सह्याद्रीतील 'हरणटोळ' सापांचे नामकरण; पाच नव्या प्रजातींचा उलगडा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2020   
Total Views |

vine snake _1  

पश्चिम घाटामधील हरणटोळ सापांवर संशोधन 

 
मुंबई (अक्षय मांडवकर) - पश्चिम घाटाच्या विस्तीर्ण डोगंररागांमधून हरणटोळ सापाच्या  ५ प्रजातींचा शोध लावण्यात संशोधकांना यश मिळाले आहे. दहा वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर हरणटोळ सापाच्या प्रजातींचे विस्तृतपणे वर्गीकरण करुन हा शोध लावण्यात आला आहे. या संशोधनामुळे भारतात खास करुन पश्चिम घाटामध्ये आढळणाऱ्या हरणटोळ सापाच्या प्रजातींमध्ये वैविध्य असल्याचे उघड झाले आहे. 
 

सदाहरित जंगलांमध्ये अधिवास करणाऱ्या बारीक वेलीसारख्या हरणटोळ सापांसंबंधी महत्त्वाचे संशोधन समोर आले आहे. भारत आणि श्रीलंकेमध्ये या सापांचा प्रामुख्याने अधिवास आहे. पश्चिम घाटामध्ये आढळणारा हा साप 'अहेतुल्ला नासुटा' या एकच प्रजातीचा असल्याचे सुरुवातीपासून मानले जात होते. कारण, त्याच्यावर सखोल अभ्यास झालेला नव्हता. मात्र, सखोल संशोधनाअंती पश्चिम घाटामध्ये 'अहेतुल्ला' या पोटजातीत पाच वेगवेगळ्या प्रजाती असल्याचे समोर आले आहे. यामधील दोन प्रजाती सह्याद्रीमधून तर उर्वरित तीन प्रजाती या पश्चिम घाटाच्या दक्षिण भागातून उलगडण्यात आल्या आहेत. या संशोधनाचे वृत्त शुक्रवारी 'झूटॅक्सा' या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले. 'आयआयसीएस'चे संशोधक अशोक मल्लिक,  अच्युतन श्रीकांतन, प्रिन्शिया डिसूजा,  'मद्रास स्नेक पार्क'चे कार्तिक शंकर, समुथैंगी राजगोपाळन आणि 'बीएनएचएस'चे सौनक पाल यांनी या सापांचा उलगडा केला आहे. या शोधामुळे भारतात आढळणाऱ्या हरणटोळ सापांची संख्या १३ झाली आहे.

 
 

महाराष्ट्राच्या सह्याद्रीत आढळणाऱ्या हरणटोळ सापांचे नामकरण आता 'अहेतुल्ला सह्याद्रेंसिस' आणि 'अहेतुल्ला बोरेयालिस', असे केल्याची माहिती संशोधक सौनक पाल यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'ला दिली. यामधील 'बोरेयालिस' ही प्रजात माथेरान, लोणावळ्यापासून उत्तर कर्नाटकपर्यंत आढळते. तर 'सह्याद्रिसिस' (सह्याद्रेंसिस) ही प्रजात संपूर्ण पश्चिम घाटात आढळत असल्याचे त्यांनी सांगितले. या शोधामुळे हरणटोळ सापाच्या वेगवेगळ्या प्रजातींचे वर्गीकरण झाले असून वेगवेगळ्या प्रदेशात आढळणारी ही प्रजात एकच नसल्याचे समोर आल्याचे त्यांनी नमूद केले. याशिवाय केरळ-तामिळनाडूच्या सीमेवर अगस्तमलाई डोंगराळ प्रदेशात आढळणाऱ्या हरणटोळचे 'अहेतुल्ला त्रावणकोरिका', कर्नाटकात आढळणाऱ्या हरणटोळचे 'अहेतुल्ला फार्नस्वर्थी' आणि उत्तर केरळ प्रदेशात आढळणाऱ्या हरणटोळचे 'अहेतुल्ला मलबारिका', असे नामकरण करण्यात आले आहे. या पाचही प्रजाती पश्चिम घाटामध्ये प्रदेशनिष्ठ आहेत.


 

 

@@AUTHORINFO_V1@@