वाघांची संख्या वाढवण्यासाठी सह्याद्रीत वन कर्मचाऱ्यांना कुरण विकासाचे धडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Nov-2020   
Total Views |

tiger_1  H x W:


'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'त कुरण विकास कार्यशाळेचे आयोजन 

मुंबई (अक्षय मांडवकर) - 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'त गवताळ अधिवासाच्या नवनिर्मितीसाठी विशेष प्रयत्न सुरू झाले आहेत. याकरिता वन कर्मचाऱ्यांना गवताळ प्रजातींचे नियोजन आणि त्या अधिवासाच्या निर्मितीचे शास्त्रीय प्रशिक्षण देण्याचे काम सुरू झाले आहे. या प्रकल्पामध्ये वाघांचे भक्ष असणाऱ्या चितळसारख्या तृणभक्षी प्राण्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे ही संख्या वाढविण्याच्या दृष्टीने वन विभागाने जाणीवपूर्वक त्यांच्यासाठी पोषक असणाऱ्या अधिवासाच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 
 
 
'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'तील वाघांच्या अधिवासाबद्दल बऱ्याचदा शंका व्यक्त करण्यात येते. मात्र, जुलै, २०२० मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'व्याघ्र गणना अहवाला'नुसार या प्रकल्पामध्ये केवळ तीन वाघ असल्याचे म्हटले होते. त्यामुळे प्रकल्पातील वाघांची संख्या वाढविण्यासाठी प्रशासनाने पु्न्हा एकदा प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. छोट्या तृणभक्षी प्राण्यांच्या कमतरतेमुळे या प्रकल्पामध्ये वाघ कायमस्वरुपी अधिवास करत नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे प्रकल्पात तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने त्यांच्यासाठी पोषक असलेला गवताळ अधिवासाच्या निर्मितीकडे आम्ही जोर दिल्याची माहिती राज्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव (पश्चिम) सुनिल लिमये यांनी दिली. यासाठी गेल्या आठवड्यात प्रकल्पातील कोयना अभयारण्य आणि चांदोली राष्ट्रीय उद्यानात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये वनकर्मचाऱ्यांना गवताळ प्रजातींचे नियोजन आणि अधिवास निर्मितीच्या अनुषंगाने प्रशिक्षण देण्यात आले. 'मेळघाट व्याघ्र प्रकल्पा'त गवताळ अधिवासाच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे प्रा.गजानन मुरतकर यांनी या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन केले. 
 
 
 
गवताळ प्रजातींची खाद्य आणि अखाद्य वनस्पतींमध्ये विभागणी होते. यामधील खाद्य वनस्पती तृणभक्षी प्राण्यांच्या आहारामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांना या खाद्य वन्सपतींची ओळख करुन देण्याबरोबरच खाद्य गवत प्रजातींचे संगोपन आणि त्यांची पुनर्लागवड करण्यासंदर्भात प्रशिक्षण देण्य़ासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विभागीय वन अधिकारी विशाल माळी यांनी दिली. प्रकल्पामधील कोयना,चांदोली आणि राधानगरी वनक्षेत्रात चितळांसारख्या छोट्या तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढण्यासाठी सागरेश्वर अभयारण्यातून त्यांचे स्थानांतरण करण्यात येणार आहे. तत्पूर्वी या तृणभक्षी प्राण्यांच्या वाढीसाठी पोषक असलेली गवताळ परिसंस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील असल्याचे, त्यांनी सांगितले. येत्या काही दिवसांमध्ये राधानगरी आणि सागरेश्वर अभयारण्यातही या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे.
 
 
 
सह्याद्रीमध्ये नैसर्गिकरित्या खाद्य गवत वनस्पतींची संख्या जास्त असल्याने नैसर्गिक कुरणांचे क्षेत्रफळ कसे वाढेल, याकडे लक्षण देणे आवश्यक असल्याचे मत प्रा. गजानन मुरतकर यांनी व्यक्त केले. याशिवाय मानवनिर्मित कुरण क्षेत्रामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने देखील शासन स्तरावर कुरण विकास प्रकल्पांकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सह्याद्रीसारख्या अतिवृष्टी होणाऱ्या परिसरामध्ये सदाहरित जंगलांची मोठ्या प्रमाणात वाढ होते. या वाढीमुळे कुरणांच्या वाढीस मर्यादा येतात. त्यामुळे राधानगरीसारख्या वनक्षेत्रात नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कुरण क्षेत्राचे संवर्धन महत्त्वाचे असल्याची माहिती व्याघ्र संशोधक गिरीश पंजाबी यांनी दिली. तृणभक्षी प्राण्यांची आहाराची गरज भागविण्यामध्ये गवताळ प्रदेश निर्णायक ठरतात. या प्राण्यांची संख्या न वाढल्यास वाघासारख्या मासांहारी प्राण्याच्या अधिवासावर त्याचा परिणाम पडत असल्याचे, पंजाबी यांनी नमूद केले.
@@AUTHORINFO_V1@@