वनसेवेतील नवा गडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Nov-2020   
Total Views |

forest office _1 &nb


मोबाईल नेटवर्कसारख्या तंत्रज्ञानाचा लवलेशही नसणार्‍या मेळघाटमधील दुर्गम भागात वनसेवेचे काम करणारे वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल रमेश चौधरी यांच्याविषयी...

 
 
मेळघाटाच्या कुवार जंगलातील वनसंपत्तीचे रक्षण करणारा हा माणूस. रानवाटांवरील वन्यजीवांचा मागोवा घेऊन त्यांच्या संवर्धनासाठी झटणारा. मेळघाटासारख्या दुर्गम भागात वनसंपत्तीवर अवलंबून असलेल्या समाजाच्या हिताचा विचार करणारा. वन विभागात नवखा अधिकारी असल्याने चुकलेल्या गोष्टींमधून शिकणारा. संयमीपणे निर्णय घेणारा. निसर्गसंपत्तीचे पावित्र्य राखून तिचा आदर करणारा. महत्त्वाचे म्हणजे, तिचे जतन करण्यासाठी सतत धडपडणारा आणि लोकमनाशी जोडलेला हा वन अधिकारी म्हणजे हिरालाल चौधरी.
 
 
हिरालाल यांचा जन्म सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या खेतिया या वनवासीबहुल भागात दि. ९ डिसेंबर, १९८७ साली झाला. जन्मच सातपुड्याच्या रानवट जंगलामध्ये झाल्याने लहानपणापासून निसर्ग त्यांना खुणावत होता. त्यांचे वडील रेल्वे विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत होते, तर आई गृहिणी. अशा मध्यमवर्गीय वातावरणात शिक्षणाची भूक असल्याने हिरालाल यांनी आपले शालेय पूर्ण केले. चाळीसगावमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना शैक्षणिक भूक स्वस्थ बसू देत नव्हती. त्यासाठी त्यांनी पुणे गाठले. येथील पुणे विद्यार्थी गृह संस्थेमधून मुद्रण तंत्रज्ञान विषयात पदवी मिळवली. पुढे त्याच संस्थेतून अभियांत्रिकेची पदवी प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक प्राप्त करुन मिळवली.
 
 
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हिरालाल एका खासगी कंपनीत रुजू झाले. दीड वर्षे त्यांनी त्या ठिकाणी नोकरी केली. मात्र, यादरम्यान त्यांना निसर्ग खुणावत होता. वन विभागात काम करण्याची इच्छा त्यांना शांत बसू देत नव्हती. त्यामुळे पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षांची तयारी करुन ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’ची परीक्षा देण्याची तयारी त्यांनी सुरू केली. या परीक्षेचा अभ्यास करताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधून ‘मानव संसाधन’ विषयात एमबीए पूर्ण केले. सोबतच ‘नेट’ आणि ‘सेट’ परीक्षा ‘जेआरएफ’ घेऊन उत्तीर्ण झाले. २०१६ साली ते महाराष्ट्र वनसेवेची स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाले. त्याचवेळी त्यांना ओएनजीसी कंपनीमध्ये मानव संसाधन पदावर नोकरी करण्याची संधी चालून आली. मात्र, वनसेवेची नोकरी हा ध्यास असल्याने त्यांनी वन विभागात नोकरी करण्याचा निर्णय अंतिम केला.
 
 
सुंदरनगर, हिमाचल येथे २०१६ ते २०१८ दरम्यान हिरालाल यांचे वन विभागाचे प्रशिक्षण पूर्ण झाले. जानेवारी, २०१८ मध्ये त्यांची नियुक्ती मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील ढाकणा वनपरिक्षेत्रात वनक्षेत्रपाल म्हणून झाली. वनवासीबहुल क्षेत्र असणार्‍या या भागात काम करणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक होते. कारण, जंगलांवर अवलंबून असणार्‍या समाजाची संख्या जास्त असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न होता. मात्र, हिरालाल यांनी शांतपणे या वनपरिक्षेत्राचा अभ्यास केला. शिकारी, अवैध वनचराई, अतिक्रमण, वन संसाधनांची तस्करीची समस्या जाणून घेतली. मानव संसाधनामध्ये शिक्षण घेतल्याने गटाने काम करण्याची शैली त्यांना अवगत होती. शिवाय लोकसहभागामधून समस्येचे निराकरण करण्याचे तंत्रही त्यांना अवगत होते. त्याच गोष्टींच्या बळावर त्यांनी कामाला सुरुवात केली.
 
