कोणी घर घेता का घर?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2020   
Total Views |

HW_1  H x W: 0
 




इतर उद्योगधंद्यांबरोबरच कोरोनाची सर्वाधिक झळ बसली ती बांधकाम क्षेत्रालाही. कोरोनापूर्वीच काहीसे मरगळलेल्या या क्षेत्राची या महामारीच्या काळात अधिकच बिकट अवस्था झाली. परिणामी, घरांच्या किमतीही काहीशा घसरल्याने बांधकाम क्षेत्रालाही चालना मिळाली. तेव्हा, खरंच आताच्या घडीला घर खरेदी करावे का? त्याचा फायदा होईल का? आणि एकूणच बांधकाम क्षेत्राची देशभरातील सद्यस्थिती काय, याचा आढावा घेणारा हा लेख...
 
 
 
 
खरं तर कोरोनाचा प्रवेश भारतात होण्यापूर्वीपासूनच बांधकाम उद्योग आर्थिक अडचणीत होता. बर्‍याच सदनिका/घरे बांधून न विक्री न होता पडून होती. पण, कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर बांधकाम उद्योग प्रचंड अडचणीत आला. पण, आता बांधकाम क्षेत्राकडे ग्राहकांची पावले परत वळू लागली आहेत. तेव्हा, जुलै ते सप्टेंबर २०२० या कालावधीचे घरखरेदीचे आकडे मात्र बांधकाम उद्योजकांना नक्कीच आनंद देऊन गेले. तसेच सध्याच्या ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीतही या उद्योगाला चालना मिळाल्याचे चित्र आहे.
 
 
 
 
दरम्यान, केंद्र सरकारने बांधकाम उद्योग भरभराटीस यावा(कारण या उद्योगामुळे रोजगारनिर्मिती फार मोठ्या प्रमाणावर होते) म्हणून गेल्या आठवड्यात पंतप्रधान आवास योजनेसाठी १८ हजार कोटी रुपये संमत केले. याशिवाय बांधकाम उद्योजक व सदनिका खरेदीदार यांच्यासाठी आयकर सवलतदेखील जाहीर केली. घरांची विक्री आणि घरांची नोंदणी यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये मुंबईत ७ हजार, ९२९ घरांच्या खरेदी-विक्रीची नोंदणी झाली. ऑक्टोबर २०१९च्या तुलनेत यात ३६ टक्के वाढ झाली. मुंबईत झालेल्या नोंदणीची संख्या गेल्या आठ वर्षांतील सर्वाधिक संख्या आहे.
 
 
 
 
या क्षेत्रातील जाणकरांच्या मते, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० या कालावधीत प्रमुख शहरांत या अगोदरच्या तिमाहीच्या तुलनेत घरविक्रीत ३३ टक्के वाढ होऊ शकेल, तर ऑक्टोबर-डिसेंबर २०१०च्या तुलनेत ६६ टक्के वाढ होऊ शकेल. लोक मुंबईत नव्हे, तर भारतभर घर खरेदी करण्यासाठी उत्सुकता दाखवित आहेत आणि घरे विकतही घेत आहेत. ‘एचडीएससी’च्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर २०२० मध्ये ऑक्टोबर २०१९च्या तुलनेत कर्ज मंजुरीच्या आकडेवारीत ५८ टक्के वाढ झाली, कर्ज वितरणात वर्षाचा विचार करता, ३५ टक्के वाढ झाली असून ही वाढ ‘एचडीएफसी’च्या इतिहासात आतापर्यंतची दुसर्‍या क्रमाकांची सर्वोत्तम वाढ आहे.
 
 
 
 
घरांचा शोध घेणार्‍यांचे किंवा घरांची माहिती काढणार्‍यांच्या संख्येत कोरोनाच्या अगोदरच्या तुलनेत ३० ते ४० टक्के वाढ झाली आहे. सध्या बांधकाम उद्योजकांकडून वेगवेगळ्या सवलती जाहीर केल्या जात आहेत. बांधकाम उद्योजकांची बांधून तयार झालेली घरे विकली जावीत म्हणून हे उद्योजक ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना जाहीर करीत आहेत. सध्या घर खरेदी बाजारपेठ ही ‘ग्राहकांची बाजारपेठ’ झाली आहे. ग्राहकाकडे घर खरेदीचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. गृहकर्जे देण्यासाठी बर्‍याच कंपन्या बाजारात आहेत. केंद्र सरकार व रिझर्व्ह बँकने प्रयत्नपूर्वक गृहकर्जांवरील व्याजाचे दर खाली आणले आहेत.
 
