महाराष्ट्राच्या समुद्रात वाढली जेलीफिशची संख्या; मच्छीमार का त्रस्तावले ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Nov-2020   
Total Views |

jellyfish_1  H

जेलीफिशच्या वाढत्या संख्येमुळे मासेमारीवर परिणाम 

मुंबई (अक्षय मांडवकर) - महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीनजीक वाढती जेलीफिशची संख्या मच्छीमारांसाठी डोकेदुखी ठरली आहे. जेलीफिशच्या वाढत्या अतिक्रमाणाचा थेट परिणाम मासेमारीवर होत आहे. त्यामुळे राज्याच्या किनारपट्टीवरील सर्वच भागांमधून जेलीफिशच्या वाढत्या त्रासाचा पाढा मच्छीमारांकडून वाचला जात आहे. 
 
 
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या सागरी परिक्षेत्रात जेलीफिशचे थवे मोठ्या संख्येने दिसत असल्याची माहिती मच्छीमारांकडून मिळत आहे. जेलीफिशच्या वाढत्या संख्येचा फटका हा मासेमारीला बसत असल्याची तक्रार मच्छीमार करत आहेत. सिंधुदुर्ग-रत्नागिरी येथील सागरी क्षेत्रात किनारपट्टीनजीक जेलीफिशची संख्या वाढल्यामुळे मासेमारी करणे मुश्किल झाल्याची माहिती मच्छीमार अक्षय हरम यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'ला दिली. किनारपट्टीनजीक केशरी रंगाच्या आणि ८ ते ९ मैल सागरी अंतरावर जांभळ्या रंगाच्या जेलीफिश दिसत आहेत. या जेलीफिशच्या आसपास मोठे मासे वावरत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून मासेमारी कमी होत असल्याचे हरम यांनी सांगितले. याचा फटका प्रामुख्याने ट्राॅलर, गील नेट आणि पर्ससीन जाळीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना बसला आहे. 
 
 

समुद्रातील जेलीफिशच्या वाढत्या संख्येमुळे मुंबई, ठाणे आणि पालघरचे मच्छीमारही त्रस्त असल्याची माहिती 'आॅल इंडिया पर्ससीन वेलफेअर असोसिएशन'चे अध्यक्ष गणेश नाखवा यांनी दिली. लाॅकडाऊनमुळे बंद असलेल्या मासेमारीचा चांगला परिणाम हा सागरी परिसंस्थेवर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सागरी पाण्यात मोठ्या संख्येने जेलीफिशची संख्या वाढल्याने मच्छीमारांच्या जाळ्यात माशांऐवजी जेलीफिशचे थवे येत असल्याचे नाखवा यांनी सांगितले. याविषयी सागरी जीवशास्त्रज्ञ स्वप्निल तांडेल यांनी सांगितले की, 'जेलीफिश हे लहान माशांच्या अंडी आणि माशांच्या पिल्लांना खातात. ज्यामुळे त्या सागरी भागातील माशांच्या साठ्यावर आणि त्यांच्या वाढीवर परिणाम होतो. त्याचप्रकारे, लहान माशांना भक्ष करणारे आणि व्यावसायिदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेले मोठे मासे देखील अन्नाच्या अभावामुळे त्या भागातून स्थलांतर करतात.' सध्या खोल समुद्रात आढळत असलेले जांभळ्या रंगाचे जेलीफिश हे 'काऊनड्' जेलीफिश असून किनारपट्टीलगत सापडणारी केशरी रंगाची जेलीफिश 'सेफिया' किंवा 'क्रायोसोरा' जातीमधील आहे. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@