 
हिरालाल यांच्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच गाभा क्षेत्रातील डोलार गावाचे पुनर्वसन झाले. गाव स्थलांतरित केल्याने येथील जागेवर कुरण विकासाचे प्रकल्प राबवून तृणभक्षी प्राण्यांचा अधिवास तयार करण्यात आला. त्यानंतर प्रशासनाच्या आदेशानंतर या परिसरात एका वाघिणीचे स्थानांतरण करण्यात आले. मात्र, काही दिवसांमध्येच वाघिणीचे मानवी हल्ले सुरू झाले. दोन व्यक्तींवर हल्ले केल्यानंतर लोकांच्या मनात वाघिणीविषयी विरोध वाढत होता. अशा परिस्थितीत संयमीपणा दाखवून हिरालाल यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाअंतर्गत सुखरुपपणे वाघिणीला पुन्हा जेरबंद केले.
 
 
त्यांच्या ढाकणा परिक्षेत्रातील बोथरा हे गाव ‘पाणी फाऊंडेशन’च्या ‘वॉटर कप’ स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. यावेळी हिरालाल यांनी गावकर्‍यांना पाठिंबा दिला. गावकर्‍यांनी आपल्या घरातील धान्य आणून वनभोजनाची संकल्पना राबविली. यावेळी हिरालाल यांनी गावकर्‍यांसोबत स्वत: पंक्तीमध्ये बसून जेवण केले. स्पर्धेतील प्रत्येक कामासाठी ते गावकर्‍यांच्या मागे उभे राहिले. सरतेशेवटी या स्पर्धेत बोथरा गावाला 15 लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले. केवळ लोकसहभागामधूनच हे शक्य झाल्याचे ते सांगतात. इथला वनवासी समाज हा जंगलावर अवलंबून असल्याने त्यांना पर्यायी रोजगार देण्याची जाण हिरालाल यांना आहे. शिवाय त्यांच्या प्राथमिक गरजाही पूर्ण करण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. ‘डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वनधन योजने’अंतर्गत विविध सुविधा उपलब्ध करुन त्यांनी येथील वनवासी समाजाला आधार दिला आहे. पाण्याची सोय, सौरदिवे, एलपीजी गॅसचे वाटप यांसारख्या योजना राबविल्या आहेत. क्षेत्रीय कर्मचारी आणि गावकऱ्यांना सोबत घेऊन वन वणव्यांचे नियोजन करण्यातही त्यांना यश मिळाले आहे. 
 
 
कोविड काळातही येथील वनवासी बांधवांवर उपासमारीची वेळ आली होती. अशा वेळी त्यांनी सेवाभावी संस्थांना हाती घेऊन या भागात अन्नधान्याचे वाटप केले. आरोग्य शिबिरांचे आयोजन केले. सिकल सेल अ‍ॅनेमियासारख्या आजाराचे निदान झालेल्या वनवासी बांधवांना पुढील उपचारासाठी मदत केली. या काळात त्यांनी एक दिवसही सुट्टी न घेता वनसंवर्धनाबरोबरच लोकहिताचेही काम केले. सध्या ते आपल्या वनपरिक्षेत्रामध्ये निसर्ग पर्यटनाचा विकास करुन त्याव्दारे स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याशिवाय येथील स्थानिक तरुणांसाठी 'मेळघाट व्याघ्र प्रकल्प प्रतिष्ठाना'मार्फत हाॅटेल मॅनेजमेंट, चारचाकी दुरुस्ती, जेसीबी प्रशिक्षण, विद्युत उपकरण दुरुस्ती अशा विविध कोर्सेस राबवून त्यांच्या हाताला काम देण्याचे प्रयत्न ते करत आहेत. या कामासांठी हिरालाल यांना मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक रेड्डी आणि उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांचा पाठिंबा मिळत आहे. वनसंवर्धनाच्या कामात जीव लावून काम करणार्‍या अशा नवख्या तरुण अधिकार्‍यांची आज आपल्यापेक्षाही आपल्या जंगलांना गरज आहे. त्यांना पुढील वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा! 

@@AUTHORINFO_V1@@