वनक्षेत्राबाहेरील वन्यजीवांच्या वाढत्या पाऊलखुणा घातक !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Nov-2020   
Total Views |
leopard attack _1 &n



दोन दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्यातील उमरेड-पवनी-कर्‍हाडला वन्यजीव अभयारण्यात वाघिणीचे मृत शरीर मिळाले. शवविच्छेदन अहवालातून तिच्या पोटात चार पिल्ले असल्याचे समजले. म्हणजे एकूणच आपण पाच वाघांना गमावले. जानेवारी ते नोव्हेंबर २०२० या ११ महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रात झालेला हा १६ व्या वाघाचा मृत्यू होता. याच कालावधीत आपण १५९ बिबट्यांना गमावले. यामधील ८६ बिबटे नैसर्गिकरीत्या, ६४ बिबटे अपघातांमध्ये, १३ शिकारीमुळे आणि दोन बिबटे विजेचा धक्का लागून मृत पावले आहेत. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात मृत्यू झालेल्या बिबट्यांची ही सर्वाधिक संख्या आहे, तर वन विभाग आणि ‘भारतीय वन्यजीव संस्थान’च्या (डब्ल्यूआयआय) मोजणीनुसार विदर्भातील संरक्षित वनक्षेत्रांमध्ये ३३१ वाघ आणि ६६९ बिबटे असल्याचे समोर आले आहे. यामध्ये संरक्षित वनक्षेत्रांबाहेरील वाघ आणि बिबट्यांची संख्या मोजण्यात आलेली नाही. मात्र, संरक्षित क्षेत्राबाहेर अधिवास करणार्‍या वन्यजीवांची संख्याच महत्त्वाची आहे. सद्यपरिस्थितीत वाघ आणि बिबट्यांचा अधिवास हा मानवी वस्तीनजीक वाढत आहे. खाद्याच्या सहज उपलब्धतेमुळे हा वावर वाढत असल्याचे प्राथमिक निरीक्षण आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे उदाहरण घ्यावयाचे झाल्यास, २०१८ च्या ‘राष्ट्रीय व्याघ्र गणने’नुसार या जिल्ह्यात १६० वाघांचा अधिवास आहे. त्यापैकी ८० वाघांचा अधिवास हा संरक्षित वनक्षेत्राबाहेर आहे. चंद्रपूर शहरानजीक या वाघांचा वावर अधूनमधून निदर्शनास येत असतो. जिल्ह्यात प्रजननक्षम असलेल्या ६३ वाघिणी आहेत. साधारण दोन ते तीन वर्षांनंतर वाघिण बछड्यांना जन्म देते. याअनुषंगाने २०१८ नंतर जिल्ह्यात ७० वाघ वाढललेले असू शकतात. उसाच्या शेतात घर करुन राहणारे बिबटेही संरक्षित वनक्षेत्राबाहेर वावरणार्‍या वन्यजीवांचे एक उदाहरण आहे. नाशिक जिल्ह्यातील मानव-बिबट्या संघर्ष हा उसाच्या शेतात राहणार्‍या बिबट्यांमुळे निर्माण झालेला आहे. रत्नागिरी शहरात बिबट्याच्या वाढलेल्या वावराचे उदाहरणही ताजे आहे. एकूणच पुढल्या काही वर्षांत संरक्षित वनक्षेत्राबाहेर वावरणार्‍या वन्यजीवांचा मुद्दा कळीचा होणार आहे. त्यासाठीचे नियोजन करणे, हे वन विभागासमोरील मोठे आव्हान असणार आहे.
 
 

 
वाढत्या पाऊलखुणा घातक 
 
 
वन्यजीवांच्या संरक्षित वनक्षेत्राबाहेरील वाढत्या पाऊलखुणा या त्यांच्यासोबत मानवी अस्तित्वासाठीही घातक ठरणार्‍या आहेत. गेल्या ११ महिन्यांमध्ये महाराष्ट्रात बिबट्याच्या हल्ल्यात २३ मानवी मृत्यू झाले आहेत. गेल्या दहा वर्षांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मानवांची ही सर्वात मोठी संख्या आहे. वाघांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्याही ५०च्या आसपास आहे. यामधील वाघांचे बहुतांश हल्ले हे संरक्षित वनक्षेत्रात शिरलेल्या माणसांवर झाले आहेत. गुरेचराई किंवा मोहाची फुले वा तेंदूची पाने काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तींवर हे हल्ले झाले आहेत. उलटपक्षी बिबट्याचे हल्ले हे मानवी वस्तीनजीक घडलेले आहेत. महाराष्ट्रात वाघांचा अधिवास हा विदर्भ आणि मराठवाड्यापुरता मर्यादित आहे. सह्याद्रीच्या खोर्‍यात व्याघ्र अधिवास असला, तरी मानवावर वाघाने हल्ले केल्याचे एकही उदाहरण या परिसरात आजवर घडलेले नाही. याउलट राज्यात सर्वच वनक्षेत्रात बिबट्यांचा अधिवास आहे. नुकताच महाराष्ट्रात आकाराने सगळ्यात छोट्या असणार्‍या अभयारण्यात म्हणजेच सांगलीतील ’सागरेश्वर अभयारण्या’त बिबट्याचा वावर आढळून आला आहे. राज्यात बिबट्याचे सर्वाधिक हल्ले हे उसाचे पिकं घेतल्या जाणार्‍या प्रदेशात घडत आहेत. उसाच्या पिकाचा हंगाम हा वर्षभर असतो. त्यामुळे घनदाट वाढणार्‍या उसाच्या उंच शेतात आसरा मिळविणे बिबट्याला सहज शक्य होते. शिवाय त्याठिकाणी पाणी आणि रानडुक्कर, कुत्र्यांसारखे भक्ष्यदेखील मिळत असल्याने बिबट्याला राहण्यासाठी योग्य अधिवास निर्माण होतो. अशावेळी ऊस कापणीच्या वेळी मानवावर हल्ले घडतात. त्यामुळे वन्यजीवांचे अस्तित्व संरक्षित वनक्षेत्रांमध्येच मर्यादित ठेवण्यासाठी उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. यामध्ये संरक्षित वनक्षेत्रांमधील गावांचे पुनर्वसन करुन त्याठिकाणी वन्यजीवांसाठी अधिवास निर्माण करणे गरजेचे आहे. पूर्ण वाढ झालेला वाघ किंवा बिबट्या हा आपली स्वतंत्र हद्द निर्माण करण्यासाठी वनक्षेत्राबाहेर पडतो. अशावेळी त्याचा भ्रमणमार्ग सुरक्षित असणे आवश्यक आहे. शिवाय वन्यजीवांचे स्थानांतरण हादेखील एक पर्याय आहे. परंतु, या पर्यायामध्ये भक्ष्य, वन्यजीवांसाठी उपलब्ध असलेले क्षेत्र, त्याच कुळातील त्याठिकाणी असलेल्या प्राण्यांच्या संख्येचा विचार करावा लागतो.
@@AUTHORINFO_V1@@