले होते. दरम्यान, या प्रकरणी राज्य सरकारला म्हणणे मांडण्यास सांगितले असता अधिवेशनाचे कारण पुढे करण्यात आले आहे. राज्य सरकारतर्फे बुधवारपर्यंतचा वेळ मागण्यात आला होता. खासगी विकासकानीही कांजूरमार्गच्या जागेवर दावा सांगत दिवाणी याचिका दाखल केली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित याचिकाकर्त्यांचीही बाजू ऐकून घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यानंतर उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.