ससाणा पक्ष्यांची कमाल! पाच दिवस न थांबता मणिपूरहून आफ्रिकेत स्थलांतर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2020   
Total Views |
bird _1  H x W:


'डब्लूआयआय'च्या शास्त्रज्ञांनी केला उलगडा 

मुंबई (अक्षय मांडवकर) - पाच दिवस न थांबता मणिपूर ते आफ्रिकेतील सोमालियापर्यंत दोन ससाणा (अमूर फाल्कन) पक्ष्यांनी स्थलांतर केले आहे. महत्त्वाचे म्हणजे या स्थलांतरादरम्यान दोन्ही पक्ष्यांनी अरबी समुद्रावरुन उड्डाण करुन अंदाजे ५ हजार ७०० किमीचा प्रवास पू्र्ण केला आहे. 'भारतीय वन्यजीव संस्थान'च्या (डब्लूआयआय) शास्त्रज्ञांनी या पक्ष्यांच्या शरीरावर लावलेल्या 'सॅटेलाईट टॅग'मुळे ही माहिती समोर आली.
 
 
 
 
लांब पल्ल्याचे स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांच्या उड्डाण मार्ग आणि या मार्गावरील पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास करण्यासाठी २०१६ साली 'डब्लूआयआय'च्या संशोधकांनी 'केंद्रीय पर्यावरण विभागा'च्या परवानगीने ससाणा पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास सुरू केला. त्यासाठी काही ससाणा पक्ष्यांना 'सॅटेलाईट टॅग' लावण्यात आले होते. या उपकरणाच्या माध्यमातून आता ससाणा पक्ष्यांच्या स्थलांतराची अचंबित करणारी माहिती समोर येत आहे. या संशोधन प्रकल्पाअंतर्गत नोव्हेंबर, २०१९ मध्ये दोन ससाण्यांना टॅग लावण्यात आले. त्यांची नावे अनुक्रमे 'शिऊलोन' आणि 'इराॅंग' अशी ठेवण्यात आली. या पक्ष्यांनी १२ नोव्हेंबर रोजी मणिपूरहून आफ्रिकेच्या दिशेने आपल्या हिवाळी स्थलांतरास सुरुवात केली. पाच दिवस कोठेही न थांबता या पक्ष्यांनी १६ आणि १७ नोव्हेंबर रोजी आफ्रिकेतील सोमालियाचे वाळवंट गाठले. 
 
 
 
मणिपूर ते सोमालियादरम्यान प्रवासात 'शिऊलोन' पक्ष्याने ५ हजार ७०० किमी आणि 'इराॅंग'ने ५  हजार ४०० किमीचे अंतर पार केल्याची माहिती 'डब्लूआयआय'चे वरिष्ठ शास्त्रज्ञ आर. सुरेश कुमार यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. या प्रवासात हे दोन्ही पक्षी कुठेही थांबले नाहीत. त्यांनी न थांबता अरबी समुद्रावरील साधारण १ हजार ३५५ किमीचे अंतरही कापल्याचे त्यांनी सांगितले. नोव्हेंबर, २०१९ मध्ये या पक्ष्यांना टॅग केल्यानंतर आफ्रिकेतील हिवाळी स्थलांतराचा त्यांचा हा दुसरा टप्पा आहे. उत्तर चीनमध्ये प्रजनन करुन ससाणा पक्षी हिवाळ्यासाठी आफ्रिकेत स्थलांतर करतात. यादरम्यान ते भारतातील नागालॅंड आणि मणिपूर या राज्यांमध्ये आरामासाठी थांबतात. यावेळी शास्त्रज्ञांकडून या पक्ष्यांना 'सॅटलाईट टॅग' लावण्यात येतात.

 
@@AUTHORINFO_V1@@