बोरिवली नॅशनल पार्कमध्ये नव्या वाघिणीची डरकाळी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Nov-2020   
Total Views |

tiger_1  H x W:


नव्या वाघिणीची स्वारी चंद्रपूरहून मुंबईकडे रवाना 

मुंबई (अक्षय मांडवकर) - बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'तील 'व्याघ्र विहारा'मध्ये नव्या वाघिणीची डरकाळी ऐकू येणार आहे. राष्ट्रीय उद्यानाचे वन्यजीव बचाव पथक आज दुपारी चंद्रपूरहून ११ महिन्यांच्या वाघिणीला घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहेत. रविवारी सकाळी ही वाघीण नॅशनल पार्कमध्ये दाखल होईल. येथील 'सुलतान' नामक वाघाला जोडीदार म्हणून या वाघिणीला आणण्यात येत आहे. 
 
 
 
बोरिवली नॅशनल पार्कमधील व्याघ्र सफारीला चालना देण्याच्या दृष्टीने नव्या वाघिणीचे आगमन होणार आहे. सद्यस्थितीत येथील व्याघ्र विहारामध्ये 'बिजली' (९), 'मस्तानी' (९) आणि 'लक्ष्मी' (१०) या तीन वाघिणींसोबत 'सुलतान' (५) या नर वाघाचा अधिवास आहे. 'सुलतान' या नर वाघाचे 'मस्तानी' आणि 'बिजली' वाघिणींसोबतचे प्रजननाचे प्रयत्न अयशस्वी ठरले. त्यामुळे उद्यान प्रशासनाने वन विभागाकडे /या माद्यांना जोडीदार म्हणून एक प्रौढ वाघ आणि 'सुलतान'साठी वाघीण देण्याची मागणी केली होती. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत चंद्रपूरहून ११ महिन्यांच्या वाघिणीला मुंबईला पाठविण्यात आले आहे.
 
 
 
बोरिवली राष्ट्रीय उद्यानाचे पथक या वाघिणीला घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले असून रविवारी ते राष्ट्रीय उद्यानात दाखल होईल, अशी माहिती उद्यानाचे संचालक आणि वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'ला दिली. ही मादी लहान असल्याने तिला व्याघ्र सफारीत ठेवले जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय ती प्रजननक्षम झाल्यानंतरच 'सुलतान'सोबत तिचे प्रजनन घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
 
एप्रिल महिन्यात चंद्रपूरमधील चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील सुशी डाबगावमध्ये एक गोठ्याशेजारी ही वाघीण बेवारस अवस्थेत वन कर्मचाऱ्यांना सापडली होती. त्यावेळी तिचे वय अंदाजे तीन महिने होते. या मादी पिल्लांच्या संरक्षणार्थ वन कर्मचाऱ्यांनी तिला ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील तीन दिवस या पिल्लाला तिच्या आईकडे सुपूर्द करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, हे प्रयत्न अयशस्वी ठरले. भारतात पहिल्यांदा प्रयत्न करुन गुणसूत्र (डीएनए) चाचणीच्या आधारे देखील या पिल्लांची आई शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, त्यामध्येही यश न मिळाल्याने सरतेशेवटी या पिल्लाची रवानगी 'वन्यजीव निवारा केंद्रा'मध्ये करण्यात आली. तेव्हापासून ही वाघीण चंद्रपूरच्या 'वन्यजीव निवारा केंद्रा'त होती.

@@AUTHORINFO_V1@@