अमेरिकेत महिलांचा कौल कोणाला?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Nov-2020   
Total Views |

Donald Trump_1  


 
सुदूर राज्यांमधील अगदी लहानात लहान आणि कमीत कमी मतदार असलेल्या भागांमध्येही ट्रम्प यांनी त्यांचे हे प्रचार अभियान अतिशय आक्रमकतेने राबविण्यावर विशेष जोर दिला. त्यातही महिला मतदारांना प्रभावित करू शकणार्‍या आणि त्यांच्या मनात बायडन - डेमोक्रेटिक पक्षाविषयी नकारात्मकता कशी निर्माण होईल, असा प्रचाराचा सूर ठेवण्यात आला. त्यासाठी बायडन यांच्या स्वस्त घरे योजनेला लक्ष्य करण्यात आले.
 
 
अमेरिकेत १९८४ नंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीप्रमाणे २०१६ सालच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतही पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या मतदानाची टक्केवारी जास्त होती, पुरुषांची टक्केवारी ५३.८ टक्के, तर महिलांची ५८.१ टक्के होती. महिलांच्या मतदानाची वाढीव टक्केवारी हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचे एक प्रमुख कारणही ठरले होते. त्यातही गौरवर्णीय महिलांच्या मोठ्या गटाने हिलरी क्लिटंन यांच्यापेक्षाही डोनाल्ड ट्रम्प यांना एकमुखी पाठिंबा दिला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत प्रचार करताना ट्रम्प यांनी नव्या मतदारांना आकर्षित करण्यापेक्षा जुन्याच महिला मतदारांना मतदानासाठी जास्तीत जास्त प्रोत्साहित करण्यावर अधिक भर दिल्याचे दिसून आले, तर जो बायडन यांनी २०१८ साली झालेल्या मध्यावधी निवडणुकीच्या अनुभवावरून आपल्या प्रचाराची दिशा ठरविण्यास प्राधान्य दिले आहे.
 
 
सत्तेत आल्यानंतर ट्रम्प यांना महिला मतदारांच्या मिळालेल्या पाठिंब्यावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. कारण, त्यांच्या कार्यकाळाच्या पहिल्या दोन वर्षांचा अभ्यास केल्यावर असे आढळून आले की, त्यांना मिळालेल्या पाठिंब्यामध्ये महिला आणि पुरुष यांच्या सरासरी मतदानामध्ये जवळपास १३ टक्क्यांची तफावत होती. त्यामुळेच २०१८ सालच्या प्रतिनिधी सभेच्या नियंत्रणासाठी झालेल्या मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाला गौरवर्णीय महिलांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळून ते विजयी झाले होते. यामध्ये कृष्णवर्णीय महिलांचाही पाठिंबा मिळविण्यात डेमोक्रेटिक पक्षाला यश आले होते. त्यामुळे बायडन यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणनीती ठरविताना गौरवर्णीय नोकरदार महिलांसोबतच अन्य महिला मतदारांकडेही विशेष लक्ष दिले आहे. अर्थात, राष्ट्रध्यक्षपदाची निवडणूक ही भिन्न असते आणि त्यामुळे प्रतिनिधी सभेच्या निवडणुकीची रणनीती तेथे यशस्वी ठरेल, असे ठामपणे सांगता येत नाही. मात्र, बायडन यांनी शहरी उपनगरांमध्ये राहणार्‍या १४ टक्के ज्येष्ठ नागरिक महिला, आफ्रिकी-अमेरिकी महिला आणि वय वर्षे ३० हून कमी वयाच्या महिलांवर विशेष लक्ष केंद्रित करून त्यांचा जास्तीत जास्त पाठिंबा मिळविण्यावर भर दिला आहे.
 
 
बायडन आणि डेमोक्रेटिक पक्षाने कोरोनाविरोधात ट्रम्प प्रशासनाला आलेले अपयश, कायदा आणि सुव्यवस्थेची गंभीर स्थिती आणि वर्णभेद या विषयांवरून रिपब्लिकन पक्षाविरोधात धारदार प्रचाराची राळ उडवून दिली. त्यामुळे ट्रम्प आणि मंडळी त्याला प्रत्युत्तर देण्यात अडकल्यावर बायडन यांनी आपले लक्ष महिला मतदारांवर केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. ट्रम्प यांनी अमेरिकन महिलांची निराशा केली आहे, अशी घोषणा देऊन ट्रम्प प्रशासनाने महिलांची गळचेपी करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रचार आक्रमकपणे सुरू केला. त्याचप्रमाणे रिपब्लिकन समर्थकांनाही फारशा न रुचलेल्या ‘व्हाईट हाऊस कौन्सिल ऑन वुमेन्स अ‍ॅण्ड गर्ल्स’ या धोरणाविरोधातही बायडन यांनी प्रचार केला. त्यामुळे ट्रम्प हे महिलाविरोधी आहेत, असा समज पसरविण्यात बायडन यांना काही प्रमाणात यश आल्याचे सांगता येते. त्यासाठी त्यांनी आपल्या पक्षातील महिला नेत्या कमला हॅरिस, नॅन्सी पॅलोसी, वेलेरी जेरेट यांना प्रचारात आघाडीवर उतरविण्याचीही खेळी केली.
 
 
त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ट्रम्प यांनी ‘वुमन फॉर ट्रम्प’ हे विशेष प्रचार अभियान राबविले. त्यातही प्रामुख्याने महिलांना जास्तीत जास्त प्रमाणात मतदानासाठी बाहेर काढण्यावर भर देण्यात आला. सुदूर राज्यांमधील अगदी लहानात लहान आणि कमीत कमी मतदार असलेल्या भागांमध्येही ट्रम्प यांनी त्यांचे हे प्रचार अभियान अतिशय आक्रमकतेने राबविण्यावर विशेष जोर दिला. त्यातही महिला मतदारांना प्रभावित करू शकणार्‍या आणि त्यांच्या मनात बायडन - डेमोक्रेटिक पक्षाविषयी नकारात्मकता कशी निर्माण होईल, असा प्रचाराचा सूर ठेवण्यात आला. त्यासाठी बायडन यांच्या स्वस्त घरे योजनेला लक्ष्य करण्यात आले. बायडन यांच्या या योजनेमुळे प्रामुख्याने उपनगरातील कायदा व सुव्यवस्था आणि महिला सुरक्षा धोक्यात येईल, असा दावा ट्रम्प यांच्यातर्फे करण्यात आला.
 
 
अर्थात, महिला मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी दोन्ही पक्षांनी कोणतीही कसूर सोडलेली नाही. मात्र, त्याचा कितपत परिणाम होते ते आज होणार्‍या मतदानामध्ये लक्षात येईलच. त्यामुळे महिलांचा कौल प्राप्त करण्यात ट्रम्प पुन्हा एकदा यशस्वी ठरले, तर सत्तासोपान चढण्याचा त्यांचा मार्ग सुकर होणार आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@