 
 
 
याशिवाय सामान्यांसाठी ‘पंतप्रधान आवास योजना’ हा पर्यायही उपलब्ध आहे. या पार्श्वभूमीचा विचार करता, गरजूंनी घर खरेदीसाठी ही योग्य वेळ आहे, हे योग्य वातावरण आहे, असे समजण्यासारखी परिस्थिती आहे. सध्या बांधकाम उद्योजक जाहीर केलेल्या किमतीपेक्षा ५ ते १५ टक्के रक्कम कमी करुन घरे विकत आहेत. बांधून तयार असलेली, पण विक्री न झालेली घरे फार मोठ्या प्रमाणावर पडून असल्यामुळे येत्या काही वर्षांत सध्याच्या पातळीवर ज्या घरांच्या किमती आहेत, त्यात वाढ होणे शक्य नाही. तसेच भाव बरेच खाली येण्याची शक्यताही नाही. जुलैमध्ये घर विकत घेण्यास इच्छुक असलेल्यांपैकी ७३ टक्के जणांची मागणी हे जाहीर केलेले भाव बरेच खाली यावेत, अशी होती. पण, ऑक्टोबरमध्ये हे प्रमाण कमी होऊन ४३ टक्क्यांवर आले.
 
 
 
 
शासनानेही घरविक्री वाढावी, बांधकाम उद्योग आर्थिक मंदीतून बाहेर यावा म्हणून ‘स्टॅम्प ड्युटी’ कमी करुन आपले उत्पन्न कमी केले आहे. ‘स्टॅम्प ड्युटी’ व सदनिका नोंदणीचे दर प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहेत. महाराष्ट्र राज्याने मालमत्ता मूल्यांच्या पाच टक्के असलेली ‘स्टॅम्प ड्युटी’ सप्टेंबर ते डिसेंबर २०२० या कालावधीसाठी पाच टक्क्यांवरुन दोन टक्के इतकी खाली आणली आहे व जानेवारी २०२१ ते मार्च २०२१ या कालावधीत ती तीन टक्के असेल. यामुळे घरविक्रीत वाढ झाल्याचे सांगितले जाते.
 
 
 
 
गृहकर्जावर सध्या सात टक्के व्याज आकारले जात आहे. एवढे कमी व्याज यापूर्वी कधीही आकारले गेले नव्हते. गृहकर्ज घेतल्यामुळे आयकरात मिळणार्‍या सवलतीचा विचार करता, ग्राहकाला बराच फायदा मिळतो. कमी व्याज दरामुळे ‘इएमआय’चा आकडा कमी झाला आहे. ग्राहकांसाठी तो सुसह्य झाला आहे. पाच वर्षांपूर्वी १५ वर्षांच्या ५० लाख रुपयांच्या गृहकर्जावर ५२ हजार, २११ रुपये मासिक हप्ता भरावा लागत होता. तो आता सुमारे ४४ हजार, ९४१ रुपये भरावा लागत आहेत. देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करता, गृहकर्जावरील व्याजदर नजीकच्या भविष्यात वाढण्याची अजिबात शक्यता नसून, व्याजदर आणखी कमी होण्याची मात्रा शक्यता आहे.
 
 
 
घरुन काम करण्यास सुरुवात झाली असल्यामुळे कित्येकांना मोठ्या घराची स्वप्ने पडू लागली आहेत. पती-पत्नी दोघेही ‘वर्क फ्रॉम होम’ करीत असतील व मुले ऑनलाईन शिक्षण घेत असतील, तर सध्याची घरे लहान पडू लागली आहेत. यामुळे शांतपणे काम करता यावे म्हणून कित्येक खरेदीदार घराला मोठी ‘बाल्कनी’ असलेल्या घरांना पसंती देत आहेत. बंगळुरूमध्ये तीन बेडरुम जागांची मागणी वाढली आहे, अशीच मागणी दिल्ली जवळील नोएडा, गाझियाबाद, मुंबई उपनगर, ठाणे व नवी मुंबई येथेही आहे.
 
 
 
तुम्ही जर ब्रोकरमार्फत घर खरेदी करणार असाल, तर ब्रोकर हा ‘रेरा रजिस्टर’ आहे याचा पुरावा पाहा. घर निवडण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या बांधकाम उद्योजकांचे प्रकल्प ‘ऑनलाईन सर्च’ करु शकता किंवा प्रत्यक्ष जाऊन पाहणी करु शकता. घर खरेदी करताना घराचे मूल्य, घराचे आकारमान, घराचे ठिकाण या बाबीही विचारात घ्याव्या लागतात.




TEXT _1  H x W:

@@AUTHORINFO_V1@@